प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
२१ ऑगस्ट हा इस्मत चुगताई यांचा जन्मदिन. उर्दू नवकथेच्या आणि आधुनिक उर्दू साहित्याच्या प्रणेत्यांपैकी इस्मत चुगताई हे प्रमुख नाव. २१ ऑगस्ट १९१५ रोजी जन्मलेल्या इस्मत चुगताई २४ ऑक्टोबर १९९२ रोजी कालवश झाल्या. इस्मत आपा या नावाने सुपरिचित असलेल्या या थोर लेखिकेचा साहित्य, शिक्षण, चित्रपटसृष्टी या सर्व क्षेत्रात संचार होता. पारंपारिक कर्मठ घरात जन्मलेल्या इस्मत चुगताई
यांचे बालपण आणि शिक्षण अलिगड व लखनऊ येथे झाले. बालपणापासूनच स्वतंत्र व बंडखोर विचार त्या मांडत राहिल्या. त्यासाठी जन्मभर संघर्षी करत राहिल्या. ९०/१०० वर्षांपूर्वी मुलीला शिकून काय करायचे आहे हा विचार प्रभावी होता. साहजिकच इस्मत आपानाही त्याचा सामना करावा लागला.आपल्याला जर शिकण्याची संधी दिली नाही तर आपण घरातून पळून जाऊ अशी धमकी त्यांनी पालकांना दिली. त्यामुळेच त्या शिकू शकल्या. केवळ शिकल्या नाहीत तर स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे हा विचार त्या आपल्या लेखनातून पेरत राहिल्या.मुंबई, बरेली आणि जोधपूर येथे त्यांनी शिक्षिकेचीही नोकरी केली.
त्यांचा भाऊ अझीम बेग हा एक प्रसिद्ध विनोदी लेखक होता.
वयाच्या २७ व्या वर्षी म्हणजे १९४२ साली त्यांनी बॉम्बे टॉकीज चे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक शाहीद लतीफ यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांचा चित्रपटसृष्टीची जवळचा संबंध आला.१९४२ सालीच के.आसिफ यांच्या छेडछाड या चित्रपटाची कथा पटकथा लिहून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. जिद्दी , फरेब ,दरवाजा, सोने की चीडिया , गर्म हवा आदी अनेक चित्रपटांचे त्यांनी लेखन केले.शशी कपूर यांच्या जुनून या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली होती. चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटीसाठीही त्यांनी जबाब आयेगा यासह काही चित्रपटांची निर्मिती केली होती.
इस्मत चुगताईंनी उर्दू , इंग्रजी व रशियन साहित्याचे प्रचंड वाचन केले.
कथा, कादंबरी ,नाटक या सर्व प्रकारात त्यांची लेखणी संचारली.
समलिंगी लैंगिक जीवनाची मांडणी करणारी लिहाफ (रजाई )ही त्यांची कथा त्याकाळी फार खळबळ माजविणारी ठरली. लाहोर न्यायालयात त्यांच्यावर अश्लील कथा लिहिल्याचा खटलाही दाखल केला होता.
अतिशय निर्भीडपणे आणि स्पष्टपणे लेखन करणारी इस्मत चुगताई यांच्यासारखी दुसरी लेखिका त्या काळातील उर्दू सह इतर भारतीय भाषातही आढळत नाही. स्त्रीवादी भू वमिका ठासून मांडताना त्यांनी लेखनातून सामाजिक लबाडीवर, ढोंगबाजीवर कठोर प्रहार केले.त्यांच्या अशा हल्ल्यांमुळे वाचक व श्रोतेही हादरे खाताना दिसत असत.अर्थात हेच तर त्यांचे वेगळेपण आणि त्यांची ताकद होती. १९७४ साली त्यांच्या साहित्य सेवेबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते.
व्यक्तीस्वातंत्र्याच्या कमालीच्या आग्रही असलेल्या या लेखिकेला संपत्तीचा मोह नव्हता. लेखनाच्या मानधनाबाबत त्या कधी अडून बसत नव्हत्या. मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या साहित्य सेवेच्या गौरव करून दिलेले एक लाख रुपये त्यांनी गोरगरिबांना जनतेला वाटून टाकले होते. उर्दूतील क्रांतिकारी डाव्या चळवळीशी त्यांचा जवळून संबंध होता .उर्दू साहित्याला आधुनिक दर्जेदार आणि आशयसंपन्न बनवून काळाच्या पुढे विचार मांडणाऱ्या त्या थोर लेखिका होत्या.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते एम आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा