इस्रोचे शंभर नंबरी अभिनंदनीय यश 

   

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

( ता.क.हा लेख प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या मार्च २०१७ च्या अंकामध्ये संपादकीय सदरात प्रकाशित झाला होता.)

बुधवार ता.१५  फेब्रुवारी २०१७ हा दिवस विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान जगात उंचावणारा होता. या दिवशी भारतीय अवकाश संस्थेने अर्थात इस्त्रोने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून एकाच उडानातून तब्बल १०४ उपग्रह यशस्वीरित्या नियोजित कक्षेत प्रस्थापित केले. यापूर्वी इस्त्रोने स्वतःचा वीस उपग्रह पाठवण्याचा आणि जागतिक पाठीवर २०१४ मध्ये रशियन स्पेस एजन्सीचा एकाच वेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम मोडीत काढला. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी १०४ उपग्रह घेऊन प्रक्षेपकाने उड्डाण केले. अत्यंत वेगाने पूर्वतयारी केलेल्या या मोहिमेच्या उलटगणतीसाठी (काउंट डाऊन टाईम) लागणारा वेळही कमी करण्यात भारतीय शास्त्रज्ञाना यश आले. एरवी साधारणतः ५२तासापर्यंत चालणारी ही उलटगणती २३ तासांमध्ये पूर्ण झाली. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंच व्हावी असे हे यश आपल्या शास्त्रज्ञांनी मिळवलेले आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात जगाच्या इतिहासातील ही महत्वपूर्ण घटना आहे. या यशाबद्दल इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. ए.एस.किरण कुमार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

एकाच उड्डाणातून भारताच्या कार्टोसॅट २  या ७१४  किलो वजनाच्या मुख्य उपग्रहासह आयएनएस वन ए आणि ए बी हे दोन नॅनो उपग्रह तसेच दोन अमेरिकन कंपन्यांचे ९६ नॅनो  उपग्रह आणि इस्त्रायल, कझाकिस्तान ,संयुक्त अरब अमीरात, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड या देशांचा प्रत्येकी एक असे एकूण १०४ उपग्रह यावेळी सोडण्यात आले. कमी खर्चात, कमी वेळेत आणि यशाची शंभर टक्के खात्री याची हमी देत इस्त्रोने आपणच उपग्रह सोडण्यासाठीचा जगातील सर्वोत्तम पर्याया आहोत हे सिद्ध केले आहे. हे यशस्वी उड्डाण केल्यावर इस्त्रोचे अध्यक्ष डॉ.ए.एस. किरण कुमार यांनी अतिशय संयमी व प्रगल्भ प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले ,”एका उड्डाणातून १०४  उपग्रहांचे प्रक्षेपण हे कोणताही विक्रम प्रस्थापित करण्यासाठी नव्हे तर आमच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करून घेण्यासाठी होते. अत्यंत कमी कालावधीत ही मोहीम पूर्ण करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.इस्त्रो बरोबरच देशभरातील उद्योगांनीही या मोहिमेस हातभार लावला. सर्वांसाठीच हा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. तसेच सध्या छोट्या उपग्रहांचे युग आले आहे. जगभरातील खाजगी कंपन्यांना त्यांचे शेकडो उपग्रह अवकाशात पाठवायचे आहेत.मात्र मोठ्या रॉकेटच्या मर्यादित उड्डाणांमुळे छोट्या उपग्रहांच्या उड्डाणांना मर्यादा आहेत. भारताकडे एकाच वेळी अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. उड्डाणांमधील अचूकतेमुळे आणि तुलनेने सर्वात कमी खर्चात प्रक्षेपण होत असल्यामुळे आपले उपग्रह आकाशात पाठवण्यासाठी जगभरातील कंपन्या इस्त्रोकडे येत आहेत.  “

या मोहिमेत कार्टासॅट दोन हा जो मुख्य उपग्रह सोडला आहे त्याचा कार्यकाळ पाच वर्षे आहे.कार्टासॅट भारताची हवामान विषयक उपग्रहांची मालिका आहे .या उपग्रहातून मिळणाऱ्या माहितीचा वापर किनारपट्टीवरील जमिनीचा वापर व नियमन ,रस्त्यांचे जाळे सुधारणे व आखणी करणे ,पाण्याचे वितरण अशा अनेक कारणांसाठी होणार आहे. तर उर्वरित १०३ नॅनो उपग्रह आहेत.नॅनो उपग्रह म्हणजे एक ते दहा किलो वजनाचे कृत्रिम उपग्रह .हे उपग्रह एकत्रित अथवा स्वतंत्रपणे कार्यरत असतात. व्यावसायिक कारणांसाठी नॅनो उपग्रह वापरले जातात .अलीकडे अशा नॅनो उपग्रहांची चलती आहे. आजवर अवकाशात ५८० नॅनो उपग्रह सोडण्यात आलेले आहेत.त्यापैकी २१३ सध्या कार्यरत आहेत. 

प्रक्षेपणाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही इस्त्रोने आपले पाय स्वकर्तृत्वावर  भक्कमपणे रोवले आहेत.२०१३  ते २०१५ या काळात स्पेस एक्स ही कंपनी अंतराळात एक उपग्रह सोडण्यासाठी सहा कोटी डॉलर रक्कम घेत होती.याच काळात याच कामासाठी इस्त्रो केवळ तीस लाख डॉलर रक्कम आकारात होती.तसेच अमेरिकेच्या मंगळयान मोहिमेसाठी एकूण रुपये ६७.२ कोटी डॉलर खर्च झाला होता.तर भारताच्या इस्त्रोने केलेल्या साठी केवळ ७.४ कोटी डॉलर रुपये खर्च झाले होते. अशा काही उदाहरणांमुळे अतिशय माफक खर्च आणि उपग्रह प्रक्षेपणाची सलग अडतीस यशस्वी उड्डाणे यांचा अनुभव ,चंद्र आणि मंगळ मोहिमा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी, यामुळे इस्त्रोचा जागतिक अवकाश विज्ञान क्षेत्रातील आदरयुक्त दबदबा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. आपल्या सर्वांच्याच अभिमानाची ही बाब आहे. 

एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडणे हे मोठे आव्हानात्मक काम होते.या मोहिमेचे संचालक डॉ. जयकुमार म्हणाले, सर्व नॅनो उपग्रहाचे प्रत्येकी चार याप्रमाणे २५ गट करून त्या गटांना दोन सेकंदाच्या अंतराने मुक्त करण्यात आले. त्यानंतर २५ गट सुटे होऊन १०४  उपग्रह कक्षेत प्रस्थापित झाले. हे सर्व उपग्रह  धडकण्याच्या तब्बल ५४६० शक्यता होत्या.आम्ही उपग्रहांची मुक्तता अशादिशेने आणि क्रमाने केली होती की ते भविष्यातही एकमेकांना धडकणार नाहीत.या यशाबरोबरच इस्त्रो आणखीही काही योजना आखत आहे. चांद्रयान दोन ,मंगळयान दोन यासह गुरु, शुक्र या ग्रहांसह सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या आदित्य या यानाच्या तयारीतही इस्त्रो मग्न आहे. तसेच सार्क हा उपग्रहही सोडण्यात येणार आहे. आगामी तीन वर्षात या मोहिमा इस्त्रो यशस्वी करेल यात शंका नाही. 

इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. जी माधवन नायर यांनी या मोहिमेबद्दल इस्त्रोचे अभिनंदन करतानाच एकावेळी तीनशे ते चारशे नॅनो उपग्रह सोडण्याची क्षमता इस्त्रोकडे आहे असे म्हटले आहे. यावरून इस्त्रोच्या सामर्थ्याची आपल्याला व जगालाही कल्पना येऊ शकते. तसेच त्यांनी आणखी एका महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधले आहे. त्याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे.तो म्हणजे अवकाश कचऱ्याचा. डॉ. माधवन नायर यांच्या मते प्रक्षेपणाबरोबरच उपग्रहांच्या उपयुक्ततेचाही विचार व्हायला हवा.या मोहिमेत १०३ नॅनो  उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. यातील बहुतांश उपग्रहांचा आयुष्यकाल एक ते दोन वर्ष असतो. आणि त्यानंतर त्याचे रूपांतर अवकाश कचऱ्यामध्ये होणार आहे. या उपग्रहांचा आकार अतिशय छोटा असल्यामुळे त्यांचे स्थान शोधणे खूप अवघड जाणार आहे.या निष्क्रिय उपग्रहांविषयी चिंता करावी लागणार आहे. 

इस्त्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे अवकाश संशोधनाच्या जागतिक बाजारपेठेतही इस्त्रोचे नाव अग्रक्रमावर गेले आहे. नॅनो उपग्रहांच्या बाजारपेठेतील संधी पाहून इस्त्रोने अँट्रिक्स या आपल्या व्यावसायिक कंपनीच्या माध्यमातून काही योजना सुरू केल्याही आहेत. १०४ उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणानंतर इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. ए. एस .किरण कुमार यांनी त्याबाबतची भूमिकाही माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे. ते म्हणाले येत्या काळात वर्षभरात पीएसएलएलव्ही १२  ते १८ प्रक्षेपणे करण्याची आमची योजना आहे. या सर्व उड्डाणांमधून मुख्य उपग्रहांसह लहान आकाराच्या उपग्रहांना अवकाशात पाठवणे शक्य झाल्यास त्यातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. याशिवाय आजच्या उड्डाणामधून प्रक्षेपित करण्यात आलेल्या आय एन एस वन ए आणि वन बी या नॅनो उपग्रहांच्या रूपाने इस्त्रोने मोठ्या उपग्रहांचा आराखडा बनवला असून प्रक्षेपणाप्रमाणेच उपग्रहही तयार करून देण्याची इस्त्रोची तयारी आहे. इस्त्रोने मिळवलेले यश हे या संस्थेच्या कामात झटणाऱ्या सर्व पूर्वसुरींचेही आहे. अतिशय मर्यादित साधनसंपत्ती, जागतिक पातळीवर काही वेळा घातले गेलेले तंत्रज्ञानविषयक निर्बंध, नासाच्या तुलनेत अतिशय तोकडा निधी अशा अनेक अडचणींवर मात करत असे दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या इस्त्रोच्या सर्व टीमचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आणि त्यांना धन्यवाद व शुभेच्छा द्याव्यात तितक्या कमीच आहेत. 

इस्त्रोच्या अतुलनीय यशाचे कौतुक करताना आपण सर्वसामान्य भारतीयांनीही आपला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची नितांत गरज आहे. इस्त्रो चंद्र, मंगळ, गुरु ,शुक्र या ग्रहांवरच नव्हे तो सूर्याच्या अभ्यासासाठीही उपग्रह पाठवीत आहे .पण आमची पाठ पत्रिकेतील ग्रह तारे सोडायला तयार नाहीत.दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या १५ फेब्रुवारी रोजी इस्त्रोने केलेल्या या मानवी इतिहासातील महत्त्वपूर्ण कामगिरीनंतर तर भारतात हा राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठा दिमाखात साजरा व्हायला हवा होता.पण तसे झाले नाही .आपण विज्ञान युगात वावरतो पण व्यक्तिगत जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वजण स्वीकारतात असे दिसत नाही.अर्थात सर्वजणांबाबत हे होऊ शकणार नाही .आज एकूण सामाजिक परिस्थितीकडे डोळसपणे पाहिले की अजूनही मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

सर्वसामान्य आजारांपासून ते भूकंप, सुनामी सारख्या घडामोडींपर्यंतची वैज्ञानिक कारणे स्पष्ट होत असतानाही, ती समजत असतानाही त्यापासून संकटमुक्त होण्यासाठी अशास्त्रीय मार्गच काढले जातात.त्यामध्ये केवळ अशिक्षितच आहेत असे नाही तर अगदी विज्ञान शाखेत पदवी , उच्च पदवी शिक्षण घेतलेलेही आहेत.त्यामुळे समाज भौतिकदृष्ट्या प्रगत होताना दिसत असला तरी मानसिकदृष्ट्या ती समांतर प्रगती होताना दिसत नाही. अंतराळात उपग्रह सोडण्याची क्षमता आणि बाजारपेठ दोन्ही इस्रोसाठी अभिमानास्पद घटना घडत असताना गल्लोगल्ली ज्योतिष पाहणाऱ्यांच्या, नवस सायासाचे उपाय सुचवणाऱ्यांच्या बाजारपेठाही भरून वहात आहेतच.

पंचमहावक्तापासून निसर्गाची, सृष्टीची निर्मिती झाली हे वैज्ञानिक सत्य असतानाही त्यांच्या निर्मितीपाठी काही वेगळ्याच बाबी समाजात वर्षानुवर्षे पसरवल्या जात आहेत.विज्ञानाने, तंत्रज्ञानाने तयार केलेल्या साधनांचा उपयोग अंधश्रद्धा कर्मकांडे वाढवण्यासाठी बेलाशकपणे केला गेला. टेलिफोन, फॅक्स ई-मेल सारखी यंत्रणा नसती तर जगभरचा गणपती एकाच दिवशी दूध पिऊ शकला नसता. ज्यांचे आत्मतेज,आत्मशक्ती दुसऱ्याच्या आंतरमनातले ओळखू शकते असे बाबा, बुवा ,मौलवी , योगी, स्वामी,महंत मोबाईल, फ्रिज, कुलर, इंटरनेट यासारखी साधने का वापरतात कुणास ठाऊक ?

वास्तविक ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या सर्व स्तरांना व्हावा व तो प्रामाणिकपणे वैज्ञानिक दृष्टीने व्हावा यासाठी विज्ञानाला लोकाभिमुख करण्याची गरज आहे. पूर्वी ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यापैकी अनेकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग इतरमंडळी अशिक्षितच राहतील अशी व्यवस्था कायम ठेवण्यासाठीच करण्याचा प्रयत्न केला. यात तथ्य आहेच.संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत मानवी जीवन अनेक कल्पनांनी जखडलेले होते. निषिध्द गोष्टींचा स्वीकार केला तर त्यांचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतील अशी भीती वाटत होती. पण वैज्ञानिक शोधानंतर त्या प्रमाणात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास आपण कमी पडलो. शिक्षण व्यवस्थेसह सर्व व्यवस्थेत त्यासाठी मूलभूत बदलाची गरज आहे.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या सीमारेषेबाबत समाज जागृतीची गरज आहे.त्याबाबतची सैद्धांतिक भूमिका अभ्यासक्रमात असायला हवी. शिक्षण पद्धतीतील बदलाशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनाची नवी पिढी घडणार नाही. श्रद्धा नीती मूल्यांवर आधारित कालसापेक्ष , विज्ञाननिष्ठ आणि बुद्धीप्रामाण्यावर आधारित असते . तर अवास्तव, अशास्त्रीय ,अविवेकी, अनैतिक गैरसमजातून अंधश्रद्धा निर्माण होत असतात.आज बुद्धीप्रामाण्यवरील निष्ठा पक्की करण्याच्या प्रयत्नांची मोठी गरज आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनाअभावी आज हजारो ,लाखो माणसं संकटमुक्त होणाऱ्या उपायांच्या शोधात भटकत भटकत अधिकाधिक संकटग्रस्त होत आहेत. विज्ञान ही केवळ चर्चेची, इतरांना सांगण्याची, शिकवण्याची गोष्ट आहे ती आचरणात आणायची नसते असे मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.खरे तर  मंत्र तंत्र, गंडे ,उपास तपास, यज्ञ याग वगैरेंमध्ये आहुती पडते ती वैज्ञानिकतेची. बुद्धी ही एकमेव गोष्ट कधीही व कितीदाही गहाण ठेवता येते यावर अनेकजण ठाम असल्यासारखे वागतात. यात समाजाला, विज्ञानाला विरोध करणाऱ्यांची ,विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून वैज्ञानिक दृष्टिकोनाची धार बोथट करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. अर्थात विज्ञानवादी चळवळीही वाढत आहेत. त्यांना प्रतिसाद मिळतो आहे हेही खरे. चारशे वर्षांपूर्वी आकाशाचा शोध घेण्यासाठी गॅलिलिओने दुर्बीण तिकडे वळवली व आज इस्त्रोने १०४ उपग्रह एकाच उड्डाणांत अवकाशात सोडले ही वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारी वाटचाल जाणून घेणे व तसे आचरण करणे हे आपले घटनादत्त कर्तव्य आहे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया