प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अर्थात ७५० जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांचे जीवन कार्य थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. ज्ञानेश्वरांनी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ ,निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशी आपली नाथसंप्रदायी गुरुपरंपरा सांगितली आहे.ज्ञानेश्वरी ,अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि इतर सर्व लेखनामध्ये ज्ञानेश्वरानी स्वतःचा नामोल्लेख ”ज्ञानदेव “असाच केलेला आहे. पुढे इतर संतांनी त्यांचा उल्लेख ज्ञानेश्वर असा केला आहे असे दिसून येते. संत विसोबा खेचर यांनी ” महाविष्णूचा अवतार ! श्री गुरु माझा ज्ञानेश्वर ” असे म्हटले आहे.
ज्ञानेश्वरांचा जन्म झाला तेव्हा म्हणजे १२७५ साली महाराष्ट्रात यादव वंशाचे राज्य होते .राजा रामदेवराव तेव्हा राज्य करत होता.अतिशय धर्मनिष्ठ असलेल्या या रामदेवराजाच्या उत्तरकाळात महाराष्ट्र पारतंत्र्याच्या खाईत लोटला गेला. अर्थात ज्या काळात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या काळात महाराष्ट्र स्वतंत्र होता. त्या काळात बौद्ध धर्माचे तेज मंदावले होते. वैदिक परंपरा प्रबळ राहिली नव्हती. तसेच याचवेळी जैन लिंगायत व महानुभाव या तिन्ही रूढी परंपरा महाराष्ट्रात कार्यमुक्त झाल्या होत्या. त्यांच्या जोडीला नाथपंथ आणि वारकरी परंपरा हे वैदिक पंथदेखील कार्यरत होते.असे असूनही वैदिक धर्माचे मूळ स्वरूप मात्र उरलेले नव्हते. वैदिक धर्माला एक प्रकारची ग्लानी आलेली होती. सर्वसामान्य लोक निरनिराळ्या गोष्टीत, विषयात गुंतलेले होते, देवदेवतांचे अवडंबर माजले होते. त्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली होती.
समाजामध्ये देव देव करीत देवाच्या मागे लागणाऱ्यांची संख्या वाढत होती. एकूण काय तर लोक निष्क्रिय बनून नको त्या विषयात अडकलेले होते. भुते खेते,नवस सायास , दैवते,जादूटोणा, करणी , मंत्र तंत्र , गंडादोरा, व्रतवैकल्य , उद्यापने अशा अनिष्ट गोष्टींच्या फेऱ्यात बहुसंख्य समाज अडकला होता. त्यामुळे खऱ्याखुऱ्या धर्म तत्वाचा ऱ्हास होऊन वैचारिक गोंधळाचे वातावरण मात्र वाढत चालले होते. वैचारिक दारिद्र्य,अंधश्रद्धा व अनिष्ट परंपरांचे संवर्धन या काळात मोठ्या प्रमाणात झाले.
समाजामध्ये विषमतेच्या दोषाबरोबरच उच्चनीच भेद कायम होता. या भेदनीतीमुळे सबंध समाज आतून सडल्यासारखा झाला होता.उच्च वर्णीय वर्ग स्वतःला परब्रम्ह मानून ज्ञानाच्या पोकळ प्रतिष्ठेने गर्विष्ठ झाला होता. अज्ञान्यांचा आणि शूद्रांचा बुद्धिभेद करण्यातच त्यांना आपल्या बुद्धीचे कौतुक वाटत होते. त्यामुळे ज्यांना डोळस म्हणावे ते आंधळ्यासारखे वागत होते. उच्चवर्णीय वर्गाला पढीक पंडिताचे स्वरूप आले होते.त्याविषयी ज्ञानेश्वर म्हणतात ,
मोराच्या अंगी असोसे ! पिसे हाती डोळसे!
परी एकली दिठी नसे ! तैसे ते गा !!
म्हणजे मोराच्या पिसांना डोळे असतात पण त्यांना दृष्टी नसते .तसेच या पढीक पंडितानाही ज्ञानाचे डोळे आहेत पण त्याचा योग्य वापर ते करत नसल्याने डोळे असूनही नसल्यासारखेच आहेत. ज्ञानेश्वरांची दृष्टी मात्र अतिशय स्वच्छ होती. त्यांनी डोळसपणे आपल्या लेखणी व वाणीचा उपयोग समाजासाठी केला.शब्दांचे सामर्थ्य ओळखले होते. म्हणून तर ज्ञानेश्वर म्हणाले, सूर्यबिंब केवळ बचके एवढे असूनही त्याचा प्रकाश साऱ्या त्रैलोक्याला व्यापून राहतो .जाणकारांना इच्छिलेले सर्व काही देण्याची शक्ती शब्दांमध्ये असते.
जैसे बिंब तरी बचके एवढे ! परि प्रकाशा त्रैलोक्या थोकडे !
शब्दांची व्याप्ती तेणे पाडे ! अनुभवावी !!
तैसे शब्दांचे व्यापकपण ! देखीजे असाधारण !
पाहे या भावज्ञा लाभती गुण ! चिंतामणीजे!!
संत ज्ञानेश्वरांनी पर्यावरणाचाही जागर केलेला आहे. निरनिराळ्या ठिकाणी वने वाढवावीत असे ते सांगतात.” नगरेची रचावी! जलाशये निर्मावी !महावने लावावी! नानाविधे!!” झाड पाणी घालणाऱ्याला आणि ते तोडणाऱ्याला दोघांनाही सावलीच देत असते ते आपले कर्म करताना भेदभाव करत नाही असेही ते सांगतात.
धर्म सुधारणेची चळवळ उभारणे हेच धर्मकार्य आहे असे ज्ञानेश्वर मानत होते. ” मार्गी अंधासरीसा ! पुढे देखणाही चाले जैसा !अज्ञा प्रकटावा धर्मु तैसा ! जाणते ना !! “असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचे मत धर्म जरूर असावा असेच होते.परंतु त्यांना अभिप्रेत असणारा धर्म पूर्णतः मानवतावादी होता.म्हणून तर त्यांनी पसायदानी प्रार्थना केली. धर्म ही तत्कालीन समाज जीवनाची प्रेरणा होती म्हणूनच व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनावर धार्मिक प्रेरणांचा प्रभाव होता. ज्ञानेश्वर म्हणतात,
दया तेथे धर्मु ! धर्म तेथे सुखागमु ! सुखी पुरुषोत्तमु !असे जैसा !!
ज्ञानेश्वरांनी धर्म विचाराला सुस्थिर बैठक दिली. जो आचरणातून व्यक्त होतो तोच धर्म आहे असे सांगितले. ज्ञानेश्वरीच्या समारोपाच्या अध्यायात त्यांनी म्हटले आहे की ,वेद हे सर्व दृष्टीने संपन्न आहेत. पण फक्त तीनच वर्णाची ते काळजी वाहतात. त्यांनाच फक्त वेदाधिकार देतात .तो त्याचा कृपणपणा आहे. वेदांमधील हा दोष नाहीसा करण्यासाठी गीता अवतरली आहे व तिने चारही वर्णांना ,सर्व भूतांना मोक्ष मार्ग मोकळा केला आहे. यावरून धार्मिक क्षेत्रातील वर्ण विषमता त्यांना नाकारायची होती हे स्पष्ट होते.
प्रस्थापित धर्म विचारांमध्ये कर्मकांड म्हणजेच धर्मरक्षण हा समज झाला होता. हे सर्व कर्मकांड स्मृती पुराणातील वचनांचा हवाला देऊन व्रतवैकल्ये, पूजा विधान ,कथा यामध्ये मिसळून तयार केले गेले.पूजा, पोथी,पुराण, श्रवण ,यज्ञयाग, नवसायास,उपास तापास यालाच भक्ती साधना मानले गेले.परिणामी कर्मकांडात भक्ती दिसेनाशी झाली. कर्मकांड आणि अनेक देवदेवता यामुळे सर्वसामान्य जनता भरडून निघू लागली. अर्थात या कर्मकांडात अधिकारभेदाचे प्रस्थ पुष्कळ होते. त्यामुळे वर्णावर्णाच्या,जाती-जातींच्या आचारधर्मात पुष्कळ विषमता दिसून येऊ लागली .स्वतःला बुद्धिवंत म्हणवणाऱ्यांचा बुद्धीभ्रम झाला होता .त्यांनी देवाचे ढोंग माजवले होते. म्हणून तर ज्ञानेश्वर म्हणतात ,
यज्ञ मूठ टाकीले याजी ! देवपिसे प्रतिभा लिंगी !
नागविले भगवे योगी ! समाधी भ्रमे !
येत उर्वशीया इंद्रसुखी ! जैसा का सर्व लोकी!
तैसाची कृमीही नरकी ! लोष्ठातु श्लघे!
म्हणून नरकु स्वर्गु ! नव्हे पाप-पुण्य भागू!
हे दोन्ही ठाई सुखभोगू ! कामाचिया तो !!
असा स्वतःला ज्ञानी मानणाऱ्यांचा टेंभा ज्ञानेश्वरांनी उतरवला तसेच स्वर्ग प्राप्तीसाठी परमेश्वराची पूजा करणाऱ्यांचीही त्यांनी हजेरी घेतली. देवाचे बंड माजवणाऱ्यांवर त्यांनी विविध प्रकाराने टीका केली. बहुजन समाजाला वृत्तवैकल्य आणि कर्मकांडे करत बसायला वेळ नाही. कारण त्याला दिवस-रात्र पोटाच्या विवंचनेत राबावे लागते हे ज्ञानेश्वरांना माहीत होते .बहुजन समाजाने हा चुकीचा मार्ग निवडू नये म्हणून काम करताना, शेत नांगरतानाही मोक्ष साधना करता येईल असा मार्ग ज्ञानेश्वरानी दाखवून दिला. तीर्थयात्रा ,वर्तवैकल्ये तिथीवार, श्राद्धपक्ष ,मंत्र तंत्र या गोष्टी म्हणजेच धर्म असा बहुसंख्य लोकांचा गैरसमज बनला होता. अशा परिस्थितीत प्रस्थापित धर्म विचाराला मोडून काढणे हे ज्ञानेश्वरांनी महत्त्वाचे मानले होते. याचे महत्त्व मोठे आहे.
तुम्ही व्रतनियम न करावे ! शरीराते न पीडावे!
दूरी के ही न वचावे ! तीर्थासी गा!
योगादिवा साधने ! साकांक्ष आराधने !
मंत्र तंत्र विधाने ! झणी करा !!
व्रतवैकल्य करणे म्हणजे धर्मपालन नव्हे. असे काही करण्यापेक्षा स्वधर्माचे पालन करा असे ते सांगतात. चतुर्थीला गणपतीची, एकादशीला विष्णूची ,पंचमीला नागाची पूजा करणे , नवस सायास करणे अशा अवडंबरांचा ज्ञानेश्वरांनी कडक शब्दात धिक्कार केला आहे.ज्ञानेश्वरांना वर्ण व्यवस्थेने निर्माण केलेल्या जातीसंस्थेतील विषमता नष्ट करण्यासाठी झटावे लागले. जातीसंस्थेला नष्ट करून समाजात एकरूपता आणण्याचे प्रयत्न त्यांना करावे लागले. ज्ञानेश्वरांची विचारसरणी, व्यक्तिमत्व ,त्यांची बुद्धिमत्ता यांचे तेज सर्वसामान्यांच्या नजरेत भरलेले होते. म्हणून तर अठरापगड जमातीची संत माणसे ज्ञानेश्वरांकडे आकर्षित झाली.” म्हणून कुळ जातीवर्ण ! हे अवघेची आकारण ! ” या श्लोकात ज्ञानेश्वरांनी या विषमतेची बुरखाफाड केलेली आहे.
त्या कालखंडात मराठी भाषा वैभवात होती. तिला चांगले दिवस आले .कारण महानुभावी मंडळींनी तिच्यात वैविध्य आणण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. महानुभावी पंथाची ग्रंथसंपदा मराठी भाषेतून लिहिली गेली. साहित्याच्या सर्व प्रकारात म्हणजे चरित्र ,आत्मचरित्र, काव्य, व्याकरण, तत्वज्ञान अशा गद्य आणि पद्य स्वरूपात मराठी लेखन सुरू झाले. मराठीचा जसा उत्कर्ष होत गेला तसा वैदिक परंपराचा ऱ्हास सुरू झाला.कारण संस्कृत पेक्षा मातृभाषेत लिहिले तर बहुजन समाजापर्यंत पोहोचते याची जाणीव ठेवून इतरपंथीयांनीही मराठीचा आश्रय घेतला.अर्थात वैदिक परंपरेची ज्यांना भलतीच कळवळ व अभिमान होता त्यांचा वेदांचा अर्थ मराठीत सांगण्यास विरोध होता. ते संस्कृतलाच ज्ञानदानाची व ज्ञानप्राप्तीची भाषा समजत होते. वेद मराठीत सांगितले तर त्यांचा दर्जा कमी होतो असे ते म्हणत.पण खरे तर त्यांना बहुसंख्य मंडळी ज्ञानी व्हावीत असे वाटत नव्हते .कारण मग यांना शहाणे कोण म्हणाले असते ?हा प्रश्न होता. वैदिक धर्मातील मंडळींच्या या आडमुठया धोरणाने हा धर्म जनसामान्यांना अनोळखी झाला.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटले आहे,” बहिणाबाईने एका अभंगात भागवत धर्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला असे म्हटले आहे. कारण तोपर्यंत धर्माची मुख्य भाषा किंवा माध्यम संस्कृत भाषाच होती.भगवद्गीतेचा व भागवताचा प्रचार सर्वत्र होता. परंतु हे ग्रंथ संस्कृत मध्ये अडकले होते. लोकभाषेला परमार्थ विचाराचे समर्थ माध्यम प्रथम ज्ञानदेवांनी केले.संस्कृत ही देववाणी होती व धर्मामृत या देववाणीत बंद होते. या अमृताला पैजेने जिंकणारी देशी भाषा ज्ञानदेवांनी निर्मिली. धर्म,तत्वज्ञान व साहित्यकला यांचे सामान्यजनांपर्यंत पोहोचवणारे माध्यम निर्माण केले.शांतरस प्रतिपादिला. तो रस श्रेष्ठ ठरविल्यामुळे विवेकबुद्धीला उजाळा मिळाला. आणि भक्ती मार्गाला ज्ञानेश्वरांनी शुद्ध केले. शिवाय भगवान बुद्धांपासून शंकराचार्यापर्यंत संन्यासाश्रमच श्रेष्ठ असे परमार्थाचे साधन मानले गेले. व ज्ञानदेवांपर्यंत संन्यासच श्रेष्ठ मानला जात होता. परंतु अनासक्तीचा गृहस्थाश्रमच परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग म्हणून प्रथम ज्ञानदेवांनी दाखवून दिला.संन्यास मार्गाऐवजी गृहस्थाचा भक्ती मार्ग उजळविला. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूप होय, त्याचाच उल्हास होय .असे सांगून सगुण व निर्गुण या दोन्ही एकाच परमात्म्याच्या बाजू होत असे वारंवार त्यांनी प्रतिपादले.”
बदलत्या काळानुसार स्वतःला न बदलता जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसण्याच्या धोरणामुळे आणि कर्मकांडाचे प्रस्थ वाढल्यामुळे वैदिक धर्माला सार्वजनिक प्रतिष्ठा न मिळता तो विशिष्ट वर्गाची मिरासदारी बनला.या मिरासदारीची झळ ब्राह्मण असूनही स्वतः ज्ञानेश्वरांना बसली .अर्थात त्यांचे आई-वडील आणि भावंडांचीही यातून सुटका झाली नाही. त्यांच्या आई-वडिलांना तर देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले. स्वतः ब्राह्मण असूनही त्यांना व त्यांच्या भावंडांना संन्याशाची मुले म्हणून हिणवले गेले. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला .या छळाने ज्ञानेश्वरांना अंतर्मुख केले .त्यांनी असा विचार केला की मी ब्राह्मण आहे तरी माझा असा छळ होतोय.तर जनसामान्यांचे काय होत असेल ? त्यांची किती पिळवणूक ,किती शोषण होत असेल ? याचा ते विचार करू लागले.
आपल्या धार्मिक संस्काराच्या अधिकार प्राप्तीचे मार्ग प्राचीन ग्रंथांनी सांगितले आहेत काय ? याचा विचार करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी प्राचीन ग्रंथांच्या अध्ययनाला सुरुवात केली. अनेक विद्वान पंडित आणि सर्वसामान्य माणसांशी त्यांनी चर्चा केली. त्यातून त्यांचा व्यासंग वाढला. आणि अखेरीस कोणताच मार्ग न सापडल्याने निरुत्तर झालेल्या ज्ञानेश्वरांनी नवा मार्ग निर्माण केला. त्यांनी आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या वेदनेला वाचा फोडली. त्यांनी भोळ्या भाबड्या जनतेला भक्तीतून मुक्तीच्या मार्गाकडे नेले. प्रपंचकांसाठी वेगवेगळ्या वाटा त्यांनी सांगितल्या. इतकेच काय तर त्या वाटांवर कुठे कुठे फसवणूक, वाटमारी होण्याची शक्यता आहे याचीही पूर्वसूचनाही त्यांनी दिली.
भजन आणि कीर्तन यांच्या साह्याने ते समाजाला जागृत करू लागले.म्हणजेच एका समाजाभिमुख जाणीवने ज्ञानेश्वरांचे वांग्मय निर्माण झाले .अशी वाचा फोडणारे पहिले साहित्यिक ज्ञानेश्वर आहेत. म्हणून ते बंडखोरांचे आद्य मार्गदर्शक ठरतात .वैदिक परंपरांना शह देण्यासाठी जनसामान्यांपर्यंत आपली ही मते पोचवण्यासाठी आणि मराठीचा गौरव करण्यासाठी ते मराठीचा आश्रय घेतात. आणि तिला समृद्ध करतात. मराठीतून ब्रह्म विद्येचा सुकाळू करतात. आणि नवरसांचे सागर भरून माय मराठीला साहित्याचा साजही चढवतात.
ज्ञानेश्वरांच्या वांग्मयीन कार्याविषयी ‘ज्ञानेश्वरीचा अभ्यास ‘या ग्रंथात शं.दा.पेंडसे यांनी लिहिले आहे की,” त्रैवर्णिकांनाच फक्त आध्यात्मिक ज्ञानाचे अधिकारी करून स्त्री-शूद्रांदीकांवर पूर्वी केलेला पक्षपात नाहीसा करण्याकरता वेदच गीतारुपाने प्रगट झाले आहेत. अब्राह्मण, चांडाळ अशा कोणत्याही व्यक्तीला ज्ञान घेण्याचा अधिकार आहे असे ज्ञानदेवांचे म्हणणे होते. दारिद्र्य , अतीहिनता, उच्चिष्ठ सेवन ही आपल्या पूर्व संचिताची फळे आहेत असे मानणारा बहुजन समाज अध्यात्मिक ज्ञानासाठी भुकेला होता. व चित्तशांती करता तळमळत होता. अशी तळमळ लागलेल्या सर्व लोकांकरता ज्ञानेश्वरांनी गीतेवरील आपली अमर टीका लिहिली व इतर ग्रंथ लिहिले. ते मराठी भाषेत लिहिले.यावरून त्यांच्या वाङ्मयाचे अधिकारी कोण व प्रयोजन काय हे स्पष्ट होते. “
ज्ञानेश्वरांनी १२९० साली गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्री महालासा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. ही गीतेवर रचलेली टीका आहे. ” केले ज्ञानदेवे गीते ! देशीकार लेणे” असा उल्लेख ज्ञानेश्वरांनी केला आहे. पुढे संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी ,ज्ञानेश्वरी, गीताटीका असा केलेला दिसतो. संतवांग्मयाचे अभ्यासक अ.र.कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवरील आपल्या टिपणामध्ये म्हटले आहे,” ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका आहे.निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेले हे काव्यमय प्रवचन आहे.तो एक श्रोतृसंवाद आहे.ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायात ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधला आहे. तो संवाद असा आहे की ,ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वर आपल्या अगदी निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत असे आपल्याला वाटते.पण असे असूनही ज्ञानेश्वरी कधी बहिर्मुख होत नाही.तिची अंतर्मुखता ती सोडत नाही………… ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांच्याशी वेळोवेळी संवादही साधला. त्यांच्या या श्रोतृसंवादाची काही वैशिष्ट्ये पाहिली तर असे दिसते की, त्यांचा श्रोतृसंवाद हा खऱ्या अर्थाने श्रोतृसंवाद आहे. त्या संवादाचे एक महत्त्वाचे आणि अनन्य साधारण वैशिष्ट्य म्हणजे श्रोता स्वतः निर्मिती प्रक्रियेत सहभागी आहे याची स्पष्ट जाणीव त्यांना आहे. तसेच हे संवाद सविस्तर आणि मनापासूनचे आहेत.त्यातून त्यांच्या अलौकिक अंतरिक व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार झालेला आहे.त्यामुळे ते भावकाव्याच्या पातळीवर जातात. आपले विवेचन फुलवताना ज्ञानेश्वर श्रोत्यांच्या प्रगट व संभाव्य प्रतिक्रिया लक्षात घेतात. ज्ञानेश्वरांच्या संवादात अंतर्मुखता असल्यामुळे त्यांचा श्रोता हा ज्ञानेश्वरीच्या आशयाचाच भाग होतो.”
ज्ञानेश्वरानी विश्वस्वधर्म सूर्ये पाहो याचसाठी ही ग्रंथनिर्मिती केली हे स्पष्ट आहे. म्हणून तर ते ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात अखेरीस पसायदानात म्हणतात,
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
ज्ञानेश्वरांनी पसायदानातून जे मागणे केले त्यातून त्यांच्या नैतिक दृष्टिकोनाची व्यापकता दिसून येते. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून असे मागणे केले आहे की, खलबुद्धीच्या लोकांचा दुष्टपणा नाहीसा व्हावा. सत्कर्मामध्ये त्यांना सर्वाधिक गोडी लागावी. जीवांच्या ठिकाणी परस्परांबद्दल मित्रभाव निर्माण व्हावा. मांगल्याचा वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा संतमेळा भेटून सज्जनांची सोयरीक जगाला लाभावी. पापाचा अंधार नाहीसा होऊन कर्तव्य कर्माच्या सूर्याच्या उदयाने सारे विश्व उजळून निघावे. सर्व प्राणिमात्रांना हवे ते इप्सित प्राप्त व्हावे. त्यांना लौकिक व पारलौकिक अशा दोन्ही प्रकारचे यश लाभून सर्वजण पूर्ण समाधानी व्हावेत. पसायदान ही मराठी साहित्यातील एक महत्त्वाची प्रार्थना आहे. अर्थात ही प्रार्थना सर्वांगीण सामाजिक समता, विश्वकल्याण आणि मानवी दुःखमुक्ती करून मांगल्याची भावना रुजविणारी आहे. विश्वकल्याणासाठी केलेली ही प्रार्थना श्री विश्वेश्वरानी मान्य केली म्हटल्याने ” ज्ञानदेवो सुखिया झाला “असे म्हटले आहे.
मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडामध्ये रविन थत्ते यांनी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी ( समांतर दृष्टिकोन ) या शीर्षकाचे टिप्पण लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे,” विश्वाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर सर्वाधिक रमतात.आकाशातील ताऱ्यांचे तेज , ते एकमेकांवर आपटल्यावर होणारा चक्काचूर ,आकाशातील रंगांची वर्णने, ढगांची हालचाल, त्यांच्या मागे लपणारा सूर्य ,जो स्वतःच लपून ढगांचे दर्शन घडवतो, आकाशात झपावणारे चिलट, त्यात भरारी आणि बुडी मारणारा पारवा आणि विहार करणारा गरुड किंवा झाडावर झेप घेणारा पक्षी ही सर्व उदाहरणे तत्वज्ञानाचे दर्शन घडवण्यासाठी वापरली आहेत.आकाशातून पृथ्वीवरच पडणारा अणू, जेव्हा आकाश नव्हते तेव्हाची गोष्ट, आकाशाचे प्रसरण होळीच्या उलट्या दिशेने पडणारी झाडे ,स्तब्ध सूर्याची भासमय प्रदक्षिणा ,वास्तवात जगू न शकणारी वाळवी, पांडुरोगातील फसवी सूज किंवा गुराच्या त्वचेला लपटलेला गोचीड, एवढेच नव्हे तर विश्वरूपात अणू परमाणू मावेल एवढीही पोकळी चैतन्य सदृश्य श्रीकृष्णाने ठेवलेली नाही.हा विचार सर्वार्थाने वैज्ञानिक आहे.पशुपक्ष्यांची तर खैरात आहे. मुंगी आणि हत्ती आहेत. भुंगा ,टिटवी, मोर आणि कोकिळेची गोष्ट आहे. जळणारे गवत विझल्यावर गवत आणि अग्नी दोन्ही कशी मिटतात असे समाधीचे वर्णन आहे. चैतन्याच्या खांबाभोवती प्रकृती कशी वेटोळे घालत एखाद्या वेलीसारखी सरसर चढते असे दृश्य आहे .आणि फळांचा राजा म्हणजेच आंबा हा रसरूपगंध असून ज्ञेयाच्याउदाहरणासाठी वापरून शेवटी तो एकच कसा असतो असा तात्विक निर्णय सांगितला आहे. चेंडूच्या मागे पडणारा कुत्रा आहे ,आपटून परत येणारा चेंडूही आहे, आणि आकाशातील चांदोबाचा चेंडू हट्टाने मागणारे बाळही आहे. ज्ञानेश्वरीत स्त्रियांची वर्णने चौफेर आहेत.त्यात साध्वी , सवत आणि स्वैरीणी आढळतात. इथे तारुण्यात प्रवेश करणारी नव्हाळी आहे आणि सौंदर्याचे लक्षण म्हणून वृद्ध पतिव्रतेचे उदाहरण आहे. इथे सरळ प्रेम करणारी वाकड्या पाठीची कुब्जा आहे. पती किंवा प्रियकरापासून दुरावलेली आणि म्हणून झुरणारी स्त्री आहे .आणि स्वप्नात आलिंगन देऊन पुरुषाला कामावश करणाऱ्या स्त्रीचे दर्शनही घडते .स्वार्थ ,सत्ता, इर्षा ,दुर्गुण यांचे वर्णन करताना मस्तवाल आणि अज्ञानी पुरुषांची रेलचेल आहे. स्वर्गातल्या स्त्रियांना प्राप्त करण्यासाठी कर्मकांडी यज्ञ करणारे पुरुष कसे शिड्या लावतात, बापावर केलेले अन्यायाची सल मनात ठेवून मुलगा कसा डूक धरून संधीची वाट बघतो आणि तपश्र्चर्येने रुद्धीसिद्धी प्राप्त झालेले पुरुष सत्तेच्या गर्वात असताना क्षुल्लक मोहाला कसे बळी पडतात असली उदाहरणे सर्वकालीनच समजायला हवीत.ज्ञानेश्वरीत लोहार ,सुतार ,कुंभार आणि सोनार भेटतात.निरनिराळ्या प्रसंगात कोल्हाटी, गुराखी ,गारुडी भेटतात. आणि नागाचे प्रदर्शन करत पैसे मिळवणारा गारुडी खरे तर लबाड भिकारी आहे असे वर्णन येते.कुठलेही जगाच्या पाठीवरचे तत्व काव्य इतके प्रत्ययकारी आणि समृद्ध नाही आणि पुढे होईल असे वाटत नाही. आणि एवढे सगळे करून शेवटी ज्ञानेश्वर तटस्थच राहतात. अंताला विश्वात्मके देव म्हणून पंथ ,धर्म आणि वैयक्तिक दैवताच्या पलीकडे जाऊन ते शांतपणे उभे राहिल्याचे दृश्य समीर उभे राहते.”
ज्ञानेश्वरांचा भक्तीविचार हा ऐहिक दुःख विसरायला लावणारा ,पळवाटा शोधणारा, व्यक्तिगत मोक्षाची मागणी करणारा नव्हता असे दिसून येते.त्यांचा भक्तीविचार, कर्मयोग व नीती विचार संकुचित नव्हता. तो विचार परंपरेने चालत आलेल्या विकृत साधनेतून मुक्त करणारा , दिन दलितांच्या आत्मोन्नतीचा मार्ग मोकळा करणारा, संपूर्ण समाजाच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देणार होता. तो प्रत्येकाच्या कर्तव्य कर्माचे महत्त्व सांगून समाज धारणेच्या तत्त्वांचा पुरस्कार करणारा होता.ज्ञानेश्वरांनी असे सांगितले की, साधकाने निष्काम कर्माचे अनुष्ठान केले असता तो बसल्या जागी संन्यासी होतो. कर्मसन्यास आणि कर्मयोग यातील भेदच त्यांनी काढून टाकला. ते म्हणाले,
आता गृहादिक अवघे ! हे काही न लागे त्यजावे!
जे घेते झाले स्वभावे ! निःसंग म्हणवूनी!
म्हणून कल्पना जै सांडे ! तैचीगा संन्यास घडे !
इथे कारण दोन्ही सांगडे ! संन्यास योगी !!
ज्ञानेश्वरांनी कर्मसंन्यासाचा पुरस्कार कधीच केला नाही. त्यांनी निष्काम कर्मयोगाचा विचार प्रामुख्याने मांडला. ज्ञानेश्वरांच्या या भक्कम पायावरूनच संतांच्या कर्म,नीती विचारांची थोरवी पटते. धार्मिक आणि नैतिक शिकवणुकीच्या संदर्भात संतांनी सांगितलेल्या कर्मयोगाला स्थान आहे. समाजामध्ये कर्मठ आणि कर्मद्रष्ट या दोन टोकांच्या दोन विचारांचा प्रसार झालेला होता याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच त्यांनी कर्मठ आणि कर्मभ्रष्ट अशा दोन टोकांऐवजी कर्मयोगाचा मध्यम मार्ग समाजाला देण्याचा प्रयत्न केला. बाह्य संन्यासापेक्षा अंतरंग संन्यास महत्त्वाचा आहे.आणि डोक्याचे मुंडन करण्यापेक्षा मनाचे मुंडन करणे जास्त महत्त्वाचे आहे हे बजावले. स्वधर्म कर्म आणि सत्कर्म यांच्यामुळे चित्तशुद्धी होते ही भूमिका त्यांनी मांडली.स्वधर्माचा अर्थ कर्तव्यकर्म असा आहे.संतांच्या धर्मदृष्टीला एक नैतिक स्वरूप होते. त्यामुळेच तर एकूणच संत साहित्यातून सद्गुणांचे संवर्धन आणि दुर्गुणांचा त्याग करण्याचा विचार आढळून येतो. नीतीची प्रस्थापना करणे हाच त्यांचा जीवनलढा होता. धर्मासी नीतीसी सेसभरी अशी धर्म व नीती यांना एकत्र आणण्याची इच्छा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केली होती नीतीला भक्तीची जोड दिली पाहिजे असे सांगून ते म्हणतात भक्त हे नीतीचे, चारित्र्याचे आदर्श असतात.
योगी पुरुष सर्व धर्माची वस्ती आहे अशा जागी जन्मतो.जे घराणं नितीने वागते, खऱ्याने चालते, चांगली दृष्टी ठेवते ,त्या कुळात आणि ज्या कुळांना पुण्याईच्या कामाईवर सुखाचा व्यापार केला त्या ठिकाणी अशा योग्याचा जन्म होतो असे ज्ञानेश्वर म्हणतात. योगी ज्ञान संपादन करतात. या ज्ञानसंपादनानंतरही कर्ममार्ग आचरता येतो हेही ते सांगतात.त्याचबरोबर कर्म करताना फळाची अपेक्षा धरू नये. ज्ञानेश्वरांचा हा नीती विचार पुढे सर्व संतांनी आग्रहाने प्रतिपादित केला.
भारतामध्ये प्राचीन काळापासून धर्माचे प्रयोजन व स्वरूप यामध्ये वेळोवेळी परिस्थितीनुसार बदल होत आले आहेत.आपली धर्म कल्पनाही व्यापक आणि सर्वंकष आहे. भागवत धर्मांनी आपल्या धर्म कल्पनेत भक्तीला मुद्दाम अग्रस्थान दिले.कारण त्या केळी आपल्या खऱ्यासहिष्णू धर्माचा ऱ्हास होऊ लागला होता. मुठभर मंडळी आपल्याला वाटेल तसा धर्माचा अर्थ लावत होती. आणि संपूर्ण समाजावर तोच अर्थ लादण्याचा प्रयत्न करत होती.अनाचार आणि अत्याचाराची लागण सर्वत्र झालेली होती. बहुजन समाजाच्या पदरी पिढ्यानपिढ्या उपेक्षाच पडत आल्याने ती या जनतेच्या मनात धर्माविषयीची नवी जाणीव निर्माण झाली होती. सर्वसामान्य जनतेच्या मनातील नेमके हे शल्य ओळखून संत वांग्मयाने धर्मविषयक नवा विचार मांडला. खऱ्या धर्माचा होत असलेला ऱ्हास थोपविण्याचा प्रयत्न केला. खरा धर्म कोणता हे कळण्यासाठी मराठी भाषेचा मोलाचा उपयोग संतवाणी करून घेतला. “ब्रह्मविद्येच्या सुकाळू ,आनंदाचे आवरू ” अशी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी केली.
माझा मराठाची बोलू कौतुके !परी अमृतातेही पैजेसी जिंके!!
ऐसी अक्षरेची रसिके ! मेळविन!!
जेथ संपूर्ण पद उभारे ! तेर् मनाची धावे बाहिरे!!
बोलू भुजाही आशा भरे ! आलिंगावया !!
तैसे शब्दांचे व्यापकपण ! देखीजे असाधारण !!
पाठेया भावज्ञा फावती गुण ! चिंतामणीचे !!
असे ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा मिळाला असल्याने आपली भाषा दोन हजार वर्षांपूर्वीपासूनची आहे यावर शिक्कामार्फत झाले आहे.आपल्या या अभिजात मराठी भाषेला जनसामान्यांमध्ये मात्र स्थान तेराव्या शतकातील संतवाणीने मिळवून दिले. कारण जनतेला ज्ञात असणाऱ्या भाषेतच जनतेचे प्रश्न मांडण्याचा व त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न संतवाणीने केला.ज्ञानेश्वर ते तुकाराम, रामदासापर्यंत सर्व संतांना मराठीचा अभिमान वाटत होता. हे त्यांच्या अनेक ओव्या व अभंगावरून हे दिसते . ज्ञानेश्वरांनी संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांना एका सिंहासनावर विराजमान झालेले पहायचे होते. मराठी भाषेचा उपयोग करणे हे तत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे होते. संतवाङ्मयाने मराठी सारस्वतावर ,समाजावर फार मोठे उपकार केले आहेत. अशा संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सोपानदेव, मुक्ताबाई व निवृत्तीनाथ यांनीही एक वर्षाच्या आत आपले प्राण त्यागले होते. त्यांच्या या भावंडांनी ज्ञानदेवांचा विचार समाजामध्ये रुजवण्याचा मोठा प्रयत्न केला होता.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.

यावर आपले मत नोंदवा