रोशनलाल नागरथ : शब्दन्यायी संगीतकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

१४ जुलै हा रोशनलाल नागरथ उर्फ संगीतकार रोशन यांचा जन्मदिन.

१४ जुलै १९१७ रोजी त्यांचा जन्म झाला आणि १६ नोव्हेंबर १९६७ रोजी ते कालवश झाले.अवघ्या पन्नास वर्षाचे आयुष्य त्यांना मिळाले. पण त्यांनी या अल्प आयुष्यात हिंदी सिनेसंगीतात अच्युत दर्जाची कामगिरी केली. संगीतकार राजेश रोशन आणि अभिनेता निर्माता राकेश रोशन ही त्यांची मुले .आणि अर्थातच ऋत्विक रोशन हा त्यांचा नातू. आजच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून हा तपशील. अन्यथा संगीतकार रोशन यांनी केलेले काम पुढील अनेक पिढ्यांमध्ये कायमचे गुणगुणले जाणार आहे यात शंका नाही.

आज पाकिस्तानच असलेल्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला.लहान वयातच त्यांना संगीताची गोडी लागली. रविशंकर ,अली अकबर खान ,मनोहर बर्वे , तिमिरबन भट्टाचार्य आदींकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले.लखनऊच्या तत्कालीन मॉरिस संगीत विद्यालयात अर्थात आज ज्याचे नाव पंडित भातखंडे संगीत विद्यालय आहे तेथे त्यांनी संगीतात एम ए केले. लखनऊ, दिल्ली, बडोदा इत्यादी ठिकाणी त्यांनी आकाशवाणीवर नोकरीही केली. दरम्यान त्यांची बंगाली गायिका इरा मोईशा यांच्याशी ओळख झाली .या ओळखीचे रूपांतर प्रेमात व पुढे लग्नात झाले. त्यांच्या पत्नीने रोशन यांच्या अंतापर्यंत सर्वार्थाने सहाय्यक म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली. 

आकाशवाणीवर काम करताना त्यांची वादनातील हुकमत बघून निर्माते दिग्दर्शक के गीतकार केदार शर्मा यांनी त्यांना मुंबईत हिंदी चित्रपट सृष्टीत आणले. अनिल विश्वास, स्नेहल भाटकर, गुलाम हैदर,सचिन देव बर्मन , खुर्शीद अन्वर यांच्याकडून त्यांनी सिने संगीतातील अनेक बारकावे आत्मसात केले. १९४८ साली मुंबईत आलेल्या रोशन यांनी पुढील एकोणीस वर्षात  एक्केचाळीस चित्रपटांना संगीत दिले.शास्त्रीय संगीताकडे त्यांचा प्रचंड ओढा होता.  म्हणूनच त्यांच्या सिनेसंगीतात शास्त्रीय संगीताचा बाज ,लोकसंगीताचा धागा आणि सतार ,सारंगी, संतूर, बासरी अशा पारंपारिक भारतीय वाद्यांचा नेमका वापर केलेला आढळतो. 

त्यांनी अनेक गीतकारांना लिहिते केले. साहीर लुधियानवी आणि रोशन हे गीतकार संगीतकार समीकरण बरेच गाजलेही .तसेच गायक मुकेश यांनी त्यांची सर्वाधिक गाणी गायलेली आहेत .जवळजवळ पन्नासावर गीतकाराना त्यांनी आपले संगीत देऊन पुढे आणले. गीतकार निरज यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की,”  चित्रपटसृष्टीत मोठ मोठे संगीतकार होऊन गेले.पण जिथे कवितेचा संबंध येतो तिथे रोशन पेक्षा चांगला कोणीही नाही. रोशन यांनी जितकी साहित्यिक गीते शेरोशायरी असलेली गीते दिली तितकी दुसऱ्या कोणी दिली नाहीत.” तर इंदीवर यांनी एका ठिकाणी म्हटले आहे ,” मी चित्रपट सृष्टीत गीतकार म्हणून स्थिर झालो तो संगीतकार रोशन यांच्यामुळे .रोशन आम्हाला तुमचे गीत हे रवींद्रनाथांच्या कविते सारखे झाले पाहिजे असे सांगत. संगीतकार रोशन एका एका गाण्याचे दहा दहा अंतरे लिहून घेऊन त्यातले सर्वोत्तम तीन अंतरे निवडत .” यावरून शास्त्रीय संगीताचा हा जाणकार संगीतकार शब्दरचनेलाही किती महत्त्व देत होता हे स्पष्ट होते. वयाच्या ऐन तिशीत हृदयरोगाने त्यांना गाठले. आणि वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी ते कालवश झाले. त्यांच्या गाजलेल्या गाण्यांची एक झलक आणि त्यातील विविधता पाहिल्यावर या महान संगीतकारापुढे नतमस्तक व्हायला होते .

संगीतकार रोशन यांची काही गाणी सांगायची झाली तर, खयालोमे किसी के इस तरह आया नही करते (बावरे नैन), एरी मै तो प्रेम दिवानी ( नौबहार), बडे अरमान से रखा है बलम तेरी कसम, जिंदगी भर नही भुलेगी बरसात की रात (बरसात की रात ),निगाहे मिलाने को जी चाहता है ,लागा चुनरी मे दाग छुपाऊँ कैसे ,तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही ,(दिल ही तो है ),जो वादा किया वो निभाना पडेगा ,जो बात तुझमे है तेरी तस्वीर मे नही , पाव छू लेने दो फूलों को इनायत होगी (ताजमहल) रहे ना रहे हम (ममता ), मन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा), बहारो ने मेरा चमन लूटकर (देवर ), मैं दिल हू एक अरमान भरा (अन्होनी) यासारखी अनेक गाणी त्यांच्या संगीताने आजरामर झाली. ताजमहाल साठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. मुकेश, महंमद रफी, मन्ना डे, तलत मेहमूद ,लतादीदी ,आशाताई ,नुरजहा अशा अनेकांच्या आवाजात त्यांनी हिंदी चित्रपटांना दिलेले संगीत त्यांच्या अवीट व अमिट गोडीमुळे आजही तृप्त करून जाते अशा या महान संगीतकाराला विनम्र अभिवादन…!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया