प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
” कविता म्हणजे आकाशीची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा नव्याणऊ आपणास होरपळून मात्र घेतात. मी अशा नव्याणवांपैकीच आहे. वाणी ही फार मोठी देवता आहे. सामान्य देवतांच्या आराधनेससुद्धा फार जपावे लागते. मग या देवतेच्या आराधनेस किती जपावे लागेल बरे ? तुम्हास कविता करून कीर्ती मिळवायची आहे काय ? तर कीर्तीच्या लालसाने धडपडणाऱ्या तरुणांकडे ती बहुदा ढुंकूनही पाहत नाही. उलट तिला तुच्छ करून आपल्याच नादात म्हातारे झालेले लोक तिला वरण्यास पसंत वाटू लागतात. आणि कित्येकास तर तुम्ही मरून या म्हणजे मी माळ घालीन असे ती म्हणत असते. तुम्हास जगाच्या अंधारात आपल्या बुद्धीचा किरण पाडणे आहे काय ? असेल तर तुमचे हृदय उललेले आहे काय ? फाटले आहे काय ? कारण हृदयाच्या गाभाऱ्यात तेवत असणाऱ्या नंदादीपाचा प्रकाश जेव्हा फाटलेल्या हृदयाच्या फटीतून अंतर्मुख झालेल्याच्या दृष्टीस पडतो आणि तो प्रकाश जेव्हा बुद्धी परावृत्त करून जगावर पाडते तेव्हा अंधारात चाचपडणाऱ्यास वाट दिसू लागते. एरव्ही कागदांवर दिव्यांची चित्रे रंगवून अंधारातून चालला आहात, तर एवढा आमचा कंदील तरी घेऊन जा असे म्हणून आग्रहाने ते आपले दिवे, म्हणजे दिव्यांची चित्रे लोकांच्या हाती देणारे स्वयंसेवक उर्फ स्वसेवक नाक्यानाक्यावर गर्दी करून उभे आहेत. त्यांच्या या दिव्यांच्या चित्रांनी त्यांना काय किंवा कोणाला काय वाट थोडीच दिसणार आहे ? …तुम्हाला स्वानंद पाहिजे आहे काय ? स्वानंद हे कवीचे उत्तम पारितोषिक होईल यात शंका नाही.पण खाज सुटली असता खाजवल्याने जो आनंद होत असतो तसला आनंद काय कामाचा ? सगळे आयुक्त आनंद याच मासल्याचे आहेत. त्यांच्या परिणामी हळहळच रहावयाची तर उत्तम पारितोषिक असा टिकाऊ आनंद कसा मिळवायचा, याचा विचार तुम्हीच करा….”
हा उतारा १२० वर्षांपूर्वी एका कवीने आपले समकालीन कवी ज. वा.हर्षे उर्फ आनंदीरमण यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरातील आहे. एका होतकरू कवीला लिहिलेल्या पत्रातून काव्यविषयक अशी भूमिका मांडणाऱ्या कवीचे नाव होते केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले. १५ मार्च १८६६ रोजी जन्मलेले केशवसुत ७ नोव्हेंबर १९०५ रोजी कालवश झाले. ( काही ठिकाणी केशवसुत यांची जन्मतारीख ७ व १७ ऑक्टोबर अशीही दिली आहे.)अवघ्या ३९ वर्षाचे आयुष्य मिळालेल्या या थोर कवीने मराठी काव्यपरंपरेला एक वेगळे वळण दिले. एका नव्या युगाच्या निर्माता म्हणून त्यांचे योगदान फार मोठे आहे.
आधुनिक मराठी कवितेचे जनक असलेल्या केशवसुतांचा जन्म गणपतीपुळ्याजवळ असलेल्या मालगुंड या रत्नागिरी जिल्ह्यातील गावात झाला. आज तेथे त्यांचे स्मारक उभे राहिलेले आहे.त्या प्रांगणात गेल्यावर प्रत्येक कवीहृदयाच्या रसिकाला कृतकृत्य झाल्याचा आनंद होतो आणि एक प्रेरणाही मिळते. “नैऋत्येकडील वारा” या कवितेत केशवसुतांनी मालगुंडचे वर्णन माल्यकुट असेही केल्याचे दिसते. केशवसुतांचे वडील केशव विठ्ठल दामले हे केसोपंत दामले या नावानेही सुपरिचित होते.त्यांचे शिक्षण चिपळूण येथे झाले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी सरकारी शाळेत ते शिक्षक बनले. ते अतिशय करारी स्वभावाचे होते.नीटनेटके राहणारे होते.केशवसुत २७ वर्षाचे होते तेव्हा म्हणजे १८९३ साली केसोपंत कालवश झाले. केशवसुतांच्या आई याही चिपळूण जवळील एका गावाच्या खोत करंदीकर घराण्यातील. त्यांच्याकडे दया, क्षमा,शांती हे मोठे गुण होते.त्या केशवसुतांच्या पूर्वी तीन वर्षे म्हणजे १९०२ साली केशवसुतांचे धाकटे बंधू मोरो केशव दामले यांच्याकडे असताना उज्जयिनी येथे कालवश झाल्या. आई आई, आईकरता शोक, गोष्टी घराकडील ,मी , सिंहावलोकन, नैऋतेकडील वारा वगैरे काही कवितातून केशवसुतानी आपल्या आई-वडिलांविषयीचा आदरभाव आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये टिपलेली आहेत.
केशवसुताना एकूण अकरा भावंडे होती.त्यापैकी श्रीधर पंत हे अत्यंत बुद्धिमान होते. ते गणित व संस्कृत विषयाचे प्राध्यापक झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत पहिली जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली होती.सितारामपंत हे राजकीय कार्यकर्ते होते.तर मोरोपंत हे व्याकरणकार म्हणून प्रसिद्ध होते. चिंतोपंत हे धाकटे बंधू. वळणे गावातील वाडवडिलार्जीत खोती पाण्यात त्यांची हयात गेली. चिंतोपंतांबद्दल केशवसुतांना विशेष प्रेम होते. ही कळवळ त्यांनी कवितेतूनही मांडलेली आहे. या चिंतोपंतांचे चिरंजीव परशुरामपंत काहीकाळ केशवसुतांबरोबर खानदेशात होते.त्यांनी आपल्या काकांच्या २५ व्या स्मृतिदिनी म्हणजे १९३० साली “केशवसुत स्मृतीग्रंथ “प्रकाशित करून आदरांजली वाहिली होती.
केशवसुतांचे मराठी शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाले.इंग्रजी शिक्षणासाठी वडील बंधू श्रीधरपंत यांच्याकडे १८८२ साली केशवसुत गेले. श्रीधरपंतांचे अचानक निधन झाल्याने वर्षभरातच केशवसुत पुन्हा खेडला आले. त्यांच्याबरोबर मोरोपंत हे बंधूही होते. श्रीधरपंतांनी आपल्या या दोन्ही भावांना घरच्या घरीच इंग्रजी तीन इयत्तापर्यंत शिक्षण दिले.त्यावेळी या दोन्ही भावांचे सहध्यायी म्हणून श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे कनिष्ठ बंधू श्रीमंत संपतरावही शिकत होते. नंतरचा काही काळ नागपूर, वर्धा येथे शिक्षण घेऊन केशवसुत पुण्याला आले आणि मोरोपंत अमरावतीला गेले. केशवसुत पुण्यात सरकारी हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे १८८९ साली ते मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत सहा ते आठ वर्षे अनेक नोकऱ्या केल्या. प्लेगच्या साथीमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. तेथे मडगाव फैजपूर येथे त्यांनी नोकरी केली. १९०३ साली धारवाड येथे त्यांची सरकारी हायस्कूलमध्ये मराठीचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. केशवसुतांचे चुलत काका हरी सदाशिव दामले हे हुबळीला शाळेत शिक्षक होते.त्यांच्या आईचे निधन झाल्याने केशवसुत आपली पत्नी आणि कन्यासह हुबळीला गेले.तेथे चार-पाच दिवस राहून ते धारवाडला परतणार होते. पण त्याचवेळी हुबळीत प्लेगची साथ जोरात होती. त्याची लागण केशवसुत आणि त्यांची पत्नी रखमाबाई नाही झाली.या दुखण्यात७ नोव्हेंबर १९०५ रोजी केशवसुत आणि आठ दिवसांनी म्हणजे १५ नोव्हेंबरला त्यांच्या पत्नीही कालवश झाल्या. त्या काळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या पंधराव्या वर्षीच केशवसुतांचा विवाह झाला होता. या दाम्पत्त्याला तीन मुली होत्या. केशवसुतांच्या पश्चात या तीन मुलींचा सांभाळ त्यांचे थोरले भाऊ चिंतोपंत यांनी केला.
केशवसुत कवी म्हणून १८८५ पासून लिहिते झाले. एकीकडे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसची स्थापना त्याच वर्षी होत होती.आणि दुसरीकडे केशवसुतांची कविता प्रगट होत होती. या भवतालाचा शोधही त्यांची कविता घेत होती. प्रारंभीच्या काळात कुणीतरी ,एकमित्र ,जगनमित्र आदी नावांनी केशवसुत लिहीत होते. त्याकाळी काव्यरत्नावली या नावाचे केवळ कवितांसाठीचे मासिक नारायण नरसिंह फडणवीस यांनी १८८७ साली सुरू केले होते. या फडणवीस यांनीच त्यांना केशवसुत हे टोपण नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. काव्यरत्नावली हे मासिक सलग पन्नास वर्षे प्रसिद्ध होत राहिले. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात त्याचे योगदान मोठे आहे. या काव्यरत्नावलीसह करमणूक हे हरिभाऊ आपटे यांचे साप्ताहिक मनोरंजन आणि निबंधचंद्रिका ही गोविंदराव आणि काशीबाई कानिटकरांचे मासिक यातूनही केशवसुतांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. हरिभाऊनी केशवसुतांच्या निधनानंतर बारा वर्षांनी म्हणजे १९१७ साली केशवसुत यांची कविता या नावाने कविता संग्रह प्रसिद्ध केला. हरिभाऊ यांच्यासारख्या ख्यातनाम कादंबरीकाराच्या संपादनाचे हे काम फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे समग्र केशवसुत एकत्र वाचायला मिळाले.त्यालाही आता शंभर वर्षे होऊन गेली आहेत. या कवितासंग्रहाने आधुनिक मराठी कवितेचा श्रीगणेशा केला. कवितेया आशयापासून मांडणी पर्यंत आणि दृष्टिकोनापासून आविष्कारापर्यंत सर्व जाणीव जागृतीत मूलभूत बदल घडवून आणला.
“समग्र केशवसुत ” बाबतचा थोडा इतिहास या निमित्ताने ध्यानात घेतला पाहिजे.केशवसुतांच्या काही कवितांचे संपादन सर्वप्रथम नारायण महादेव भिडे यांनी केले होते.मात्र या कवितांची कालानुक्रमे जुळणी आणि इतर काम केशवसुतांचे सच्चे चाहते नाट्यछटाकार दिवाकर उर्फ शंकर काशिनाथ गर्गे यांनी १९१३ पासून सुरू केले होते.हे पुस्तक प्रकाशित होणार अशी करमणूक मासिकाच्या ८ नोव्हेंबर १९१३ च्या अंकात हरिभाऊ आपटे यांनी जाहिरातही दिली होती.दिवाकरांनी केशवसुतांचे १०२ कवितांचे संकलन करून हरिभाऊंना दिले होते.मात्र यासंदर्भात या दोघांत काहीतरी मतभेद झाले. त्यामुळे हरिभाऊंनी केशवसुतांच्या कवितांच्या संपादनाचे काम त्या काळातील तरुण कवी आणि वृत्तरचना व भाषा यावर असाधारण प्रभुत्व आणि संस्कृत, इंग्रजी ,बंगाली प्राचीन मराठी वाङ्मयाचा व्यासंगत असणारे कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांच्याकडे दिले होते.पुढे १९१७ साली ” केशवसुत यांची कविता ” हा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यावर संग्रहक म्हणून हरिभाऊंचे नाव होते.त्यात १२४ कविता होत्या. दरम्यान दिवाकर यांचे केशवसुतांच्या कवितांच्या संशोधनाचे काम सुरू होते. ते पुढे रत्नाकर या मासिकातून प्रकाशित झाले. १९२१ साली केशवसुतांचे धाकटे बंधू चिंतोपंत यांनी केशवसुतांचे चरित्र आणि काव्यविषयक माहिती प्रसिद्ध केली. त्यात हरीभाऊंच्या पुस्तकात नसलेल्या सात कविता आहेत.१९६१ साली भवानी शंकर पंडित यांनी ” समग्र केशवसुत” चे संपादन केले.त्यात संपादकीय निवेदन ,अर्पण, केशवसुतांचे चरित्र, केशवसुतांच्या कवितेचे पर्यालोचन ,केशवसुतांच्या कविता विभाग पहिला (१८८५ ते १८८९ बेचाळीस कविता) ,विभाग दुसरा (१८९० ते १८९६ त्रेपन्न कविता), विभाग तिसरा(१८९७ ते १९०५ सदतीस कविता) अशा एकूण १३२ कविता त्यावरील विभागनिहाय टीपा आणि केशवसुतांच्याय चार इंग्रजी व दोन मराठी कविता या केशवसुतांच्या अप्रसिद्ध लेखनासह केशवसुतांवर नरहर शंकर रहाळकर, वासुदेव वामन गद्रे ,नारायण वामन टिळक आणि नारायण या टोपण नावाने लिहिलेल्या कवीच्या पाच कविता परिशिष्ट म्हणून समाविष्ट आहेत.गेल्या सव्वा शतकभर केशवसुतांच्या कवितांचा निरनिराळ्या अंगानी अभ्यास न केला गेला आहे. त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य हे की सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता आजच्या जागतिकीकरणाच्या सर्वांगीण बदलाच्या परिस्थितीतही नवा विचार देणारी ठरते. केशवसुतांच्या कवितेचे कालातीतपण आणि युगप्रवर्तकता यात सामावली आहे. त्यांच्या सर्व कवितांचा आढावा या लेखात घेणे शक्य नाही. पण काही कविता आणि त्यामागील भूमिका जाणून घेण्याची गरज आहे.
“मनुष्याची जाणीव त्याच्या अस्तित्वाला घडवीत नसते तर उलट त्याचे सामाजिक अस्तित्वस्त त्याची जाणीव बनवत असते” असे कार्ल मार्क्स एक विधान आहे. केशवसुतांच्या कवितेतून व्यक्त होणाऱ्या जाणीवा हे स्पष्ट करतात असे दिसून येते.केशवसुतांच्या कवितांची काही वैशिष्ट्ये दिसून येतात. १९७३ साली ज्येष्ठ समीक्षक व. दि.कुलकर्णी यांचे ” केशवसुतांचे अंतरंग” हे शंभर पानांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याच्या मलपृष्ठावर वदि लिहितात ,” केशवसुतांची सामाजिक कविता ही पृथ्वीला स्वर्ग बनू न देणाऱ्या कृतघ्न,दुष्ट, स्वार्थी मानवांवर चालू करून जाणारी उद्दाम, आवेगी अशी क्रांतीकविता आहे. तर केशवसुतांची कविविषयक कविता ही पृथ्वीला स्वर्गसौंदर्य प्राप्त करून देऊ शकणाऱ्या उदारमनस्क, उदारचरित, प्रज्ञाचक्षु,प्रतिभासंपन्न आदर्शरूप कलावंताचे महात्म्य गाणारी अनिवार स्तोत्रगीते आहेत. आणि त्यांच्या गुढवादी कविता म्हणजे मानवी मर्यादा सोसणाऱ्या पण अमर्याद होऊ बघणाऱ्या एका बद्धमुक्त जीवात्म्याची करुणरम्य निश्वासिते आहेत. या त्रिविधरूपातील केशवसुतांची कविता एकात्मताने पाहण्यातच खरे स्वारस्य आहे.”
केशवसुतांच्या जन्मशताब्दी निमित्त १९६६ साली आलोचना मासिकाने एक विशेषांक प्रकाशित केला होता. या अंकातील खास लिहून घेतलेल्या मजकुराचे “केशवसुतं गाऊनी गेले ” हे पुस्तक वसंत दावतर यांनी त्यावर्षी प्रकाशित केले.या पुस्तकात पु. शि.रेगे, दुर्गा भागवत, दि.के.बेडेकर, ल. म .जोग,रमेश तेंडुलकर, गंगाधर पाटील, दिलीप पुरुषोत्तम चित्रे ,गजानन कामत आणि व वसंत दावतर यांचे केशवसुतांच्या कवितांवरील लेख आहेत. त्यातील ” केशवसुतांच्या कवितेची अपूर्वाई आणि आमच्या रसिकतेची मर्यादा” या लेखात वसंत दावतर यांनी केशवसुतांचे वेगळेपण नेमकेपण अधोरेखित केले आहे.
या लेखात वसंत दावतर लिहितात,” समकालीन किंवा आधीच्या इंग्रजी कवितेचे मराठी नमुने केशवसुतानी दिलेले नाहीत.आणि कालसापेक्ष जीवनदर्शनाच्या बोधमय विचारसृष्टीला कवितेत प्रतिबिंबित करण्याइतके दुय्यम ध्येय त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले नाही. निव्वळ कविताप्रकार निर्माण करण्याची नव्हे तर नवंलेखनाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी त्यांची प्रायोगिकता आहे. श्रवणाश्रयी तालकल्पनेच्या आधारावर शब्दांमध्ये अर्थवाही व लयबद्ध गती निर्माण करण्याची त्यांची क्षमता आहे.आणि समकालीन स्वप्नरम्यतात्मक व बुद्धिवादी, ध्येयवादी भावसंवेदनांच्या पलीकडे जाऊन लौकिक भाषेच्या माध्यमातून स्वराश्रयी आणि आघाताश्रयी साकल्यपूर्ण कविताबंध निर्माण करणारी त्यांची कल्पकता आणि योजकता आहे. या वैविध्यात केशवसुतांच्या प्रतिभेची म्हणून कवितेची अपूर्वाई आहे “.
केशवसुतांच्या कवितेने मराठी कवितेला आधुनिकतेचे रंगरूप दिले. हे रंगरूप आम्हाला दिसले नसेल तर ती आमच्या रसिकतेची मर्यादा आहे हे स्पष्ट करून वसंत दावतर म्हणतात,” या अपूर्वतेतच केशवसुतांचे कवित्व प्रत्ययाला येते. आणि ते एक श्रेष्ठ प्रतिभावंत ठरतात. इतकेच नव्हे तर ते युगकवी ठरतात. या अर्थाने मात्र, केशवसुतांच्या कवितेतून मराठी कवितेचे युगप्रवर्तन झाले नाही. ज्या तांत्रिक प्रयोगांचा स्वीकार केशवसुतानी केला ते तांत्रिक प्रयोग नंतरच्या मराठी कवितेने स्वीकारले आणि केशवसुतांनी केलेला कविता विषयाचा विस्तार नंतरच्या मराठी कवितेने धारण केला. या दृष्टीने केशवसुतांच्या कवितेने मराठी कवितेचे युगप्रवर्तन केले. पण काव्यार्थाची व काव्यबंधाची जी मूलभूत नवी दृष्टी केशवसुतांनी आपल्या कवितेतून प्रत्यक्षात आणली ती या मराठी कवितेला व तिच्या समीक्षेला अस्पृश्यच राहिली. केशवसुतांच्या कवितेचे हे नवे उन्मेष जाणणे व अनुभवणे आणि या अनुभवांचे शक्य तितके दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केशवसुतांची कविता समजणे व आस्वादणे होय. या आश्वादातून होणारी केशवसुतांच्या कवितेची समीक्षा त्यांच्या कवितेची अपूर्ववस्तूक्षमता प्रत्ययाला आणून देते. या अपूर्ववस्तूक्षमतेत केशवसुतांचे क्रांतिकारत्व आहे.”
केशवसुतांचे हे क्रांतिकारकत्व त्यांच्या कवितांच्या आधारे समजून घेणे गरजेचे आहे. अर्थात या कविता कालानुक्रमे नव्हे तर विषयानुक्रमे निवडलेल्या आहेत. “स्वर्ग,पृथ्वी आणि मनुष्य “ही कविता ११ एप्रिल १८९० रोजी केशवसुतानी लिहिली. देवाने प्रारंभी आकाश व पृथ्वी निर्माण केली ही बायबल मधील कल्पना आणि माणसाच्या पापी स्वभावामुळे जगातील सुखे संपली ही ख्रिस्तीपुराणकथा या कवितेचा प्रेरणास्त्रोत आहे.केशवसुत हे पृथ्वीचे पुत्र आहेत. ते पृथ्वीच्या भौतिक वास्तवाला तुच्छ लेखून परलोकाचा अथवा पारलौकिक सुखाचा विचार करत नाहीत.उलट ही पृथ्वी अधिकाधिक सुंदर कशी होईल याचा ध्यास त्यांना लागलेला आहे.पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न ही कविता करते. एकेकाळी स्वर्ग व पृथ्वी जवळ जवळच होते.स्वर्ग पृथ्वीला सदैव आनंद देण्याचा प्रयत्न करी. पृथ्वीही त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. पृथ्वीने आपल्या अंगाच्या मळापासून माणूस तयार केला. तिची अपेक्षा अशी होती की या माणसाने मांगल्याचे गाणे गाऊन स्वर्गाला आणखी जवळ आणावे.आणि त्याने पृथ्वीवर पृथ्वी सह नांदावे. पण दुष्ट माणसाने पृथ्वीला लाथाडले. आणि स्वतः स्वर्गावर स्वार व्हायचे ठरवले. माणसाच्या या कृतघ्नतेमुळे स्वर्ग कोपला.आणि तो दूरवर जाऊन बसला.तेव्हापासून पृथ्वी स्वर्गाच्या प्रेमासाठी झुरत आहे. माणसाचा हा स्वार्थीपणा जाऊन तो उदात्त होईल आणि स्वर्ग पृथ्वीचे मिलन तो घडवून आणेल हा आशावाद केशवसुताना आहे. म्हणूनच या कवितेचा शेवट करताना ते म्हणतात,
तेव्हापासूनी ही धरा झुरतसे, माते, चुकी जाहली!
स्वर्गा,तुही आम्हा क्षमस्व सदया, ये खालता भूतली!
ये बा , आणिक या धरेस अगदी देऊ नको अंतर !
आहे तुजवरी तसेच बसले स्वर्गा, तिचे अंतर !!
प्रा.स.त्र्यं.कुल्ली यांनी ” तीन अर्वाचीन कवी : मार्क्सवादी दृष्टिक्षेप “या पुस्तकात केशवसुत ,मर्ढेकर आणि नारायण सुर्वे यांच्या कवितांचा परामर्श घेतला आहे. त्यात त्यांनी केशवसुत हे भारतातील उदयोन्मुख मांडवलशाहीने निर्माण केलेल्या जाणिवांचा, जीवन मूल्यांचा नव्या सामाजिक राजकीय विचारांचा पुरस्कार करणारे व अशा प्रकारे भूतकाळाच्या काळोख्या गर्भातून येणाऱ्या प्रकाश युगाची पदचिन्ह ओळखणारे थोर कवी होते हे स्पष्ट करून म्हटले आहे की ,युरोपीय प्रबोधनाच्या मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यातील एक प्रकाशमान रत्न म्हणजे मानवाची प्रतिष्ठा हे होय. परमार्थिक जीवनाकडून पृथ्वीवरील जीवनाकडे मनुष्याची दृष्टी वळल्यामुळे साहजिकच मानवाला महत्त्व प्राप्त झाले.आजपर्यंत तो एक साधन होता. ईश्वर ,धर्म, रूढी ही साध्ये होती .आता मनुष्य साध्य झाला. जीवनाच्या सर्व उपयुक्त संस्थांचा तो केंद्रबिंदू बनला.मानवाचा विकास, त्याचे सुख हे ध्येय ठरले. त्याच्या सुखाच्या आणि विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करण्यात येऊ लागले. सारांश,मानवाची प्रतिष्ठा हे मूल्य आधुनिक युगात प्रस्थापित झाले. सामान्य माणसाच्या ठिकाणी असणाऱ्या सत्य, सत्शीलता,ज्ञान यांनी जग बदलता येईल असा विश्वास त्यांना आहे.”
मानवाच्या मनातील या शक्तीचे सामर्थ्य पूर्ण विश्वासाने केशवसुतांनी ” विद्यार्थ्याप्रत ” या कवितेतून मांडलेले आहे ते म्हणतात,
महत्त्व भारी आहे या पृथ्वीचे
त्याहुनी अतिशय या सगळ्या विश्वाचे
परी तुजमध्ये महतीचे हे बीज
त्याहून काही मोठी नाही चीज
ठसव मनी हे साचे बाबा
हे वच बहु मोलाचे..?
माणसाच्या अंतरंगातील सत्याचा प्रकाश,पृथ्वीवरचे सर्वात अनमोल रत्न म्हणजे माणूस आणि तो प्रगल्भ होत जाण्यानेच जग बदलणार आहे हा विश्वास केशवसुत विद्यार्थ्याप्रत या कवितेतून देतात. केशवसुतांच्या कवितेत प्रगल्भ राजकीय जाणीव आणि प्रखर राष्ट्रवाद दिसून येतो. १८८५ साली केशवसुतांनी लेखनाला प्रारंभ केला.त्याच वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. केशवसुत त्यावेळी १९ वर्षाचे होते.त्यांना भोवतीच्या सर्व परिस्थितीचे व्यापक भान होते.त्या काळातील सर्व प्रवाहांचे ते निरीक्षण करत होते. लोकमान्य टिळक आणि आगरकर त्यांचे शिक्षक होते .त्यांची राष्ट्रवादी विचारधारा प्रथम टिळकांच्या प्रभावाखाली होती. नंतर ती आगरकरांच्या वैचारिकतेत समाविष्ट झाली. भारतीय स्वातंत्र्याची आस कवीला लागलेली आहे. त्याची उदाहरणे देता येतील.”एका भारतीयाचे उद्गार “या १८८६ साली लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात,
“संध्याकाळी बघुनी सगळी कांती ती पश्चिमेला
वाटे सद्यस्थितीच अपुली मूर्तती मन्मनाला “
अशी सुरुवात करून अखेरीस म्हणतात
“देवा केव्हा परवशपणाची निशाही सरून
स्वातंत्र्याचा दिनमणी उद्या यावयाचा फिरून ?
केव्हा आम्ही सुटूनी सहसा पंजरांतुनी देवा
राष्ट्रत्वाला फिरूनी अमुचा देश येईल केंव्हा?”
“गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे “ही १८८७ साली केशवसुतांनी लिहिलेली कविता आहे. विद्यार्थी म्हणून घरापासून दूर राहावे लागलेल्या केशवसुतांचे मन घराकडे कसे धाव घेत होते हे या कवितेतून स्पष्ट होते. आपल्या चिंतोपंत या बंधूला बापू या घरगुती नावाने संबोधून या कवितेत केशवसुत लिहितात,
बापू ! गड्या! ध्वज उभा करशील काय ?
तू देशकारण करू झटशील काय ?
बापू ! जनात दिवटी धरशील काय ?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?
प्रा. स. त्र्यं.कुल्ली यांनी म्हटले आहे की ,गावी गेलेल्या मित्राची खोली पाहून त्याच्याबरोबर रात्र-रात्र देशाचे पारतंत्र्य कसे घालवता येईल याचा विचार केल्याचे कवी सांगतो.सामान्य माणसाच्या सुखाचा अंतर्भाव असलेला हा वास्तववादी विवेकी राष्ट्रवादी आहे. म्हणूनच ” कवितेचे प्रयोजन “या कवितेत ते म्हणतात,
“माता ही सुजला स्वभूमी सुफला, तिच्या परी लेकरा खायाला पुरते पहा नच मिळे की, हाल आहे पुरा
झाकायास तनुस वस्त्रही न ते आता पुरेसे मिळे
या वेळेस कसे कवे तुज सुचे गाणे न माते कळे!”
याच राष्ट्रवादी विचारांची उत्क्रांती आंतरराष्ट्रीय वादात झाली.केवळ आपला देशच नव्हे तर जगातील सर्वच देश स्वतंत्र असावेत .कोणत्याही राष्ट्राला दुसऱ्याचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा अधिकार नाही. किंबहुना आपला देश जर दुसऱ्या देशावर पारतंत्र्य लादत असेल तर त्याचाही विरोध करणे हे खरे स्वातंत्र्य प्रेम म्हणजेच देशप्रेम. विष्णुशास्त्री चिपळूणकर, सावरकर यांच्या राष्ट्रवादाचे पर्यावसन आक्रमक अंधराष्ट्रवादात होताना दिसते. तर आगरकर आणि केशवसुतांच्या राष्ट्रवादाचे पर्यावसन मानवताधिष्ठित राष्ट्रवादात होताना दिसते.
केशवसुतांनी आयरीश स्वातंत्र्याच्या बाजूने एक कविता लिहिली होती असे प्रा. भ.श्री. पंडित यांनी म्हटले आहे.भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा जगातील मानवमुक्तीचा व्यापक लढ्याचा एक भाग आहे. या भूमिकेशी ते सुसंगतच आहे .म्हणूनच “आगबोटीच्या काठी उभ्या असलेल्या तरुणीस ” पाहून आलेल्या विचारात पुढील विचारही येतात,
कधी कोणी राष्ट्र प्रबल दुसऱ्याच्या बुडविण्या
जहाजे मोठाली करील जरी गे सज्ज लढण्या
तरी सांगोनिया प्रवर वरुणाला खवळवू
समुद्रा तेणे या सकळ खलनौका चुथडवू !
पाश्चात्य राष्ट्रांच्या वसाहतवादाचा व साम्राज्यवादाचा हा विरोध आहे.याच कवितेत ते पुढे म्हणतात,
गुलामा आणाया निघतील कुणी दुष्ट नर ते
तरी त्यांची फोडू अचूक खडकी ती गलबते!
आफ्रिकेतील निग्रोला गुलाम म्हणून विकणाऱ्या गोऱ्यांच्या वंशवादाचा हा संदर्भ आहे. हे पाहिले म्हणजे मुक्तिबोध, सुर्वे यांनी व्यक्त केलेल्या इंटरनॅशनलीजमचा हा पहिला काव्यात्म हुंकार असल्याची खात्री पटते. शंभर वर्षांपूर्वी एका मराठी कवीने घेतलेली विचारांची ही उत्तुंग झेप पाहून मन अभिमानाने भरून येते. आणि मन आदराने लवते.
खरोखर केशवसुत हे सुब्रमण्यम भारती किंवा रवींद्रनाथांसारखे राष्ट्रीय कवी आहेत यात शंका नाही.
आगरकरांच्या विचारधारेचा प्रभाव पडलेल्या केशवसुतांनी सामाजिक सुधारणेच्या आग्रह कवितेतून धरला.अनिष्ट रूढी ,परंपरा, विषमतावादी व्यवस्था चातुर्वर्ण्यव्यवस्था या साऱ्यांवर कठोर हल्ला चढवला. हरिभाऊ आपटे यांच्या स्त्रीवादी भूमिकेच्या गौरव करताना त्यांनी ” पण लक्षात कोण घेतो ? च्या कर्त्यास ” ही कविता लिहिली. त्यात त्यांचा स्त्रीमुक्तीचा विचार दिसून येतो.” अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ” या कवितेतून त्यांनी अस्पृश्यतेवर जो घाला घातला तो इतक्या मर्मभेदी पद्धतीने मराठीत प्रथमच आलेला होता.
आर्थिक विषमतेचा प्रश्न ” मजुरावर उपासमारीची पाळी ” कवितेतून १८८९ साली केशवसुत मांडतात.
ही मंदिरे ही खुलतात चांगली
माझ्या वडिलांनीच न काय बांधली ?
मी मात्र हो आज मरे भुकेमुळे
श्रीमंत हे नाचती मंदिरी भले
सर्वास देवा, बघतोसी सारखा
होतोस का रे गरिबास पारखा
काहीस सुग्रास सदन्न तू दिले
साधी आम्हा भाकरही न का मिळे ?
आज खाजगीकरण उदारीकरण ,आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळात बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात उभा ठाकलेला आहे.हे दुःख सव्वाशे वर्षांपूर्वी केशवसुत या युगद्रष्ट्या कवीने मांडले आहे. केशवसुत धर्माच्या नावे चाललेल्या दुकानदारीवर कोरडे ओढतात.मूर्तीभंजन या अभंगात त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलेले आहे. ते म्हणतात ,
मूर्ती फोडा धावा ! धावा मूर्ती फोडा
आतील संपत्ती फस्त करा !
धर्माच्या शुद्ध व समतावादी स्वरूपाचा अवलंब करा व त्यावर चढलेले अशुद्धीचे रूढी परंपरांचे किटण खरवडून बाजूला करा असे केशवसुत सांगतात.” देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कवळू द्या ” असे केशवसुत मांडतात. ते त्याद्वारे इहवाद,बुद्धिवाद, व्यक्तीस्वातंत्र्य, प्रयत्नवाद यांचा पुरस्कार करताना दिसतात.
१८९३ साली “तुतारी ” ही गाजलेली कविता केशवसुतानी लिहिली.” एक तुतारी द्या मजा आणूनी, फुंकिन मी जी स्वप्राणाने “अशी सुरुवात असणारी ही कविता समाज सुधारणेची व्यापक भूमिका मांडते. न्याय,समता, बंधुता यांचा डिंडीम वाजवते. तसेच “नवा शिपाई ” या १८९८ साली लिहिलेल्या कवितेतून केशवसुत नव्या युगाचा गौरव करत, त्या युगाचा स्वतः शिपाई असल्याचे सांगतात, ते म्हणतात,
“नव्या मनूतील नव्या मनूचा शूर शिपाई आहे
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
ब्राह्मण नाही ,हिंदूही नाही न मी एक पंथाचा
तेच पतित की जे अखंडिती प्रदेश साकल्याचा
शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे
प्रेषित त्याच्या नव्या दमाचा शूर शिपाई आहे !”
याशिवाय झपूर्झा ,काट्यावाचून गुलाब नाही, तहानभूक ,हरपले श्रेय , मुलास झोडपणाऱ्या पंतोजीस , स्फुट विचार ,ईश्वराचा ग्रंथ ,आई वगैरे अनेक कविता केशवसुतांचे युगप्रवर्तकपण स्पष्ट करतात.
“कवितेचे प्रयोजन “या कवितेतून केशवसुतानी काव्य लेखनाचे समर्थन करून ती एक प्रकारे देशसेवाच आहे हे स्पष्ट केले आहे.”कविता आणि कवी ” या कवितेतून त्यांनी कवींवर बंधने घालू नका तो केवळ प्रसिद्धीसाठी नव्हे तर स्वांत सुखाय भूमिकेतून लिहीत असतो असेही म्हटलेले आहे. ” शब्दांनो ! मागूते या ” या १८९२ साली लिहिलेल्या कवितेतून केशवसुत कवितेवरील उत्कट प्रेम व्यक्त करतात. तर “स्फूर्ती ” या १८९६ साली लिहिलेल्या कवितेतून ” काठोकाठ भरू द्या प्याला ,फेस भराभर उसळू द्या “असे म्हणत कवीचे स्फूर्तीदायक महत्त्व अधोरेखित केले आहे.
” केशवसुत संप्रदाय : एक वदतोव्याघात ” या लेखात व.दि.कुलकर्णी यांनी म्हटले आहे की ,” केशवसुतानी मराठी कवितेला कोणता संप्रदाय दिला नाही. तर त्यांनी जातिवंत कलावंत अंतर्यामी कसा स्वतंत्र असतो, जिवंत असतो , भावोत्कट असतो ,केवळ स्ववश नसतो ,हे परोपरीने सांगितले .आणि स्वतः ते जगून दाखवले. केशवसुतानी कवींना त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. ते स्वतः स्वतंत्र राहिले आणि दुसऱ्यासही त्यांनी स्वतंत्र राखले.कवी हा मुक्त मानव आहे ,तो कोणाकडे पाहून काही बोलत नसतो. तो स्वतःकडे पाहून जे सांगायचे आहे तो सांगत असतो. केशवसुतानी कवीची अस्मिता जागी केली. त्याचे पर प्रकाशित्व घालवले. त्यांना स्वयंप्रकाशाचे वेड लावले. मराठी कवीना स्वानुभव चित्रित करण्याचे धैर्य आले.त्यांचा आत्मविश्वास वाढला.कवी या पदवीला विशेषार्थ प्राप्त झाला. कवी ही जाती सामान्याहून वेगळी आहे. तिच्या आशाआकांक्षा, ध्येय, स्वप्न, सगळी भिन्न आहेत याची जाणीव झाली. सृष्टीचे अर्थ वेगळे लागू लागले. पक्षांचे गायन , आकाशीचे रंग, गवताचे पाते किंवा झऱ्यांचे झुळझुळणे यांनाही नवे असीम सौंदर्य लाभले.कवी प्रतिभेचे नवनवोन्मेष उदयास येऊ लागले. केशवसुतानी मराठी कवी दृष्टीची जीर्णता, निरसता निपटून टाकली.आणि प्रत्येक अनुभवाच्या सत्यदर्शनाने आणि सौंदर्यप्रतीतीने पुलकीत होणाऱ्या वृत्तीचे ,मनोधर्माचे उद्गान केले. केशवसुतानी कलावंतांना खेळण्यासाठी हे सारे जग खुले करून दिले.” आम्ही कोण ” या कवितेतून “आम्हाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे “असे त्यांनी म्हटलेलेच आहे.
वास्तविक केशवसुतांच्या प्रेमापासून ते गुढवादापर्यंतच्या प्रत्येक कवितेवर लिहिता येण्यासारखे आहे. कारण ” प्रीती मिळेल का हो बाजारी, प्रीती मिळेल का हो शेजारी ” असा प्रश्न उभा करून ती स्वतःच्या हृदयात व प्रियजनांच्या हृदयातच असते असे उत्तर ते देतात. तसेच “आला क्षण, गेला क्षण ” असेही सांगतात .” विश्वाचा विस्तार केवढा ? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा “असे सांगत ” आम्ही नव्हतो आमचे बाप, उगाच का मग पश्चाताप “असेही विचारतात .अशा सर्वच कविता फार महत्त्वाच्या आहेत. पण या लेखात प्रामुख्याने त्यांच्या सामाजिक कवितांवरच लिहिले आहे .अर्थात लेखाचा हेतूही तोच आहे .आता लेखाच्या अखेरीस आपण केशवसुतांना युगकवी ,प्रबोधनकार कवी का म्हणायचे हेही पाहू.
“केशवसुतांच्या कवितेचे पर्यालोचन ” या नावाचा पन्नास पानांचा लेख प्रा.भ.श्री.पंडित यांनी समग्र केशवसुत या स्वतः संपादित केलेल्या संग्रहात लिहिला आहे.त्यात त्यांनी मांडलेली भूमिकाही या निमित्ताने जाणून घ्यावी लागेल.त्यात प्रा. पंडित म्हणतात ,” इंग्रजी राजवटी बरोबरच या देशात मुद्रण,शिक्षण व ज्ञान प्रसारण यांचे नवे युग उगवले.मुद्रणापूर्वी या देशात बहुतेक लोक बहुश्रुत होते. त्या जागी आता साक्षर व निरक्षर असा नवा भेद निर्माण झाला. आणि समाजात पांढरपेशी आणि कामगार असे दोन वर्ग पडले. केशवसुत हे सुशिक्षित पांढरापेशा वर्गाचे कवी आहेत. त्यांची प्रतिभा अंतरभेदी होती.त्यांच्या ठायी स्वतंत्र स्फूर्तीची स्पष्ट लक्षणे होती. त्यांच्या वृत्तीत आत्मप्रत्यय होता. आणि त्यांचे विचार तेजस्वी आणि वाणी ओजस्वी आहे .या सर्व गोष्टी मान्य केल्या तरी केशवसुतांनी केलेली क्रांती ही फक्त त्या काळाच्या कवितेच्या क्षेत्रातील पांढरपेशी क्रांती आहे आणि तिचे स्वरूप जितके व्यक्तिसापेक्ष तितकेच युगसापेक्ष आहे हे दृष्टीआड करता येत नाही.केशवसुतांनी केलेल्या क्रांतीचे स्वरूप असे मर्यादित असण्याचे कारण तेव्हाच्या काळात व परिस्थितीत आहे. केशवसुत कोकण सोडून पुढील शिक्षणासाठी ज्यावेळी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले त्यावेळी देशात राष्ट्रसभेची स्थापना झाली होती. व पुण्यात केसरी व सुधारक यांचे मतप्रसाराचे कार्य सुरू होते .इंग्रजी भाषेच्या आणि वाङ्मयाच्या संपर्कांने तिकडील भिन्नभिन्न वांग्मयप्रकार येथे नव्याने रुजू लागले होते. वाम्मयप्रकारांच्या द्वारे नवे संकेत येत होते. नव्या शैली मान्यता पावत होत्या. आणि भाषा इंग्रजी वळण घेत होती. कारण विचार इंग्रजी होते. परंतु ही क्रांती नसून हे यथावकाश होत असलेले परिवर्तन होते. या परिवर्तनाचे स्पष्ट दर्शन केशवसुतांच्या कवितेत घडते.
याच लेखात पुढे प्रा.पंडित म्हणतात, ” केशवसुतांनी कवितेच्या प्रांतात थोडीफार उलथापालथ केली म्हणून ते सामाजिक क्रांतिकारक होते हे म्हणणे मात्र इतिहासात धरून होणार नाही. कवितेला असे कितीसे वाचक असतात ? केशवसुतांच्या काळी ते हाताच्या बोटांवर मोजता येत. पुन्हा ते वाचक फक्त पांढरपेशा वर्गातच असत.क्रांतिकारक किंवा युगप्रवर्तक ही विशेषणे टिळक व आगरकर यांना लावता येतील. टिळक केवळ लेखक नव्हते. ते समाजाचे पुढारी होते. व प्रत्यक्ष कार्य करणारे होते. आगरकरांच्या लेखांचा प्रचार केशवसुतांच्या कवितेपेक्षा अधिक होता.तेव्हा केशवसुत हे या युगाचे प्रातिनिधिक कवी होते असे म्हणणे संयुक्त होईल.”
तर प्रा.स.त्र्यं.कुल्ली यांनी म्हटले आहे की,” केशवसुत हे युगकवी होते. भारताच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या दीर्घ इतिहासातील एका संक्रमण काळाच्या सीमेवरती उभे होते. दोन युगांच्या संगमावर ते उभे होते. एक युग होते जीर्ण झालेल्या,ऱ्हास पावणाऱ्या सरंजामशाहीचे तर दुसरे उदयाला येणाऱ्या भांडवलशाहीचे.आधुनिक जगाचे एक मुमुर्शू,दुसरे वर्धिष्णू .केशवसुतांची कविता म्हणजे या युग संगमावर उभे राहून अनुभवलेली भाव विचारांची आंदोलने, पाहिलेली स्वप्ने आणि भोगलेल्या वेदना …….सरंजामशाही विरुद्ध भांडवलशाही या द्वंदात जुन्या अर्थ- समाजव्यवस्थेत हितसंबंध असलेला प्रस्थापित सावकार ,जमीनदार, मालगुजार ,उच्चवर्णीय, भिक्षुक, संस्थानिक यांचा वर्ग पहिल्या पक्षाकडे होता. तर उच्चवर्णीयातील ध्येयवादी, नवशिक्षित ,उद्योजक ,व्यापारी आणि बहुजन समाज दुसऱ्या पक्षाकडे होत. हेच द्वंद्व केशवसुतांनी अनुक्रमे सूर असूर,पृथ्वी-स्वर्ग या प्रतीकातून व्यक्त केले आहे. केशवसुतांची व्यापक ध्येयदृष्टी त्यांना दुसऱ्या म्हणजे बहुजनांचे कल्याण करणाऱ्या पक्षाकडे घेऊन गेली. त्यांच्या उच्चवर्णीय पांढऱपेशा वर्गाचे व श्रमजीवी वर्गाचे हितसंबंध सुसंवादीच होते हे न ओळखणाऱ्या उच्चवर्णीयांमधील संकुचित दृष्टीच्या सनातन्यांनी कडाडून विरोध केला. केशवसुत या द्वंदात नव्या जाणिवांचे ,नव्या मूल्यांचे निशाण खांद्यावर घेऊन आवेशाने लढले. म्हणूनच त्यांच्या कवितेत भावनेची बेहोशी आहे. विचारांची उत्कटता आहे. उदात्त व्यक्तित्वाची ध्येयधुंदी आहे. शब्दाशब्दात ओज आहे. आणि म्हणूनच ते भारतीय प्रबोधन युगाचे महान प्रवक्ते आहेत.”
या लेखाचा शेवट करताना मला एक प्रश्न असा पडतो की ,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यातून केशवसुतांना काही प्रेरणा मिळाली असेल का ? केशवसुतांच्या जन्मापूर्वी ३९ वर्षे म्हणजे १८२७ साली महात्मा फुले यांचा जन्म झाला आहे. आणि केशवसुत वयाच्या पंचवीशीत असताना म्हणजे १८९० साली महात्मा फुले कालवश झाले आहेत.केशवसुतांच्या जन्मापूर्वीच महात्मा फुले यांनी मुलींची शाळा काढली होती.रात्रशाळा काढली होती. तृतीयरत्न हे नाटक लिहिले होते .विधवा पुनर्विवाह सहाय्य मंडळ, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती. तर केशवसुतांच्या जन्मानंतर अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला होता.सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. गुलामगिरी पासून शेतकऱ्यांचा आसूड पर्यंतचे लेखन केले होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिण्यापासून मराठी ग्रंथकार सभेला पत्र लिहिले होते. फुले अखंडादि काव्यरचना करत होते. एकूण महात्मा फुले यांच्या विचारधारेचाही प्रभाव केशवसुतांवर पडला असण्याची शक्यता आहे. कारण केशवसुत सामाजिक सुधारणांकडेही बारकाईने पाहत होते.महात्मा फुले यांच्या प्रेरणेचा त्यांच्या कवितेत उल्लेख नसला तरी ती प्रेरणा मिळाली असावी असे केशवसुतांच्या कवितेतील रोखठोकपणावरून वाटते.
महात्मा फुले समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होते. आपल्या दीनदुबळेपणाचे कारण शिक्षणाच्या अभावात आहे हे बहुजन समाजाला पटवून देत होते. सारे अनर्थ एका विद्येने केले हे महात्मा फुले सांगतात. जग बदलायचे असेल तर शिकले पाहिजे, नवी अक्षरे गिरवली पाहिजे ते सांगताना केशवसुत ” विद्यार्थ्याप्रत ” म्हणतात,
“स्नायूंमध्ये पुष्कळ आहे शक्ती
नृप्रवेत्री तर फारच आहे म्हणती
परी एक एक जो नवा शब्द तू शिकसी
शक्ती तयाची उलथिल सर्व जगासी
पठण तरकरी त्याचे बाबा
जग हे बदलायाचे!!”
तर ” विद्याप्रशस्ती ” या कवितेत ज्ञान नसेल तर आपण जीभ असूनही मुके होतो .विद्येच्या आधारे पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करता येतो असे केशवसुत सांगतात. तसेच ” मुलास झोडपणाऱ्या एका पंतोजीस” या कवितेतून केशवसुतानी शिकवणाऱ्यास कसे शिकवावे व कसे शिकवू नये याचा नेमका उपदेश केला आहे.
” जगामध्ये या तुला कशाला परमेशे धाडीले ” ही कविता म्हणजे केशवसुतानी एलिजाबेथ ब्राऊनिंगच्या वर्क या कवितेचे केलेले भाषांतर आहे.या कवितेतून श्रम आणि कार्यतत्परता यांचे महत्त्व केशवसुतानी सांगितलेले आहे.तर ” गोफण केली छान “या कवितेतून आळशी, ऐतखाऊ, पोटार्थी अशा लोकांवर कोरडे ओढून ही माणसे समाजाची व देशाची वैरी आहेत असे म्हटले आहे. या कवितेत केशवसुत म्हणतात,
वैर तयाला, पूर्वीच्या
आर्यांचा बडीवार
गाऊनी जे निडा षंढत्वा
मात्र दाविती फार …
त्याचबरोबर धर्माची चिकित्सा करण्यापासून ते चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या अर्थहीनतेपर्यंत आणि कष्टकरी मजुरावर येणाऱ्या उपासमारीच्या पाळीपासून ते नव्या दम्याच्या शूर शिपाईच हे सारे परिवर्तन घडवेल या आशावादापर्यंतची केशवसुतांची विचारझेप पाहता पाश्चात इंग्रजी ज्ञानाच्या प्रभावाप्रमाणेच आधीच्या पिढीतले आणि काही काळ समकालात कार्यरत असलेले महात्मा फुले यांचा प्रभाव केशवसुतांवर पडला नसेल असे वाटत नाही.
एक गोष्ट स्पष्ट आहे की महात्मा फुले यांचा विचार सर्वांगीण व्यापक परिवर्तनाचा होता. शेतकरी ,कष्टकरी वर्गाच्या उत्थानाचे व्यापक तत्वज्ञान कृतीसह ते मांडत होते. त्यांचा आवाका प्रचंड होता. तर केशवसुत हे रूढ अर्थाने त्या काळातील पांढरपेशा, उच्चभ्रू वर्गात कवी या नात्याने हस्तक्षेप करत होते.महात्मा फुले अखंडातून अनिष्ट परंपरेवर जोराचा घणाघात करत होते. तर केशवसुत वेगळ्या भाषेत या पूर्वापारच्या इमारतीला खिळखिळे करू पाहत होते. महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म सांगत एक नवी व्यवस्था आणू पहात होते. आणि केशवसुत मानवधर्माच्या अपरिहार्यतेचा कवितेच्या डंका पिटत होते.महात्मा फुले यांचा सुधारकाचा पिंड वेगळा होता तर केशवसुतांचा वेगळा होता. त्यांची तुलना होऊ शकत नाही. मात्र केशवसुत हे कवितेच्या माध्यमातून मानुषतेचा अर्थपूर्ण उद्गार काढत होते यात शंका नाही.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा