खुशवंतसिंग 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

‘ एपिटाफ ‘ म्हणजे थडग्यावर कोरलेले शब्द अथवा मृताच्या स्मरणार्थ लिहिलेली वाक्ये.एका अवलियाने आपला एपिटाफ स्वतःच पुढील शब्दात लिहून ठेवला होता.

“या स्थळी चिरविश्रांती घेणाऱ्या माणसान 

ना मानवाला सोडलं ना देवाला.

त्याच्यासाठी तुमचे अश्रू व्यर्थ घालवू नका

तो हलकट होता, ओंगळवाण्या गोष्टी लिहिण्यात 

त्याला फार मजा वाटायची.

हल्ला चढवायला टपलेला हा माणूस

 गेल्याबद्दल परमेश्वराचे आभार  ! “

हे लिहून ठेवणाऱ्या माणसाचे नाव होतं ‘ सरदार खुशवंतसिंग डेॲट माय डोअरस्टेप अर्थात मृत्यू माझ्या उंबरठ्यापाशी या मृत्युलेखसंग्रहाचा समारोप खुशवंत सिंग आणि या एपिटाफने केला होता. असे हे खुशवंतसिंग शतकाच्या उंबरठ्यावर असताना वयाच्या ९९ व्या वर्षी २० मार्च मार्च २०१४ रोजी आपला डाव कायमचा संपून गेले.पण त्यांनी जीवनाचा डाव खेळताना जी वैविध्यपूर्ण अदाकारी केली, कामगिरी केली ती बेजोड होती. कायमची स्मरणात राहणारी आणि स्वतःचा ठसा दीर्घकाळ उमटवणारी होती.

सरदार खुशवंतसिंग हे भारतातील एक ख्यातनाम पत्रकार ,संपादक ,साहित्यिक होते.अतिशय लोकप्रिय आणि बिनधास्त व्यक्तिमत्व असलेल्या खुशवंत सिंग यांनी जीवनाचा मनसोक्त आनंद घेतला आणि इतरांना दिला.जीवनातील सुंदरतेवर या माणसांना समरसून व मनमुराद प्रेम केलं.त्यांनी लिहिलेला शीख धर्माचा इतिहास असो ,ट्रेन टू पाकिस्तान सारखी आज उत्तम कादंबरी असो किंवा माझ्या आयुष्यातील स्त्रिया व पुरुष पासून द मार्क ऑफ विष्णू अँड आदर स्टोरीज हा कथासंग्रह असो त्यांना जगभरातून वाचक मिळाले. ऐंशीच्यावर पुस्तके लिहिलेल्या सरदारानी संपादक म्हणून ,पत्रकार म्हणून अत्युच्च दर्जाची कामगिरी केली होती. साहित्य अकादमी, रॉकफेलर , पंजाबरत्न, टाटा लिटरेचर जीवनगौरव असे अनेक पुरस्कार मिळाले होते. १९७४ साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने गौरवले होते. मात्र १९८४ साली ऑपरेशन ब्लू स्टारचा निषेध करत त्यांनी तो पुरस्कार परत केला. नंतर भारत सरकारने २००७ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले. जगभरच्या अनेक विद्यापीठानी त्यांना डिलीट ही मानाची पदवी देऊन सन्मानित केलेले होते. 

फाळणीपूर्व पंजाब प्रांतात हदली येथे २ फेब्रुवारी १९१५ रोजी त्यांचा जन्म झाला.त्यांचे वडील सर सोभा सिंग हे अतिशय ख्यातनाम वास्तूरचनाकार होते.नवी दिल्लीला त्याकाळी आकार देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. खुशवंतसिंग यांचे शिक्षण दिल्ली आणि केंब्रिजमध्ये झाले. कंवल मलिक या बाल मैत्रिणीशी त्यांनी लग्न केले. त्यांना राहुल आणि मला अशी दोन अपत्ये आहेत. चित्रपट अभिनेत्री अमृतासिंग यांचे ते चुलत पणजोबा होते.लाहोरच्या उच्च न्यायालयात त्यांनी वकीलीही केली.स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारत सरकारचे प्रसिद्ध अधिकारी म्हणून कॅनडा, ब्रिटन ,आयर्लंड आदी देशात काम केले.नियोजन आयोगाच्या योजना मासिकाचे ते पहिले संपादक होते. पुढे त्यांनी नॅशनल हेरॉल्ड, हिंदुस्थान टाइम्स, इलेस्ट्रेटेड विकली आदींचे संपादक मोठी कामगिरी केली.१९८० ते ८६ या काळात ते राज्यसभेचे सभासद होते. खुशवंतसिंग हे भारतातील सर्वात जास्त वाचक लाभलेले स्तंभलेखक होते. त्यांची नर्म विनोदी, सुस्पष्ट, नेमकी भाषा आणि लेखनातून मिळणारी अव्वल माहिती वाचकांना बरेच काही देऊन जात असे. त्यांच्या गंभीर लेखनापासून ते हलक्याफुलक्या लेखनापर्यंत सर्वत्र त्यांचा व्यासंग जाणवायचा. पण तो जडजंबाळ वाटायचा नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांचे लेखनही खुसखुशीत आणि अर्थपूर्ण होते.

संपादकांने नेहमीच गंभीर चेहऱ्याने वावरल पाहिजे, सातत्याने चिंतन मननात अखंड बुडालेलंच असलं पाहिजे हा समज त्यांनी खोटा ठरवला. ते पंचतारांकित हॉटेल प्रमाणेच रस्त्याच्या कोपऱ्यावरील टपरीवरही लोकांशी गप्पा मारताना दिसत.राष्ट्रपतींशी ज्या जिव्हाळ्याने चर्चा करत तेवढाच जिव्हाळा ते त्यांच्या दरवाजावर उभे असलेल्या वॉचमनशी बोलताना दाखवत. त्यांच्याबरोबर काम केलेल्या विमला पाटील यांनी त्यांच्याबद्दल लिहिलं होतं,”  त्यांना काही लोक विचित्र म्हणत पण मला तसं कधी वाटलं नाही. ते श्रीमंत आणि गरीब यात फरक करत नसत. त्यांची मैत्री निखळ होती. ते कुणालाही आपल्याकडे चहाला आणि गप्पा मारायला बोलावीत.पण एक होतं, त्यांचं वागणं आणि त्यांचा संपादनाच काम हे पूर्णपणे प्रामाणिक होतं.आय एम व्हॉट आय एम पद्धतीचं. त्यांच्याविषयी कोणी काहीही बोला त्यांना काहीच फरक पडत नसे. त्यांना आपलं काम आणि आपण भले एवढेच माहीत होत.थोडक्यात काय तर खुशवंतसिंग यांचे व्यक्तिमत्व भेळीसारख संमिश्र आणि चटपटीत होत.

उर्दू शायरीचे निस्सिम चाहते असलेले खुशवंतसिंग आपल्या लेखनात अनेकदा  शेर व कविता पेरत असत. दीर्घकाळ आयुष्य लाभलेल्या या अवलियाने मृत्यूबाबत भरपूर चिंतन केलं होतं. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी ‘ मृत्यूचा चिंतन केल, चिंता नव्हे ‘हा लेख लिहिला. त्यात त्यांनी आज माझे समकालीन मित्र कोणीच हयात नाहीत.मीही काही दिवसात निरोप घेईन .मला मृत्यूची भीती वाटत नाही पण तो शांतपणे यावा एवढंच वाटतं असं म्हटलं. तसेच त्यांना मरण आलं.त्यांचा मुलगा राहुल यांनी सांगितले की,मृत्यूच्या आदल्या रात्री खुशवंतसिंग यांनी रोजच्या रिवाजाप्रमाणे एक पेग मद्य घेतले. नंतर एका पुस्तकाचे थोडावेळ वाचन केले. सकाळी उठल्यावर त्यांनी शब्दकोडीही सोडवली.त्यानंतर काही मिनिटातच त्यांची प्राणज्योत मालवली .एकच दुःख आहे की अवघ्या अकरा महिन्यात त्यांची शताब्दी साजरी करता येणार होती ती आता करता येणार नाही.” अस अखेरपर्यंत आनंदी आयुष्य जगणार्‍या व दीर्घकाळ आपल्या क्षेत्रात अव्वल कामगिरी करणाऱ्या खुशवंतसिंग यांना विनम्र अभिवादन.

खुशवंत सिंग यांनी वर उल्लेख केलेल्या लेखाचा समारोप करताना लिहिलं होतं ,’ दहनापेक्षा दफन मला अधिक आवडतं.कारण जे तुम्ही मातीतून मिळवलेल असत ते पुन्हा मातीत परत  करत असता. बाकी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक क्रिया मला मंजूर नाहीत. आजही माझी प्रकृती चांगली आहे. पण फार दिवस उरले नाहीत हे मलाही जाणवतं .सध्या माझ्या मृत्यूशी वाटाघाटी सुरू आहेत.ना देवावर माझी श्रद्धा आहे ना माझा कयामतच्या दिवसावर विश्वास आहे. ना पुनर्जन्मावर विश्वास आहे.मला केवळ पूर्णविरामच हवा आहे.दिवंगत बुजुर्गही माझ्या लेखणीच्या फटकाऱ्या तून सुटले नाहीत याबद्दल काही जण माझ्यावर टीका करतात. पण मृत्यू काही कोणाला संतत्व बहाल करत नाही. मग एखादा गेलेला माणूस भ्रष्ट आहे असं समजलं तर मी त्याबद्दल लिहितोच. मी पुरेसं आणि पूर्णपणे जगलो आहे. जेव्हा जाण्याचा क्षण येतो तेव्हा कुणाविरुद्ध कोणतेही किलमिष न बाळगता, अढी न बाळगता ,माणसाला शोभेल असे जावं. इकबाल म्हणतो,”  श्रद्धावंताची खूण कोणती तर मृत्यू आल्यावरही त्याच्या ओठांवर प्रसन्न हसूच असेल .”हा माणूस असाच हसत हसत , हसवत हसवत कडा ओलावून गेला. 

(पूर्वप्रसिद्धी: ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” मासिक एप्रिल २०१४)

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया