प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
११ ऑक्टोबर हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्मदिन तर ८ ऑक्टोबर हा स्मृतीदिन. बिहार मधील सीताबदीयारी येथे ११ ऑक्टोबर १९०२ रोजी त्यांचा जन्म झाला. तर ८ ऑक्टोबर १९७९ रोजी पटना येथे ते कालवश झाले. फुलराणी आणि हरसू दयाल श्रीवास्तव हे त्यांच्या आई-वडिलांचे नाव होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते.जयप्रकाश यांचे पाटण्यामध्ये शिक्षण झाले. १९२० साली त्यांचा प्रभावती यांच्याशी विवाह झाला. त्यांचे सासरे वकिल ब्रिजकिशोर हे बिहारातील एक प्रमुख राजकीय नेते होते. त्यांच्यामुळे जयप्रकाश यांचा महात्मा गांधींशी परिचय झाला.१९२२ साली जयप्रकाश शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. तेथे सात वर्षे राहून १९२९ मध्ये ते भारतात परतले. अर्थातच त्यावेळी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जोमाने सुरू होती.जयप्रकाश त्यात उतरले आणि जीवनाचे अखेरपर्यंत ते राजकारणात सक्रिय राहिले.
भारतीय स्वातंत्र चळवळीतील प्रमुख समाजवादी नेते म्हणून,१९४२ च्या आंदोलनाचे सूत्रधार म्हणून, सर्वोदयाच्या तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते म्हणून जयप्रकाश नारायण सर्वांनाच परिचित आहेत.देशपातीवरील एक प्रमुख व प्रभावी नेतृत्व म्हणून ते ओळखले गेले .भारताच्या सार्वजनिक जीवनावर आपला ठसा ज्या व्यक्तीनी उमटवला आहे त्यात त्यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्यागी ,निस्वार्थी ,तेजस्वी नेतृत्वाने हजारो तरुणांना देशसेवेची प्रेरणा दिली.१९१७ च्या रशियन राज्यक्रांतीचा जयप्रकाश यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. मार्क्सवादाने प्रेरित असलेली ही क्रांती आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या लिखाणामुळे ते मार्क्सवादाकडे वळले.केवळ स्वातंत्र्य मिळवून उपयोग नाही तर खऱ्या अर्थाने तळागाळातील माणसांचा उद्धार झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती.
रशियातील बदलते चित्र पाहून १९३२ नंतर ते मार्क्सवादाकडून लोकशाही समाजवादाच्या दिशेने गेले .१९३४ मध्ये त्यांनी काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस या गटाची स्थापना केली होती.तिचे नेतृत्व केले. समाजवादी विचारावर आढळनिष्ठ असलेल्या या लोकनेत्यांने ” समाजवादच का ? ” ही पुस्तिकाही त्यावेळी लिहिली. त्यात ते म्हणतात,” समाजातील सर्व प्रकारची विषमता नाहीशी केली पाहिजे. आज एका बाजूला ऐश्वर्य ,आराम,संस्कृती व सत्ता तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य , रोगराइ,उपासमार , गलिच्छ राहणी,अज्ञानाचे चित्र आहे. ते बदलले पाहिजे. अशी विषमता व जातीभेद नाहीसे करणे हा समाजवादाचा प्रमुख हेतू असला पाहिजे.मात्र लोकशाहीने बदल घडवून आणणे शक्य असते तेथे हिंसाचारी मार्गाचा अवलंब करणे चूक ठरेल. लोकशाहीत अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य मिळत नसेल तर समाजवाद निर्माण करता येणार नाही.”
१९५२ च्या निवडणुकीत पराभवानंतर जयप्रकाश समाजवादाकडून सर्वोदयाकडे झुकू लागले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनातही ते सहभागी झाले. त्यावेळी लिहिलेल्या एका लेखात ते म्हणतात,” जडवादी संस्कृती भौतिकवादाच्या माणसाला चांगुलपणाने वागण्यासाठी कोणतीही तर्कसंगत प्रेरणा मिळत नाही. माझी आता खात्री झाली आहे की चांगुलपणाच्या प्रेरणा शोधण्यासाठी माणसाला जडवादाच्या पलीकडे गेले पाहिजे.जडवाडी तत्त्वज्ञानाच्या आधारावर कोणत्याही समाजाच्या पुनर्घटनेचे काम यशस्वी होऊ शकणार नाही.” १९४७ ते १९५३ या काळात ते रेल्वेच्या सर्वात मोठ्या अशा ऑल इंडिया रेल्वेमन्स संघटनेचे अध्यक्ष होते.
सत्ताकेंद्राभोवती व संपत्तीच्या प्रभावाखाली असलेल्या राजकारणात भेद करून जनहिताचे राजकारण निर्माण करण्यासाठी अखेरच्या काळात सर्वोदय तत्त्वज्ञानाचे अपुरे पण लक्षात आल्यावर त्यांनी १९७४ साली संपूर्ण क्रांतीची हाक दिली. नैतिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात मूलभूत सुधारणा घडवून आणून त्याद्वारे जातीविहीन व वर्गविहीन समाजाची निर्मिती हे संपूर्ण क्रांतीचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले होते. ” राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौतिक व आध्यात्मिक अशा सात क्षेत्रात मुलभूत बदल मला अभिप्रेत आहे. मी अशा भारताचे चित्र रंगवतो की ज्यात जाती नसतील, शोषण नसेल आणि प्रत्येक नागरिक स्वतंत्र असेल. संपूर्ण क्रांतीला मी लोकक्रांती म्हणतो.” असे ते म्हणाले होते. राजकारणाचे शुद्धीकरण करून लोककारणात तिचे परिवर्तन करणे हा या क्रांतीचा मुख्य उद्देश होता. अर्थात हा एक आदर्शवादी विचार होता त्यामुळे त्याला मर्यादाही होत्या. हे तत्त्वज्ञान व्यावहारिक पातळीवर आणणे हे अतिशय लांब पल्ल्याचे उद्दिष्ट आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
संपूर्ण क्रांतीबाबत एन.एस.कुलकर्णी यांनी भारतीय समाज विज्ञान कोषात म्हटले आहे ” , संपूर्ण क्रांतीचे तत्वज्ञान माणूस सत्प्रवृत्त आहे, त्याच्याकडून सौजन्य अपेक्षित आहे या गृहीतकावरच आधारलेले आहे. म्हणूनच त्यावर काही मर्यादा पडतात. क्रांतीचे साधन कायदा नव्हे असे म्हणणे अतिशयोक्त स्वरूपाचे वाटते. कारण कायद्याचे राज्य ही कल्पना बहुतेक सर्वत्र जवळजवळ यशस्वी आणि सर्वमान्य झाली आहे. मानवी स्वभाव लक्षात घेता समाजात स्वार्थ ,मत्सर, स्पर्धा ही नष्ट होईल असे मानणे ही अवास्तव वाटते. म्हणून संपूर्ण क्रांतीतील गृहीते प्रत्यक्ष व्यवहारापासून दूर वाटतात.सर्वच गोष्टी अहिंसात्मक मार्गाने साध्य होतील हे तत्व विशुद्ध असले तरी नेहमीच यशस्वी होत नाही. वाढत्या औद्योगीकरणामुळे ग्रामव्यवस्था ,संयुक्त कुटुंब पद्धती यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. तेव्हा संपूर्ण क्रांतीला अभिप्रेत असलेली अर्थव्यवस्थाही प्रत्यक्ष कशी आणता येईल हा प्रश्नच आहे. पक्षविहीन लोकशाही हा विचार नवा वाटला तरी तोही आदर्शवादी स्वरूपाचाच आहे.”
१९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या अंतर्गत आणीबाणी विरोधात जयप्रकाश यांनी यशस्वी आंदोलन केले. आणीबाणीनंतर जनता सरकार सत्तेवर आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. हे जनता सरकार सत्तेवर असतानाच जयप्रकाश नारायण कानवश झाले. हा पक्ष नंतरच्या काळात पूर्णतः अपयशी ठरला.हे आपण पाहत आहोतच. आणीबाणी निश्चितच चुकीची होती.पण त्याच बरोबर जनता सरकार मध्ये उजव्या विचारांचा केंद्रात शिरकाव झाला हेही लक्षात घेतले पाहिजे.
जयप्रकाश यांना लोकांनी लोकनायक नाही ही पदवी दिली होती. जयप्रकाश यांची वाटचाल मार्क्सवादापासून संपूर्ण क्रांती पर्यंतच्या विचारापर्यंत बदलत गेली असली तरी त्यामागे सामान्य माणसाच्या विकासाचा विचार हीच प्रेरणा होती यात शंका नाही. जयप्रकाश यांना फाय फाउंडेशनच्या राष्ट्रभूषण पुरस्कार, रेमेन मॅगसेस पुरस्कार आणि मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा