ॲडम स्मिथ : स्वतंत्र अर्थशास्त्राचा जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

१७  जुलै हा स्वतंत्र अर्थशास्त्राचा जनक असलेल्या ब्रिटिश अर्थतज्ञ ॲडम स्मिथचा स्मृतिदिन. १७२३ रोजी स्कॉटलंड मध्ये जन्मलेला ॲडम स्मिथ १७ जुलै १७९० रोजी कालवश झाला. आज अडीच तीनशे वर्षानंतरही त्याच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करावाच लागतो. कारण तो एका अर्थाने अर्थशास्त्राचा आद्यपुरुष आहे. अकराव्या शतकात इंग्लंडमध्ये उद्योग प्रधान स्वरूपाची नवी व्यवस्था आकार घेत होती. त्या व्यवस्थेला प्रतिसाद देण्यासाठी ॲडम स्मिथने काही सिद्धांत मांडले. त्यांने आर्थिक उदारीकरण ,खुला व्यापार आदी संकल्पना अडीचशे वर्षांपूर्वी मांडल्या होत्या. आज आपण जागतिकीकरणाच्या संदर्भात या संकल्पना वापरतो, मांडतो, स्वीकारतो किंवा विरोध करतो पण त्याचा प्रणेता ॲडम स्मिथ आहे. खाजगी शेती व खाजगी उद्योगधंदे याचा त्याने पुरस्कार केला.अर्थशास्त्राची स्वतंत्र शास्त्र म्हणून त्याने सर्वप्रथम मांडणी केली.

केवळ निसर्ग आणि केवळ व्यापार यावर अर्थकारण चालू शकत नाही. तर राष्ट्रीय संपत्तीचा आणि लोकांच्या जीवनमानात वाढ होण्यासाठी, त्यात सुधारणा होण्यासाठी व्यापार, शेती ,उद्योग या सर्वांचीच गरज असते. हा विचार ॲडम स्मिथने मांडला.म्हणूनच त्याला अर्थशास्त्रातील अभिजात संप्रदायाचा जनक असे मानले जाते. १७७६ साली “वेल्थ ऑफ नेशन्स “हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला.जगभर एक पकांडपंडित अर्थतज्ञ ,तत्वज्ञ म्हणून त्यानंतर तो सुपरिचित झाला.

ॲडम स्मिथच्या तत्त्वज्ञानातील मूलभूत कल्पनांबाबत यांनी घडवलं सहस्त्र या ग्रंथात म्हटलं आहे की,प्रत्येक व्यक्तीला स्वतःच हित कशात आहे हे कळत असतं. स्वतःचं जास्तीत जास्त हित साधणे ही अंत:प्रेरणा निसर्गदत्त असते.अदृश्य शक्तीच्या प्रभावामुळे ती निर्माण होत असते. निसर्गाच्या अदृश्य शक्तीने समाज रचना अशा तऱ्हेने केली आहे की, व्यक्ती हितातून समाज हित निर्माण व्हावे.अशी अदृश्य शक्ती व्यक्तीव्यक्तीतील परस्पर संबंध विरोधी होऊ देत नाही.जे जे निसर्गनिर्मित असतं ते मानवी समाजा हीतकारक असतं. निसर्गाने अशा प्रकारे समाज रचना केली आहे की व्यक्तीच्या स्वार्थातून समाजहित निर्माण व्हावं. म्हणूनच सरकारने व्यक्तीच्या वर्तनावर कोणतेही निर्बंध घालू नयेत.सरकारने आर्थिक क्षेत्राबाबत अलिप्तपणाचे धोरण स्वीकारलं आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादली नाहीत तरच सामाजिक हित साध्य होऊ शकेल. परमेश्वरी इच्छेनुसारच निसर्ग व्यवस्था निर्माण झाली असून या व्यवस्थेचे नियम सदासर्वकाळ लागू पडतात.

जे निसर्गनिर्मित आहे ते माणसाच्या हिताचे आहे असे स्मित मानतो. माणसाला स्वातंत्र्य दिलं तर तो स्वतः बरोबर इतरांचही हित साधतो.मग व्यक्तीहित व समाजहित  यात आंतरविरोध राहत नाही असे त्याचं मत होतं.उत्पादनाबाबत असा आशावाद मांडणारा स्मिथ संपत्तीच्या विभागणीबाबत मात्र आशावादी नव्हता. कारण तो म्हणतो दांडगे जमीनदार इतरांच्या कष्टावर इमले उभारतात. भांडवलदार कामगारांना कमी मोबदला देतात. आणि त्यांचे शोषण करतात. कष्टकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेल्या वस्तूंच्या किमतीतून व्याज व खंड दिला जातो. स्मिथने काही बाबतीत खाजगीकरणाचा पुरस्कार केलेला असला तरी वाढती नफेखोरी रोखण्यासाठी सरकारने हस्तक्षेप केलाच पाहिजे हेही बजावून सांगितले आहे .

ॲडम स्मिथचा थिअरी ऑफ व्हॅल्यू म्हणजे मूल्य सिद्धांत हा ग्रंथ गाजला.वस्तूला उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य अशी दोन प्रकारची मूल्य असतात व त्यात विरोधाभास असतो असे त्याने म्हटले.ॲडम स्मिथची मतं पटोत अथवा न पटोत पण अर्थशास्त्र या विषयात त्यानं पायाभूत काम केलं, त्याच्या मतांचा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही हे खरं.भांडवलशाही अर्थकारणाची तर सुरुवातच त्याने करून दिली. कारण त्याच्या काळात १७६०पासून औद्योगिक क्रांतीतून भांडवलशाही आकाराला आली. आयात, निर्यात ,किंमत, मजुरी, उत्पादन यामध्ये सरकारने पडू नये असे त्याचे मत होते.म्हणूनच ॲडम स्मिथ समजून घ्यावा लागतो व द्यावाही लागतो.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया