नावाप्रमाणे नावाजलेला माणूस : बशर नवाज
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)
तेज हो धूप तो और भी निखर आयेंगे
हम कोई फुल नही जो मुरझा जायेंगे..
संघर्षासाठी सिद्ध असल्याचा पुकारासुद्धा अशा तरल शेराने करणार्या ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचा आज सहावा स्मृतिदिन. १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबाद मध्ये जन्मलेले बशर नवाज ९ जुलै २०१५ रोजी कालवश झाले. बशर नवाज उर्दू भाषेत लिहायचे. औरंगाबाद शहराला उर्दू कवितेची, शायरीची दीर्घ परंपरा आहे. ती परंपरा उज्वल करण्यात बशर नवाज साठ वर्षे योगदान देत राहिले. या महान शायराला केवळ ऐकण्याची नव्हे तर त्यांच्याबरोबर मुशयऱ्यात सहभागी होण्याची मला तीन वेळा संधी मिळाली होती. ती माझ्या अभिमानाची बाब होती व आहे. पुरोगामी विचारांचा अंगीकार केलेल्या बशर साहेबांनी आपल्या काव्यात सामाजिक उत्तरदायित्व आणि संवेदनशीलता यांची जपणूक केली होती. उर्दू शायरीत त्यांचे आदराने नाव घेतले जाते.त्यांच्या लेखनात जगण्यातील अनुभव नेमकेपणाने व्यक्त झालेले दिसतात. उर्दूतून गझल लिहिणारे बशर नवाज औरंगाबादचे रहिवासी होते.हे महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक परंपरेला अतिशय भूषणावह होते.
गझल हा शब्द अरबी भाषेतला. पण गझलेला खरी ओळख दिली ती उर्दू व फारसी भाषेने. फारसी भाषेचे संस्कार घेऊन उर्दू समृद्ध झाली.मीर तकी मीर हा रूढ अर्थाने उर्दूचा पहिला गझलकार.१७२४ साली म्हणजे तीनशे वर्षापूर्वी जन्मलेल्या मीर तकी मीर पासून सुरू झालेली उर्दू गझलेची परंपरा बशर साहेब मोठ्या ताकतीने पुढे नेत होते. १९५४ पासून गझल लेखन करणारे बशर साहेब शायर होते. तसेच समीक्षकही होते.गझल सादर करण्यात हातखंडा असलेले बशर साहेब उत्तम वक्ते होते. डाव्या विचारधारेचा, समतावादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्यावर होता.१९५८ ते १९७३ अशी पंधरा वर्षे औरंगाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर हा तरुण शायर तेव्हा लिहून गेला,
ये एहतमामे चरागां बजा सही लेकिन
सहर तो हो नही सकती दिये जलाने से..
भुपेन्द्रपासून मेहंदी हसनपर्यंत आणि गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून गुलाम अलीपर्यंत अनेकांच्या आवाजात बशर नवाज यांची शायरी सर्वदूर पोहोचली.’ बाजार ‘ या चित्रपटातील भूपेंद्र यांनी गायलेल्या गीताने त्यांची उर्दू साहित्याला, चित्रपटसृष्टीला आणि रसिकाना ‘शायराना’ ओळख झाली.बशर नवाज जगभरच्या हिंदी-उर्दू रसिकांचे आवडते शायर होते. अनेक अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर पीएचडीचे प्रबंध लिहिले.त्यांच्या कवितांचा विविध भारतीय भाषांत अनुवाद झाला.दूरदर्शन वरील अमिर खुसरो या मालिकेच्या सव्वीस भागांचे लेखन त्यांनी केले होते. तर भारत रत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्यावरील डॉक्युमेंटरीसाठीही लेखन त्यांनी केले होते.
गली के मोड पे सुना कोई दरवाजा
तरस्ती आखों से रस्ता किसीका देखता,
निगाह दूर तलक जा के लौट आयेगी
करोगे याद तो हर बात याद आयेगी..
असे सांगणारा हा शायर केवळ दहावीपर्यंत शिकला होता. पण जीवनाला भिडण्याची व तो अनुभव दाहक शब्दात मांडण्याची त्यांची ताकद विलक्षण होती. त्यांच्या निधनानंतर आदरांजली वाहताना ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजली म्हणाले होते,” मानवी जगण्यातील सुख-दुःख सहजपणे मानणारा शायर गेला. कैफी आझमी यांच्या तोडीची त्यांची शायरी होती. विषय, लहेजा आणि घाट या तिन्ही अंगाने बशर नवाज नेहमीच लक्षात राहतील. ‘
हथेलियौ की हिना याद कुछ दिलायेगी ‘म्हणणारे बशर साहेब सहजपणे लिहून गेले की,
जुल्फे खुली तो मस्त घटा घीर के छा गई
आंचल उडा तो एक कयामतसी आ गई …
चाहते तो किसी पत्थर की तरह जी लेते
हमने खुद मोम की मानिंद पिघलना चाहा..
शृंगारिक म्हणजे ‘रूमानी ‘आणि सुधारणावादी म्हणजे ‘ तरक्कीपसंद ‘अशा दोन्ही प्रकारची शायरी तेवढ्याच ताकतीने बशर साहेबांनी लिहीली.
जब छायी घटा लहराई ठनक
एक हुस्न मुकम्मल याद आया,
उन हाथो की मेहंदी याद आयी
उन आखो का काजल याद आया..
असे लिहिणारे बशर साहेब जातीय दंगली, धार्मिक तंटे ,दुःख याबाबत संवेदनशील होते.” गम अपना हो या पराया,तडप उठता हुं ” असं ते म्हणत आणि तसेच जगतही. म्हणून तर ते लिहून गेले,
हम अपनी रिवायत से बगावत नही करते
नफरत बढाने की नसारत नही करते,
रखते है बडे प्यार से हर घाव पे मरहम
हम कौम की जखमोकी सियासत नही करते…
किंवा
बहते पानी कि तरह दर्द का भी शक्त नही
जब भी मिलता है नया रूप हुवा करता है..
मराठी साहित्याचा विचार करताना आपण साठोत्तरी लेखनाचा एक वेगळा विभाग करतो. त्याच पद्धतीने उर्दूतील साठोत्तरी लेखनाचा विचार केला तर त्या काळातील महत्त्वाचे कवी म्हणून बशर साहेबांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. आजच्या बदलत्या जगात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय.अपराधी व भ्रष्ट उजळ माथ्याने वावरतात. त्यांना पद, प्रतिष्ठा, पैसा सारे मिळते.पण निरपराध माणूस पिचला जातोय, त्याच्यावर हल्ले होत आहेत.हे सांगताना बशर साहेब म्हणतात,
पत्थर को मेरे सिमत तो आना जरूर था
मै ही उन गुनाहगारो मे एक बेकसुर था..
‘रायगा’ आणि ‘अजनबी समंदर ‘हे त्यांचे कवितासंग्रह अतिशय गाजले. ‘नया आदब नये मसाये ‘ हा समीक्षाग्रंथ त्यांनी लिहिला. महाराष्ट्र सरकार ,साहित्य अकादमी, उर्दू अकादमी आदीसह अनेक संस्थांनी त्यांच्या लेखनाचा सन्मान केला. रसिकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केले. बशर म्हणजे माणूस आणि नवाज म्हणजे लौकिकपात्र. आपल्या नावाप्रमाणे बशर नवाज एक लौकिकप्राप्त माणूस होते. सामाजिक वेदना व दुःख नेमक्या शब्दात मांडणाऱ्या या शायराला विनम्र अभिवादन. ते म्हणाले होते ,
बहुत खोफ जीसका फिर वही किस्सा निकला आया
मेरे दुख से किसी आवाज का रिश्ता निकल आया…

यावर आपले मत नोंदवा