नवसुमनांचा संग्रह : फुलोरा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

(पूर्व प्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर १२ एप्रिल १९८७ )

फुलोरा हा प्रतिनिधीक काव्यसंग्रह साप्ताहिक साहित्यधाराचे संपादक आनंद कुलकर्णी यांनी प्रकाशित केला आहे. त्यामध्ये त्यांनी नवोदित कवींना व्यासपीठ खुले करून त्यांना वाचकांसमोर आणण्याचे मुख्य काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये मराठी वाङ्मय क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल दिसून येतो तो म्हणजे अनेक प्रकाशन संस्था उदयास आल्यामुळे नवोदितांना प्रसिद्धीचा लाभ घडू लागला आहे. वांग्मयनिर्मितीची केंद्रे बदलली असल्याने साहित्य लेखनही विपुल प्रमाणात घडू लागले .आणि या विपुलतेच्या ढिगार्‍यात काही चमकदार मोती असतात. त्यांच्या लेखणीची भरारी दाखवण्याचा प्रयत्न प्रकाशक करत असतात. प्रसिद्धी व अभिप्राय यामुळे स्फूर्ती मिळते असे म्हणतात.ते जर खरे असेल तर यामधून प्रकाशात आलेले कवी चिंतनशील कविता लिहू लागतील असा विश्वास वाटतो.

या काव्यसंग्रहात मीना समुद्रे ,शामसुंदर नाईक,प्रदीप कुलकर्णी ,सुरेश जोशी, पाटलोबा पाटील, चंद्रकांत ढाले वगैरे कवी आपला वेगळा ठसा उमटवतात.नवोदिकांची ही वाटचाल मराठी साहित्याच्या वाटचालीत उपयोगाचीच आहे. मीना समुद्रे यांची निर्माल्य कविता छान आहे. निर्माल्य  प्रवाहातच अर्पण करायचे असते. ते प्रवाहाशी एकरूप होऊन वाहत जाते किंवा काठावर साचून राहते. श्यामसुंदर नाईक म्हणतात, सूर्य पाहायचाच असेल तर मशालीची गरज आहे का ?

गजल ह्या काव्यप्रकाराची नाते सांगणारी परंतु परिपूर्ण गझल नसणारी रचना पाटलोबा पाटील यांनी केली आहे ते म्हणतात ,

गेले असेन जेथे करपून पीक पाणी

झोळीत मेघ माझ्या घेऊन चाललो मी,

घेऊन चाललो मी सारे ऋतूचे इथले 

तुमच्या उरात वादळे ठेवून चाललो मी..

या व्यतिरिक्त अनेक नवनवीन विचार या संग्रहात नवोदितांनी व्यक्त केलेले आहेत.सगळीच उदाहरणे येथे देणे शक्य नाही.त्याकरता काव्यसंग्रहाचे वाचन हाच एकमेव उपाय आहे.साध्या सोप्या शब्दात मोठा अर्थ सांगण्याचे कसब चंद्रकांत ढाले यांना साधले आहे.ते लिहितात ,

लाटांना शेवट नाही

लाटातच शेवट आहे,

वलयांना शेवट नाही

वलयातच शेवट आहे…

अशा विविध आणि रचनांनी हा फुलोरा वाचनीय झाला आहे.आनंद कुलकर्णी यांनी या काव्यसंग्रहाच्या निर्मितीसाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागले आहेत.प्रसिद्धीपासून दूर असलेल्यांना प्रकाशित करण्याचे काम या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाद्वारे केले आहे.नवोदित कवींचीही काही कर्तव्ये असतात. ती म्हणजे सुंदर काव्यासाठी सतत चिंतन मनन यांची आवश्यकता असते. सुंदर विचार अर्थपूर्ण भाषेतून काव्यात व्यक्त व्हावा ही वाचकाची अपेक्षा असते.मराठी साहित्यात केवळ प्रेम हा एकच विषय काव्यशास्त्रात नाही हे  लक्षात घेणे गरजेचे आहे. निर्मितीवंताच्या दृष्टिकोनातून काही कविता फसतात तर काही कविता अनुकरणाचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात. स्वतःचा उत्कर्ष व्हावा असे जर वाटत असेल तर  स्वतःवर बंधने घातली पाहिजेत.परंतु एक नवोदित कवींचा काव्यसंग्रह या व्याख्येतून त्याकडे पाहिल्यास फुलोरा रसपूर्ण वाटतो. नवदितांच्या वाटचालीचे हे पहिले पाऊल आहे. त्यांची वाटचाल आता जोमाने सुरू होईल अशी आशा वाटते. त्यांना प्रकाशात आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला आहे.

पुस्तकाचे नाव : फुलोरा 

संपादक : आनंद कुलकर्णी

 साहित्य धारा प्रकाशन ,इचलकरंजी

पृष्ठे: ४० किंमत : १२ रुपये 

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया