रुसो : राजकीय विचारांचा स्फूर्तीदाता 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

अठराव्या शतकामध्ये जे विचारवंत होऊन गेले त्यामध्ये रुसोला मानाचे स्थान आहे.जीन जॅक रूसो हे त्याचे पूर्ण नाव.२८ जून १७१२ रोजी स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे त्याचा जन्म झाला. तो २ जुलै १७७८ रोजी कालवश झाला.जिनिव्हात जन्मलेल्या रुसोंचे सर्व जीवन अत्यंत हलाखीत गेले. त्याच्या जन्मानंतर थोड्याच दिवसात त्याची आई कालवश झाली. पुढे त्याचे वडील त्याला टाकून घर सोडून निघून गेले. त्यामुळे त्याचे प्राथमिक शिक्षण मामाकडे झाले. सोळाव्या वर्षी त्याला कॅथोलिक धर्म पंथाचे शिक्षण घेण्यासाठी अनेसी येथे पाठवण्यात आले. तेथे तू मादाम लुईसी द वॉरेन्स या श्रीमंती महिलेकडे विद्यार्थी व सेवक म्हणून राहिला. तिने त्याला व्यावसायिक करण्याचा प्रयत्न केला पण ते होऊ शकले नाही. त्याचे वाचन प्रचंड होते. युरोपात त्या काळात निर्माण झालेली विषम राज्यव्यवस्था, विषम अर्थव्यवस्था यांच्यामुळे सामान्य माणसाचे जीवन यातनामय बनलेले होते. रुसोचेही तसेच झाले.जिनिव्हा स्वित्र्झलडमध्ये पश्चिमेला फ्रान्सच्या सरहद्दीला लागून असल्याने जिनेव्हामध्ये फ्रेंच भाषाच प्रामुख्याने बोलली जाते.त्यामुळे रुसोच्या लेखनाचा परिणाम तत्कालीन फ्रेंच राज्यव्यवस्थेमुळे गांजलेल्या सामान्य फ्रेंच माणसावर ताबडतोब झाला आणि त्यातूनच पुढे झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीची बीजे रुजली.

फ्रान्समध्ये  झालेल्या राज्यक्रांतीचा स्फूर्तीदाता  म्हणून त्याची ओळख जगभर आहे. त्याच्या राजकीय ,शैक्षणिक ,विचारांचा प्रभाव पुढील अनेक  शतकांवरही पडलेला होता. तसेच संगीत ,साहित्य क्षेत्रातही त्याचे मोठे नाव  आहे.गेली अडीच दशके त्याच्या विचारांनी जगभरातील अनेक राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक विचारवंतांच्या विचारांना चालना दिलेला आहे . स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा जागर त्याने मांडला.रूसोचे जीवन धावपळीने ,विसंगतीने आणि अनेकदा अविवेकानेही व्यापलेले होते. मात्र कोणत्याही प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेण्याची तयारी आणि लोकशाहीचा पुरस्कार हे त्याच्या विचारविश्वाचे महत्त्वाचे गुण होते .या पैलूमुळेच तो विचारवंत म्हणून श्रेष्ठ ठरला. समाजातील विषमतेची कारणे ,मानवी स्वभाव वैशिष्ट्ये,सर्वसाधारण इच्छाशक्ती यांचे त्याने केलेले विवेचन फार महत्त्वाचे होते.

रुसोच्या मते पूर्वी निसर्गावस्थेत मानव स्वर्गीय सुखात होता. मात्र कालांतराने मानवी जीवनात बदल झाला. माणूस स्थायिक झाला. मालमत्ता संग्रहित करू लागला .कुटुंबसंस्थेचा व्याप वाढला. समाजसंस्था स्थापन झाल्या.आणि माणूस नैसर्गिक स्वातंत्र्य गमावून बसला. त्याचे स्वयंपूर्ण जीवन खुंटले.हिंसा, भीती, वैर, जुलूम यांचा प्रादुर्भाव वाढू लागला. अर्थात या बदलाचे अपरिहार्यत्व त्याने स्पष्टपणे मान्य केले आहे. रूसोने  आधुनिक संस्कृतीवर स्पष्ट शब्दांत टीका केली. त्याच्या मते भौतिक सुख म्हणजे सुख नव्हे. खरी प्रगती  नैतिक विकासाशी निगडीत असते. आधुनिक समाजामध्ये नैतिकतेची जागा असमानता, भ्रष्टाचार, क्रौर्य यांनी घेतलेली आहे असे तो म्हणतो. रोमँटिसिझम या युरोपियन साहित्यातील प्रभावी संकल्पनेचा जनक रुसो होता. जीवनातील कृत्रिमता नष्ट करून नैसर्गिक जीवन जगण्यासाठी आधुनिक मानवाने  निसर्गाकडे परत फिरावे असे त्याचे मत होते.रुसो म्हणतो,जेव्हा कधी पहिल्या माणसाने जमिनीच्या तुकड्याभोवती कुंपण घालून असे म्हटले की या जमिनीचा मी मालक आहे, तेव्हा अन्य लोकांनी अजाणता त्याला मान्यता देऊन टाकली. त्या माणसाला नागरी समाजाचा जनक मानले पाहिजे. यामुळे अनेक गुन्हे, युद्धे, खून, भयप्रद घटना आणि दुर्दैवाचे फेरे सुरू झाले.

त्याच्या मते प्रत्येक माणसाच्या मनात दोन प्रकारच्या इच्छा असतात. व्यक्तिनिष्ठ इच्छा आणि सामाजिक इच्छा.व्यक्तिनिष्ठ इच्छा स्वार्थ बुद्धीने प्रेरित व संकुचित असते.तर समाजनिष्ठ इच्छा विशाल आणि व्यापक असते. रुसोने व्यक्ती स्वातंत्र्याचाही व्यापक विचार केलेला होता. समाजाचे विधीनिषेध व नितीनियम व्यक्तीने पाळलेच पाहिजेत. कारण त्या नियमांची व बंधनाची मानवी स्वातंत्र्यासाठी आवश्यकता असते. ही भूमिका त्याने मांडली. रुसोने सार्वमत्वाची संकल्पना स्पष्ट करताना म्हटले आहे की,समाजातील प्रत्येक व्यक्ती सार्वभौम सत्तेची सहभागी व समभागी असते.या सत्तेचे विधीनियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत.

विधीनियमाने म्हणजेच कायद्याने चालणारे प्रत्येक राज्य लोकशाही राज्य असते. जनतेच्या संमतीने व जनतेच्या हितासाठी जी आज्ञा  करण्यात येते तिला विधीनियम म्हणतात. अशा विधीनियमानी चालणारे राज्य लोकशाही पद्धतीचे असते व त्यात लोकहितालाच प्राधान्य मिळते. राज्य व शासन संस्था यांच्यातील भेदही त्याने स्पष्ट केले. सार्वभौम सत्तेचे विधीनियम अमलात आणण्यासाठी उभारलेली यंत्रणा म्हणजे शासन.जनतेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे शासन संस्थेचे प्रमुख काम असते. शासन संस्थेला इष्ट वाटेल तेव्हा बदलण्याची क्षमता जनतेत असते. कारण जनता सार्वभौम असते. हे ऋषींनी स्पष्टपणे म्हटलेले आहे.

राज्यघटनेबाबत तो म्हणतो निरोगी शरीररचना माणसाला दीर्घायुषी बनवते. त्याचप्रमाणे चांगली राज्यघटना राज्याचे आयुष्य दीर्घकाळ टिकवू शकते. विधी नियम करणारी सत्ता म्हणजे राज्याचे हृदय. तर ते अमलात आणणारी सत्ता म्हणजे बुद्धी होय. शासन संस्था जनतेच्या इच्छेनुसार चालत नसल्यास त्या जुलमी सत्तेविरुद्ध क्रांती करण्याचा जनतेला अधिकार आहे.असे रुसोने म्हटले आहे.या संदर्भात इतके सखोल विवेचन रुसोपूर्वी झालेले दिसत नाही.जनतेचे सार्वभौमत्व आणि समतेचा सिद्धांत ही लोकशाहीची मुख्य तत्वरुसोने सांगितलेली आहेत.अर्थात रुसोच्या एकूण विचारांबाबत विचारवंतांनी अनेक मतभेद स्पष्टपणे मांडले.पण तरीही राजकीय विचारांचा स्फूर्तीदाता म्हणून त्याचे महत्त्व मोठे आहे.रुसो झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती असे नेपोलियनने म्हटले होते. कांट,गटे, रोबेस्पीयर, लिओ टॉलस्टॉय, इलियट,महात्मा गांधी यासारख्यांनी रुसोपासून प्रेरणा घेतली होती. कांट त्याला नैतिकतेचा न्यूटन असे संबोधतो.

म्हणूनच त्यांचे सर्व विचार पटणारे नसले तरी त्याच्या महानपणा विषयी आदरच व्यक्त केला पाहिजे. त्यांने लिहिलेले ‘ए ट्रिटीज ऑन द सोशल कॉन्ट्रॅक्ट’, ‘ए ट्रिटीज ऑन इनइकव्यालिटी,एमिल,डिसकोर्सेस ऑन सायन्स अँड आर्टस, द सेल्फ-अ‍ॅडमायर,अ कॉमेडी एमिले ओउ दे ल’एज्यूकेशन ,न्यू हेलोइस,द क्रीड ऑफ अ सॅवॉयर्ड प्रिस्ट ,पिग्मॅलियन

,रेव्हरीज ऑफ अ सॉलिटरी वॉकर द कन्फेशन्स ( आत्मचरित्र),‘ला नूवेल एलॉयजा (कादंबरी) हे  ग्रंथ प्रभावी ठरले. पण प्रभावी साहित्यनिर्मिती करणाऱ्या रुसोंच्या नशिबी मात्र दारिद्रय़, दैन्य, उपेक्षाच आली. मात्र फ्रेंच घटना समितीत बेंजामिन फ्रँकलिन ,जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याप्रमाणे रुसोचाही अर्ध पुतळा बसवण्यात आला होता.

रुसोचे काही महत्वाचे विचार पुढीलप्रमाणे,माणूस जन्माला येताना स्वतंत्र असतो मात्र नंतर प्रत्येक ठिकाणी तो श्रृंखलेतअडकला जातोकोणताही देश स्वातंत्र्याशिवाय परिपूर्ण होत नाही आणि स्वातंत्र्य हे सद्गुणाशिवाय असू शकत नाही./सामाजिक हीत साधायचे असेल तर व्यक्तिगत स्वातंत्र्याची आवश्यकता असते./नैसर्गिक परिस्थितीमध्ये दोषरहित नैतिकता प्रबळ होत जाते./ जेव्हा माझ्या भावना जागृत होतात तेव्हा त्या तीव्र असतात. आणि जेव्हा मी  त्यांच्याबरोबर सक्रिय राहतो तेव्हा त्याच्या इतकं काहीच महत्त्वाचं नसतं./खरं तर, कायदे नेहमीच संपत्ती असलेल्यांसाठी उपयुक्त असतात आणि ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांच्यासाठी हानिकारक असतात. ज्यावरून असे दिसून येते की सामाजिक स्थिती केवळ तेव्हाच  फायदेशीर असते जेव्हा सर्वांकडे काहीतरी असते आणि कोणाकडेही जास्त नसते./

.संपत्तीच्या बाबतीत, कोणताही नागरिक कधीही दुसरा विकत घेण्याइतका श्रीमंत होणार नाही आणि कोणताही नागरिक इतका गरीब होणार नाही की त्याला स्वतःला विकावे लागेल./कोणत्याही परिस्थितीत, वारंवार शिक्षा देणे हे सरकारमधील कमकुवतपणा किंवा आळशीपणाचे लक्षण आहे. कोणताही माणूस इतका वाईट नाही की त्याला एखाद्या गोष्टीसाठी चांगले बनवता येत नाही. कोणत्याही माणसाला मृत्युदंड देऊ नये, अगदी उदाहरण म्हणूनही, जर त्याला समाजाला धोका न देता जगता येत असेल तर./ एक बोट जगाला उध्वस्त करू शकते. पण जगाला आधार द्यायचा असेल तर खांद्याला खांदा लावावा लागेल./ गुलामगिरी आणि हक्क हे शब्द परस्पर विरोधी आहे. ते एकमेकांना पुसून टाकत असतात./संपूर्ण जनता संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेते तेव्हा आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतःच्या इच्छा ना सर्वोच्च मार्गदर्शन करत असतो./ स्वातंत्र्याचा त्याग करणे म्हणजे पुरुषत्त्वाचा त्याग करणे आहे .मानवी हक्कांचा आणि कर्तव्याचा त्याग करणे आहे./ सर्वात बलवान व्यक्ती कधीही स्वामित्व मिळवण्यासाठी बलवान नसतो. स्वामित्व मिळवण्यासाठी त्याला त्या शक्तीचे रूपांतर अधिकारात करावे लागते./ समुदायाची स्थापना होत असताना त्याचा प्रत्येक सदस्य स्वतःला तेथे समर्पित करत असतो./ एखादा माणूस जेव्हा राज्याच्या कारभाराबाबत म्हणतो की ,मला काय फरक पडणार आहे ? तेव्हा त्याचे राज्य संपुष्टात येऊ शकते./ जन्मजात राजा हा एक दुर्मिळ प्राणी आहे./ नागरिक जेव्हा व्यक्ती पेक्षा पैशाने सेवा देण्यास महत्व देऊ लागतात तेव्हा राज्य नाशाच्या दिशेने जात असते./ ज्याला कायदेविषयक शक्ती शिवाय इतर कोणतेही बळ नसते तो केवळ कायद्यांच्या मदतीनेच कार्य करत राहतो.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया