प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
१९ जुलै हा कवी निरज यांचा स्मृतिदिन. शंभर वर्षांपूर्वी ४ जानेवारी १९२५ रोजी त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इरावा जिल्ह्यातील पुरवली या गावात झाला. १९ जुलै २०१८ रोजी ते कालवश झाले.
मै तुफानो से चलने का आदी हू
तुम मत मेरी मंजिल आसान कर..
किंवा
उम्र के चढाव का उतार देखते रहे
कारवा गुजर गया गुबार देखते रहे..
असे म्हणणारे हिंदीतील ख्यातनाम कवी ,गीतकार गोपालदास सक्सेना उर्फ नीरज हे एक लोकप्रिय कवी होते. मानव होना भाग्य है ,कवी होना सौभाग्य है असे म्हणणारे नीरज आपल्या कवितातून जीवन विषयक प्रगल्भ असे तत्त्वज्ञान मांडत राहिले. हिंदी आणि उर्दू कवी संमेलनातून साठहून अधिक वर्षे त्यांनी शब्दशः राज्य केले. माणुसकी, प्रेम याविषयी सातत्याने लिहिणारे निरज एके ठिकाणी आत्मविश्वासाने म्हणाले होते की ,”आज भले कुछ भी कह लो तुम, पर कल विश्व कहेगा सारा, नीरज से पहिले गीतो मे सबकुछ था, पर प्यार नही था “!
अतिशय गरीबीत निरज यांचे बालपण गेले. गंगा किनारी राहत असल्याने भाविकांनी गंगार्पण केलेली नाणी शोधून त्यावर गुजराण करावी लागल्याचे त्यांनी स्वतः नमूद करून ठेवले आहे. वयाच्या सहाव्या वर्षीच पितृछत्र हरपले. त्यांनी पडेल ती कामे केली. सिनेमागृहात काम केले टायपिस्ट व क्लार्क म्हणून काम केले.
अशा परिस्थितीत मेहनत करत, अभ्यास करत ते बहिस्थ विद्यार्थी म्हणून १९५३ साली हिंदी साहित्यात एम.ए.झाले. मेरठ, अलीगढ येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.नंतर काही काळ मुंबईत येऊन राहिले. तेथे चित्रपट सृष्टीत गीतकार म्हणून मोठी कामगिरी त्यांनी केली. आणि पुन्हा इरावा या मूळ गावी ते राहायला गेले.
इतने बदनाम हुए हम तो इस जमाने मे ,लगेगी आपको सदिया हमे भुलाने मे, न पीने का सलीका न पिलाने का शउर,ऐसे भी लोक चले आये है मैखाने में / औरो का धन सोना चांदी, अपना धन तो प्यार है, दिल से जो दिल का होता है, वो अपना व्यापार रहा /आज की रात तुझे आखिरी खत और लिख दू , कौन जाने यह दिया सुबह तक जले ना जले/ जिन मुश्किलो में मुस्कुराना हो मना ,उन मुश्किलोमे मुस्कुराना धर्म है / जितना कम सामान रहेगा ,उतना सफर आसान रहेगा, जितनी भारी गठरी होगी, उतना तू हैरान रहेगा / अशा अनेक अप्रतिम रचना लिहिणाऱ्या नीरज यांनी हिंदी आणि उर्दू मुशायरे अनेकदा एकहाती अर्थात एकमुखी रंगतदार केले. भदंत आनंद कौशल्यायन यांनी निरज यांना हिंदी साहित्याचा अश्वघोष अशी उपमा दिली. तर कवी दिनकर यांनी त्यांना हिंदीची वीणा असे गौरवले होते. ख्यातनाम शायर राहत इंदोरी यांनी म्हटले होते, “अनेकदा हिंदी मुशायऱ्यात अधिक शायर हिंदू असल्याचे अभिमानी तर उर्दूत अधिक शायर मुसलमान असल्याचे अभिमानी दिसतात.पण या दोन्हीही ठिकाणी नीरज नेहमीच एक धर्मनिरपेक्ष, मानवतावादी शायर म्हणून उठून दिसत.नीरज हे केवळ कवी नव्हते तर ते कवितेतील एका युगाचे नाव आहे.”
या महाकवीला भारत सरकारने पद्मश्री (१९९१) पद्मभूषण (२००७) पुरस्कार देऊन गौरवले होते. तसेच विश्व उर्दू परिषद पुरस्कार यासह
देशभरातील साहित्य विषयक बहुतांश महत्त्वाचे पुरस्कार त्यांना लाभलेले होते. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात अत्यंत मौलिक स्वरूपाचे काम त्यांनी केले होते. १९४४ साली संघर्ष हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर आंतरध्वनी, विभावरी, प्राणगीत,दर्द दिया है ,बादल बरस गयो,मुक्तकी, नीरज की पाती ,गीत भी अगीत भी, आसावरी नदी किनारे ,लहर पुकारे, कारवा गुजर गया, फिर दिल जलेगा, तुम्हारे लिये यासारखे अनेक कविता संग्रह लोकप्रिय ठरले. ओशो पासून राजकपूर पर्यंत आणि हरीवंशराय बच्चन पासून आजच्या नवकवी पर्यंत सर्वजण निरज यांचे चाहते होते. अखेरच्या काळात त्यांची उत्तर प्रदेश सरकारने भाषा संस्थानच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला होता. पण वृद्धापकाळाने आजार व विकारग्रस्त असलेल्या निरज यांनी इच्छामरण मिळावे अशीही अपेक्षा व्यक्त केलेली होती.
नीरज यांच्या कवितांचे देश विदेशात चाहते आहेत. त्यांच्या कवितांच्या संग्रहांची अनेक देशी विदेशी भाषेत भाषांतरे झाली. या महाकवीला त्यांच्या अनेक चित्रपट गीतांनी मोठी लोकप्रियता दिली. १९७०,७१ आणि ७२ अशी सलग तीन वर्षे त्यांना उत्कृष्ट गीत लेखनाचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. बस यही अपराध मैं हर बार करता हु (पहचान ),ए भाई जरा देख के चलो ( मेरा नाम जोकर) काल का पहिया घुमे रे भैया ( चंदा और बिजली )शोखियों में घोला जाये फूलों का शबाब ( प्रेम पुजारी ),लिखे जो खत तुझे वो तेरी याद में (कन्यादान), खिलते है गुल यहा ( शर्मिली), चुडी नही ये मेरा दिल है (गॅम्बलर), है मैने कसम तुने कसम ली (मेरे सपने) जिना यहा मरना यहा( मेरा नाम जोकर )रंगीला रे ,तेरे संग में यु रंगा है मन ,ओ मेरी ओ मेरी शर्मिली, आज मदहोश हुआ जाये रे मेरा मन, यासारखी अनेक गीते गेली अनेक दशके रसिकमनावर गारुड करून आहेत.”बदन पे जिसके शराफत का पैरहन देखा, वो आदमी भी यहा हमने बदचलन देखा “असे म्हणणाऱ्या या महान कवीला विनम्र आदरांजली…!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा