प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
‘फ्रेम’ हा अलीकडे आलेला ताजा चित्रपट.
वृत्तपत्रातील छायाचित्रकार, त्यांचे काम,कामातील नैतिकता, दोन छायाचित्रकार असलेल्या पत्रकारांची विचार करण्याची पद्धत हा विषय यात हाताळलेला आहे. अर्थात वृत्तपत्रीय छायाचित्रकार आपल्या एका फोटोतून मोठं भाष्य करत असतो. क्रीडाक्षेत्रापासून निरनिराळ्या समारंभापर्यंत आणि फुललेल्या बागांपासून उधाणलेल्या समुद्रापर्यंत अनेक बाबी तो कॅमेऱ्यात कैद करत असतो. शब्दांशिवाय प्रसंग उभा करण्याची ताकद त्याच्या छायाचित्रात असते. एखादा क्षण टिपण्याचे त्याचे कौशल्य महत्त्वाचे असते. त्याला प्रसंगावधान राखावे लागते तसेच अंगी धैर्यही बाणवावे लागते. असे अनेक गुण ज्याच्यात एकत्र येतात तो उत्तम वृत्तपत्रीय छायाचित्रकार होत असतो. अशा छायाचित्रकाराचा नैतिक व अनैतिक या विचार पद्धतीतील संघर्ष हा चित्रपट मांडतो.
विक्रम पटवर्धन यांची कथा असलेला हा चित्रपट त्यांनीचा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात नागनाथ मंजुळे ,अमेय वाघ, मुग्धा गोडसे, अक्षया गुरव ,विठ्ठल काळे आदी कलाकार आहेत. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया असे पत्रकारितेत होत जाणारे बदल यासह या क्षेत्रातील अनेक मुद्द्यांना या चित्रपटांना स्पर्श केलेला आहे
नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांनी अनुक्रमे
चंदू पानसरे आणि सिद्धार्थ देशमुख या दैनिकात छायाचित्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. इतरही सर्वांची कामे ठीक झाली आहेत. तसेच मुख्य कथानकाला जोडून चंदू पानसरेचा अयशस्वी विवाह वगैरे उपकथनकेही आहेत.ती तेवढ्याच मर्यादेत आहेत. मात्र त्याचा परिणाम चंदू च्या मानसिकतेवर होतो हेही दिसून येते. अर्थात चित्रपटाचा मुख्य विषय सुटत नाही हे या चित्रपटाचे मुख्य यश आहे.
चंदू पानसरे हा राष्ट्रीय पातळीवर नावाजला गेलेला पत्रकार आहे. त्याची सतत होणारी धावपळ व कामाचा ताण कमी करण्यासाठी त्याला एक सहाय्यक हवा असतो. त्यासाठी दोन छायाचित्रकार मुलाखतीला येतात. त्यातून सिद्धार्थ देशमुखची निवड होते. सिद्धार्थ चंदूला आपला गुरु म्हणून काम करत असतो. त्याचे चंदूसरही त्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत वृत्तपत्राचा छायाचित्रकार म्हणून काम करण्याचे बारकावे शिकवत असतात.
चंदू पानसरेच्या मते छायाचित्रकाराला एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी एकाच वेळी एक उत्तम छायाचित्रकार आणि एक चांगला माणूस होता येणे अवघड असते. त्याला यातले काहीतरी एक निवडावे लागते तेंव्हा त्याने चांगला फोटोग्राफर बनावे. थोडक्यात उत्तम फोटोग्राफर व्हायचं असेल तर माणुसकी थोडी बाजूला ठेवावी लागते असे त्याचे मत असते. मात्र हे मत त्याचा शिष्य सिद्धार्थला मान्य नसते. त्याच्यामते आपण एकाच वेळी चांगला माणूस आणि उत्तम फोटोग्राफर होऊ शकतो. त्यावर चंदू फार तात्विक चर्चा करत न बसता सिद्धार्थला हे तुला वेळच शिकवेल असे सांगतो.
चंदू आणि सिद्धार्थच्या गुरु-शिष्य छायाचित्रकार म्हणून सुरू असलेल्या प्रवासात एका राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेमध्ये चंदू पानसरेला पहिले पारितोषिक मिळते. सिद्धार्थसह सर्वांना अतिशय आनंद होतो.त्या पारितोषिक वितरण समारंभात पुरस्कार घेताना पहिल्या तीन क्रमांकाची छायाचित्रे दाखवली जातात. यातील चंदूचे पहिला क्रमांक मिळालेले छायाचित्र पाहताना सिद्धार्थ एकदम गडबडून जातो. त्याला मोठा धक्का बसतो. तो स्तिमित होतो.कारण ज्या प्रसंगाची ती छायाचित्रे काढलेली असतात त्याप्रसंगी सिद्धार्थही तेथे उपस्थित असतो. त्यानेही तिथे छायाचित्रे काढलेली असतात. चंदूसरांचे हे छायाचित्र तिथे जशी परिस्थिती होती तसे नाही हे सिद्धार्थ ला जाणवते.
चंदूच्या ज्या छायाचित्राला पारितोषिक मिळालेले असते ते छायाचित्र काढण्यासाठी चंदूने जी कृती केलेली असते ती धक्कादायक असते हे सिद्धार्थला कळते. हे प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले छायाचित्र मिळवण्यासाठी चंदूसरनी अनैतिक मार्गाचा अवलंब करून माणुसकीला सोडचिठ्ठी दिलेली आहे हे सिद्धार्थला उमगते. त्याबाबत तो चंदूसरना कार्यालयात आल्यानंतर बोलतोही. आणि बरच काही सत्य ऐकवतोही.
सिद्धार्थने कॅमेऱ्याशिवाय वास्तवात टिपलेली आपली अनैतिकता चंदूला अस्वस्थ करते. मुळातच तो त्याच्या विस्कटलेल्या संसारामुळे मद्यपान आणि धूम्रपानाच्या आहारी गेलेला असतो. त्यात आणखी ही भर पडल्यामुळे चंदू आत्महत्या करतो. आत्महत्या करण्यापूर्वी चंदूने सिद्धार्थला फोन केलेला असतो. चंदूसर काहीतरी बरे वाईट करून घेणार अशी शक्यता वाटल्याने त्यांना वाचवण्यासाठी सिद्धार्थ त्यांच्या घरी येतो. मात्र तोपर्यंत चंदूची तडफड थांबून सर्व शांत झालेल असत.
याप्रसंगी आपले दुःख आवरत सिद्धार्थ काही छायाचित्रे काढतो. कालांतराने त्यातील एका छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळते. या छायाचित्रात चंदूला ज्या फोटोसाठी पहिले पारितोषिक मिळालेले असते तो
भिंतीवरचा फोटो आणि गळफास लावून आत्महत्या केलेला चंदू एकाच क्लिक मध्ये आलेले दिसतात. सिद्धार्थचा हा फोटो दाखवल्यानंतर हा फोटो ही नैतिकतेला धरून आहे की नाही याची चर्चा लोक करू लागतात. आणि चांगला माणूस आणि उत्तम फोटोग्राफर एकावेळी बनता येतं असं म्हणणाऱ्या सिद्धार्थबद्दलही शंका उपस्थित होते. अर्थात आत्महत्येचे फोटो बहुतांश वृत्तपत्रात प्रकाशित केले जात नाहीत. तसेच अशा फोटोला राष्ट्रीय स्पर्धेत क्रमांकही मिळत नसतात हे खरे आहे. अर्थात चित्रपट कथाकाराला किंवा दिग्दर्शकाला ही गोष्ट माहीत असणारच. मात्र चित्रपट अशा फोटोतून संदेश देऊ इच्छित असल्यामुळे त्यांनी या महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष केले असावे असे दिसते. एकूण हा चित्रपट या विषयाची एक वेगळी मांडणी करतो यात शंका नाही. चित्रपट सर्व तांत्रिक बाजूंनीही जमून गेला आहे. वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट येणे ही सामाजिक व सांस्कृतिक गरज असते. ती गरज या या चित्रपटाने ‘ फ्रेम ‘ करून ठेवली आहे असे म्हणावे लागेल.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा