पाणकळा कार र .वा .दिघे : १२५ वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी , इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०)

ख्यातनाम मराठी कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे उर्फ र.वा.दिघे यांचा शनिवार ता.२४ एप्रिल २०२१ रोजी १२५ वा जन्मदिन आहे .२४ एप्रिल १८९६ रोजी कल्याण येथे जन्मलेले र.वा. दिघे ४ जुलै १९९० रोजी कालवश झाले. काही ठिकाणी त्यांचा जन्मदिन २५ मार्च असाही नोंदवला गेला आहे.पण १८९६ हे जन्मवर्षं निश्चित आहे.त्यामुळे त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला सुरुवात होत आहे. र. वा.दिघे यांच्या वडिलांची नोकरी फिरतीची होती. त्यामुळे दिघे यांचे शिक्षण कर्जत ,खोपोली ,जळगाव, चाळीसगाव ,सोलापूर, अहमदनगर, रत्नागिरी , पुणे अशा विविध ठिकाणी झाले .बी. ए .एल .एल.बी .या पदव्या त्यांनी पुण्यात प्राप्त केल्या. पनवेल येथे काही काळ वकिली करून १९२७ ते १९४३ अशी सोळा वर्षे त्यांनी पुण्यात वकिली केली .त्यानंतर ते पुढील सर्व आयुष्य अलिबाग जिल्ह्यातील खोपोली जवळच्या ‘विहारी ‘ या गावी शेतीतच रमले. शेती आणि त्यांचे लेखन यांचे फार जवळचे संबंध दिसून येतात.

बालवयातच काव्यलेखन करणाऱ्या दिघ्यांना कादंबरीकार कथाकार म्हणून मोठी प्रसिद्धी मिळाली. पाणकळा, सराई ,पूर्तता, निसर्गकन्या रानजाई, गानलुब्ध मृगनयना, आई आहे शेतात ,पड रे पाण्या ,कार्तिकी अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या .ग्रामीण जीवनातील प्रश्न मांडताना दिघ्यानी त्याला तेथील निसर्गाचीही जोड दिली. त्यांच्या कादंबऱ्याना कृषी जीवनाचा अस्सल स्पर्श आहे. तसेच वारकरी संप्रदायाची शिकवण त्यांच्या नायकांच्या रूपाने पुढे जाताना दिसते .संतांच्या शिकवणुकीतून प्राप्त परिस्थितीवर मात करता येऊ शकते हा संदेश ही पात्रे देतात. शेती ,वनराई ,डोंगर-दऱ्या ,पहाड यांच्यात रममाण झालेली जिवंत माणसे त्यांच्या साहित्यातील पात्रे बनली.दिघे यांची दोन लग्ने झाली होती.त्यांना आठ मुले होती.दिघे यांना शिकारीचा नाद होता.त्यांची पाच वर्षाची कन्या उल्हास हिचा मृत्यू त्यांच्या जिव्हारी लागला होता. ‘ पानकळा ‘ कादंबरी त्यांनी तिला अर्पण केली होती.अर्पण पत्रिकेत ते म्हणतात “जिच्या आठवणींनी माझ्या लिखाणाचे प्रत्येक पान अश्रूंनी भिजले आहे त्या माझ्या या लाडक्या उल्हास बाळाला..” तिच्या मृत्यनंतर त्यांनी शिकारीचा छंद सोडून दिला होता.


‘आई आहे शेतात’ आणि ‘पड रे पाण्या ‘या त्यांच्या कादंबऱ्या वास्तववादी चित्रण करणार्‍या ठरल्या .कोरडवाहू जमिनीची शेती ,जमीनदार व कुळे यांचे संबंध व संघर्ष,जात व्यवस्थेवर आधारित स्पृश्य -अस्पृश्यता आदी महत्त्वाचे विषय त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यातून गांभीर्याने हाताळलेले दिसतात . काहीशी स्वप्नाळू जीवनदृष्टी असलेल्या दिघे यांचे लेखन एकाच वेळी वास्तववादी आणि स्वप्नरंजन वादी आहे .अर्थात हेच त्यांच्या लेखनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आज आपण शेतीचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर बोलतो. पण दिघ्यांनी ऐंशी वर्षांपूर्वी हा प्रश्न मांडला होता .नुसत्या शेतीवर अवलंबून राहून उपयोगी नाही जोडधंदा केला पाहिजे पाणी अडवणे व जिरवणे यावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे ही भूमिका त्यांनी आपल्या लेखनातून मांडलेली होती. ‘आई आहे शेतात ‘ या कादंबरीत ते म्हणतात,” शेती ही फुकाची नाही. इथे कौशल्य लागतं त्यात भात शेती म्हणजे कशिदा .झिजकाम ,भरतकाम गप्पा मारून किंवा शिरा ताणून भागायचं नाही. इथं नुसतं वाटप करून किंवा कायदे करून हा प्रश्न सुटायचा नाही .सामुदायिक शेतीनेही सुटणार नाही. रशियात देखील हा प्रश्‍न सुटलेला नाही .शेतीचे ज्ञान असणाऱ्यांच्या हातात जमीन गेली पाहिजे किंवा ज्यांच्या हातात ती आहे त्यांनी तरी अद्यावत शेतकरी बनलं पाहिजे .”

ज्येष्ठ समीक्षक कालवश कुसुमावती देशपांडे यांनी’ मराठी कादंबरी: पहिले शतक’ या ग्रंथात म्हटले आहे की ,” दिघे यांच्या कथांमध्ये निसर्गजीवन व मानवी जीवन यांच्यामधील भावपूर्ण एकतानतेची एक विशेष परंपरा निर्माण झाली आहे.पुढे इतरांच्या कादंबऱ्यांमध्ये विकास झालेला दिसून येतो. वन्य जातींच्या जीवनाकडे ही दिघ्यांनीच प्रथम लक्ष दिले हेही ध्यानात घेण्याची गरज आहे.”

ज्येष्ठ समीक्षक व माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले एके ठिकाणी म्हणतात,” मराठी साहित्यात नव्या दिशा ध्वनित करण्याचे फार मोठे ऐतिहासिक कार्य र.वा .दिघे यांनी केले. त्यांच्यामुळेच पुढील काळात मराठीमध्ये ग्रामीण आणि प्रादेशिक वाङ्मय असे प्रवाह समृद्ध झाले .हे दिघे यांचे कार्य मराठी वाङ्मयाच्या परंपरेत मोलाचे नाही असे कोण म्हणेल ? ज्येष्ठ अभ्यासक व लेखक डॉ.रवींद्र ठाकूर यांनी र.वा. दिघ्यांच्या साहित्यावर पी.एचडी. केली होती.रवांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजेच पंचवीस वर्षांपूर्वी तो प्रबंध ग्रंथरूपाने ही प्रकाशित झाला होता. त्या प्रबंधात डॉ.रवींद्र ठाकूर यांनी दिघ्यांच्या साहित्याचा उत्तम आढावा घेतला आहे. आणि त्याचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.

त्यामध्ये डॉ.ठाकूर प्रास्ताविकात म्हणतात ,”मुळातला प्रसिद्धीविन्मुख स्वभाव आणि प्रसिद्धीच्या साधनांपासून दूर अशा ठिकाणी वास्तव्य यामुळे त्यांचे नाव भडक अक्षरात झळकत राहिले नाही. स्वतः दिघे प्रसिद्धी, लोकप्रियता याबाबत बेफिकिरी व्यक्त करत.परंतु आपल्याला खरा व पुरेसा न्याय मिळाला नाही ही खंत त्यांच्या मनात होतीच .मात्र हेही तेवढेच खरे की त्यासाठी करावा लागणारा आटापिटा त्यांच्या स्वभावात नव्हता. सभा संमेलनात किंवा कुठल्याही साहित्यिक वर्तुळात ते कधीच वावरले नाहीत .दिघे यांच्या कादंबऱ्यांचे मोल समीक्षकांनी खोलात जाऊन कधी जोखलेच नाही. मराठीतील हा थोर कादंबरीकार ५ जुलै १९८०रोजी कालवश झाला.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया