कॉम्रेड ए.बी.बर्धन : समर्पित लोकयोद्धा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

२५ सप्टेंबर हा भारतातील डाव्या चळवळीचे भीष्माचार्य म्हणून ओळखल्या गेलेल्या कॉ.अर्धेंदूभूषण उर्फ ए.बी.बर्धन यांचा जन्मदिन. २५सप्टेंबर १९२४ रोजी आज बांगलादेशात असणाऱ्या सिल्हट येथे त्यांचा जन्म झाला. तर २ जानेवारी २०१६  रोजी ते कालवश झाले. हेमेंद्रकुमार आणि सरलादेवी या दांपत्याच्या पोटी ते जन्मले. वडिल हेमेंद्रकुमार नागपूरच्या अकाऊंट जनरल चंकार्यालयात नोकरीला असल्याने वर्धन कुटुंब नागपूरला स्थाईक झाले होते. वयाच्या पाचव्या वर्षापासून नागपुरात कॉ. बर्धन  राहत होते.तेथे शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन जीवनात त्यांचा कम्युनिस्ट विचारधारेशी परिचय झाला. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचाही प्रभाव त्यांच्यावर होता. वयाच्या पंधराव्या वर्षी ते ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे (एआयएसएफ )सक्रिय सदस्य झाले. त्यांचा राजकारणातील प्रवेश घरच्यांना मान्य नव्हता. परिणामी कॉम्रेड बर्धन घर सोडून नागपूरच्या पक्षकार्यालयात राहू लागले. त्यांचे अखेर पर्यंतचे वास्तव पक्षकार्यालयातच कमालीच्या साधेपणाने झाले.

स्वातंत्र्य चळवळीतील सहभागामुळे त्यांनी तुरुंगवासही भोगला. विद्यार्थी चळवळी सोबतच ट्रेड युनियनमध्येही ते सक्रिय झाले.स्वातंत्र्यानंतर अखेर पर्यंत त्यांनी कामगार चळवळीसाठी आपले जीवन खर्च केले.१९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता व तुरुंगवास पत्करला होता.१९९० च्या दरम्यान ते राष्ट्रीय राजकारणात आले. त्यानंतरची पंचवीस वर्षे राष्ट्रीय राजकारणातील प्रभावी नेता म्हणून त्यांनी कामगिरी केली. आयटक आणि भाकपचे सरचिटणीस पद भूषवलेल्या कॉ. बर्धन यांनी डाव्या पक्षांना आणि जन संघटनांना जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्याचा सतत प्रयत्न केला.

आदिवासी चळवळ, कोळसा कामगार चळवळ , एन्रॉन हटाव मोहीम ,बाबरी पतन निषेध आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलन, सडवा जुलूम विरोधी आंदोलन, पास्को कंपनी विरोधी आंदोलन अशी अनेक आंदोलने ते लढले.कॉ.बर्धन यांनी आदिवासींच्या प्रश्नांपासून ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासापर्यंतची अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेले प्रासंगिक लेख आणि त्यांची भाषणेही अतिशय आशयघन व विचारगर्भ होती. पास्को कंपनी विरोधातील आंदोलनात वयाच्या ८८ व्या वर्षी ते कच्च्या रस्त्याने ३५ किलोमीटरचा मोटरसायकल प्रवास करून पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाले होते. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत अर्थात अखेरच्या श्वासापर्यंत पक्षकार्यात व्यस्त असलेले ते एक महान नेते होते. कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा अनेकदा सहवास लाभला होता. ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने अभिमानाची आणि अविस्मरणीय बाब आहे.

राजकीय विचारात कमालीचे अंतर असूनही कॉ. बर्धन सर्व विचारधारांना नेत्यांना कार्यकर्त्यांना आपले वाटत होते .त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या.त्यांनी नोकरी करून आपल्यासारख्या पूर्णवेळ कार्यकर्त्याचा संसार सांभाळला याबद्दल बर्धन नेहमीच कृतज्ञता व्यक्त करीत.उत्तम दर्जाचे साहित्य वाचन आणि उत्तम दर्जाचे संगीत ऐकणे त्यांना आवडायचे.साहित्य, संगीताची त्यांची जाण सखोल होती. मराठी, हिंदी ,इंग्रजी, उर्दू आदि भाषांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. त्यांची भाषणे ऐकणे ही स्वतःला श्रीमंत करणारी गोष्ट असे आहे असे ऐकणाऱ्याला वाटत असे.

” जमिनीला कान लावा तेव्हाच तुम्हाला सामान्यांच्या हाका लक्षात येतील. एक ज्वालामुखी जमिनीत खदखदतो आहे. तो ऐकू येणार नसेल तर आपल्याला कोणीही माफ करणार नाही.” असे म्हणणारा हा नेता कमानीच्या संवेदनशील होता.व्रतस्थ होता.आणि विचारांशी तडजोड न करणारा कर्तव्यकठोरही तितकाच होता.वकिलीची पदवी मिळवूनही त्यांनी काळा कोट घालून कोर्टात वकिली कधी केली नाही. पण सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांची बाजू घेऊन लढण्याचा वकिली बाणा त्यांनी जन्मभर जोपासला.निवडणुकीच्या राजकारणात त्यांचा एकदा विजय आणि तीनदा पराभव झाला. पण एक निर्भय, सुसंस्कृत, कुशल नेता म्हणून विरोधी पक्षाच्या मंडळींनीही त्यांचा नेहमी सन्मान केला हे त्यांच्या प्रामाणिक राजकीय निष्ठेचे फळ होते. 

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार केंद्रात कम्युनिस्ट पक्षांच्या पाठिंब्यावर सत्तेवर होते .त्यावेळी राष्ट्रपती पदावर एका महिलेला संधी द्यावी असा विचार सर्वप्रथम कॉ. बर्धन यांनी मांडला. आणि त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांची निवड झाली होती.भारतीय राजकारणातील ही महत्त्वाची घटना कॉ. बर्धन यांच्यामुळेच घडलेली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे नेमके वर्णन त्यांच्या निधनानंतर लिहिलेल्या महाराष्ट्र टाइम्सच्या ४ जानेवारी २०१६ च्या अंकात केले आहे. त्यात म्हटले आहे ,…..व्यक्तिगत अपमानाची बोच ओठांवर कधीही न आणणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख होती.भंडारा लोकसभेतून लढणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना जाहीर समर्थन देऊन पददलितांविषयी बांधिलकी प्रगट करणारे बर्धन अनेकांच्या स्मरणात आहेत. नागपूरातील संघाच्या कार्यालयावर लिहिलेल्या कार्यकर्त्यांच्या आक्षेपार्ह घोषणामुळे व्यथित झालेले बर्धनही अनेकानी पाहिले आहेत. उजव्या विचारसरणीच्या सुमतीबाई सुकळीकर यांच्याकडून राखी बांधून घेणारा त्यांच्यासारखा डाव्या पक्षातील अग्रणी विरळा म्हटला पाहिजे.”

या अग्रलेखात पुढे म्हटले होते,” आपल्या अमोघ वाणीतून वैचारिक मुद्द्यांद्वारे प्रतिपक्षांना नामोहरम करण्याची हातोटी त्यांना लाभली होती.असे असतानाही हिंदू महासभेचे नेते विक्रम सावरकर यांना व्यासपीठावर थेट आलिंगन देण्याचा करिश्माही त्यांनी दाखवून दिला होता.आपल्या व्यथा ज्यांच्याजवळ सांगाव्यात असा विश्वास बर्धन यांनी गिरणी कामगारांमध्ये संपादन केला होता.भगतसिंगांसोबत काम करणाऱ्या कुंदनलाल गुप्ता यांना शस्त्रक्रियेच्या काळात आठवलेले पहिले नाव बर्धन यांचेच होते. त्यांच्या आढळ निष्ठेचे गारुड फक्त डाव्या पक्षांपुरते मर्यादित होते असे नव्हे.पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन एकूण राजकीय व सामाजिक क्षेत्र त्यांनी आपल्या अफाट लोकसंपर्काने आणि अचाट कर्तृत्वाने भारून टाकले होते. कम्युनिस्ट पक्षाचे उच्चपद दीर्घकाळ सांभाळल्यावर सुद्धा आत्मचरित्र लिहिण्यास त्यांनी नेहमीच नकार दिला. मी मी या एकेरी भाषेत बोलणे हा माझा पिंड नाही हे त्यांचे कायम उत्तर होते. पदांची उंची वाढली की सामान्यांसोबतचा संपर्क दुरावतो अर्धेंदूभूषण बर्धन हे नाव मात्र त्या सार्वत्रिक अनुभूतीला अपवाद सिद्ध करणारे होते.जखमी झाल्यावरही आंदोलन मागे न देण्याचा निग्रह ज्या नेत्याच्या भूतकाळात जमा असतो त्याने स्पष्टीकरणे आणि खुलाशांच्या मार्गाशी सलगी करणे तसेही अभिप्रेत नसते. गावखेड्यातील कामगारांनाही बर्धन जवळचे वाटले, कवी ग्रेस यांनाही साथी म्हणून त्यांचे नाव अभिमानाने कवितेतून मिरवावेसे वाटले.लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा हा अभेद्य विश्वास हे बर्धन यांचे बलस्थान होते.”

(ता.क.हा लेख ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” मासिकाच्या फेब्रुवारी २०१६ या अंकामध्ये प्रकाशित झाला होता.)

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया