मदन मोहन : लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

१४ जुलै २०२६ रोजी ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मदन मोहन कोहली यांचा ५१ वा स्मृतिदिन.हिंदी चित्रपट सृष्टीतील या नामवंत संगीत दिग्दर्शकाचा जन्म २५ जून १९२४ या दिवशी झाला आणि ते १४ जुलै १९७५  रोजी कालवश झाले.त्यांना अवघे ५१ वर्षाचे आयुष्य मिळाले होते. पण या आयुष्यात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून अजरामर  स्वरूपाचे काम केले. गेले पाऊण शतक त्यांच्या गीतांनी रसिकांना तृप्त केलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये  त्यांना अभिनेताही बनायचे होते. पण ते संगीतकार म्हणूनच ख्यातनाम झाले.

मदन मोहन यांचा जन्म बगदाद  मध्ये झाला होता. त्यांचे वडील रायबहादुर चुनीलाल कोहली इराकी पोलीस दलात कार्यरत होते. त्यामुळे मदन मोहन यांची बालपणाची काही वर्षे तेथे गेली. १९३२ साली त्यांचा परिवार पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यातील चकवाल या आपल्या मूळ गावी आला. वडील नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेले. आणि मदन मोहन आपल्या आजीआजोबांसह तेथे राहिले . नंतर ते कुटुंबासह लाहोरला आले लाहोर मध्ये ते पुढील शिक्षण घेऊ लागले. 

लाहोर मध्ये त्यांनी गायक कर्तार सिंग यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे काही धडे गिरवले. अर्थात त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण नियमित स्वरूपात होऊ शकले नाही. पुढे हे कुटुंब मुंबईला आले. तिथे त्यांनी पुन्हा शाळेत प्रवेश घेतला. सतराव्या वर्षी ते डेहराडूनला कर्नल ब्राऊन केंब्रिज स्कूल मध्ये दाखल झाले. हे शिक्षण घेत असताना त्यांची थोडीफार संगीत साधना सुरूच होती. मात्र त्यांना त्यासाठी सलग पुरेसा वेळ देता आला नाही. १९४३ साली ते लष्करात दाखल झाले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि संगीत क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. १९४६ साली ते लखनऊला ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम करू लागले. तिथे त्यांना उस्ताद फैयाज खान, उस्ताद अली अकबर खान, बेगम अख्तर, तलत महमूद असे कलाकार भेटले. नंतर ते दिल्लीला ऑल इंडिया रेडिओमध्ये आले. दरम्यानच्या काळात त्यांनी आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमाला संगीत दिले तसेच अनेक गझला व गीतांना चाली लावल्या.

या काळातच १९५३ साली अमृतसरच्या शीला धिंग्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. या दांपत्याला संगीता,संजीवनी आणि समीर ही तीन अपत्ये झाली.वयाच्या २६ व्या वर्षी १९५०  साली ‘आँखें ‘या चित्रपटाला त्यांनी संगीत देऊन त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे अदा, मदहोश ,आशियाना, खूबसूरत ,भाई भाई, छोटे बाबू ,देख कबीरा रोया, जहाँआरा, आखरी दाव, जेलर ,संजोग ,आपकी परछाईया , गझल, हकीकत, वह कौन थी,  परवाना बावर्ची, हसते जखम, अदालत,अनपढ,गेट वे ऑफ इंडिया,दस्तक,दुल्हन एक रात की,नीला आकाश,

मौसम,रेल्वे प्लॅटफॉर्म असे अनेक चित्रपट संगीतदृष्ट्या गाजले.

मदन मोहन यांनी गझलांना अतिशय सुंदर संगीत दिले. गझल हा त्यांचा आवडता काव्यप्रकार होता. तलत मेहमूद, मोहम्मद रफी, लता मंगेशकर आदींच्या पार्श्वगायानाने त्यांनी अनेक नायक नायिकांद्वारे उत्तम गझला व गीतांनी सादर केले.

मदन मोहन यांनी गझल आणि गीतांना अतिशय उत्तम चाली दिल्या. गझलेच्याबाबत तर त्यांचे संगीत त्यांना गझल संगीताचा सम्राट ठरवते. राग दरबारी कानडा, यमन यासारख्या रागांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून एकीकडे ते रचनांना गोडव्यात भिजलेली अतिशय मधाळ चाल लावतात तर दुसरीकडे त्यांचे संगीत काळीज पिळवटून टाकणाऱ्या शब्दांना काळजाच्या आर्त स्पंदनांची बोलकी चाल देते. त्यांचे संगीत सतार, बासरी, व्हायोलिन अशा मोजक्या वाद्यांचा वापर करून श्रवणीय होत असते. शब्दातील भाव प्राधान्याने व्यक्त करणारे त्यांचे संगीत त्यामुळेच भावप्रधान बनते.

मदन मोहन यांनी ज्या काळात संगीत दिले तो कालखंड हिंदी चित्रपट सुट्टीचा सुवर्णकाळ होता. त्यांच्याबाबत बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या होत्या,मदन मोहन यांच्या सुरांमध्ये थेट मनाला भिडणारी एक वेगळीच जादू होती आणि तीव्र वेदनाही होती. तलत मेहमूद यांनी म्हटले होते की,

मदन मोहन यांना शब्दांची आणि भावनांची इतकी अचूक समज होती की ते गाण्यातून कविता जिवंत करीत असत.

मदन मोहन गझलांचे  संगीतकार म्हणून श्रेष्ठ होतेच होते यात शंकाच नाही. 

बरबादे मोहब्बत की दुवा साथ लिये जा 

टूटा हुआ इकरारे वफा साथ लिये जा……

तुम्हारी जुल्फ के साये मे शाम कर लूंगा

सफर इक उम्र का युं ही तमाम कर लूंगा…

हाले दिल युं उन्हे सुनाया गया 

आख ही को जबां बनाया गया…

नगमा ओ शेर की सौगात किसे पेश करुं

ये  छलकते हुये जजबात किसे पेश करुं…

ना हंसो हम पे जमाने के है ठुकराये हुए 

दर ब दर फिरते है तकदीर के बहकाए हुए…

हसा है मुझपे जमाना मगर मिटा के मुझे

रहा है प्यार तेरा खाक में मिलाके मुझे…

जो खुशी से चोट खाये वो जिगर कहा से लाऊ किसी और को भी देखे वो नजर कहासे लाऊ…

अशा असंख्य गझला सांगता येतील.पण  त्यांनी राजा मेहदी अली खान (१९१५ -१९६६) यांनी लिहिलेले आणि लतादीदीनी गायलेले ‘ वो कौन थी’ (१९६४ ) चित्रपटातील 

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो…

पास आइए कि हम नहीं आएँगे बार-बार

बाँहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

हमको मिली हैं आज ये घड़ियाँ नसीब से

जी भर के देख लीजिए हमको क़रीब से

फिर आपके नसीब में ये बात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो…

या एकाच गाण्याला संगीत दिले असते तरी मदन मोहन अजरामर ठरले असते असे वाटते. शब्द, सूर आणि संगीत या सर्वच बाजूने हे गाणे अप्रतिम झालेले आहे.

अर्थात बस्ती बस्ती पर्वत पर्वत, कभी ना कही ना , रंग और नूर की बारात ,ये दुनिया ये महफिल, तुम जो मिल गये हो, तेरी आखो के सिवा दुनिया मे रखा क्या, आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे, मेरा साया साथ सही होगा, झुमका गिरा रे, नयना बरसे रिमझिम रिमझिम, वो भुली दास्ता दो फिर आ गई, हुश्न हाजिर है मोहब्बत की सजा पाने को,, तुम बिन जीवन कैसे बिता, हे हसरतों के दाग, कौन मेरे मन के द्वारे, होके मजबूर मुझे, फिर वही शाम वही गम,आपके पहलू में आकर, कर चले हम फिदा जानो तन साथियो, ये दिल मुझे बता दे, तू प्यार करे या ठुकराये, मिलो ना तुम तो हम घबराए, तू जहा जहा चलेगा, रुक जा रात ठहर जा रे चंदा अशा अनेक रचना त्यांच्या संगीताने कृतकृत्य झाल्या.

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले काही चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी पडद्यावर आले .लैला मजनू आणि साहिब बहादुर या चित्रपटांचे काम सुरू असताना मदन मोहन अचानक कालवश झाले. त्यानंतर त्याचे संगीत इतरांनी पूर्ण करून ते १९७६ व १९७७ साली प्रदर्शित झाले. २००४ साली आलेल्या वीर-झारा या चित्रपटामध्येही त्यांच्या संगीताची धून ऐकायला मिळते. मदनमोहन हयात असताना त्यांनी करून ठेवलेल्या चालींवर जावेद अख्तर यांनी शब्द लिहून त्याची गाणी या चित्रपटात झाली आहेत.

नामवंत लेखक अंबरीश मिश्र यांनी अलीकडेच “साठवणीतील गाणी : गझल गंधर्व मदन मोहन “

मदन मोहन यांच्या २५ अप्रतिम गीतांचे रसग्रहण करणारे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाबाबत अर्थात मदन मोहन यांच्याबाबत म्हटले आहे ,” पौर्णिमेच्या रात्रीचं निरभ्र आकाश… ग्रह-तारे-नक्षत्रांचा सडा घातलाय वरती अन् हिरवागार गालिचा पसरलाय धरतीवरती ! असाच अपलक आभास नि आनंद होत राहतो, मदन मोहनची गीतसंपदा अनुभवताना ! मदन मोहन यांची गाणी दुःखी असतात? कोण म्हणतं? धैर्य लागतं दर्द आणि मदन मोहन समजायला. दुबळ्या माणसाचं काम नाही ते… इतक्या साऱ्या संगीतकारांच्या मेळ्यात, गज़लने प्रेमात पडण्यासाठी निवड केली ती मदन मोहनचीच, हा एक शुभयोगच… मदन मोहन अन् लताच्या गज़ल म्हणजे प्राजक्ताचे टप्पोरे अश्रूच ! मदन मोहनबरोबर फार चित्रपट करू शकलो नाही, याबद्दल गुलजार यांनी खेद प्रकट केला. अहो, आम्ही रसिक तर रोज हळहळत असतो ! मदन मोहन गेले पन्नाशीतच. पण गाणी टिकून राहिली. सच्ची कला काळाच्या भक्ष्यस्थानी कधीच पडत नाही… मदन मोहनच्या अमर संगीताचा, रसिक लेखक अंबरीश मिश्र यांनी घेतलेला ललितसुंदर शोध…” मदन मोहन यांचं अतिशय नेमक्या शब्दात यापेक्षा वेगळं वर्णन असू शकत नाही असं वाटतं. मदन मोहन यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया