प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
जीवनस्पर्शी साहित्याची निर्मिती करणाऱ्या थोर साहित्यिकांच्या मांदियाळीत मुंशी प्रेमचंद यांचा अग्रक्रमाने समावेश केला जातो.हिंदी व उर्दू साहित्याला त्यांनी वेगळे वळण दिले. आपल्या लेखनातून मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांचे वास्तव जीवन पुढे आणले.उपदेशापेक्षा उदात्त मूल्ये रुजवण्यावर त्यांनी भर दिला. महात्मा गांधींच्या भाषणाने प्रभावित होऊन सरकारी नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला आणि स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. सामाजिक सुधारणांचा कृतीशील पुरस्कार करणारे प्रेमचंद विख्यात साहित्यिक होते. उत्तर प्रदेशातील पांडेपूर जिल्ह्यातील लमहिला या गावी येथे ३१ जुलै १८८० रोजी जन्मलेले प्रेमचंद वयाच्या ५६ व्या वर्षी ८ऑक्टोबर १९३६ रोजी कालवश झाले. त्यांच्या वडिलांचे नाव अजायबराय तर आईचे नाव आनंदी देवी होते.मानवी जीवनात सर्वकालिक उपयुक्त ठरतील अशा अनेक साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या. प्रेमचंद यांचे मूळ नाव धनपतराय होते. पण सरकारी नोकरांना सरकारच्या परवानगीशिवाय लेखन करता येत नाही म्हणून त्यांनी लेखनासाठी नबाबराय हे टोपण नाव घेतलं होतं.सरकारने पुस्तके जप्त केल्याने त्यांनी तेही नाव सोडून दिले आणि एका मित्राच्या विनंतीनुसार प्रेमचंद हे नाव घेतले.
वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली. असरारे महावीद म्हणजे देवाबद्दलचे रहस्य ही त्यांची पहिली कादंबरी बनारसच्या आवाजे खलक या उर्दू साप्ताहिकातून १९०३ ते १९०५ या काळात क्रमश: प्रकाशित झाली.१९१८ साली सेवासदन ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने हिंदी साहित्यातील वास्तववाद आणि कलात्मक लेखनाची सुरुवात केली असे मानले जाते. तर रंगभूमी या कादंबरीतून त्यांनी शेती संस्कृती आणि भांडवली संस्कृती यातील फरक आणि संघर्ष नेमकेपणाचे टिपला. तर कर्मभूमी या कादंबरीतून त्यांनी शहरी राजकारणाचे व चळवळीचे चित्रण केले.गोदान ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जातेत्यात शेतकऱ्यांच्या जीवनाप्रमाणे जमीनदारवर्ग ,मध्यमवर्ग ,भांडवलदारवर्ग यांच्याही जीवनाचे चित्रण येते.प्रेमचंद यांच्या मार्मिक व सखोल निरीक्षणाचा दाखला तिथे दिसतो.
साहित्याचा उद्देश केवळ रंजन नव्हे तर साहित्याने उदात्त मूल्यांचे संस्कार कलात्मक रीतीने केले पाहिजेत असे प्रेमचंद म्हणत असत. महात्मा गांधींची विचारधारा, समाजवादी मूल्ये ,सामाजिक सुधारणांची गरज आदींचे महत्त्व त्यांनी जाणलेले होते. पण त्यांनी स्वतःला एका विशिष्ट विचारधारेत बंदिस्त करून घेतले नाही. परिणामी त्यांच्या लिखाणात एकांगीपणा आला नाही. प्रेमचंदांचे साहित्य वाचताना त्यातील आशयाचा ठसा वाचकाला दीर्घकाळ पकडून ठेवतो हे त्यांच्या साहित्याच यश आहे.हिंदी, उर्दू, फारसी ,इंग्रजी आदि भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
प्रेमचंद यांचे पहिल्या पत्नीशी सूर जुळले नाहीत. सतत उडणाऱ्या खटक्याना वैतागून त्यांनी त्यांच्याशी काडीमोड घेऊन शिवरानी देवी या विधवेशी विवाह केला.त्यांचा हा संसार उत्तम झाला. त्यांचे पुत्र अमृतराय हे मोठे हिंदी लेखक होते तर श्रीपतराय मोठे प्रकाशक होते. कमला देवी ही कन्याही त्यांना होती.लेखक या नात्याने प्रेमचंद भारतभर फिरले.गोदानसह सेवासदन, प्रेमाश्रम, निर्मला, रंगभूमी, गबन, कायाकल्प, कर्मभूमी अशा पंधरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.त्यांचे चोवीस कथासंग्रह प्रकाशित झाले. प्रेमचंद यांच्या साहित्याचे अनेक भारतीय व युरोपीय भाषा अनुवाद झाले. त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट व नाटकेही निघाली. त्यांनी इतरांचे लेखन हिंदीत अनुवादित केले. चरित्र ,नाटक, बाल वांग्मय हेही प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले.पण ते गाजले ते उपन्यास सम्राट म्हणूनच.
एप्रिल १९३६ मध्ये लखनऊ येथे झालेल्या प्रगतिशील लेखक संघाच्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष प्रेमचंद होते. त्यावेळी त्यांनी अध्यक्ष म्हणून केलेले भाषण अतिशय महत्त्वपूर्ण आणि पुढील कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक असे ठरले. साहित्यिक अथवा कलावंत हा मुळातच प्रगतिशील असतो. कारण त्याशिवाय तो यशस्वी ठरत नाही असे त्यांचे मत होते.प्रेमचंद यांनी मानवी मनाचा वेध घेतच राष्ट्रीय जीवनात प्रचंड घडामोडींना साहित्यातून शब्दबद्ध केल आहे.केवळ मनोरंजन करणे हे साहित्याचे ध्येय नाही तर जीवनाचे दर्शन घडवणे ,लोकांच्या अभिरुची चे पोषण करणे ,मांगल्यावरची श्रद्धा वाढवणारे संस्कार करणे हे साहित्याचे ध्येय असले पाहिजे ही त्यांची धारणा होती. १९८० साली त्यांची जन्मशताब्दी भारत सरकारने अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी केली होती. त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीट देखील काढलेले होते.भारतातील सर्वकालिक श्रेष्ठ साहित्यिकांमधले एक महत्त्वाचे नाव असलेल्या प्रेमचंद यांना विनम्र अभिवादन…!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा