नामवेद सांगणारे संत नामदेव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co

संत नामदेवांचे हे ६७५ स्मृती वर्ष आहे. २६ ऑक्टोबर १२७० रोजी जन्मलेले नामदेव ३ जुलै १३५० रोजी पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या शेजारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा पदस्पर्श आपल्याला व्हावा या भूमिकेतून ” आम्ही पायरीचे चिरे ” या भावनेने ही जागा संत नामदेवांनी जाणीवपूर्वक निवडली होती. संत नामदेव विठ्ठलमय होऊन गेलेले होते. ही आपली मनस्थिती त्यांनी

जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल ! परमात्मा विठ्ठल विठ्ठल !
जनक विठ्ठला जननी विठ्ठल ! सोयरा विठ्ठल सांगाती !
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ! देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल !
माता विठ्ठल पिता विठ्ठल ! बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल !
गुरु विठ्ठल देवता विठ्ठल ! निधान निरंतर विठ्ठल !
नामा म्हणे मज.विठ्ठल सापडला ! म्हणूनच कवीकाळा पाड नाही !!

अशा शब्दात लिहून ठेवली आहे.

अनेक संतांच्या बाबतीत जन्मकाळ, जन्मस्थळ याबाबत नेमकेपणा व अचूकपणा याबाबत विविध मते आहेत. संत नामदेव ही त्याला अपवाद नाहीत. प्रा. डॉ. गजानन नारायण जोशी यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास अनेक खंडात लिहिला आहे. त्यातील सातवा खंड “महाराष्ट्र संत “याविषयीचा आहे. त्यात ते म्हणतात,” नामदेवांच्या पूर्वजांचे मूळ गाव रिळे. हे गाव सध्याच्या सांगली जिल्ह्यातील शिराळे या तालुक्यात आहे .रिळे येथील रहिवासी ते रिळेकर आणि त्यापासून रेळेकर असे त्यांचे आडनाव तयार झाले.रिळे येथून नामदेवांच्या घराण्यातील आधीचे सहावे पुरुष यदुशेठ हे नरसी या गावी राहण्यास गेले.नामदेवांचा जन्म या नरसी गावचा आहे .तर काहींच्या मते त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला असा मतभेद आहे. नरसी हे गाव कोणते याविषयी तीन शक्यता सांगितल्या जातात .सोलापूर जिल्ह्यात नरसी बामणी हे एक गाव आहे .सातारा जिल्ह्यात कराड जवळ नरसिंगपूर हे गाव आहे. ते मूळचे नरसिंहपुर असून ते बहे नरसिंगपूर किंवा कोळे नरसिंगपूर असेही ओळखले जाते. आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील नरसी छोटेसे गाव आहे .यापैकी सोलापूर जिल्ह्यातील नरसी बामणी किंवा सातारा जिल्ह्यातील नरसिंगपूर ही खरे अभिप्रेत नरसी गाव नसावे. आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील हिंगोली स्टेशन जवळील नरसी हे नामदेवांचे मूळ व जन्म ग्राम असावे असे मानण्यास आधार आहे. हे नरसी गाव औंढा या गावापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे .येथे जे ओंढ्या नागनाथाचे देवस्थान आहे त्याच्या दर्शनास लहानपणी नामदेव जात असत. नरसीला नरसिंहाचे मंदिर आहे .तसेच बामणी याच नावाचे गाव नरसी पासून सुमारे तीस किमी अंतरावर आहे.हे गाव नरसी बामणी या नावाने ओळखले जाते. नामदेवांना ज्यांनी दीक्षा दिली ते त्यांचे गुरु विठोबा खेचर हे औंढ्या नागनाथ येथे राहत असत. नामदेवांचे आजोळ कल्याणी हे गाव याच नरसी जवळ होते. एकूण परभणी जवळील हेच नरसी गाव नामदेवांचे जन्मगाव समजणे योग्य ठरेल.”

अकराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात चालुक्य ,शिलाहार, कलचुरी, परमार, राष्ट्रकूट वगैरे राजघराण्यांनी विविध भागांमध्ये राज्य केलेले होते. बाराव्या शतकामध्ये राष्ट्रकूटांचे मांडलिक असलेले यादव राजकीय दृष्ट्या प्रबळ झाले. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धास जेव्हा संत नामदेव कार्यरत होते तेव्हा महाराष्ट्रात रामदेवराव यादवांची राजवट होती. १२९६ साली अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र यादवांच्याच अमलाखाली होता. नंतरच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीच्या सांगण्यानुसार जेव्हा मलिक कपूरने महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हा यादवांची सत्ता संपुष्टात आली. मुसलमान राजवटीला सुरुवात झाली. नामदेवांच्या काही रचनांमध्ये तत्कालीन परिस्थितीचा उल्लेख आहे. तर संत नामदेवांच्या काळामध्ये दक्षिण व उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती ही सत्ताकांक्षेने ग्रस्त झालेली होती. बल्बन या तुर्की घराण्याची सत्ता संपुष्टात आली होती.जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी, मुबारक खिलजी,मंगोल,मोहम्मद तुघलक, गीयासुद्दीन तुघलक,बहामनी आदींचे साम्राज्य होते. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अशा व्यवस्थेत संत नामदेव कार्यरत होते.

संत नामदेवांनी जातीनिरपेक्ष परमार्थिक लोकशाही निर्माण केली. ते उत्तम कवी होतेच तसे संगीताचेही जाणकार होते. किर्तन ही कला त्यांनी उत्तमप्रकारे आत्मसात केली होती. तसेच तिला जनजागरणाचे साधनही बनवले होते. निवृत्तीनाथ ,ज्ञानदेव हेही त्यांना थोर कीर्तनकार म्हणून वंदन करत असत. ज्ञानेश्वरांच्या आधी पाच वर्षे जन्मलेल्या नामदेवांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचे चरित्र लिहिले. या भावंडांची शोकविव्हलता संत नामदेवांनी पुढील शब्दात मांडली आहे.

बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट! ओघ बारा वाट मुरडताती!
बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा ! तृण रानोमाळ पांगलेसे !
हरिणीविन खोपी पडीये ली वोस ! दशदिशा पाडस भ्रमताती!
मायबापे आम्हा त्यागीयले ! ऐसे संकट तेव्हा झाले नाही !!

संत ज्ञानदेव आणि इतरांच्या समाधी सोहळ्याला संत नामदेव स्वतः उपस्थित होते. त्यांनी त्या प्रसंगाना शब्दबद्ध केले. ज्ञानेश्वरांनी जो पाया रचला तो पाया भक्कम करण्यासाठी व पुढे ती इमारत उभी राहण्यासाठी अनेक हात संत नामदेवांनी तयार केले होते.
” ग्रंथामाजी ग्रंथ ज्ञानदेवी ! एक तरी ओवी अनुभवावी ” अशा शब्दात ज्ञानेश्वरीचा सर्वप्रथम गौरव संत नामदेवांनी केला. चरित्र आत्मचरित्र, आख्यान काव्य, प्रवासवर्णन, कूटरचना ,भक्ती काव्य, भाव काव्य, हिंदी पद रचना अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केली. हे साहित्य लोकांशी संवाद साधणारे व जवळीक निर्माण करणारे होते.

महाराष्ट्राचा भागवत धर्म जागृत ठेवणं ,वारकऱ्यांचं संघटन करून व्यवस्थापन करणे आणि इथला भक्तीपंथ पंढरी पासून पंजाब पर्यंत घेऊन जाणे हे संत नामदेवांच्या जीवनकार्याचे पैलू होते.वारकरी संप्रदायातील या संत श्रेष्ठ संत कवीने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ” नाचू कीर्तनाचे रंगी ! ज्ञानदीप लावू जगी ” असे म्हणत भाषा, प्रांत, धर्म, जातपात या साऱ्याच्या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून आणि जीवनाचा जीवन म्हणून विचार केला. जातपातीचा आणि जन्मानुसार येणाऱ्या प्रतिष्ठा व अप्रतिष्ठेचा त्यांनी धिक्कार केला. दुःखाचे मूळ इथल्या विषमतेत, मानवभेदी व्यवस्थेत आहे हे त्यांनी जाणले होते.संत विसोबा खेचर यांना त्यांनी गुरु मानले. ” डोळियाचा डोळा उघडीला जेणे ! आनंदाचे लेणे लेवविले ” अशी त्यांची विसोबा यांच्याबाबतची भावना आहे.दासी असलेल्या जनाईला प्रतिष्ठान वागवले. संत चोखोबांचे कुटुंब जेव्हा आपत्तीच्या फेऱ्यात अडकले तेव्हा संत नामदेवानी स्वतः मंगळवेढा गाठले. चोखोबांच्या अस्थी आणल्या आणि पंढरीच्या महाद्वारासमोर त्यांचे स्मृतीमंदिर उभारले. त्यावेळी सनातन आणि त्यांना केलेल्या विरोधाला संत नामदेवांनी भीक घातली नाही.राजकीय, सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही महाराष्ट्रासह उत्तर वायव्य भारतापर्यंतच्या लोकजीवनाला नवा असे प्राप्त करून देण्याचे फार मोठं काम संत नामदेवांनी केले. संत बहिणाबाई म्हणतात त्या पद्धतीने संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा किंकर म्हणजे सेवक होऊन विस्तार केलेला आहे. आत्माविष्काराचे साधन म्हणून त्यांनी अभंग रचना सुरू केली. ते म्हणतात,

माझिया चित्तासी फार झाले क्लेश ! वृथा म्या आयुष्य गमविले !
शतकोटी तुझे करीन अभंग! सिद्धीस हा न्यावा पण माझा !!

संत नामदेवांनी स्त्री शूद्रांना उद्धाराची परवानगी आहे असे ठासून सांगितले. दया ,क्षमा, शांती ,अहिंसा या गुणांची वाहवा केली. जनता हाच जनार्दन आहे हे स्पष्टपणे अधोरेखित केले. त्या काळात कौटुंबिक, सामाजिक व्यवहारात जो अविचारीपणा आलेला होता त्याचे उपासात्मक चित्रण त्यांनी केले. उदाहरणार्थ,

ऐसा कलयुगीचा आचार ! क्रियाभ्रष्ट झाले नर !
मंचकावरी बैसे राणी ! माता वाहतसे पाणी !
स्त्रियेसी अलंकार भूषण ! माता वळीतसे शेण !
स्त्रियेसी पाटावाची साडी ! माता नेसे चिंध्या लुगडी !
सासू सासर्‍या योग्य मान ! मायबापा न घाली अन्न !
साली सासवा आवडती! बहीण भावा तोंडा माती !
स्त्रियेसी एकांत गोडी ! मातेसी म्हणे रांड वेडी !
म्हणे विष्णू दास नामा ! ऐसी कलियुगाचा महिमा !!

“संत नामदेवांचे जीवित कार्य “या लेखात गं.बा.सरदार नामदेवांच्या व्यक्तीत्वाबाबत म्हणतात ,” नामदेवांच्या चरित्रात आरंभापासून अखेरपर्यंत सगुणोपासनेचा जिव्हाळा आणि ऐश्वर्य पाहायला मिळते. विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांना अनुवंशिकतेने लाभला होता.त्यांचे मन हळुवार व संवेदनशील होते. भावोत्कतटा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव असल्याने त्या त्या क्षणाच्या चित्तवृत्तीत दंग होऊन जाणे हा त्यांचा सहज धर्म होऊन बसला.प्रसन्नता व विषण्णता ,कारुण्य वा कृतार्थता यासारख्या त्यांच्या सर्व भाववृत्ती विठ्ठलाच्या ठिकाणीच केंद्रित झालेल्या होत्या. ते रात्रंदिवस पांडुरंगाशी हितगुज करीत असलेले दिसून येतात…… नामदेवांचे चरित्र म्हणजे परमार्थ साधनेचा एक स्फूर्तीदायक वस्तूपाठच आहे.आर्त,जिज्ञासू व अर्थार्थी या तिन्ही अवस्थांमधून त्यांना जावे लागले.”

तत्कालीन समाजामध्ये वर्णव्यवस्था बळकट होती.कर्मकांड आणि विधिनिषेध बोकाळले होते. संस्कृत मूठभरांची भाषा होती. चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील खालच्या तिन्ही वर्णाना लेखन,वाचन ,शिकणे, शिकवणे , मंदिर प्रवेश अशक्य झाला होता. विषमता दर्शक चुकीच्या रूढी परंपराने धर्माचा अवकाश व्यापला होता. तसेच अज्ञानाचा व अंधश्रद्धांच्या अंधकार वाढला होता. हा अंधार भेदण्याचे व प्रकाश पसरवण्याचे काम संत नामदेव करत होते. संत नामदेवांचे वडील दामा शेटी, आई गोणाई ,पत्नी राजाई , नारा, महादा, गोंदा, विठा, लिंबाई ही अपत्ये, बहिण आऊबाई हे अवघे कुटुंब विठ्ठल भक्त होते. या सर्वांनीच अभंग लिहिले होते. त्यामध्ये नामदेवांचे क्रांतदर्शित्व उठून दिसते.

संत नामदेवांच्या क्रांतदर्शित्वा बाबत डॉ. हे. वि. इनामदार यांनी म्हटले आहे की, ” नामदेवांचे क्रांतदर्शित्व त्रिविध आहे.वाङ्मयसंपदा, विचार प्रणाली आणि आचारधर्म या तीन क्षेत्रात त्यांच्या व्यक्तित्वाचे वेगळेपण उठून दिसते. नामदेवांच्या कवितेने मराठी संतांच्या स्फूट कवितेच्या पायाभरणीचे काम केले आहे. नामदेवांच्या भावार्थ वृत्तीने त्यांच्या कवित्वाचे स्वरूप निश्चित केले आहे. त्यांच्या अभंगरचनेच्या लोकप्रियतेस मुख्यतः त्यांचे संतत्वच कारणीभूत झाले आहे. विठ्ठल प्रीतीचा आपला आनंद अभंग करण्यासाठी कवित्वाचे सुलभ सोपारे माध्यम त्यांनी निवडले आहे.हा भक्तीविषय अभंगाच्या एका छंदबंधातून पण अनेक वांग्मय प्रकाराच्या माध्यमातून मांडून त्यांनी संत कवितेला विविधता आणि विदग्धता यांची नवी दिशा दाखवली आहे.नामदेवांच्या विचारप्रणालीस ऐहिक आणि परमार्थिक अशी दोन अंगे आहेत.त्यांचे ऐहिक तत्वविवेचन हे व्यवहारनिरूपण व नित्यउपदेश या दोन वैशिष्ट्यांनी सिद्ध झाले असून, अध्यात्मशास्त्र व भक्तीशास्त्र हे त्यांच्या परमार्थ विचारांचे दोन पैलू आहेत.नाचू कीर्तनाचे रंगी ! ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा म्हणजे त्यांच्या समाजमनस्क क्रांतदर्शी व्यक्तित्वाची निशाणीच आहे. “

डॉ. हे. वि. इनामदार याच लेखात पुढे म्हणतात,” नामदेवांची दृष्टी पुरोगामी आहे. त्यांची शिकवण कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक आहे.देव दगडात नाही ,तो हृदयात आहे. तो सर्वांभूती आहे. ज्ञानापेक्षा भक्ती बरी. कारण तेथे अहंकार नाही. मोक्षासाठी दुर्गम योगमार्गाची गरज नाही. व्रतवैकल्य व कर्मठपणा यांचे स्तोम माजवणारा खरा धर्म नाही.नाम हेच सर्व धर्माचे सारसर्वस्व आहे. भक्ताला कळीकाळाचेही भय नसते. संसारात राहून ईश्वर प्राप्ती होते. असे चैतन्यदायी विचार मांडून नामदेवानी जनतेचे बाह्यत: दरिद्री असलेले जीवन सुसह्य व संपन्न केले. आपल्या तत्त्वदर्शनाने सामान्यजनांचे जीवन त्यांनी आनंदमय बनवले. “नामा म्हणे तया असावे कल्याण ! ज्या मुखी निधान पांडुरंग !” असे पसायदान मागून त्यांनी लोकांत जीवननिष्ठा उत्पन्न केली.

जळेवीण जलचर पक्षीवीण पिलियासी l तैसे झाले नामयासी रे ! किंवा देह जावो अथवा राहो ! पांडुरंगी दृढ भावो! चरण न सोडी सर्वथा ! आण तुझी पंढरीनाथा ! किंवा भेटीलागी माझा फुटतसे प्राण !

असे लिहिणाऱ्या संत नामदेवांनी नामसाधनेचा आणि भक्तीचा मार्ग दक्षिण भारतातून उत्तर भारतात नेऊन सांस्कृतिक एकतेचा संदेश देण्याचे फार मोठे काम केले. नामदेवांनी दीर्घ पल्ल्याच्या पाच तीर्थ यात्रा केल्या. महाराष्ट्रातून निघाल्यावर ते दक्षिणेला कर्नाटक, मैसूर, तामिळनाडू ,रामेश्वर पर्यंत गेले. आणि उत्तरेकडे गुजरात, सौराष्ट्र ,सिंधू प्रदेश ,राजस्थान ,मध्यप्रदेश ,उत्तर प्रदेश ,पंजाब हिमाचल प्रदेश आणि पुन्हा पंजाबात ते आले. त्यातून एक प्रकारचा सामाजिक समन्वय त्यांनी निर्माण केला. त्यामुळे उत्तर भारतातील संत कबीर, दादू दयाल , मलुकदास ,पटलूदास अशा अनेक संतांनी नामदेवांच्या आदरपूर्वक उल्लेख व गौरव केला. संत गुरुनानक आणि त्यांच्या शिष्य परंपरेने संत नामदेवांच्या व्यापक भूमिकेमुळे आपल्या पूर्वपरंपरेतच सामावून घेतले. त्यामुळेच गुरु ग्रंथसाहेब मध्ये संत नामदेवांच्या अनेक रचना आहेत. मुखबानी या विशेषणाने त्या समाविष्ट केल्या आहेत .संत नामदेवांनी भक्तीला समाजसेवेचे आणि लोकप्रबोधनाचे साधन केले. हिंदी कवितेच्या इतिहासात संत नामदेवांना सगुण निर्गुण भक्तीचे आद्य पुरस्कर्ते म्हणून मानले जाते. रविदास ,सूरदास ,मीराबाई यांच्यावरही नामदेवांचा प्रभाव दिसून येतो. मीराबाईंच्या भजनात नामदेवांचा उल्लेख आहे. नामदेवांची पुष्कर ,जयपुर ,गंगापूर ,कोटा, घोलपुर, खिलचीपुर ,नरसिंहगड ,छिपा, बडोदा ,छपरा, झालर ,पाटणा ,खानपुर, जोधपुर ,अलवर, बिकानेर, कोलादजी ,बगरू ,संगणीर ,काळा डेरा, शतपुर, सागर ,बिना ,सतना ,पिंडरा, ललितपुर ,सीतामंडी, सारंगा, जबलपूर, रीवा आदी अनेक गावात संत नामदेवांची मंदिरे आहेत. ज्वालापूर येथे एक मठ वजा गुरुद्वार नामदेवांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे. घुमान येथे तर संत नामदेवांचे वास्तव्य दहा वर्षे होते. तेथेही त्यांचे स्मारक आहे.त्यांच्या नावाने अनेक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्था तिकडे उभ्या आहेत. बेदी, तीरखाण, सप्पय , बावा, छीणा अशी अठरापगड जातीतील मंडळी संत नामदेवांना आपला वैष्णव कुलपुरुष मानतात.यावरून त्यांची राष्ट्रीय महत्ता ध्यानात येते.

संत नामदेवांचे चरित्र लेखक व त्यांच्या साहित्याचे संशोधक ग. वि. कविटकर यांनी त्यांच्या “संत नामदेवांच्या आंतरभारतीचे एक दर्शन ” या लेखात नामदेवांची भाषा व अन्य भाषाभगिनी याबाबत म्हटले आहे, ” तेराव्या शतकात जी भाषा रूढ होती त्या व्रज भाषेचे नामदेव एक मुख्य शिल्पकार होते. त्यांच्या हिंदीवर त्या काळच्या प्रचलित बोलींचा परिणाम स्पष्ट दिसतो. जनतेचा उद्धार हे एकच ध्येय सतत डोळ्यापुढे असल्याने ते स्वतः व त्यांची भाषा प्रादेशिकतेच्या मर्यादेत अलिप्तपणे गुरफटलेली नाही. त्यांच्या भाषेने प्रसंगानुसार कधी मराठीची, कधी हिंदीची, कधी राजस्थानीची, कधी गुजरातीची ,कधी अपभ्रंश भाषेची, कधी संस्कृतची प्रकृती स्वीकारली असल्यास नवल ते काय ? जसे विचार सुचले तसे व्यक्त करण्यासाठी तत्कालीन लोकभाषेच्या प्रकृतीत जे जे सामावू शकले त्या त्या सर्वांचा त्यांनी भक्ती प्रचारासाठी उपयोग केला.पुष्कळसे देशी शब्द, देशी वाक्यप्रयोग त्यांच्या रचनेत आहेत. नामदेवांच्या हिंदी साहित्यावर अरबी, फारसी व पंजाबी भाषेची छाया दिसून येते.”

वेदांनी सांगितल्याप्रमाणे वागणे अर्थहीन आहे.कारण तो खरा धर्मच नव्हे असे सांगून संत नामदेवांनी ” नामवेद ” हा पाचवा वेद मानावा असे सांगितले. त्याद्वारे त्यांनी बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ” आकारला देव नामरुपा आला, म्हणोनि स्थापीला नामवेदी ” असे म्हणत नामदेवाने नामालाच वेद पदवी दिलेली आहे. जनसामान्यांना वेदाध्ययनाचा अधिकार नाही हे जाणून त्यांनी हा पाचवा वेद मांडला. या वेदाच्या माध्यमातून संत नामदेवांनी व्रतवैकल्ये, कर्मठपणा ,जातीय उतरंड, वर्णव्यवस्थेची बंधने , कर्मकांडे यांना चूड लावली. आणि धर्माच्या नावावर शोषण करणाऱ्यांची मिरासदारी मोडून काढण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केला. देव भक्तांचा कैवारी आहे. त्याच्याजवळ उच्चनीज भेद नाही. तो केवळ अंतरकरणातील शुद्ध भाव पाहतो.ते म्हणतात, “न पठावे वेद ! नको शास्त्र बोध !
नामाचे प्रबंध पाठ करा ! ” नामदेवांची शिकवण व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला आणि सामाजिक नीतिमत्तेला पोषक अशी आहे. सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी आहे.

जातीपातीला संत नामदेवांनी विरोध केला. ” कहा करू जाती ,कहा करू पाती ! राम को नामु दिनराती ” असेही हिंदी अभंगात लिहिणारे संत नामदेव जात ईश्वरभक्तीच्या आड येत नाही हे सांगत होते. याचा अर्थ असा नव्हे की त्यांना जातीव्यवस्था मान्य होती. ते म्हणतात माझा जन्म शिंप्याच्या घरात झाला असला तरी माझं मन मात्र सदैव भक्तीतच गुंतलेल आहे.सुई ,दोरा ,गज, कात्री ही माझ्या व्यवसायातील साधने आहेत.पण या साधनांनी मी विठोबाचीच अंगी शिवली आहे.त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे.

जे स्वतःला ज्ञानी, पंडित, शास्त्री , हरिदास, पुराणिक म्हणवून घेतात ते आपापल्या अहंकारात मग्न आहेत. विषयोपभोगातून ते बाहेर पडू शकत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून ईश्वराचे खरे स्वरूप कळणार नाही. ते जे सांगतात त्यामुळे सर्वसामान्य प्रामाणिक म्हणून गोंधळतो, निराश होतो असे सांगताना ते म्हणतात,

तत्व पुसावया गेलो वेदज्ञासी !. तव भरले त्यापाशी विधिनिषेध!
तया समाधान नुपजे कोणे काळी! अहंकार बळी झाला तेथे !
स्वरूप पुसावया गेलो शास्त्रज्ञासी ! तव भरले तयापाशी भेदाभेद !
एक एका न मिळती मताशी ! भ्रांत गर्वराशी भुलले सदा !
पुराणीकासी पुसू स्वरूपाची स्थिती ! तव त्यासी विश्रांती नाही कोठे !
विषयी ठेवुनी मन संगती ब्रह्मज्ञान ! तेणे समाधान नूपजे कदा !
हरिदासासी पुसू भक्तीचा उपाय ! तव तयापाशी नाही भाव कोठे !
वाचेने सांगती नामाचा बडीवार ! विषयी पडीभर सदाकाळी !
ऐसे विचारता बहुत भागलो ! म्हणून शरण आलो पांडुरंगा !
भयभीत झालो संसार करिता ! नामा म्हणे आता तरी मज !!

संत नामदेवांनी भोंदू गुरुच्या विरोधात कठोर लेखन केले आहे. जगाला सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असणारे हे लोक टिपे,टोपी ,माळा असली भक्ती शिकवतात. ही खोटी कर्मकांडी भक्ती म्हणजेच कांचनिक भक्ती आहे असे ते म्हणतात,

कांचनिक भक्ती सर्व काळ करी ! बहुतांंचे वैरी हित नेणे!
वेद मर्यादा सांडून चालती ! डुंबते धेती वाण्यासवे !
लोकांपुढे सांगे आम्ही हरीभक्त ! न होय विरक्त स्थिती त्याची !

” मांजराचे गेले डोळे ! उंदीर देखोनी तळमळे ! ” असा उपरोध त्यांनी लबाड संन्याशाना उद्देशून व्यक्त केला आहे.आणखी एका अभंगात ते म्हणतात,

पोटासाठी जरी करी हरीकथा ! जन रंजविता फिरतसे !
तेणे केला घात एकोत्तर शतकूळांचा ! पाहुणा यामाचा श्रेष्ठ थोर !
द्रव्याचिये आशे हरिकथा करी ! तया यमपुरी नित्यवास !
नामा म्हणे ऐसे होते जे रे कोणी ! ते नर नयनी पाहू नये !!

नामदेवांनी व्रतवैकल्ये,तीर्थयात्रा ,भस्म , तुळशीमाळा ,चंदनाची उटी वगैरेची अर्थहीनता स्पष्ट केली आहे. आपली भक्ती दाखवण्यासाठी अशा कर्मकांडांची व अंधश्रद्धेची गरज नाही. तर ” सर्वभूती समदृष्टी हेचि भक्ती गोड मोठी ” हे त्यांनी सांगितले. तसेच
व्रततप नलगे करणे, नलगे तुम्हा तीर्था जाणे!
आपुलेचि ताई असा सावधान ,करा हरी किर्तन सर्वकाळ ! असेही त्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय ” दगडी देव इच्छा पुरवित ! तरी का भंगत अपघाताने ! ” असा विवेकवादी प्रश्नही उपस्थित केला आहे.

जीवनात संपूर्ण परिवर्तन म्हणजे काय ? याचे उदाहरण द्यायचे झाले तर संत नामदेवांचे देता येईल. वाल्याचा वाल्मिकी ज्या प्रकारे झाला त्याच प्रकारे नाम्या शिंप्याचा संत नामदेव महाराज झाल्यावर त्याला लोकांनी भरपूर त्रास दिला पण त्यांच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन झाले होते हे खरेच. त्याबाबत संत नामदेव म्हणतात,

लोखंडाचा विळा ! परिसासी लागला ! मागलिया मोला! मागू नये!
वेश्या होती तेची ! पतिव्रता झाली !मागील ते बोली ! बोलू नये !
दासीचिया पुत्रा ! राजपद आले !उपमा मागील !देऊ नये !
गावरस होता ! गंगेसी मिळाला ! वाचूनी गंगाजळा! मानू नये !
विष्णुदास नामा ! विठ्ठल मीनला ! सिंपी सिंपी त्याला ! म्हणू नये !

नामदेवांची कविता ही अतिशय उत्कट आहे. तिच्यात कल्पनाशक्ती आणि विचार सौंदर्य यांचा मिलाप आहे. तिची व्यापकता मोठी आहे.
डॉ. सरोजनी बाबर यांनी नामदेवांच्या कविता बद्दल म्हटले आहे,” नामदेवांनी केवळ काव्यलेखन करावे या हेतूने आपल्या काव्यशक्तीला राबवले नसून आपल्या ठाई निर्माण होणाऱ्या सहजोद्गाराचे माध्यम म्हणूनच तिचा स्वीकार केला. कवित्व त्यांच्या पायाशी लोळण घेत आले .त्यामुळे नामदेवांची भाषा साधी राहिली .साधे, वेचक पण समर्पक शब्द शेलक्या उत्साहाने त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. त्यांच्या सामर्थ्याच्या बळावर त्यांनी पंढरीनगरी, विठ्ठल आणि हरी नामाचा भक्तमहिमा एवढेच आपले विश्व उभे केले.आणि वत्सल, करूण ,अद्भुत अशा रसाविष्कारास सहजतेने हाताळले.भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार हीच भूमिका त्यामागे ठेवली. म्हणूनच त्यांचे लेखन हे पौराणिक थाटाचे ठरले आणि वर्णित विषय हा अद्भुतात विलीन होऊ शकला……… नामदेवांच्या कवित्वामुळे सामान्य लोकांच्या बुद्धीस चालना मिळून त्यातील सहजतेने मोठा चटका लावून सोडला आहे.त्या कारणाने अनेक मंडळींच्या सहवासात, वाचनाच्या निमित्ताने, पठणाच्या कारणांनी, गायनाच्या विलासाने, वारकऱ्यांच्या भजन कीर्तनाच्या श्रद्धेने नामदेवांची कविता आगळे स्थान निर्माण करू शकली आहे.त्यामागे उचंबळून येणाऱ्या भक्तीने आवर्जन उभी केलेली श्रद्धाही आहे.त्यामुळे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असे मोठ्या भक्ती भावाने परमेश्वराला आळवणाऱ्या नामदेवांच्या मनाची बैठकही समजू शकली आहे. “

प्रेम पिसे भरले अंगी ! गीत संग नाचू रंगी!
कोणे वेळ काय गाणे ! हे तो भगवंता मी नेणे!
टाळ मृदंग दक्षिणेकडे !आम्ही गातो पश्चिमेकडे !
बोले बालक बोबडे !तरी ते जननीय आवडे !
नामा म्हणे का केशवा ! जन्मोजन्मी देवी सेवा !!

अशी भावकविता लिहिणाऱ्या संत नामदेवांनी गूढवादी पद्धतीच्या रचनाही केल्या. उदाहरणार्थ पुढील गवळण.कृष्णाच्या रंगात सर्व गोष्टी एकरूप झाल्या आहेत. कृष्णाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या रंगाची भक्ती व्यक्त करण्याताना ते म्हणतात,

रात्र काळी घागर काळी ।यमुनाजळें ही काळी वो माय !
बुथ काळी बिलवर काळी ।गळां मोती एकावळी काळीं वो माय !
मी काळी कांचोळी काळी ।कांस कांसिली ते काळी वो माय !
एकली पाण्याला नवजाय साजणी ।सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय !
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी । कृष्णमूर्ति बहु काळी वो माय !

संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक प्रा.कृ.ब.निकुंब यांनी नामदेवांच्या काव्यातील वास्तववाद सांगताना म्हटले आहे, ” नामदेवांचे लेखन आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अर्थाने रिऍलिझमला, वास्तववादाला अधिक जवळ आहे. पहिली गोष्ट अशी की नामदेव आल्या अनुभवाची पोच देत राहतात. जो अनुभव आला असेल तो व्यक्त करीत राहतात. आला अनुभव जसाच्या तसा सांगणं हा
रिऍलिझमचा भाग झाला. इथं एक शंका येण्यासारखी आहे. नामादेवांचे भावविश्व अत्यंत हळुवार आहे. ते आपल्या कल्पनेने काही आभासचित्र पाहत राहतात.देव आपल्याशी बोलतो आहे, आपल्याबरोबर जेवतो आहे ,देव आपल्याला असं म्हणतो आहे ,आपण त्याला तसं म्हणतो आहे.ही सगळी कल्पनेने निर्माण केलेली आभास चित्र असली पाहिजेत. पण नामदेवांना ती खरी वाटू लागतात. आभास आहे अस आपण म्हणायचं, त्यांना ते प्रत्यक्ष वाटायला लागतं.या प्रत्यक्षाचच ते नि:संकोच निवेदन करू लागतात. जे खरोखर कल्पनीय ते वास्तव वाटावं हे मनाच्या तरल अवस्थेत आणि अत्यंतीक निदिध्यासाच्या स्थितीत सहज घडण्यासारख आहे. ही खरोखर दिवस स्वप्नच होती. नंतर अनेक संतांनी अशा दिवास्वप्नांचा अनुभव साक्षात केलेला दिसतो.”

संत साहित्याचे अभ्यासक रा.शं.नगरकर यांनी २०२१ साली “संत सुभाषित कोश ” तयार केला. त्यामध्ये त्यांनी संत साहित्यातील पाच हजारांहून अधिक सुभाषिते जवळपास ११५ विषयांमध्ये वर्गीकृत केली आहेत. त्यामध्ये संत नामदेवांच्या साहित्यातील काही सुभाषिते पुढीलप्रमाणे आहेत. बोलिल्यासारखे न करी पामर / दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा / मी म्हणता अहंता वाढे हे सर्वथा/ लोभीयांचे घरी लटीकेची उपवास / सोंगाचे वैराग्य हे अनर्थ मूळ / कांचनिक भक्ती सर्वकाळ करी, बहुतांंचे वैरी हित नेणे / असंतोषी सदा अतितासी जाळी सुकृताची होळी स्वयं केली / गोसावीपणाचा दाखविती वेष, नाही निजध्यास हरिनामी / डोई बोडून केली खोडी,काया नागविली बापुडी / हरिदास म्हणुनी हलवि मान ,कवडीसाठी घेतो प्राण /नामा म्हणे कीर्तन करिताती सांग, परि प्रेमाचे ते अंग आणिता न ये / रोग व्याधी पीडा जनाशी नसती ,तरी कोण पुसती वैद्य लागी / भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळी / नामा म्हणे विषय वासना वोंगळ, तेणे कोण्या काळे सुटीजेना / बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता / गुणरहित स्तुती असो नये / जळाचा जळबिंदू जळीच तो विरे / जीवना वेगळे मत्स्य तळमळती / सर्वानभूती हित तेची दया / पाजळला दिपू फीटला अंधकारु / जनी जनार्दन भावाची संपन्न / नामा म्हणे चित्ती आहे सुखरूप, संकल्प विकल्प मावळती / राजाचे लेकरू पांघरे वाकळ, तेव्हा ते सकळ लाज कोण / संपत्तीचे बळे एक झाले आंधळे / शिष्य केले पाप भोगावे गुरुने / येथेची जो खोटा तेथे तो करंटा / नामा म्हणे जाण प्रारब्ध कारण / परी ते होणार कदापि चुकेना / चंद्रासी चकोर मेघासी मयूर / हंसाशी विरोध करीत कावळा, नेणे त्याची कळा उंच पणे / पुराण प्रसिद्ध गोष्टी ह्या ऐकाव्या, प्रत्यक्ष देखाव्या कोणी ठायी , अंगे अनुभवा आपण आणाव्या, तरीच वाणाव्या संतांपुढे / कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव / भावा पाशी देव उभा सर्वकाळ / भक्तीविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत / अमृताहुनी गोड नाम तुझे देवा / जैसा ज्याचा भाव तैसा भासे / आपुल्या आपण व्यर्थ सांगे स्तुती, वडिलांची कीर्ती भोग सांगे / तुळशी रोपा घाली उदक, त्याचे हारती महादोष / कडू भोपळ्याचा कोणता उपयोग / आवडीचे चिन्ह सांगवेना वाचे / डोंगरा सांगाते कोण करी वाद / ताकही पांढरे दूधही पांढरे ,चवी जेवणारे जाणविते / कावळा प्रात: स्नान करी, जिते मेले ते न विचारी / कांडीताची कोंडा न निघे तांदूळ / अंध काय जाणे कैसा उगवे दिन / पाषाणा पर्जन्य न कळे जेवी / शेती बीज नेता थोडे मोटे आणिताती गाडे / अग्निस मिळे ते न ये परतोन / परिसाचे संगे लोह होय सुवर्ण/
धन्य तोची देश जेथे संतवास / माती आणि सोने ज्या भासे समान, तो एक निधान योगीराज / निंदास्तुती ज्याला समान पै जाली, त्याची स्थिती झाली समाधीची / मायेचा कळवळा मायची जाणे / मूर्खाहाती दिले रत्न पारखीसी ,तयाच्या मोलासी घेऊ नका / अशी शेकडो सुभाषिते संत नामदेवांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात. अशा या महान संत नामदेवांना ६७५ व्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन….!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया