हे महासंकट अस्मानी नव्हे सुलतानीच आहे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )

भारताचे विद्यमान केंद्र सरकार आणि त्याचे धुरीण बढाईखोरीत जसे प्रवीण आहेत तसेच कातडीबचाऊ भूमिका घेण्यातही निपुण आहेत. कोरोनाची भयावह वाढती लागण आणि मृत्युदर हे सर्व निर्णय घेणाऱ्या मा.पंतप्रधान व मा.गृहमंत्री या जोडगोळीचेच अपयश आहे ही खरी’ जन की बात ‘ आहे.पण ते खरे नसून हे व्यवस्थेचेच अपयश आहे असे लोकमानसावर बिंबवण्यात नेहमीप्रमाणे लाळघोटे अंधभक्त, पगारी समाजमाध्यम चालक आणि स्वाभिमान गमावलेली अनेक प्रसार माध्यमे धन्यता मानत आहेत. जर व्यवस्था दोषी असेल तर व्यवस्थापक सर्वात दोषी असतात.कारण संसदीय लोकशाहीत जनतेने देशाचा कारभार करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या रुपात कारभारी निवडलेले असतात. त्या लोकप्रतिनिधीनी आपले प्रमुख निवडलेले असतात. त्यामुळे प्रमुख कारभाऱ्यांना आपली जबाबदारी टाळता येत नसते.आज ते आणि लोकशाही मूल्य न मानणारे त्यांचे पाठीराखे ही पद्धतशीरपणे जबाबदारी टाळत आहेत.

मात्र देशाच्या भल्याचा व भारतीय संविधानाच्या मूल्यांचा विचार करणाऱ्या खऱ्या देशप्रेमी व्यक्ती ,संस्था, विविध राज्यातील उच्च न्यायालये व भारताचे सर्वोच्च न्यायालय, जागतिक संस्था, जागतिक माध्यमे याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. सत्तापिपासूनी सत्ता जरूर सांभाळावी कारण तोच त्यांचा ऑक्सिजन असतो.पण त्याचवेळी सर्वसामान्य जनतेलाही जिवंत राहण्यासाठी रोजगारापासून ते औषधापर्यंतच्या किमान ऑक्सिजनची गरज असते.आणि तो पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते याचे भान ठेवण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट हे आपल्या देशावरील संकट आहे आणि त्याचा आपण सर्वांनी मिळूनच मुकाबला केला पाहिजे यात कोणतीही शंका नाही.पण तरीही सत्ताधारी संकुचित राजकारण सोडायला तयार नाहीत.झालेल्या चुकांची कबुली देणे तर राहोच पण त्यात सुधारणा करायलाही तयार नाहीत ही अतिशय असमंजस ,असंस्कृत बाब आहे.

देशातील विविध राज्यातील उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या पंधरा काही दिवसात केंद्र सरकारलाअतिशय कठोर शब्दात त्यांच्या चुका सुधारण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारने सांगितले , कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबाबतचे सर्व निर्णय केंद्र सरकार तज्ञांशी,वैज्ञानिकांची चर्चा करून घेत आहे.सरकारला जनतेने पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिले आहे,आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे वगैरे सांगितले होते. जनतेने पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिले आहे हे निर्विवादपणे सत्य आहे.पण लोकशाही पद्धतीत सरकार काय करते ? हे जाणून घेण्याचाही जनतेचा अधिकार गृहीत धरलेला आहे. म्हणून तर न्यायालयांनी स्वतःहून काही बाबींच्या सूनवण्या सुरू केल्या आहेत.पी.एम.केअर फंडापासून सर्व गोष्टींची देशातील जनतेपासून लपवाछपवी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे.

गतवर्षी कोरोना जगात फैलावत असतांना आणि पप्पू म्हणून ज्यांची जाणीवपूर्वक हेटाळणी केली जाते त्या राहुल गांधींनी व अनेक तज्ञांनी हे संकट भयावह रुप घेऊ शकते अशी जाहीर कल्पना दिलेली असतांना व त्याबाबत सावधानता बाळगण्याची भूमिका मांडलेली होती . मग आजच्या अवस्थेला जबाबदार असणारे सरकारचे तज्ञ सल्लागार कोण हे जनतेला समजले पाहिजे. कोरोनाच्या संकटाचे सूतोवाच करणाऱ्यांची हेटाळणी करून त्याकडे दुर्लक्ष करण्याचा व नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला होता? कोरोना काळातच विरोधकांची राज्यसरकारे आमदारांचा खरेदी व्यवहार करून पाडण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला होता ? कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी टाळ्या वाजवून – थाळ्या बडवून – दिवे पाजळून ,गो कोरोना गो असे म्हणण्याचा राष्ट्रव्यापी कार्यक्रम राबविण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला होता.? कोरोना योद्धे जिवापाड मेहनत घेत आहेत व त्यांच्यामुळेच देश वाचतो आहे. पण स्वतः काही न करता त्यांच्यावर लष्करी विमानातून फुले उधळून स्वतःची प्रतिमा उजळवून घेण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ? जीएसटीतून मिळालेल्या पैशांतून राज्यांचा हक्काचा हजारो कोटी रुपयांचा परतावा त्यांना न देण्याचा आणि त्यांचेच पैसे अडवून ठेवत केंद्र सरकार मदत करत आहे असे खोटे चित्र तयार करण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ? रिझर्व्ह बँकेची राखीव पुंजी काढून घेण्याचा व देश कंगाल करण्याचा सल्ला कोणत्या तज्ञानी दिला ?

तसेच मागच्या वर्षी २३ मार्चला अचानक मध्यरात्रीपासून देशभर लॉकडाऊन जाहीर करून देशाला सर्वार्थाने खाईत लोटण्याचा आततायी निर्णय कोणाच्या सल्ल्याने घेतला होता ? आणि आज वर्षभरानंतर ” लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय आहे “हे ज्ञानामृत पाजण्याचा सल्ला कोणत्या तज्ञानी दिला ? अगदी २८ जानेवारी २०२१ रोजी कोरोनाच्या कराल दाढेतून ‘ आम्ही जगाला वाचवले आहे ‘अशी धादांत खोटी आत्मप्रौढी मिरवण्याचा सल्ला कोण दिला होता?

तसेच जगातले अनेक देश संकटाचे गांभीर्य ओळखून व दूरदृष्टी ठेवून आपल्या देशातील संस्थांकडे लसीची नोंदणी करत असताना आपण जानेवारी २१ अखेर झोपी जाण्याचा व जाग आल्यावर देशाच्या गरजेच्या एक टक्क्यातूनही कमी लसींची मागणी नोंदविण्याचा अनमोल सल्ला कोणत्या तज्ञानी दिला होता ? कोरोनाची पहिली लाट कोणत्याही लक्षणीय कृती कार्यक्रमशिवाय काहीशी आवाक्यात आली होती तेंव्हा ” आम्ही कोरोनावर विजय मिळवला आहे’ अशी शेखी मिरवण्याचा सल्ला कोणत्या तज्ज्ञांनी दिला होता ? कोरोना वाढत असतानाही निवडणुकात मग्न राहून एप्रिल २१ पर्यंत कोरोना कृती दलाच्या बैठकाच न घेण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला होता ? लाखोंच्या संख्येने एकत्र आणणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत परवानगी देण्याचा आणि त्यामुळे हजारो श्रद्धाळू बंधू – भगिनी बाधित झाल्यावर हे कार्यक्रम प्रतीकात्मक करावे असे उपदेशांमृत देण्याचा सल्ला कोणत्या तज्ञानी दिला ?

तसेच कोरोनाची दुसरी लाट येत असतानाही पाच राज्यांच्या निवडणुकांत लाखोंच्या सभा घ्या आणि सत्तेचे धुरीण असलेल्या दोघांनी तर केवळ सभेतच मश्गुल राहावे ,कोरोना व नागरिक परस्परांना बघून घेतील असा सल्ला कोणी दिला होता ? निवडणूक आयोगाने बंगालची निवडणूक आठ टप्प्यात घेऊन कोरोनाला महिनाभर निवांत पसरण्याची संधी दिली. त्यांना तो सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला होता ? त्यावेळी लाखोंच्या सभा टाळून रेडिओवरून ‘ मन की बात ‘ सारखा प्रचार न करण्याचा सल्ला कोणी दिला ? देशात लसींचा तुटवडा असतानाही ‘लस महोत्सव ‘जाहीर करण्याचा सल्ला कोणी दिला ? देशात लसीचा तुटवडा पडणार असतानाही स्वतःची प्रतिमा उजळण्यासाठी जगातील काही देशांना लसी लस्सीप्रमाणे वाटण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ? सात वर्षाच्या सत्ता काळात स्वतः काहीही उभारणी न करता गेल्या सत्तर वर्षातील सत्ताधाऱ्यांनी उभारलेल्या संस्था उपक्रम विकून टाकून ते बगलबच्चा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ? देशभर ज्या गुजरात मॉडेलचा आदर्श म्हूणून उल्लेख केला जात होता त्या मॉडेलचे खरे स्वरूप उघड झाल्यावर हा प्रचार गेल्या काही वर्षात अचानक बंद करण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ? भारत हे विविध राज्यांचे संघराज्य असून सुद्धा सारे केंद्रीकरण गुजरात मध्ये करण्याचा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ? देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली असताना सेंट्रल व्हीस्टा हा केवळ चैनखोरीचा व व्हाइट हाऊसच्या तुलनेचा किडा वळवळणारा राजमहाल तातडीने पूर्ण करण्याचा सल्ला कोणत्या तज्ञानी दिला ? पेट्रोल व डिझेल यांची अत्यंत बेदरकारपणे दरवाढ करून सार्वत्रिक महागाईत जनतेला होरपळून टाकावे असा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ? खरे तर असे अनेक प्रश्न आहेत पण विस्तारभयास्तव येथे उपस्थित करत नाही.

पण सर्वोच्च न्यायालय जेव्हा केंद्र सरकार आम्ही तज्ञांच्या व शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने कार्यरत आहोत असं सांगते तेव्हा ते महनीय तज्ञ व शास्त्रज्ञ कोण ? हे जनतेला माहिती असलेच पाहिजे.जनतेचा तो हक्क आहे. नाहीतर जनतेला वाटेल की , आपल्या या महाकाय देशात एक- दोन महातज्ञ सारे निर्णय घेतात. आणि फसलेल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी मात्र व्यवस्थेवर, नेहरूंवर किंवा विरोधकांवर झटकून मोकळे होतात.खरेतर आज बिचाऱ्या अंध भक्तांना आणि प्रचारी पगारी समाज माध्यमकर्मीना महातज्ञांचा बचाव किती करावा हेच कळेनासे झाले आहे. मानसिक- वैचारिक गुलामगिरी आता त्यातील अनेकांना सहनही होईना झाली आहे. पराकोटीच्या ब्रेनवोशिंगमुळे ते हे कबूल करत नसले तरी वास्तव आहे. त्याचा विस्फोट होऊ नये म्हणून पडद्यामागचे मुख्य सूत्रधार आता ‘ अमक्या पेक्षा तमुक बरा ‘ , अमक्याचा राजीनामा घेऊन तमक्याकडे सूत्रे द्यावीत अशी चर्चा जाणीवपूर्वक,पद्धतशीरपणे समाज माध्यमांवर याच भक्तांच्या द्वारे आणि फेक अकाऊंट द्वारे घडवून आणत आहेत. पण खरा मुद्दा कमअस्सल व लाटेबाज नेतृत्वापेक्षा संकुचित ,खुनशी, परधर्मद्वेषी आणि खरा भारत न उमगलेल्या विचारधारेचा आहे.ती बदलली पाहिजे हा आहे. देशात सर्व क्षेत्रात रोग वाढत असल्याने मुद्दा केवळ मलमपट्टीचा नसून ऑपरेशन करण्याचाच आहे हे आजचे वास्तव आहे.

पण मूळ मुद्याची चर्चाही कोणी करू नये,तसा विचारही कोणी करू नये याची दक्षता घेण्याचा कावेबाजपणा सत्ताधाऱ्यात ठासून भरलेला आहे.अगदी दोन दिवसापूर्वी भाजपाचे अध्यक्ष मा. जे.पी.नड्डा यांनी मानभावीपणे काँग्रेस अध्यक्ष मा.सोनिया गांधी यांना काँग्रेस नेत्यांच्या भाषेबद्दल दुःख व्यक्त होत असल्याचे पत्र लिहिले. आता हे पत्र म्हणजे भंपकपणाचा कळस आहे. काँग्रेसने द्यायचे ते उत्तर दिले आणि देईलही.तो त्या पक्षाचा मुद्दा आहे.पण देश अभूतपूर्व संकटात असताना आणि हे संकट आपल्या नेतृत्वाच्या बेजबाबदार कारभारामुळे आलेले असताना त्याचे खापर मात्र स्वतःच्या हातातील व्यवस्थेवर आणि स्वतःच्या हाताबाहेरील विरोधी पक्षांवर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय हे राजकीय मुत्सद्दीपणाचे नव्हे तर कर्तव्यहीनतेचे आहे. आजही कोरोनाच्या काळातही काही अंधभक्त गेली सात वर्षे सत्तेवर असलेल्या नेत्याने व पक्षाने काय केले हे सांगण्याऐवजी काँग्रेस किती चुकीची होती हे सांगण्याचा बिनडोकपणा सुरू केला ठेवला आहे. आणि गंमत म्हणजे त्यामध्ये कोणताही आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक , शैक्षणिक मुद्दा नसतो तर केवळ आणि केवळ प्रधारमद्वेष ठासून भरलेला असतो. आणि हे सारे काँग्रेस काळातीलच मोफत शिक्षणापासून ते गलेलठ्ठ पेन्शन पर्यंतच्या सर्व निर्णयांचे लाभ घेणारे करत असतात.पोट भरलेले असले की धर्मांधता व परधर्मद्वेष अंगात मस्ती आणत असतो. ज्याला पोटाला चिमटा काढत जगावे लागते.उद्याची भ्रांत असते. ज्याला मरेपर्यंत राबत राहावे लागते त्याचा धर्म भाकरी हाच मग त्याचा जन्माला आलेला धर्म कोणताही असो.

खरेतर प्रासिद्धीलोलुपाना व त्यांच्या समर्थकांना कोणत्याही परिस्थितीत आपलाच जयजयकार व्हावा असे वाटत असते. पंजाब विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.चमनलाल यांनी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मा. पंतप्रधानांच्या फोटोची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आणि तेथे त्यांचा फोटो योग्य असेल तर कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांच्या दाखल्यावर ही त्यांचा फोटो असावा अशी रास्त मागणी केली आहे.ही केवळ प्रा.चमनलाल यांची ‘मन की बात ‘ नसून देशातील करोडो लोकांची खरी जन की बात आहे.अशा प्रसिध्दीलोलुप विकृतीतूनच विरोधकांची ट्विटर खाते बंद करण्याचा प्रयत्न होतो. शिर्षस्थ नेत्याच्या राजीनामा मागण्याचा ट्रेंड बेदखल करण्याचा प्रयत्न होतो.त्यासाठी समर्थकांची पगारी यंत्रणा उभी केली जाते. त्यांना साथ द्यायला सुशिक्षित पण राजकीय बाबतीत स्वतःच्या डोक्याचा वापर कधीही करणार नाही अशी शपथ घेतलेली अथवा भोवतीच्या सहकाऱ्यांनी लादलेली परधर्मद्वेषी मंडळी असतातच. शिवाय वैचारिक विरोधकांना धमक्या देणे,त्रास देणे हे तर अखंड सुरूच असते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून कॉ.गोविंद पानसरे यांच्यापर्यंत अनेकांना खुनशीपणाने ठारही मारले जाते हेही उघड सत्य आहे. पण काळ व इतिहास गांधीजी व पानसरे यांचीच नोंद ठेवतो.भ्याड, पळपुट्या,हिंसकांची नाही.हे सार्वकालिक सत्य आहे.

खरेतर मा.मनमोहनसिंग ते मा.राहुल गांधी आणि मा.ममता बॅनर्जी ते मा.सीताराम येचुरी यांच्यापर्यंतच्या अनेज राजकीय विरोधकांनी सरकारला ज्या उपाययोजना सुचवल्या त्याची प्रथम खिल्ली उडवली गेली.आणि आता त्याच उपाययोजना स्वीकारणे सरकारला भाग पडले आहे हे वास्तव आहे.पण ते कबूल करण्याची राजकीय व वैचारिक दानत या सत्ताधाऱ्यांकडे नाही.गेल्या सात वर्षातील बेजबाबदार निर्णय व वर्तन व्यवहार यांची तर अनेक उदाहरणे देता येतील.
मा.पंतप्रधानांनी राज्यांच्या निवडणुकीत किती सहभाग घ्यायचा या संकेताला मोदी यांनी नेहमीच तिलांजली दिलेली आहे. देशाचे पंतप्रधान चोवीसतास केवळ आणि केवळ निवडणुकीच्या मोडवर असणे हे किती धोकादायक असते हे आपण आज पाहतो आहोत.प. बंगालमध्ये त्यांनी अनेक सभा घेतल्या.लाखोंच्या सभा घेतल्या.सभेत दुपारी ते म्हणायचे ‘ एवढी गर्दी मी कधीच पाहिली नाही ‘आणि संध्याकाळी राष्ट्राला उद्देशून ‘ कोरोना वाढतोय त्यामुळे मास्क वापरणे व शारीरिक अंतर राखणे हे गरजेचे आहे असे मानभावीपणे जनतेला संबोधित करायचे.इतकी बेजबाबदारी देशाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे असणे हे अत्यंत भयावह आहे. कारण या पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या काळात कोरोना बाधितांची संख्या कैक पटीने वाढलेली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या काळात म्हणजेच निवडणूक प्रचाराच्या काळात केरळ मध्ये कोरोना बाधितांची संख्या १२२९ टक्‍क्‍यांनी, आसाम मध्ये ५४१२ टक्क्यांनी , पश्चिम बंगाल मध्ये १२६६ टक्क्यांनी, तामिळनाडूमध्ये ५६३ टक्क्यांनी आणि पुदुचेरी मध्ये ३५९ टक्क्यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामध्ये कित्येक बळी गेलेले आहेत.याची जबाबदारी कोणाची ? असे करा हा सल्ला कोणत्या तज्ञांनी दिला ?

आज भारतात कोरोनाने दोन कोटीहून अधिक लोक बाधित आहेत. आणि दोन लाखावर लोक मृत झाले आहेत. रोज चार लाखाच्या आसपास बाधित होत आहेत व हजारो मरत आहेत. औषधापासून अंत्यसंस्कारापर्यंत तिष्ठत राहावे लागत आहे. गैर व्यवस्थापनामुळे गंगा नदीतून निष्पाप नागरिकांची प्रेते वहात आहेत.प्रशासन ती प्रेते बिहारची की उत्तरप्रदेशातून आली याची चर्चा करत आहे.आणि दोन्ही राज्ये भाजपचीच आहेत.हेच जर विरोधी पक्षाच्या राज्यात झाले असते तर मढयाच्या टाळूवरचे लोणी खाणारे किंचाळी गदारोळाचे नीच राजकारण आजच नव्हे तर वर्षानुवर्षे खेळले गेले असते.एवढा गहजब माजत असतानाही सरकारच्या पोटचे पाणी हलत नाही हे भयावह आहे.या संकटाशी सामना करण्याचा वकुब नसल्यानेच भारतात कोरोनाचे संकट वाढण्यासाठी सर्वस्वी केंद्रसरकार आणि त्याचे धोरणकर्ते कारणीभूत आहेत. लोकभावना व लोकक्षोभ ध्यानात घेऊन उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठे स्वतःहून याबाबत लक्ष घालत आहेत.जागतिक माध्यमे टीका करत आहेत.केंद्र सरकारचे चुकीचे निर्णय सुपर स्प्रेडर ठरले आहेत यात शंका नाही.कारण आज गेल्या सत्तर वर्षांमध्ये विकसनशील व विकसित असलेला भारत आज आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारत असताना जगातले लहान-लहान देश सुद्धा या काळात आपल्याला मदत करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण ही मदत का घ्यावी लागली याचा विचार करता केंद्र सरकारचे नियोजनशून्य धोरण या भिके कंगाल अवस्थेला कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे.आपण पुन्हा तिसऱ्या जगातील देशात ढकलले जाण्याची शक्यता विद्यमान सत्ताधाऱ्यांनी निर्माण केली आहे.

देशाची आर्थिक, सामाजिक, संस्कृतिक, विकलांग अवस्था होत असताना त्यावर काहीही नेतृत्वाकडून बोलले जात नाही हे चिंताजनक आहे.पण अशी ढोंगबाजी व बेमुर्वतखोरी फार काळ भारतीय जनमानस फार काळ चालवून देत नाही.हा इतिहास आहे. देशप्रेमाचा ठेका घेतल्यासारखी भाषा करणाऱ्यांनीच देश विकायला सुरुवात केली आहे.सध्या सर्वच बाबतीत संकुचितता व अतिसुमारीकरणाचा काळ आहे.कारण आपण व आपले अंध समर्थक सोडून अन्य सर्व राजकीय नेते अर्थतज्ञ , समाजशास्त्रज्ञ , शास्त्रज्ञ ,डॉक्टर , विचारवंत , कलावंत , पत्रकार मूर्ख आहेत अशा भ्रमात सत्ताधारी वागत आहेत. पण काही अंधही आता डोळस होऊ लागले आहेत. निवडणुकीतील विजयापेक्षा ज्यासाठी लोकांनी निवडून दिले त्यांच्यासाठी काम करणे महत्वाचे असते.तसे होत नाही म्हणूनच ‘आपण कुठे चाललो आहोत ? ‘ हा प्रश्न उभा राहतो. तसेच हे आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक यासह आरोग्य व अन्य सर्व क्षेत्रावरील महासंकट अस्मानी नाही तर सुलतानी आहे हे स्पष्ट दिसून येते.

(लेखक ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘या समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे नियमित प्रकाशित होणाऱ्या मासिकाचे ‘संपादक’ आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया