मुक्काम पोस्ट परदेशवारी ( प्रस्तावना)

प्रवासाच्या वर्णनीय अनुभवाठवणी 

—————————–

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

प्रा.डॉ.शैलजा चनगुंडी यांचे ” मुक्काम पोस्ट परदेशवारी “हे प्रवास वर्णन त्या त्या ठिकाणचे समग्र चित्र आणि तिथला भवताल संक्षिप्त पण अतिशय नेमकेपणे टिपते. वाचकाने त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट दिलेली नसली तरीही आपण तिथे असल्याचा आनंद हे प्रवासवर्णन वाचकाच्या मनात निर्माण करू शकते हे या लेखनाचे महत्त्वाचे यश आहे असे म्हणावे लागेल. भारतातील आणि परदेशातील प्रवासाचे,त्यातील अनुभवांचे आणि प्रमुख पर्यटन स्थळांचे वर्णन करणारे ३१ लेख या पुस्तकात आहेत. प्रत्येकी तीन-चार पृष्ठांचे असलेले हे छोटेखानी लेख जसे वाचनीय आहेत तसेच दर्शनीय अनुभवही निश्चितच देऊन जातात.गेल्या आठ नऊ वर्षामध्ये  केलेल्या या प्रवासाच्या वर्णनीय अनुभवाठवणी त्या त्या ठिकाणी पर्यटक म्हणून जाण्यासाठी वाचकांना नक्कीच उपयुक्त ठरतील असे वाटते.

हे पुस्तक भारतातील केरळ, राजस्थान ,काश्मीर ही स्थळे आपल्याला फिरवून आणते. तसेच अमेरिकेतील फ्रँकफर्ट विमानतळ, कार्मेल बीच , योसोमिटे नॅशनल पार्क, ताहो लेक, यलोस्टीन, ग्रँड टिटॉन नॅशनल पार्क, लास वेगास येथेही आपण जाऊन येतो.युरोपातील लंडन ,पॅरिस, लंडन आय, मादाम तुसोदस म्युझियम,आयफेल टॉवर , व्हरसॉय  पॅलेस, ॲमस्टरडम, स्विझर्लंड आदी त्याच्या आसपासच्या स्थळांसहित आपल्याला नेऊन आणते. या साऱ्या प्रवासाचे, विमानतळाचे , प्रत्यक्ष विमान प्रवासाचे, जेवण खाण्याच्या,विमानतळांच्या प्रतीक्षालयाचे, २ तासापासून २५ तासापर्यंतच्या विमान प्रवासाचे, कौटुंबिक नातेसंबंधाचे माहितीपूर्ण विवेचन साध्या सोप्या पण अंतराला भिडणाऱ्या शब्दांमध्ये डॉ. शैलजा चनगुंडी करतात. निवांत वाटत असतानाच”You are in tha security area.please leave this area” सारखी अचानक आलेली सूचना आणि त्याने झालेली काळजीयुक्त गंमत असेही काही प्रसंग या प्रवास वर्णनाची वाचनीयता वाढवतात.लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही त्यांची शैली वाचकाला खिळवून ठेवते यात शंका नाही.

“अमेरिकेत कुठेही फिरायचं म्हटलं की आपली दोन गोष्टींची पूर्ण तयारी लागते. ती म्हणजे भरपूर प्रवास करण्याची आणि भरपूर चालायची तयारी. काही वेळेला हे एखादे छोटे हायकिंगही असू शकतं किंवा सरळ रस्त्यांनं भरपूर चालणही असू शकतं.” असे सांगणारे हे प्रवास वर्णनपर लेख वाचत असताना काही महत्त्वपूर्ण माहितीही वाचकाला लेखिका करून देतात. उदाहरणार्थ,अमेरिकेतील नेवाडा स्टेट पार्क मधील जगातील सर्वात शुद्ध पाण्याचे सरोवर असलेल्या ताहो लेकचे पाणी ९९.९९४ टक्के शुद्ध आहे. तसेच यलो स्टोन नॅशनल पार्क मध्ये २०२२ साली एका दिवसात १९  इंच झालेल्या अफाट पावसामुळे त्याची अपरिमित हानी झाली होती. एका अर्थानं ते उध्वस्त झाले होते. पण अवघ्या काही महिन्यात ते पूर्वीपेक्षा अधिक दिमाखात उभे करून त्याचे सौंदर्य व वैभव अधिक दिमाखदार करण्याची मानवी शासन, प्रशासन, विज्ञान व तंत्रज्ञान यांची कमाल. तसेच इटली मधील पिसाचा कलता मनोरा आता जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट नसून त्याची जागा रोममधल्या कलोजियमने  अर्थात फ्लेव्हियन अम्फीथिएटरने घेतलीआहे.आणि शरीराचं घड्याळ बदलण्यानं अनुभवायला येणारा जेटलॉग आणि त्याचा होणारा परिणाम व त्यातून बाहेर येण्याचा मार्गही येथे वाचनातून अनुभवता येतो.

व्हिसाबाबतचे एक निरीक्षण नोंदवताना मिश्किलतेने डॉ. शैलजा चनगुंडी लिहितात,” लंडन आणि अमेरिकेच्या व्हिसाचा तुलनात्मक विचार करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी की ,अमेरिकेचा व्हिसा दहा वर्षासाठी मिळतो. मग लंडनचा व्हिसा फक्त सहा महिन्यासाठीच का बरं ? कारण लंडन एकदा बघितले की लगेच तर कोणी एवढे पैसे घालून पुन्हा लंडनला जाणार नाही दुसरा एक मजेशीर विचार मनात आला की सहा महिन्यांचा व्हिसा अशासाठी असणार की एकदा जर पर्यटक लंडनला येऊन गेला की सहा महिन्यांनी लगेच कुणी परत येणार नाही. म्हणूनच त्याचा विचार असा असावा की ,एकदा आलात आता पुन्हा येऊ नका.तिसरा विचार असा होता की कदाचित आम्ही टुरिस्ट म्हणून आलो असल्यामुळे असा सहा महिन्याचा व्हिसा देत असावेत. हे सगळे त्यावेळच्या अज्ञानापोटी माझ्या मनात आलेले विचार. असे अनेक विचारांचं गाठोडं घेऊन आम्ही रूमवर आलो.विमान प्रवास करत असताना माझ्या मनातल्या विचारांनीही बरीच मोठी झेप घेतली होती.”

तर युरोपच्या टूर बद्दल लेखिका संवेदनशीलपणे निरीक्षण नोंदवताना म्हणतात ,” मला युरोपच्या टूर मधील एक गोष्ट आवडली ती म्हणजे जकात नाक्यासारखा एक नाका आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसहित ओलांडला की आपण लगेच दुसऱ्या देशात प्रवेश करतो.मला हे आवडण्याचे कारण म्हणजे इथे सीमारेषा दाखवण्यासाठी कुठलाही कुंपणाची (तेही काटेरी तारेचं )किंवा भिंतीची गरज नाही. या कुंपणानी आणि भिंतींनी माणसांच्या मनात पण भिंत (खऱ्याखुऱ्या) नसल्या तरी मानसिक भिंती ) तयार केले आहेत की काय असं वाटतं. असो.”

पर्यटन आणि शॉपिंग यांचे घट्ट नाते आहे. याबाबत राजस्थानमधील वेगळा अनुभव मांडताना लेखिका म्हणते,” शॉपिंग म्हटले की स्त्रियांचा अग्रक्रम असतो. पण या राजस्थानच्या ट्रीपमध्ये स्त्रियांच्या एक पाऊल पुढे पुरुष आहेत हे मी आवर्जून सांगेन.आणि अर्थातच ही आम्हा स्त्रियांच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. म्हणजे नवऱ्यांच्या पाठीमागे आपल्याला लागायला नको. एखाद्या गोष्टीसाठी. त्यामुळे आमचे सर्वांचे भरपूर शॉपिंग झाले.”

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये इंग्रजीच्या नामवंत अध्यापक म्हणून डॉ. शैलजा चनगुंडी सुपरिचित आहेत. त्या अनेक वर्षे इचलकरंजीत कार्यरत होत्या त्यामुळे त्यांचा माझा परिचय झाला. त्या स्नेहातून व माझा हात लिहिता असल्याने त्यांनी त्यांच्या या पहिल्या पुस्तकाची प्रस्तावना मला लिहायला सांगितली असावी असे मी मानतो. त्यांच्या या पुस्तकाने मलाही मोठा प्रवास घडवला याचा मनस्वी आनंद आहे.

प्रवासवर्णनाचा अर्थच आपण केलेल्या प्रवासातील अनुभव, स्थलदर्शन, त्या भागातील संस्कृती याची माहिती आपल्या लेखनाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचवणे असते .अर्थात त्यामध्ये ते वर्णन लिहिणाऱ्याचा स्वतःचा दृष्टिकोन डोकावत असतो. प्रवास वर्णन म्हणजे केवळ फिरलेल्या ठिकाणाच्या यादीची नोंद नसते तर तो एक जिवंत अनुभव असतो. तो ताजेपणा लेखनातून जेवढा प्रकट होईल तेवढे लेखन वाचनीय होते. तो तजेला डॉ.शैलजा चनगुंडी यांच्या या लेखनातून दिसून येतो. त्यांच्या पुढील लेखन व पर्यटन प्रवासाला माझ्या भरभरून शुभेच्छा……!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली सदतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ते म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया