प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०)
एकीकडे भारतात कोरोनाचे थैमान सुरू आहे. अन्य सर्व गोष्टींपेक्षा मानवी जीवन व मानवी अस्तित्व महत्त्वाचे ठरते आहे .असे दिसत असतानाच जात्यंध मानसिकतेच्या घटनाही समोर येत आहेत .गेल्या काही दिवसात नागपूर येथील अरविंद बनसोडे, पिंपरी चिंचवड येथील विराज जगताप यांच्या हत्या झाल्या.कारणे काहीही असली तरी माणूस मारण्याची पद्धत क्रूरपणे वाढत आहे हे स्पष्ट आहे .त्याच पद्धतीने दगडू सोनवणे या जळगाव जिल्ह्यातील व्यक्तीच्या घरावर हल्ला झाला .जालना येथे एका परिवाराला समूहाने येऊन मारहाण केली गेली. परभणीत शाळेत कोरांटाईन केले म्हणून महिला सरपंच व त्यांच्या कुटुंबियांनाच मारहाण करण्यात आली .उत्तरप्रदेशात मुलगा मंदिरात गेला म्हणून गोळ्या मारून ठार मारण्यात आले .अशा प्रकारच्या घटना संख्यात्मक वाढत आहेत.ही सारी उदाहरणे पाहिली की, आपण माणूस म्हणून जगायला लायक आहोत का ?हा प्रश्न उभा राहतो . जात आणि धर्म नावाची एक मनुष्यनिर्मित बाब आपल्याला क्रूर,खुनशी बनवत आहे का ? हा प्रश्न पडतो. भारतीय जातीव्यवस्था आणि आणि तिचे विश्लेषण गौतम बुद्धांपासून आंबेडकरांपर्यंत आणि बसवेश्वरांपासून महात्मा फुले यांच्यापर्यंत अनेकांनी केले आहे. विठ्ठल रामजी शिंदे,महात्मा गांधी यांच्यासह अनेकांनी या व्यवस्थेच्या दाहाचे अमानवी स्वरूप स्पष्ट केले आहे.
आपला देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटून गेल्यानंतरही आज समाजाची वाटचाल जातीअंता ऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसते आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी विविध पक्ष ,संघटना जात जाणिवा बळकट करण्याची कारस्थाने करत असतात.यासाठी समाजाला वेठीला धरतात. हे हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर जातीअंताचा विचार फार महत्त्वाचा ठरतो.
महात्मा फुल्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती विरोधात आवाज उठवला. जातिव्यवस्थेवर प्रहार केला .त्यांनी पुनर्विवाहाला दिलेल्या प्रोत्साहनातून विधवांच्या संततीच्या बालकाश्रमा पर्यंत केलेले उपक्रम हे जातीअंतासाठीची पावलेच मानावी लागतात. तुकाराम तात्या पडवळ यांच्या “जातीभेद विवेकसार” या पुस्तकाची महात्मा फुल्यांनी स्वतः दुसरी आवृत्ती काढली .’मी कोणत्याही व्यक्तीच्या हातचे अन्नग्रहण करीन ‘असे म्हणणार्या व तसे वागणाऱ्या महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःचा हौद खुला केला होता .विधवांच्या केशवपनाविरोधी ही त्यांनी आवाज उठवला होता. तसेच वैचारिक दस्यत्वातून समाजाची सोडवणूक करण्यासाठी ‘गुलामगिरी’ सारखा ग्रंथ लिहिला होता .कोणताही धर्म व धर्मग्रंथ ईश्वराने निर्माण केला नाही. इथला जातीभेद ,वर्णव्यवस्था ही माणसाने स्वार्थी हेतूने निर्माण केली आहे .हे जग निर्माण करणारा कोणी तरी निर्मिक आहे असेही त्यांनी सांगितले होते.
१९२८ साली आंतरराष्ट्रीय बंधुभाव परिषदेत महात्मा गांधी म्हणाले होते, दीर्घकाळ अभ्यास करून आणि फार दिवसांच्या अनुभवाने मी तीन सिद्धांत मांडले आहेत. १) सर्व धर्म सत्य आहेत. २)सर्व धर्मात काही चुका आहेत.३) माझ्या स्वतःच्या हिंदू धर्मा इतकेच इतर सर्व धर्मही मला प्रिय आहेत. असे स्पष्ट करून गांधीजीनी अस्पृश्यतेचे उच्चाटन ही स्वराज्याची पहिली पायरी असेल हे अधोरेखित केले होते. त्यांनी म्हटले होते, ‘हिंदू काचेच्या घरात राहत आहेत म्हणून, आपल्या मुसलमान शेजाऱ्यावर दगड फेकण्याचा त्यांना अधिकार नाही .दलित वर्गाशी आपण कसे वागलो ? अजून कसे वागत आहोत? हे पहा. ‘काफिर ‘ही संज्ञा जर निंदाव्यंजक असेल तर ‘चांडाळ ‘ही संज्ञा कितीतरी अधिक निंदाव्यांजक आहे. जागतिक धर्माच्या इतिहासात दलित वर्गासारखे दुसऱ्या कोणाला क्वचितच कोणी वागवले असेल. आणि अद्याप त्यांना तसेच वागवले जात आहे ही सर्वात कीव करण्यासारखी गोष्ट आहे. जाती टेंगूळ याप्रमाणे असून प्रगतीच्या मार्गातील धोंड आहेत, माणसातील उच्चनीचतेवर माझा विश्वास नाही ,असे स्पष्ट करून गांधीजींनी जातीय ऐक्य हीच विकासाची हमी आहे असे म्हटले होते. परस्परावलंबित्व हाच धर्म आहे हे सांगताना गांधीजी म्हणतात, माणसांमध्ये जी सामाजिक वृत्ती आहे तिचा तो पशूपासून वेगळा असल्याची खूण आहे ,हे आपण विसरू नये .स्वतंत्र असणे हा जर त्याचा विशेष अधिकार असला तर परस्परावलंबी असणे हा तितकाच त्याचा धर्म आहे. मी दुसर्या कोणावर अवलंबून नाही, मी स्वयंपूर्ण आहे असा दावा फक्त अहंकारी माणूसच करू शकेल ‘.
माणगाव परिषदेचे हे शताब्दीवर्ष आहे. २१ व २२ मार्च १९२० रोजी झालेल्या या परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष तर राजर्षी शाहू महाराज प्रमुख पाहुणे होते. त्यात राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाला अनेक आवाहने केली होती .आपल्या करवीर संस्थानात अस्पृश्यांवर अन्याय करणारी हजेरीची पद्धत का नष्ट केली हेही सांगितले होते .आणि वेठबोगरी नष्ट करण्याचाही मनोदय व्यक्त केला होता.अस्पृश्यवर्गा करता राजश्रीनी दिलेले योगदान बाबुराव यादव यांनी एका पुस्तिकेत नोंदवल्या बद्दल त्यांचे आभार मानले होते .अस्पृश्यांना माणसाप्रमाणे वागवल्याशिवाय राजकारण करता येणार नाही ही भूमिका त्यांनी मांडली होती.
१९१६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ भारतातील जातीसंस्था, तिची यंत्रणा ,उत्पत्ती आणि विकास ‘ हा लेख लिहिला होता .त्याद्वारे त्यांनी जातीसंस्थेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. जातीसंस्था ही मानवनिर्मित असून ती कृत्रिम आहे. जातीबध्द विवाहसंस्था हा तिचा मुख्य आधार आहे हे त्यांनी स्पष्ट केले. अनुकरणाचा संसर्गदोष हा सिद्धांत त्यांनी मांडला .त्यांच्या मते ‘जगातील सर्व समाज हे वर्गीय समाज होते. या वर्गाचा आधार आर्थिक, भौतिक व सामाजिक होता. समाजातील व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी वर्गाची घटक असते. ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता .भारत सोडून अन्यत्र समाजातील वर्ग मुक्त राहिल्याने ते समाज परिवर्तनीय राहीले.परंतु भारतात वर्ग बंदिस्त केले गेल्यामुळे जाती निर्माण झाल्या .जात म्हणजे बंदिस्त वर्ग होय .भारतीय समाजात वर्गाला बंदिस्त करण्याची प्रक्रिया तत्कालीन उच्चवर्णीयांनी सुरू केली.’
‘जातीचा उच्छेद ‘ या लेखामध्ये बाबासाहेबांनी जातीसंस्थेचे परखड विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही सुसंस्कृत समाजात श्रमविभागणी असते हे खरे. परंतु ती श्रमविभागणी श्रमिकांच्या जन्माभेदावर हवाबंद कप्पे तयार करणारी समाज व्यवस्था नसते .जातीसंस्था ही श्रमविभागणी नसून ती श्रमिकांचीही विभागणी असल्याने ती कृत्रिम आहे. त्यामुळे हिंदू जनसमुदाय समाज या संज्ञेस पात्र होऊ शकला नाही. हिंदू समाज म्हणजे विविध जातींचा पुंजका होय. हिंदू समाजाचे हे स्वरूप व्यक्तिविकासास आणि उत्पादन क्षमतेस मारक आहे .डॉ.आंबेडकरांचे हे विश्लेषण ध्यानात घेतलेले की विविध मार्गाने होणारी जातीय संमेलन आणि जात जाणिवा बळकट करण्याचे उपक्रम सामाजिक ऐक्याला कसे तडे देणारे आहेत ते स्पष्ट होते .अगदी कोरोना काळातही फिजिकल डिस्टनसिंग ऐवजी सोशल डिस्टनसिंग हा शब्द आणला गेला होता व आहे.
जाती संस्थेने बध्द असलेल्या समाजात एका नव्या प्रबोधन चळवळीची गरज डॉ.आंबेडकरांना वाटत होती.या प्रबोधनाची व्याप्ती सखोल असली पाहिजे ही त्यांची धारणा होती .जातिसंस्था नष्ट करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून आंतरजातीय विवाहाकडे डॉ.आंबेडकर पाहत होते. जातिसंस्था नष्ट करायची तर प्रथम धर्माचे आणि त्याच्या गुंतागुंतीचे स्वरूप समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. यातूनच त्यांनी धर्माची समीक्षाही केली .यांनी म्हटले होते ‘ धर्म हा केवळ कायदा आणि आज्ञा नसाव्यात .ज्याक्षणी धर्माचे रूपांतर तत्वाऐवजी कायद्यात होते त्याच क्षणाला तो धर्म भ्रष्ट होतो आणि असा भ्रष्ट धर्म खऱ्या धार्मिक संकल्पनेचा आवश्यक गुणच मारून टाकतो.’
गेल्या काही वर्षात जातीय प्रतिष्ठेसाठी हत्या म्हणजे ‘ऑनर किलिंग’ चे प्रमाण व प्रकार वाढत आहेत.उत्तर प्रदेश ,हरियाना, पंजाब ,मध्यप्रदेश ,राजस्थान या राज्यांमध्ये खाप पंचायती अथवा जातपंचायतीने हैदोस घातलेला होता. ऑनर किलिंग चे आदेश देऊन या पंचायती जातीय प्रतिष्ठा जपण्याच्या भूलथापा देत होत्या .पण त्या मानवी प्रतिष्ठेला मातीमोल करतात आणि भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांना हरताळ फासतात हे स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने १९ एप्रिल २०११रोजी या खाप पंचायतीनाच एका निकालाद्वारे बेकायदेशीर ठरवले होते. ‘जी जात नाही ती जात ‘यापासून ‘जातीसाठी माती खावी ‘पर्यंतच्या म्हणी- वाक्यप्रचार आपल्याला ठाऊक आहेत. खरेतर जाती या शब्दाची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे .कारण जातीत अनेक पोटजाती असतात .या पोटजातींची मिळून एक जात बनते असेही दिसते. भारतीय जातीव्यवस्थेचा दाह फार भयानक आहे. कारण येथे धर्मांतर होऊ शकते ,पण जात्यांतर मान्य होऊ शकत नाही असे दिसून आले आहे.
भारतीय जातीय व्यवस्था अतिशय कडक स्वरूपाची होती. व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कसे वागले पाहिजे याची बंधने त्यात होती. त्यामुळे माणसाची व्यक्ती म्हणून होणारी प्रगती कुंठित झाली .स्वतंत्र पद्धतीने विचार करण्याची त्याची कुवतही क्षीण झाली .ही व्यवस्था हजारो वर्षे टिकून राहिली याचे कारण या जातीव्यवस्थेत राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाला फारसा वाव नव्हता. परिणामी शासनव्यवस्था कोणतीही असली तरी सामाजिक व्यवस्थेत फारसा बदल होत नव्हता. यातूनच ‘जात पंचायत ‘ही सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील सार्वभौम सत्ता बनली.
संपूर्ण समाजावर जातपंचायतीचे नियंत्रण होते. काहीवेळा तर न्यायालयिन सुनावणीच्या काळात ही तेथील काही प्रकरणे जातपंचायतीत आणली गेली आहेत. व्यक्ती ही प्रथम जमातीशी व त्यानंतर ती समाजाशी किंवा शासनाशी बांधील आहे हे जातपंचायतीने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला .ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जातीजातीतील तंटे पंचायतीने सोडवावेत ही चालत आलेली परंपरा मान्य केली. पण जातपंचायतीचा निवाडा मान्य नसेल तर न्यायालयात दाद मागण्याची सोयही उपलब्ध करून दिली .न्यायालयांनी अनेकदा जात पंचायतीचे निर्णय रद्द ठरवण्याची उदाहरणे ब्रिटिश काळात घडलेली आहेत .अर्थात समाज विखुरलेला असणे हे ब्रिटिशांच्या फायद्याचे असल्याने त्यांनी जातीअंतासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. त्यांच्याकडून ती अपेक्षाही नव्हती. पण शिक्षणाचा प्रसार आणि औद्योगीकरणाच्या वाढीने जातीव्यवस्थेची तीव्रता काहीशी कमी होत गेली .समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी तिचा दाह कमी होऊ लागला .स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेने अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलली .पण जातीबद्ध मुखंडानी त्याचा मोठ्या प्रमाणात अपेक्षित असा स्वीकार केलेला दिसत नाही.हे आज घडणाऱ्या घटनांवरून स्पष्ट होते.
इथल्या जातीय व धर्मांध कट्टरवाद्यानीच मंडल आयोगाला विरोध केला होता. मंडल आयोगाने स्पष्टपणे म्हटले होते की , ‘बुद्ध व इस्लाम धर्माची आव्हाने ,ब्रिटिश संस्कृती व राज्यकारभार पद्धती यांचे आघात आणि गांधी-आंबेडकर -लोहिया यांची जातीव्यवस्थेविरुद्धची धर्मयुध्ये यांनाही ही जातीव्यवस्था पुरून उरली कारण तिचा चिवटपणा. ही जातीव्यवस्था नष्ट करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे खालच्या स्तरावरील जातींना वर आणणे.सामाजिक अभिसरणाची गती वाढवण्यासाठी राखीव जागा व सवलतींचे तत्व आहे. जातिव्यवस्थेचा नाश यातूनच होऊ शकेल. सवलतींमुळे जातीवाद वाढणार नाही तर घट्ट जातीयवादामुळे सवलती द्यावा लागत आहेत.’
एकीकडे ऑनर किलिंग घडत असताना दुसरीकडे जातीय अहंकार ,जातगंड ,पर जातद्वेष वाढतो आहे. शहीद कॉ .गोविंद पानसरे यांनी ‘जाती-अंत की जाती उद्धार ‘हा लेख काही वर्षांपूर्वी लिहिला होता. त्यात ते म्हणाले होते की ,’वर्णव्यवस्था ,जातीव्यवस्था टिकवायला अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापरण्यात आल्या आहेत. ब्राह्मणेतर सर्व वर्णांना ज्याप्रमाणे ‘एक वरची जात ‘आहे त्याप्रमाणे खालच्या ही जाती आहेत .ब्राह्मण मला नीच समजत असतील तर असू द्या ,पण क्षुद्रातीक्षुद्र माझ्यापेक्षाही नीच आहेत ,ही भावना म्हणजे काय ?एका बाजूने नीचतेची भावना निर्माण करण्यात आली ,त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने उच्चतेची भावना तयार करण्यात आली .उतरंडच तयार केली .त्यामुळे उतरंडच्या उतरंड टिकायला सोपे गेले. मी स्वतः नीच नाही आणि मी कुणाला नीच मानत नाही ,सर्व मानव समान आहेत अशी भूमिका घेऊन त्या भूमिकेवर आधारलेली रणनीती आखली पाहिजे. तरच समता निर्माण होऊ शकेल .सर्व विषमतां विरुद्ध एकत्र संघर्ष करण्याची रणनीती हवी .एक विषमता दुसऱ्या विषमतेला पोषक असते.सध्या जी जातीय अहंकार व परजातीय द्वेष यांची प्रकरणे वाढत आहेत त्या पार्श्वभूमीवर आपण हा आशय समजून घेण्याची व देण्याची गरज आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली एकतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ”प्रबोधन प्रकाशन ज्योती “मासिकाचे संपादक आहेत.)
यावर आपले मत नोंदवा