विटेवर गझलेचे रसग्रहण

नमस्कार,
काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि काव्यप्रेमी गझल यांच्या ‘गझलगंध ‘ उपक्रमात मा.रामहरी पंडित ( कारंजा जि.वाशीम ) यांनी बुधवार ता. १० नोव्हेम्बर २१ रोजी सादर केलेले माझ्या गझलेचे केलेले रसग्रहण.गझलगंध उपक्रमास भरभरून शुभेच्छा आणि मा.रामहरी पंडित यांना मनःपूर्वक धन्यवाद..! आपण रसग्रहण जरूर वाचावे ही विनंती.

विटेवर
———
नाही कधीच झाले माझे इथे कलेवर
मृत्यू निवांत झोपे माझ्या जरी कडेवर..

ती बोलते मनाशी आतून आर्ततेने
माझेच नाव येते तेंव्हा तिच्या जिभेवर.

ना पांगणार गर्दी केंव्हाच आठवांची
त्यांना मिळेल मुक्ती माझ्यासवे चितेवर..

अंधार पावसाला जाहीर बोललेला
ठेवू नको भरोसा तू वादळी विजेवर..

विज्ञान शांततेने वर्गामध्ये म्हणाले
केलाच पाहिजे तू हल्ला खुळ्या प्रथेवर..

गाण्यात जीवनाच्या साधी असे अपेक्षा
केव्हातरी तिनेही यावे जरा समेवर..

भट्टीत भाजलेली रखमा मला म्हणाली
माझा विठू बिचारा आहे उभा विटेवर..
——–
◼️◻️◼️
*गझलगंध…*
*सुवर्णमहोत्सवी.भाग…5️⃣0️⃣*🎉🎉🎊🏮
दि.,१० नोव्हेंबर २०२१.. बुधवार
________________
अतिथी गझलकार…
*मा. प्रसाद कुलकर्णी*
(इचलकरंजी, कोल्हापूर,)
______________
रसग्रहण
*रामहरी पंडित*
( *चंद्राशु*)
कारंजा जि.वाशिम
*९७६५०११२५१*
_________________
*काव्यप्रेमी शिक्षक मंच® आणि, काव्यप्रेमी गझल मंच*
——–आयोजित————-
गझलगंध उपक्रमातील.. *पन्नासाव्या* भागात…
केंद्रिय मंच व गझल समितीतील मान्यवर पदाधिकारी, गझल मंचातील मान्यवर रसिक मित्रांनो… *सस्नेह नमस्कार*🙏
_________________
💫 *गझलगंध उद्देशिका*
१)मान्यवर गझलकारांचा परिचय,
त्यांच्या रचनांचा साहित्यिक दृष्टीने आस्वाद घेणे.
२) रसग्रहण,अतिथी रचना व गझल प्रकारावर, सर्व अंगाने साधक-बाधक चर्चा करणे.
३) नवोदितांना प्रेरणा देणे व गझल विषयक आवड निर्माण करणे..इ.
_________________
*अपने ही होते हैं जो दिल पे वार करते हैं फ़राज़*
*गैरों को क्या ख़बर की दिल की जगह कौन सी हैं….*
~ *अहमद फराज़*
__________________
वाह.. फराज़ साहब…
क्या खूब लिखा…..
खैर…अपने ही सपने जैसे होते…
अच्छे ही….तो बुरे ही…….
मराठी गझल अन् मराठी गझलकार हे मराठी वाड्मयाचं समृद्ध दालन आहे. जेंव्हा एखादी नवी रचना एखाद्या गझलकाराकडून प्रसवते. तेंव्हा जो नवनिर्मितीचा आनंद असतो..तो जगातल्या कुठल्याही बाजारपेठेत मिळत नसतो. कारण तो आत्मानंद असतो. म्हणूनचं गझल प्रासादिक असते तसेच आत्मानंदी असते.
*गणितात शून्याचा शोध लागला अन् गणित विश्वव्यापक झाले. तसाचं निर्विकार शून्याचा शोध म्हणजे गझल. गझल विश्वव्यापक आहेचं, पुढेही राहील,इतके गझलविश्व समृद्ध होत आहे. होत राहिलं….असो.*
आज पन्नासाव्या भागात आपण अभ्यासणार आहोत.. आदरणिय,प्रसाद जी कुलकर्णी यांना.
सरांचा परिचय विस्तृत असून तो मी स्वतंत्रपणे देणार आहे.
तरीही,
सारांशाने…
👉 समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी या संस्थेचे *सरचिटणीस*
👉 *प्रबोधन प्रकाशन ज्योती*(मासिक) *संपादक*
👉 *आजपर्यंत विविध विषयावरील २८ पुस्तकांचे लेखन*
👉 *गझलांकित,गझलसाद*(गझलसंग्रह) *गझलानंद* (हिंदी/उर्दू गझल रचना,गझलकारांची ओळख)
👉 *आजपर्यंत विविध मानाच्या क्षेत्रातील १९ पुरस्कार.*
…..असो…………..
आता आपण मूळ रचनेकडे वळणार आहोत.
___________________
1️⃣ मतला…
*नाही कधीच झाले माझे इथे कलेवर*
*मृत्यू निवांत झोपे माझ्या जरी कडेवर*
____________________
सुंदर,तसाचं चिंतनीय आनंदकंदी मतला.
*कलेवर* होणे.. म्हणजे मृत्यूची गळाभेट.
मृत्यूचे दोन प्रकार आहेत… एक शरीरातून आत्मा निघून जाणे…
दोन….
सुदृड सामाजिक विचारातला आत्मा निघून जाणे, हा ही सामाजिक आत्मघात ठरतो.
*आपेश मरणाहूनी वोखटे* अशीही ऐतिहासिक म्हण आहे.
आपण कसे जगतो? आपली सामाजिक उपयोगिता काय आहे? यावर जगण्याचं अन् मरण्याचं मूल्यमापन होतं.
*नाही कधीच झाले…असे म्हणत असतांना…. “मृत्यू निवांत झोपे”..अशी म्हणण्याची ताकद हवी.*
मृत्यूला मी कडेवर झोपवतो म्हणजेचं…माझी मरण्याची भिती पार क्षितीजापलिकडे झाली आहे.
याला एक तर संत हृदय हवं किंवा पार्थिवाच्या पार गेलेला *प्रासादिक* माणूस.
माझ्या कडेवर मृत्यू झोपला काय किंवा जागृत काय? कलेवर कधिच झाले नाही… म्हणजे..
विचारांची, सदाचारांची, जगण्याणी उर्मी शंभर टक्के शुद्ध आहे. जगणे म्हणजे *”वसंतातला बहर”* आहे जणू!
या जगात रडगाणे गाणाऱ्याची कमी नाही. पण अशा वातावरणात… नाही कधीच झाले.. असा आशावाद पेरणारा विरळाचं..म्हणून मतल्याला सलामचं!
______________________
*शेर….2️⃣*
*ती बोलते मनाशी आतून आर्ततेने*
*माझेच नाव येते तेंव्हा तिच्या जिभेवर*
_______________
*लाजवाब शेर…*
*आर्तता..* मनाचा एक प्रासंगिक आविष्कार आहे.
मनाचे मनाशी बोलणे. यात अक्षरांची/शब्दांची गरज नसते. फक्त भावसौंदर्य असते. पण भिडते थेट काळजाशी!
आर्ततेने बोलणे म्हणजे शब्द अन् त्या भावाशी तादात्म्याने संवादणे होय. कुणी अंतरीचा सखा हवा. मग आर्तता कळते.
एकदा कुणी एक मुस्लीम सरदार जंगलात नमाज अदा करत होता.
कुणी एक स्त्री आपल्या पतीला भेटण्याला त्याच रस्त्याने निघाली होती. बऱ्याच वर्षाने तिचा पती भेटणार होता. चालता चालता तिचा पाय त्या सरदाराच्या अंथरलेल्या चादरीवरून गेला तर तो सरदार चिडून त्या स्त्री ला म्हणतो… मूर्ख औरत, दिखता नही है क्या. मैं नमाज अदा कर रहा हूं!
त्यावर ती स्त्री म्हणते…
क्षमा कर दे अल्ला के बंदे,मेरा दिल तो मेरे पती पर है…इसलिए मुझे दिखा नहीं.. पर इतना दिल तू नमाज मे अल्ला पर रखता तो तूझे मैं भी नहीं दिखती!
याला म्हणतात *आर्तता.*
आर्ततेने तेंव्हा प्रेयस नजरेपुढे दिसतो. तेंव्हा तो जिभेवर ही असतो. असो.
____________________
*शेर..क्र.3️⃣*
*ना पांगणार गर्दी केंव्हाच आठवांची*
*त्यांना मिळेल मुक्ती माझ्यासवे चितेवर*
_________________
बहोत खूब……
विचारांचे ढग येतात तर आठवांची गर्दी. कारण वर्तमान पेक्षा भूतकाळ भारी. *”भूतकाळ आठवांचा काळ आहे”*
विचार कसे आहे?
सुखद की दु:खद यावर *गर्दी* चा कडेलोट अवलंबून आहे.
चित्रकाराच्या मनात.. *मानसिक चित्र सक्षम असते. तसे घडलेल्या घटनांचा आठव फार नाजूक नि सक्षम असतो. म्हणून गझलकार म्हणतो..ना पांगणार……*
तर मग पुढे काय?
तर ,माझ्यासवे आठवांना ही मुक्ती मिळणार आहे. याचा अर्थ उपभोक्ता नि उपभोग्य दोन्ही आपल्या विचारांवर बिनतोड आहे. जर आठव वरचढ चढले तर *मुक्ती शिवाय* पर्याय संभवत नाही.
*बाहेरच्या गर्दित आपण एक “एककाप्रमाणे” असतो पण हीच गर्दी आपल्या आत झाली तर आपण… आठवांच्या विश्वात अनंत होतो*….असो.
________________
*शेर क्र .4️⃣*
*अंधार पावसाला जाहीर बोललेला*
*ठेवू नको भरोसा तू वादळी विजेवर*
___________________
क्या बात‌…..
काळे ढग दाटून आले की, पोशिंद्याला आनंद होतो. आता बरसणार… पण बऱ्याचदा निराशा पदरी येते. इथे *अंधार शब्द हा *”निराशेचा अंधार”* या अर्थाने घेतलेला दिसतो.
कारण जाहिरपणे बोलणे म्हणजे…कायद्याच्या चौकटीतून बोलणे होय. तसा शेतकऱ्यांचा कायदा फार वाईट. जो तो येतो नि लूटतो. *”अस्मानीचं संकट”*
दरवर्षी ठरलेलं. एका पावसाने पिकं जातं. कमी पडतो किंवा जास्त.
जेंव्हा पावसाचा गरज आहे पण तो पडत नाही. तेंव्हा हा निराशेचा अंधार *शेतकऱ्यांच्या काळजातले शब्द घेऊन जाहिर बोलतो की, ठेऊ नको भरोसा….तू वादळी विजेवर*
कारण हे वादळ, *वांझ* ठरणार आहे. असो.
___________________
*शेर क्र.5️⃣*
*विज्ञान शांततेने वर्गामध्ये म्हणाले*
*केलाच पाहिजे तू हल्ला खुळ्या प्रथेवर*
_____________________
*वास्तववादी शेर*
*विज्ञान म्हणजे..विशुद्ध ज्ञान*
अर्थात.. *आज आवश्यक असे जे मानवजातीला कल्याणकारक होईल…ते ज्ञान*
प्रथा परंपरा प्रथमतः खुळ्या नव्हत्या मूळी…. पण *”कालाय तस्मै नमः*” म्हणजे आजची गरज काय? त्याला ती प्रथा परंपरा योग्य नसेल ती बदलली पाहिजे. असेच विज्ञान सांगते.
म्हणजे शिक्षणाची जी सामाजिक उपयोगिता आहे त्यात प्रथमत: विज्ञानवादी दृष्टीकोन महत्वाचा… वर्गात शांततेने सांगते यांचा अर्थ…*विकासवादाच्या भूमिकेतून लोकशाहीच्या अंगाने सांगत आहे*..असाही होतो.
*उच्चतम जाणिवांचा जागर* म्हणजे हा शेर होय….असो.
_____________________

*शेर क्र.6️⃣*
*गाण्यात जीवनाच्या साधी असे अपेक्षा*
*केव्हातरी तिनेही यावे जरा समेवर..*
__________________
आशावादी शेर….
*समेवर येणे*
ही क्रिया समस्थिती गाठण्याच्या तोडीची असते. चैतन्य निर्माण करीत असते. दरवेळी ती येते तेंव्हा काहितरी सापडल्याचा काहितरी मिळवल्याचा आनंद घेऊन येते…हीच क्रिया म्हणजे *समेवर येणे* होय.
जीवन हे एक गाणेच आहे.
जीवन म्हणजे *सूर-ताल* होय.
जीवनाने केंव्हातरी मूळ पदावर… समस्थितीवर, किंवा चैतन्य दशेत यावे ही एक साधी अपेक्षा..जीवन- संगित साधकांची असते.
जीवन म्हणजे सप्तसुरांची बासरी.
निर्गवीपणाची पोकळी हवी. काळजातली साद हवी. असो.
____________________
*शेर..क्र.7️⃣*
*भट्टीत भाजलेली रखमा मला म्हणाली*
*माझा विठू बिचारा आहे उभा विटेवर..*
__________________
*सुंदर शेवट*…
संसार अन् दु:ख एक नातं आहे.
*आधी हाताला चटके..मग…*
*”भट्टीत भाजणे”* ही संसाराच्या दु:खासाठी,कष्टासाठी सर्वसमर्थ उपमा आहे.
*पुरूषप्रधान संस्कृतीत संसाराचा गाढा “स्त्री प्रधान” आहे.* विटेवर उभे असणे म्हणजे… भक्तांसाठी तिष्ठत आज्ञापालन…..
म्हणजे भट्टीत भाजणे ही एक तपस्या तर विटेवर उभे असते.. ही एक प्रेमळ तपस्याचं…
यालाच *पारमार्थिक संसार* म्हणतात.
लाखो वारकरी *”विठ्ठल रखमाई”* म्हणत आपल्या संसाराचा ताप नाहीसा करतात.
पण प्रत्यक्ष देवालाही विटेवर तिष्ठत उभे राहावे लागते. रखुमाईला विठ्ठलाच्या प्रतिक्षेच्या भट्टीत भाजावे लागते.
……म्हणून या साठी सर्व बाजूंनी माणूस ज्ञान-विज्ञानवादी, पारमार्थिक हवा.
मग तो म्हणू शकतो की,
*नाही कधीच झाले माझे इथे कलेवर*
*मृत्यू निवांत झोपे माझ्या जरी कडेवर*
असो.
_____________________
आज *विटेवर* ही आनंदकंद वृत्ताची आदरणीय प्रसाद कुलकर्णी यांच्या रचनेवर व्यक्त होतांना लेखणीचा कस लागला.
सरांच्या रचनेतील शेरांजवळ पोहचलो असेल तर या पामराचे भाग्य! बाकी गझलसौंदर्य गझलकाराकडे जाते.
___________________
अतिथी गझलकार
*आ. प्रसाद कुलकर्णी*
इचलकरंजी कोल्हापूर.
________________
*रसग्रहण*
*रामहरी पंडित*
( *चंद्रांशु*)
कारंजा जि.वाशिम
*९७६५०११२५१*
◼️◻️◼️

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया