प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
१४ ऑगस्ट हा प्रयोगशील नाटककार बर्टोल्ड ब्रेख्त यांचा स्मृतिदिन. विसाव्या शतकामध्ये जागतिक रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला.बर्टोल्ड ब्रेख्त हे प्रयोगशील जन्म नाटककार आणि कवी होते. नाट्यलेखन, त्यातील प्रायोगिकता आणि रंगभूमी विषयक स्वतंत्र तत्त्व विचार या आधारे त्यांनी मानवी अस्तित्वाबद्दलचे मूलभूत प्रश्न उभे केले
१० फेब्रुवारी १८९८ रोजी जन्मलेले बर्टोल्ड ब्रेख्त १४ ऑगस्ट १९५६ रोजी कालवश झाले.
आपल्या ५८ वर्षाच्या जीवनात त्यांनी अनेक नाटके व कविता लिहिल्या. त्यांच्या नाटकांची जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरही झाली .समाज जरी स्थितीशील असला तरी तो गतिशील करता येतो, त्यात बदल करता येतो हा आशावाद बर्टोल्ड ब्रेख्त यांनी मांडला. प्रेक्षकांना सजग ठेवलं तरच काही बदल घडवता येणे शक्य आहे या भूमिकेतून त्यांनी इपिक थिएटर ही संकल्पना मांडली. तसेच प्रेक्षकांच्या विचारशक्तीला कार्यप्रवण करण्यासाठी एलिअनेशन इफेक्ट हे तंत्र त्यांनी आणले.विसाव्या शतकात रंगभूमीवरील हे महत्त्वाचे बदल होते.
बर्टोल्ड ब्रेख्त यांचे मोठेपण त्यातच आहे.
वयाच्या तिशीमधे त्यांनी त्यांचे जगभर गाजलेलं द थ्री पेनी ऑपेरा हे नाटक लिहिले. हे नाटक त्यांनी जॉनगे या नाटकाराच्या दि लेगर्स ऑपेरा या नाटकावर आधारलेले होते .पण त्यातील प्रायोगिकता आणि नाट्य तंत्र बर्टोल्ड ब्रेख्त यांनी स्वतंत्र शैलीने विकसित केलं. आजच्या जगामध्ये राजकारणाने समाजकारण कसं दूषित झालेल आहे आणि त्याला प्रामुख्याने बुर्जवा वर्ग कसा जबाबदार आहे हे या नाटकातून त्यांनी उपरोध, उपहास ,विडंबन या आधारे दाखवून दिल आहे.
मराठीमध्ये कालवश पु.ल. देशपांडे यांनी या नाटकावरून तीन पैशाचा तमाशा हे नाटक लिहिलेले आहे.बर्टोल्ड ब्रेख्त ही मिथस,लोककथा, ऐतिहासिक दंतकथा ,लोकगीते ,लोकनृत्य, तमाशा, मुकाभिनय,धर्म प्रवचन, विनोद, कारुण्य, नागरी सभ्यता आदी विविध बाबींच्या मिश्रणातून उभी राहतात. लोकजीवनातील गायन, वादन ,नृत्य यांच्या साथीने त्यांनी ग्रीक रंगभूमीला लोक रंगभूमी बनवलं.
तीन पैशाचा तमाशा या नाटकाच्या प्रास्ताविकात कालवश पु.ल
देशपांडे म्हणतात,” बर्टोल्ड ब्रेख्त यांनी रंगभूमीला लोकशिक्षणाचे साधन मानले. नाटकी रम्यवादातून मुक्त केले. पण मनोरंजनाशी नाते तोडले नाही. संगीत, नृत्य विनोद अशा नाटकाच्या रंजकतेत भर घालणाऱ्या घटकांचे वैचारिक गांभीर्याच्या नावाखाली उच्चाटन केले नाही. नाटककार ,दिग्दर्शक ,कवी, संगीतज्ञ आणि तत्वचिंतक
बर्टोल्ड ब्रेख्त हा मार्क्सच्या तत्वज्ञानाने प्रभावित झाला होता. उपाशीपोटी नीती, संस्कृती वगैरे परवडत नाही हे त्याला पक्के उमजले होते. मार्क्स म्हटले की काही लोकांच्या मनात उगाचच किल्मिशे निर्माण होतात. त्याला लगेच प्रचारकी साहित्य, बोधवाद वगैरेची आठवण येते .ललित साहित्यातून बोध झालाच पाहिजे आणि बोध होताच कामा नये अशा दोन टोकाच्या भूमिकांवर वाद चालू असतात. कमकुवत प्रतिभेच्या लेखकाच्या कृतीतला बोध आणि कला दोन्ही कमकुवतच असता. मग तो मार्क्सवादी लेखक असो की मार्क्सविरोधी असो.बर्टोल्ड ब्रेख्त सारख्या असामान्य प्रतिमेचा माणूसच शिक्षण आणि रंजन यातला समतोल राखू शकतो.
नाटक म्हणजे काहीतरी उत्कंठा वाढविणार, सस्पेन्स असणाऱ कथानक हवं या समजाला बर्टोल्ड ब्रेख्त तडाखा देतो. त्याच्या नाटकात जसा सस्पेन्स फार कमी आढळतो. कारण त्याच्यामते नाटकाच अंतिम ध्येय भावना चेतविणे नसून विचारांना चालना देणं ,प्रेक्षकांची जाण वाढवण हे आहे. समाज घडवण्याची स्फूर्ती प्रेक्षकात नाटकाने निर्माण केली पाहिजे असं त्याला वाटतं. कारण भावना चटवणारी नाटकं आणि भावनावेगाने भारावणारे प्रेक्षक समाजात बदल घडवून आणू शकत नाहीत यावर तो ठाम होता. भावना क्षणभुंगुर तर विचार चिरंतन टिकणार असतो असं मानणारा बर्टोल्ड ब्रेख्त म्हणतो शोकांतिका पाहताना मला हसायला येत.तर सुखांतिका पाहताना मला रडायला येत. शोकांतिका पाहून ढसाढसा रडणाऱ्या किंवा सुखांतीका अनुभवत असताना खालून असणाऱ्या प्रेक्षकात नाही म्हटलं तरी एक प्रकारची श्रेष्ठत्वाची भावना असते. शोकनायकाच्या करुण जीवनाकडे पाहताना प्रेक्षक सहानुभूतीने चार अश्रू ढाळतो ते आपल्या वाट्याला असं दुःख आलेलं नाही या समाधानाने. हास्याचा विषय झालेल्या सुखांत नाटकातील व्यक्तिइतके आपण मूर्ख नाही या भावनेने.”असे
बर्टोल्ड ब्रेख्त म्हणतो.
बर्टोल्ड ब्रेख्तचा जीवन प्रवास व लेखन प्रवास पाहण्यासारखा आहे. १९७७ साली म्युनिच विद्यापीठातून त्याने मॅट्रिकची पदवी प्राप्त केली
वैद्यक व तत्वज्ञान विषयाचा त्याने तेथे व बर्लिन विद्यापीठात अभ्यास केला. पहिल्या महायुद्धात त्याने वैद्यक विभागात सैनिक म्हणून काम केले. याच काळात त्याने ट्रोमेल इन डेअर नाक्त हे पहिले नाटक लिहिले. लढणाऱ्या सैनिकाचे खडतर आयुष्य आणि युद्धाचा लाभ घेऊन प्रचंड संपत्ती जमवून सुखासीन आयुष्य जगणाऱ्यांमधील फरक व विरोध त्यांनी मांडला.हिटलरच्या उदयामुळे १९३३ साली त्याने जर्मनीचा निरोप घेतला.तो डेन्मार्क, स्वीडन , फिनलंड मध्ये काही काळ राहिला. पुढे तो काही वर्षे रशियात राहिला व शेवटी अमेरिकेत स्थायीक झाला. द थ्री पेनी ऑपेरा बरोबरच त्याची ती लाईफ ऑफ गॅलिलिओ, मदर करेज ,गुड वूमन ऑफ सेंटुआ ,द कॉकशियन एलचॉक सर्कल इत्यादी अनेक नाटके गाजली .
जर्मन दिग्दर्शक एरवीन पिस्किटरच्या साथीने बर्टोल्ड ब्रेख्तने वर
उल्लेखलेली एपिक थिएटर ही संकल्पना मांडली. अवकाश आणि काल यांचे स्वातंत्र्य घेऊन कुठल्याच नाटकीय संकेतांची अडचण त्यांने मान्य केली नाही. तसेच नाटकाच्या मुद्द्याला पोषक ठरणाऱ्या पारदर्शिका प्रेक्षकांना दाखवाव्यात आणि प्रेक्षकांना वर्तमानाचे भान द्यावे, त्यामुळे प्रेक्षकांची विचारशक्ती वाढेल व कार्यान्वित होईल. यासाठी त्याने एलिअनेशन इफेक्टचा वापर केला. अर्थात या संकल्पनांवर काहींनी टीकाही केली. ज्येष्ठ नाट्य समीक्षक माणिक कानडे यांच्या जागतिक रंगभूमी या ग्रंथात ते म्हणतात,” मनोरंजनात्मक प्रबोधन साधणाऱ्या सामाजिक अभिव्यक्तीवादी शैलीने जागतिक प्रायोगिक रंगभूमीचा शिल्पकार म्हणून बर्टोल्ड ब्रेख्तचे स्थान आढळ राहणार आहे. त्याच्या प्रायोगिकतेने इंटिमेट थिएटर, हॅपेनिंग ,लिविंग थिएटर आदी प्रयोगिक रंगभूमीचे प्रकार उदयाला आणले .रंगभूमीवर तयार नाट्य संहिता वापरण्यापेक्षा आयत्यावेळी नटाना किंवा प्रेक्षकांना (नट प्रेक्षक हे आंतर बर्टोल्ड ब्रेख्तने पुसूनच टाकलं )एक विषय देऊन तो शीघ्र काव्याप्रमाणे आपापल्या मगदूराप्रमाणे फुलवून त्याचा एक सामुदायिक अनुभव घ्यायचा अशा नाटकाचा उत्स्फूर्त नाट्यप्रकार उदयाला आला. या उत्स्फूर्त नाट्यानुभावाला रसरशीत जिवंतपणा असल्याने त्याला लिव्हिंग थिएटर म्हणणं संयुक्तिक वाटतं. धार्मिक विधीप्रमाणे हसमुदायिक अनुभूती बनते.शब्दबद्ध संहिता नसल्याने देहबोलीचा मुक्त वापर झाला आणि शब्दापेक्षाही या ध्येयबोलीचे सामर्थ्य किती मोठ आहे हे कळलं.नाटक रस्त्यावर, चौकाचौकावर कुठेही उभं राहता येऊ शकले येऊ लागलं. आणि जनतेच्या सामूहिक सहभागाने अनुभवता येऊ लागलं.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा