सुनीता फडणीस यांच्या ओंजळ संग्रहाचा ब्लर्ब 

सौ. सुनीता नितीन फडणीस या गोव्याच्या राहणाऱ्या कवयित्री संस्कृत आणि वाणिज्य या शाखांच्या उच्च पदवीधर आहेत. संस्कृतच्या अध्यापक आहेत.कविता,कथा, ललित स्वरूपाचे सातत्यपूर्ण लेखन त्या करतात. तसेच त्यांना कीर्तन आणि सूत्रसंचालन कलाही अवगत आहे. “ओंजळ “या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहात छंदात्मक कवितेचे अनेक प्रकार दिसून येतात. चाराक्षरी,अष्टाक्षरी,दशेक्षा आठोळी,दशाक्षरी,शिरोमणी काव्य,चित्रकाव्य, हायकू मधुदीप, मधुसिंधू असे विविध प्रकार या संग्रहात आढळतात. त्यांना छंदात्मक कविता लिहायला आवडते आणि ती कला त्यांनी परिश्रमपूर्वक आत्मसात केली आहे हे यातील कवितांवरून दिसते. ही कविता मराठी भावकवितेची परंपरा जपणारी व पुढे नेणारी आहे.

“कशाला आपण विचार करायचा 

मला कमी अन तुला जास्त 

हसत खेळत जीवन जगायचं 

सुखासमाधानात आनंदात मस्त…”

असा प्रामाणिक हृदभाव  जपणाऱ्या या ओंजळीतील एकसष्ठ कवितांतून भक्ती ,प्रेम, निसर्ग यासह एकूणच सकारात्मक जीवन विषयक दृष्टिकोन दिसून येतो. या कविता वाचनीय आहेत. स्वतःकडे व भवतालाकडे  नितळ दृष्टिकोनातून बघणाऱ्या आणि ते शब्दबद्ध करणारी ही कविता आहे. हे या कवितांचे बलस्थान व वेगळेपण आहे. केवळ शब्दकृती कधीही कविता ठरत नसते. तर त्या शब्दकृतीचे विशिष्ट संकेतानुसार केलेले रूपांतर कविता म्हणून आकार घेत असते. असा आकार घेत साकार झालेल्या या कविता आहेत. मी सुनीता नितीन फडणीस यांचे या पहिल्या संग्रहाबद्दल अभिनंदन करतो. त्यांच्या कवितांची ओंजळ अक्षय राहो अशा मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया