समर्थ रामदासांची जीवनदृष्टी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co

समर्थ रामदास जन्मभर महाराष्ट्रासाठी आणि त्यातील रहिवाशांसाठी झटले .संत चळवळीत रामदास हे तसे अखेरचे संत होते. अर्थात समर्थ रामदासांचे कार्य हे इतर संतांच्या कार्याचाच एक भाग होता. रामदासानी वारकरी संप्रदायाहून वेगळ्या अशा स्वतःच्या समर्थ संप्रदायाची स्थापना केली.परंतु लोकजागृती आणि लोकशिक्षण याबाबतीत त्यांच्या हेतूमध्ये फरक नव्हता. समर्थांचे कार्य सामाजिक राजकीय दृष्ट्या इतर संतांसारखेच महत्त्वाचे आहे. समर्थ रामदासांच्या कार्याबाबत प्रामुख्याने दोन विचार मांडले जातात. ते म्हणजे एक तर रामदास शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून कार्य करत होते. तर दुसरा विचार असा की रामदास ब्राह्मण शाहीचा पुरस्कार करणारे होते.
ब्राह्मणशाहीचा पुरस्कार त्यांनी केला ही गोष्ट खरी आहे.पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच याचा विचार करावा लागेल .इतर संतांनी जातिभेदाना ज्या पद्धतीने विरोध दर्शवला, त्यावर प्रहार केले तसे काही रामदासांनी केलेले नाही हे खरे आहे. कारण ब्राह्मणानी समाजाचे नेतृत्व करायचे आहे ही त्यांची धारणा होती. म्हणून त्याकाळी ब्राह्मण समाजाचे नेतृत्व करायचे सोडून इतर बाबतीत जास्त लक्ष घालत आहेत याकडे लक्ष वेधून ते म्हणतात,

ब्राह्मण बुद्धीपासून टेवले !आचारापासून भ्रष्टले !
गुरुत्व सांगून जाले ! शिष्य शिष्यांचे !!

ब्राह्मणांनी स्वतःला सावरले पाहिजे ,असे सांगणाऱ्या समर्थांनी वर्ण व्यवस्थेला पूर्णपणे विरोध केला नाही. पण सर्व स्तरातील, जातीतील समाजात सुधारणा व्हावी ,समाजात नैतिकता वाढावी असे त्यांचे मत होते. रामदासांचा विचार प्रवृतीकडे झुकणारा होता.

इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी ‘रामदास ‘ या दीर्घ लेखात म्हटले आहे की ,रामदास इतिहास तत्वनिरूपण करणारे महाराष्ट्रातील प्रथम ग्रंथकार होत. एकनाथ तुकाराम वगैरे साधुसंतानी महाराष्ट्राचे हित केले यात शंका नाही. परंतु राष्ट्रीय व सामाजिक दिशेने विचार करण्यात या लोकांनी बिलकुल लक्ष घातले नाही. रामदास आणि पूर्वीच्या संतांमध्ये हाच मोठा भेद आहे .पूर्वीचे साधू हे एकदेशी होते तर रामदास सर्व देशी होते .निवृत्ती मार्गाकडे झुकणाऱ्या आणि त्याला अपरिहार्य मानणाऱ्या अद्वैतचिंतनाला रामदासांनी ऐहिक बांधिलकीची जोड दिली. बारा वर्षाच्या अखंड भ्रमंतीत यांनी भारतीय समाजाचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले होते .महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर त्यांनी मठ व निस्पृह शिष्यांची संघटना उभारली.

रामदास यांनी शके १५५६ मध्ये चाफळ येथे पहिले राममंदिर स्थापन केले.आपल्या संप्रदायाच्या कामकाजाला सुरुवात केली. रामदासांनी स्थापन केलेल्या या संप्रदायाला रामदासी संप्रदाय,समर्थ संप्रदाय, दास संप्रदाय अशा विविध नावानी ओळखले जाते.वास्तविक समर्थ संप्रदाय हा वारकरी संप्रदायाहून फारसा वेगळा नाही. परंतु श्रीराम आणि हनुमान या आराध्य दैवतांच्या उपासनेला रामदासांनी नवा अर्थ देऊन लोकांतील आळस , शैथिल्य , नाकर्तेपण , बेशिस्त काढून टाकून त्यांना कर्तुत्वाची दीक्षा दिली. आपले कर्तृत्व उजळायचे असेल तर आपणच प्रयत्नशील राहिले पाहिजे.कठोर परिश्रम केले पाहिजेत. हा विचार त्यांनी मांडला. प्रयत्न वादाचा पुरस्कार केला.आणि त्या काळाला उपयुक्त ठरेल असे तत्त्वज्ञान सांगितले. चारित्र्यसंपन्नता, निश्चयी व्यवहारबुद्धी आणि विरक्ती या त्यांच्या गुणामुळे शिवकाळातील लोक मानसाला एक नवा विचार मिळाला. प्रपंच विज्ञान शिकवून त्यांनी ऐहिक कर्तव्याची जाणीव निर्माण केली. तसेच अन्यायाचा प्रतिकार करण्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या साहित्यामधून रामदासानी संसार कसा करावा ,राजा कसा असावा, सेवक कसे असावेत,विटा कशा पाडाव्यात, देश माणूस निसर्ग यांच्याशी कसे वागावे, राग ठेवू नये, समाजशास्त्र कसे असते, वक्त्याने कोणते संकेत पाळावेत,आरोग्य, व्यायाम, शरीर संपत्ती, बालसाहित्य , स्त्रीचे मोठेपण ,माणसाचे लिहिणे बोलणे लेखन साहित्य कसे असावे, अशा विविध विषयांवर विचार मांडलेले आहेत.यावरूनच त्यांची सामाजिक जागृतीची व समाज शिक्षणाची तळमळ दिसून येते . समाजाचे जीवन कसे असावेb? त्याने काय करावे व काय करू नये ?याची शिकवण देण्यासाठी रामदासांनी समाजकारणाला अधिक महत्त्व दिले होते. समाजातील गोरगरिबांकडे आपुलकीने पहावे. हळुवार अंतकरण ठेवावे. राग मनात न आणता वागावे असे सांगताना ते म्हणतात ,

दिनांचा दयाळू मनाचा मवाळू ! स्नेहळू कृपाळू जनी दास पाळू!
तया अंतरी क्रोध संताप कैचा! जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा !!

निष्क्रिय बनलेल्या समाजाला प्रयत्नवादाची शिकवण समर्थांनी दिली. समाजातील बहुसंख्य लोक नशिबाला दोष देत दारिद्र्यात खीतपत पडले होते. त्यांच्यामध्ये प्रयत्न करण्याची कोणतीच कुवत राहिलेली नव्हती. म्हणून आळस झटकून प्रयत्न करण्याची गरज त्यानी प्रतिपादित केली. ते म्हणतात ,

वन्ही तो चेतवावा रे ! चेतविताच चेततो!
केल्याने होत आहे रे !आधी केल ची पाहिजे !
यत्न तो देव जाणावा! अंतरी धरिता बरे!
पुढे ते म्हणतात ,

जो दुसऱ्यावर विश्वासूला ! तयाचा कार्यभाग बुडाला!
जो आपणची कष्टत गेला ! तोच भला!!

दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय जडली की माणूस निष्क्रिय होत जातो. आणि एकदा माणूस निष्क्रिय बनला की त्याला आहे त्याच परिस्थितीत खुरटे जीवन जगण्याची सवय लागते. स्वतःच्या निष्क्रियतेला तो प्रारब्धयोग समजायला लागतो .आणि परिस्थिती सुधारण्याच्या हात पाय हलवणे म्हणजे प्रयत्न करायचे सोडून देतो. मग त्याची स्थिती अशी होते ,

दुबळा लाचारी वोडाग्रस्त ! आळशी खादाड रीणग्रस्त !
मूर्खपणे अवघे वेस्त काहीच नाही!!
खाया नाही जेवाया नाही ! लेया नाही नेसाया नाही !
अंथराया नाही पांघराया नाही ! कोपट नाही आभागी !
……. तेणे कैसे करावे ? काय जीवेशी धरावे ?
वाचावे की मरावे ? कोण्या प्रकारे ?

कल करे सो आज कर आज करे सो अभी यानुसार वागले पाहिजे. आळस झटकायला पाहिजे असे समर्थ सांगतात. जीवन आनंद सुखी आणि समाधानी बनते. सदैव कामात गर्क असायला हवे. समर्थ म्हणतात ,

लहान थोर काम नाही ! केल्या वेगळे होत नाही!
करंट्या सावध पाही! सदैव होसी!
अंतरी नाही सावधानता! येत्न ठाकेना पुरता !
सुख-संतोषाची वार्ता ! तेथ कैची!
म्हणोनी आळस सोडावा ! येत्न साक्षेप जोडावा !
दुसचितपणाचा मोडावा ! थारा बळे !!

समर्थ रामदासांनी सांगितलेला प्रयत्नवाद म्हणजे ऐहिक प्रपंचाचे एक व्यापक तत्वज्ञानच आहे त्यांनी प्रयत्न वादात विवेक, सावधपणा , साक्षेप ,प्रचिती, बुद्धीयोग यांची मांडणी केली. प्रारब्धावर अवलंबून राहणाऱ्या निष्क्रिय लोकांनी सक्रिय व्हावे, एका अर्थी जिवंत व्हावे यासाठी रामदासांनी प्रयत्नवाद मांडला. यत्न हाच देव आहे असे ते म्हणतात. प्रयत्न वादाचे महत्व सांगताना रामदास म्हणतात,

यत्नाचा लोक भाग्याचा ! यत्न वीण दरिद्रता !
करील यत्न जितुका!तयास लाभ तितुका !!

प्रयत्न वादातून त्यांनी बुद्धी योग मांडला.इहलोकी ,परलोकी बुद्धी योगाची पाहिजे असे सांगत समर्थ म्हणतात ,

हिंडता शहाणे होते ! घरीच बसता खोटे !
हिंडता पारखी लोका ! कार्यकर्ता जीवी धरी!!

समर्थांचे तत्त्वज्ञान आणि शिकवण तत्कालीन समाजाला अतिशय उपयुक्त ठरली आहे. समाजाचे परिवर्तन करण्यासाठी त्यांनी बुद्धीयोग, इहयोग, व्यवहारवाद, वास्तववादाची शिकवण सातत्याने दिली .सर्वांनी डोळस व्हावे, शहाणे व्हावे, दक्ष-सावध- विवेकी व्हावे ,यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकातील भोळसटपणा,अंधश्रद्धा कमी करण्यासाठी समर्थांची शिकवणूक उपयुक्त ठरली.समर्थांनी सक्रिय व्हायला सांगितलं. याचा अर्थ काहीही करा असा नव्हे तर जे करायचे आहे ते स्वतःच्या, समाजाच्या हिताचे असले पाहिजे. त्यात सामाजिक व्यवहाराचे आणि नीतीचे प्रतिबिंब असायला हवं. सक्रियता कशी असावी हे सांगताना समर्थ म्हणतात ,

सावधानता असावी ! निती मर्यादा राखावी !
जनसमाने ऐसी करावी ! क्रिया सिद्धी !!

प्रत्येकात काही चांगले गुण असतात.अनेकदा ते सुप्तअवस्थेत असतात. हे चांगले गुण आपले आपणच शोधून काढावे लागतात. या आत्मशोधातूनच आत्मविकास होत असतो .आणि अर्थातच हा आत्मविकास साधण्यासाठीच समर्थांनी सांगितलेला प्रयत्नवाद हा महत्त्वाचा मार्ग आहे.

प्रयत्नाने जीवन सुखी करता येते हा आत्मविश्वास लोकात त्यांनी निर्माण केला. त्याच बरोबर प्रपंचाचा पुरस्कारही त्यांनी आग्रहाने केला. खरे तर स्वतः समर्थ लग्नाच्या वेळी बोहोल्यावरून बाजूला झाले होते .संसाराचा आणि प्रपंचाचा विचार करणे म्हणजे काहीतरी पाप आहे. संसार म्हणजे साधनेत आडवे येणारे लोढणे आहे असे एकेकाळी समर्थ मानत असत. परंतु संसाराचा तिरस्कार करणारे समर्थ नंतर लोककल्याणसाठी प्रपंचाचा, गृहस्थाश्रमाचा पुरस्कार करू लागले. कारण नेटकेपणाने प्रपंच करणे ही काही साधीसुधी बाब नाही हे त्यांना समाजाच्या अभ्यासावरून उमगले होते. तसेच प्रपंचात राहून परमार्थ करता येईल हेही त्यांना पटलेले होते. प्रपंचाचा पुरस्कार करणाऱ्या त्यांच्या काही ओळी महत्त्वाच्या आहेत.समर्थ म्हणतात ,

आधी प्रपंच करावा नेटका ! मग घ्यावे परमार्थ विवेकका !
….प्रपंच सांडून परमार्थ कराल ! त्यांनी तुम्ही दुःखी व्हाल !
… प्रपंच सांडून परमार्थ केला ! तरी अन्न मिळेना खायाला !
मग तया करंट्याला! परमार्थ कैचा!
……. ऐक सदैव पणाचे लक्षण! रिकामा जाऊ नेदी क्षण !
प्रपंच व्यवहाराचे ज्ञान ! बरे पाहे !

प्रपंचात पूर्णपणे लक्ष द्यावे अर्धे प्रपंचाचा अर्धे परमार्थात असू नये. प्रथम प्रपंच नीटपणे करावा आणि नंतर परमार्थात गुंतावे . गृहस्था श्रम उत्तम आहे हे सांगताना ते म्हणतात ,

गृहस्थाश्रमी निर्माण झाले ! आपला आश्रम टाकून गेले !
परंतु गृहस्थागृही हिंडो लागले ! कीर्ती रूपे !
या कारणे गृहस्थाश्रम ! सकळांमध्ये उत्तमोत्तम !
परंतु पाहिजे स्वधर्म !आणि भूतदया !!

प्रपंच सोडून परमार्थ करणाऱ्यांनी स्वतःला फार वेगळे समजू नये. कारण
‘ प्रपंची खाजी जेवती ! परमार्थी काय उपवास करती ?
प्रपंच कसा करावा याची अनेक उत्तम उदाहरणे समर्थांनी दिलेली आहेत.प्रपंच्यातील सर्व गोष्टींवर समर्थ अतिशय बारकाईने निरीक्षण मांडून सूचना करतात असे दिसून येते. समर्थांनी जे जे विषय निवडले त्यातून त्यांनी लोकशिक्षण ,लोकजागृतीचा प्रयत्न केला. म्हणूनच प्रपंच म्हणजे केवळ मुलाबाळांना जन्म देणारी,वाढवणारी संस्था नसून तिला एक सामाजिक अधिष्ठान आहे असे ते मानत. आज आपण सर्वत्र छोटे कुटुंब सुखी कुटुंबच्या जाहिराती पाहतो. कारण आज खरच आपल्यापुढे वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आवासून उभा आहे .आज कुटुंब नियोजन हा आपल्या पुढील मुख्य कार्यक्रम आहे. परंतु या बाबतीत साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थांनी लिहून ठेवले आहे ,

लेकुरे उदंड झाली ! तो ते लक्ष्मी निघून गेली !
बापडी भिकेशी लागली !काही खाया मिळना !
दिवसेंदिवस खर्च वाढला ! यावा होता तो खुंटून गेला !
कन्या उपवरी झाल्या ! उजवायाला द्रव्य नाही !!

सामाजिक प्रश्नांची नेमकी मांडणी करणारे किती तरी दाखले समर्थ वाङ्मयात उपलब्ध आहेत. प्रपंचातून परमार्थ साधता येतो हे समर्थानी पटवून दिले. उपासनेचा मंत्र समाजाला दिला. परंतु उपासनेतही त्यांनी आंधळा दैववाद आणला नाही. की ही करंटीभक्ती आणली नाही. आत्मविकासासाठी आत्मसामर्थ्य असावे लागते.त्याच्या निर्मितीसाठी समर्थांनी उपासना पद्धती सांगितली. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की समर्थांना बहुदेवतावाद अमान्य होता. रामदासांच्या साहित्यातील निरनिराळ्या ठिकाणी आलेल्या पुढील ओळींवरून हाच विचार दिसून येतो.

साधू दिसती वेगळले !परि ते स्वरूपी मिळाले !
मिळोनिया एकची झाले !देहातीला वस्तू!
…. देव झाले उदंड ! देवाचे मांडले भंड !
भूत देवांचे थोतांड !एकली झाले !
…. सकळ देवांचे मूळ! तो हा अंतरात्माची केवळ !
भूमंडळी भोग सकळ ! त्यासीच घडे!
नाना देव होऊन बसला !नाना शक्तीरुपे झाला!
भोक्ता सकळ वैभवाला ! तोचि एक !
……नर्मदा गडी का तीरी ! देव पडले लक्षवरी !
त्यांची संख्या कोण करी ! असंख्यात गोठे!
……धातू पाषाण मृत्तिका! चित्र लोप काष्ठ देखा!
तेथे देव कैचा मूर्खा! भ्रांती पडली !
…….देव निर्मिली हे क्षिती! तिचे पोटी पाषाण होती !
तयासची देव म्हणती ! विवेकहीन !!

बहुदेवतावादावर अशी टीका करणारे समर्थ रामदास अर्थातच मूर्ती पूजेच्या विरुद्ध तितक्या कडवटपणे पाहत नाहीत असे दिसते.तर त्यांनीच एक ठिकाणी म्हटले आहे ,

” नातुडे मुख्य परमात्मा ! म्हणून करावी लागे प्रतिमा !!”

लोकांनी प्रपंच करावा , परमार्थ करावा,उपासना करावी असा आग्रह धरणारे समर्थ हे खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते.समाज पुरुष होते.
कारण संपूर्ण समाजाने शहाणे व्हावे ,कोणीही अज्ञानाच्या अंध:कारात वावरून दुःखाच्या खाईत पडू नये. त्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. लोक शहाणे झाले की ते सुखी होतील. म्हणूनच ज्ञान सर्वाना मिळाले पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. समाजातील शहाण्यासुरत्या वर्गाने अशिक्षित , अज्ञानी वर्गाला स्वतःहून शिकवले पाहिजे. असे झाले तर अज्ञान आणि दुःख दोन्हीही उरणार नाहीत.लोकांना शहाणे म्हणजे सुशिक्षित कसे करावे याबाबत समर्थ म्हणतात ,

जितके काही आपणासी ठावे ! तितके हळूहळू शिकवावे !
शहाणे करून सोडावे ! सकाळ जन!
तसेच कसे शिकवावे याबाबत ते म्हणतात,
आधीच शिकोन जो शिकवी ! तोचि पावे श्रेष्ठ पदवी !
मुलांचे चालीने चालावे ! मुलाच्या मनोगते बोलावे !
तसे जनासी शिकवावे ! हळूहळू!!

आपण दुसऱ्याला शिकवत असताना त्याला कमी लेखू नये. त्याला एकदा सांगून समजले नाही, तर पुन्हा पुन्हा सांगावे.समर्थ म्हणतात,

वेड्यास वेडे म्हणो नये ! वर्मा कदापी बोलू नये !
वेडे शहाणे करावे ! तरीच जिणे श्रांद्यवाणे !

रामदासांनी आपल्या संप्रदायाच्या कार्यामधून जशी लोकजागृती व लोक संघटना यांची उभारणी केली ,तशीच त्यांनी समाजामध्ये व्यवहार चोख करण्याबाबतची आग्रही भूमिका मांडली. लोकांमध्ये नेटके पणाची आवड निर्माण केली . नितीयुक्त आणि उत्साही जीवन जगण्याबाबतची प्रेरणा दिली.

बहुतांचे समाधान राखावे ! बहुतास मानेल न ते बोलावे !
शरीर परोपकारी लावावे !बहुतांच्या कार्यास यावे !
उणे पडू न द्यावे ! कोणी एकाचे!
दुःख दुसऱ्याचे जाणावे ! ऐकून तरी वाटून घ्यावे !
बरे वाईट सोसावे ! समुदायाचे!!

ही सामाजिक एकतेची शिकवण समर्थ रामदास यांनी दिली. तसेच ” सामर्थ्य आहे चळवळीचे ! जो जे करील तयाचे”असे सांगून ” आधी गाजवावे तडाके ! मग भूमंडळ धाके !”अशी प्रतिकार आणि पराक्रमाची शिकवणी त्यांनी दिली. ही शिकवण लोकांना स्फूर्तीदायक वाटली.

समाजाने धीर धरावा.जे काय करायचं असेल ते पूर्ण विचार करून करावे .असे सांगताना ते म्हणतात ,
धीरधरा धीरधरा तकवा! हडबडू गडबडू नका !
काळ देखोनि वर्तावे! सांडावे भय पोटीचे !!
धरावा धीर तो मोठा ! विचारे पाहता बरे!
अधीर माणसे खोटी ! काम काही कळे यिन!!

रामदासानी वैदिक धर्मातील अध्यात्म ज्ञानाचा स्वीकार आणि पुरस्कार केला असला तरी त्याची मांडणी मात्र वेगळ्या विचारांची जोड देऊन केलेली आहे असे दिसून येते. आत्मज्ञान हेच खरे ज्ञान या विचारांचा पुरस्कार रामदासांनी केला.

जो कोणी ज्ञानबोधी! समूळ अविद्या छेदि !
इंद्रियमन प्रपीदी ! तो सद्गुरु जाणावा !!

असे म्हणून समर्थांनी ” ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ! पहावे आपणासी आपण ! या नाव ज्ञान ” अशी ज्ञानाची व्याख्या केली. रामदासांच्या वाङ्मयातील मात्रा समाज मनात खोलवर रुजून बसलेली आहे. त्यांचे सोपे ,सुटसुटीत व सुबोध वांग्मय लोकप्रिय आहे.रामदासांनी आपल्या कार्यातून व वाङ्मयातून जे तत्वज्ञान मांडले, जी शिकवण दिली ती समाजाला उपयुक्त ठरणारी आहे .

रामदासांनी करंटा दैववाद आणि निष्क्रिय उदासीनता यांच्याविरुद्ध प्रवृत्तीपर प्रयत्नवादाची शिकवण दासबोध, मनाचे श्लोक यामधून लोकांना करून दिली. त्यांनी लोकांना अज्ञान, भोळसटपणा आणि पारधार्जींणेपण यांचा तिटकारा करायला शिकवले. संवेदना गमावलेल्या समाजाला त्यांनी मारिता मारिता मरावे ही प्रतिकाराची शिकवण दिली. हा रामदासांच्या सामाजिक कार्याचा वेगळेपणा म्हणावा लागेल. लोकांना शिकवून त्यांना जाणते करावे आणि मग त्यांना एकजीव करून संघटना बांधावी असे समर्थांचे सांगणे होते.ते म्हणतात ,

लोक हे राखता राजी ! सर्व राजीच होतसे !
अंतरे चुकता तेथे ! सर्व भाजीच होतसे !

समर्थांचा दासबोध म्हणजे गुरु आणि शिष्य यांचे संवाद होत. या ग्रंथात समर्थांनी अनेक प्रश्न निर्माण करून त्याला योग्य अशी उत्तरे दिली आहेत. कीर्तनकारानी केवळ पोपटपंची करत बसू नये. तर भरपूर वाचन , मनन, चिंतन केलं पाहिजे. त्यांच्या चिंतनातूनच नव्या समाजमनाची जडणघडण होणार आहे. हे सांगताना समर्थ म्हणतात ,

बहुत करावे पाठांतर ! कंठी धरावे ग्रंथांतर !
भागवत कथा निरंतर !करीत जावी !
नित्य नवा हव्यास धरावा ! साक्षेप अत्यंतची करावा!
हरिकीर्तने भरावा ! ब्रह्मगोल आघवा !

पुढे ते म्हणतात ,परमेश्वर विश्वामध्ये ठायी ठायी भरलेला आहे. त्याला प्रसन्न करायचे असेल तर दिनदुबळ्यांची सेवा करावी लागेल. ते म्हणतात ,

नारायण असे विश्वी! त्याची पूजा करीत जावी !
या कारणे तोषवावी!कोणी तरी काया !

परमेश्वराची पूजा दीनदुबळ्यांच्या सेवेतच आहे असे सांगणाऱ्या समर्थांनी ‘ मूर्खाची लक्षणेव फार उत्तम रीतीने सांगितली आहेत.समर्थ साहित्यात ही मुर्खांची लक्षणे अतिशय उठावदार आहेत.याचे कारण यातून समर्थांनी व्यक्तिगत ,सामाजिक, कौटुंबिक जीवनात प्रत्येकाने कसे वागले पाहिजे याचे दिग्दर्शन केले आहे.तेम्हणतात ,

जन्मला जयांचे उदरी ! तयांसी जो विरोध करी !
सखी मानोली अंतरी !तो एक मूर्ख!
आपुली आपण करी स्तुती ! स्वदेशी भोगी विपत्ती !
सांगे वडिलांची कीर्ती ! तो एक मूर्ख !
अकारण हास्य करी ! विवेक सांगता न धरी !
या बहुतांचा वैरी ! तो एक मूर्ख!

म्हणजे जन्मदात्या आई-वडिलांचा द्वेष करून जो बायकोच्या मुठीत जातो तो मूर्ख .स्वतःची स्तुती करतो, आपल्या देशातच विपत्तीत राहून वडिलांची कीर्ती सांगत असतो तो मूर्ख .तसेच जो विनाकारण हसतो, सांगितलेले ऐकत नाही, लोकांशी वैर करतो.तो एक मूर्ख ,

औषध ने घे असोनी व्यथा! पथ्य न करी सर्वदा!
न मिळे आलिया पदार्था !तो एक मूर्ख !
आपणासी जेथे मान !तेथे अखंड करी गमन!
रक्षू नेणे मानाभीमाना ! तो एक मूर्ख !
घरच्या घरी खाय दाढा! बाहेरी दिन बापुडा !
ऐसा जो का मूढ वेडा! तो एक मूर्ख !

आजारी असतानाही जो औषध नाकारतो, पथ्यपाणी टाळतो ,आणि ताटातील पदार्थांना नावे ठेवतो तो मूर्ख. जिथे आपल्याला सन्मान देतात तिथे वारंवार जाणारा , घरच्यावर दाब देऊन बाहेरच्यांपुढे मान खाली घालणारा घालणारा मूर्ख आहे.

स्वये नेणे परोपकार !उपकाराचा अनोपकार!
करी थोडे बोले फार !तो एक मूर्ख !
लंडी लटिकी लबाड! कुकर्मी कुटील नीचाड !
निद्रा जयाची वाड ! तो एक मूर्ख!
जिवलगांशी परमखेदि !सुखाचा शब्द तो ही नेदी!
नीच जनास वंदी! तो एक मूर्ख!

ज्याला परोपकार करणेच माहीत नाही, उपकाराची फेड अपकाराने करतो मुठभर काम करून वारंवार बोलतो तो मूर्ख . भित्रा , लबाड, वाईट चिंतणारा व वागणारा, धूर्त, बेपर्वा, उद्धट, झोपाळू ही लक्षणे मुर्खाची होत. जवळच्याना टाकून बोलणारा आणि नीच माणसांना दंडवत घालणारा मूर्ख आहे .

कलह पाहता उभा राहे! तोडविना कौतुक पाहे!
खरे असता खोटे साहे ! तो एक मूर्ख !
अक्षरे गाळून वाची ! का ते घाली पदरची!
निगा न करी पुस्तकाची !तो एक मूर्ख!
आपण वाचीना कधी ! कोणास वाचाया नेदी!
बांधुनी ठेवी बंदी! तो एक मूर्ख !!

रस्त्यात चाललेलं भांडण सोडवण्याचा प्रयत्न न करता जो मजेने पाहत उभा राहतो तो मूर्ख .जो सत्य माहित असूनही असत्याला शरण जातो तो मूर्ख .वाचन करताना जो आधली मधली अक्षरे ,ओळी सोडून देतो किंवा आपल्या पदरचे त्यात काही शब्द घालतो, तसेच जो पुस्तकाची काळजी घेत नाही तो एक मूर्ख .स्वतः पुस्तके वाचायची नाहीत आणि दुसऱ्यालाही त्याचा उपयोग करू न देता जो पुस्तके वस्तूप्रमाणे कपाटातच ठेवून बसतो तो मूर्ख .

अशाप्रकारे समर्थांनी मूर्खाची कितीतरी लक्षणे सांगितलेली आहेत. पढत मूर्खाबद्दल समर्थ म्हणतात ,पंडित असूनही अभिमान दांडगा ,सगळा ग्रंथ वाचल्याविना त्याला नावे ठेवणारा, दुसऱ्याला दोष देणारा आणि आपले तेच खरे करणारा ,श्रोत्यांचा अधिकार न पाहता मनाला येईल ते बोलत सूटणारा पढत मूर्ख असतो. समर्थ म्हणतात दुसऱ्याचे मन ओळखूनच आपण वागणे पाहिजे .मात्र दुसऱ्याबरोबर आपण वाहत जाऊ नये .नीती आणि न्याय दोन्हीत अंतर असता कामा नये.तसेच दुसऱ्याचे दोष जरूर समजून घ्यावेत .त्यांचा वारंवार उच्चार करणे बरे नव्हे. दुसऱ्यांचे दोषही झाकून घेतले पाहिजेत.तसेच दुर्जनावर आपण उपकारच करावेत.

जाणारे पराचे अंतर !उदासीनता निरंतर !
नितीन्यायासी अंतर ! पडोची निदावे !
दोष देखोनि झाकावे ! अवगुण अभंग न बोलावे !
दुर्जन सापडोनी सांडावे ! परोपकारक करोनी!!

समर्थांच्या एकूण लेखनामध्ये समाज हिताची बुद्धी, समाजनिष्ठा यांचे दर्शन प्रामुख्याने होते. या कारणासाठीच त्यांनी धर्म जागृती हे आपले प्रमुख कार्य मानले. त्याकाळी धर्म संस्थेची जी सामाजिक अवनती चालली होती त्याला कारण म्हणजे आपली धार्मिक अनास्था .असे दिसत असले तरी या अवनतीचे मूळ आपल्या राजकीय गुलामगिरीत आहे असे समर्थ मानत होते. त्यामुळे स्वधर्म आणि संस्कृती यांची निकोप वाढ होण्यासाठी स्वराज्याची गरज आहे हे समर्थांनी ठासून सांगितले. यावरून रामदासांना धर्म जागृतीचे साधन म्हणून स्वराज्य निर्मितीची गरज आवश्यक वाटत होती हे स्पष्ट दिसते.

समर्थ रामदास हे शिवकालीन समाजाच्या प्रवृत्तीची व आकांक्षांशी जोडले गेले होते. धर्मजागृती आणि निर्भय वातावरणाची निर्मिती आपले प्रमुख कार्य आहे असे मानणाऱ्या रामदासांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केलेले होते. धर्माचा आणि स्वराज्याचा उत्कर्ष एकमेकांवर अवलंबून आहे अशी त्यांना खात्री वाटत होती. आणि उत्कर्षाचे कार्य करण्यासाठी शिवाजी महाराज हा अखंड परिश्रम घेणारा उत्तम पुरुष आहे असे रामदासांना वाटले.आपले विचार सांगणारी अनेक पत्र रामदासांनी शिवाजी महाराजांना लिहिली .एका पत्रात ते म्हणतात ,हे राजा तू निश्चयाचा महामेरू आहेस. दिन दुबळ्यांना तुझा फार मोठा आधार वाटतो .तू श्रीमंत आहेस आणि योगीही आहेस.तुझ्या हातून परोपकाराचे पुण्य कर्म फार मोठ्या प्रमाणात होत आहे .तू यशवंत आणि कीर्तिवंत आहेस.तुझ सामर्थ्य, पुण्य,जय, ज्ञान हे सगळं अपार आहे .

निश्चयाचा महामेरू ; बहुत जनासी आधारु!
अखंड स्थितीचा निर्धारु !श्रीमंत योगी!
परोपकाराचीया राशी ! अखंड घडती जयासी!
तयाचे गुण महत्वासी! तुलना कैची!
यशवंत किर्तीवंत !सामर्थ्यवंत वरदवंत!
पुण्यवंत आणि जयवंत ! जाणता राजा !!

थोर इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांनी ‘श्री समर्थ व समर्थ संप्रदाय व या पुस्तकात म्हटले आहे की ,समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना वेळोवेळीची पत्र पाठवली त्यामधून त्यांचा राजकीय विचार दृष्टीस पडतो .परंतु रामदासांनी शिवाजी महाराजांबरोबर राजकीय सल्ला मसलत केली याला पुरावा कोठेही आढळत नाही. रामदासांनी प्रत्यक्ष सल्ला दिल्याचा एकच प्रसंग सांगता येईल की, औरंगजेबाचा मुलगा अकबर पळून दक्षिणेत आला (जून १६८१) त्यावेळी रामदासांनी संभाजी राजांना लिहिले की, उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन झाले म्हणून ऐकले . ते समय आता काय आले म्हणून बोलले .परंतु या उपरीही ते प्रांतीचे लोक अनुकूल करून घेतील. तरी उभयता योजे कार्य सिद्धीच आहे.तरी त्वरा करा .

रामदासांना शिवरायांची भेट हवी होती पण ती झाली नाही हे वास्तव आहे . कारण रामदासांनीच लिहिले आहे,

तुमचे देशी वास्तव्य केले। परंतु वर्तमान नाही केले।
ऋणानुबन्धे विस्मरण झाले। काय नेणू।।
उदंड राजकारण तटले। तेणें चित्त विभागले।
प्रसंग नसता लिहिले। क्षमा केली पाहिजे।।

समर्थांच्या वाङ्मयात राजकारण हा शब्द वारंवार येतो. परंतु त्यांनी राजकारण हा शब्द चातुर्य,बुद्धिवाद, यत्न , शिकवण, प्रयत्न, उपाधी, विवेक अशा विविध अर्थाने उपयोगात आणलेला आहे. असे संतवाणीचे अनेक अभ्यासक मानतात. त्यात ही तथ्य ही आहे.कारण समुदाय एकनिष्ठ अनन्य राहावा याचे महत्त्व सांगताना समर्थ लिहितात,

मुख्य हरिकथा निरूपण ! दुसरे ते राजकारण !
तिसरे ते सावधपण !सर्व विषयी!

अर्थात राजकारण या शब्दात त्यांना अभिप्रेत असणारे विविध अर्थगृहीत धरूनही समर्थ रामदासांना स्वतःची अशी राजकीय मते होती. त्यांचा स्वतंत्र एक राजकीय दृष्टिकोन होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतून राजकीय मते अमलात येत असल्याचे त्यांना दिसत होते .

शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनीही शिवाजी महाराजांच्या तत्त्वानुसार चालावे अशी अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणतात,

शिवरायाचे आठवावे रूप ! शिवरायांचा आठवावा प्रताप!
शिवरायांचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी!

तसेच ‘सामर्थ्य समर्थ करावे , तरीच समर्थ म्हणावे ‘असे राजकारणाचे निवेदनही रामदासांनी केले.राजकारणातील पुरुषांनी अंतर्वाह्य कसे असले पाहिजे हे सांगताना रामदास म्हणतात,

नाना वस्त्रे नाना भूषणे! येणे शरीर शृंगारणे!
विवेके विचारे राजकारणे! अंतर शृंगारीजे!

राजकारण करणाऱ्या व्यक्तीने नेहमी काय ध्यानात ठेवावे हे सांगताना ते म्हणतात ,

समर्थ सारिखा समय योना ! नेम सहसा चालेना!
नेम धरता राजकारण अंतरपडे!
अति सर्वत्र वर्जावे !प्रसंगी पाहून चालावे !
हार निग्रही पडावे! विवेके पुरुषे !

त्याचप्रमाणे राजकारणातील लोकांनी कसे वागावे याबद्दल समर्थ म्हणतात ,

घटसि , आणावा धट ! उद्धटाशी पाहिजे उद्धट !
खटनटाशी खटनट ! अगत्य करी!

दासबोधातून रामदासानी असा राजकारण व्यवहारपर उपदेश केला असल्याने भाजपचाला काही अभ्यासकांनी व्यवहार कोश असे टोपण नावे दिल्याचे दिसून येते. या व्यवहार कोशातून त्यांनी लोक संघटन, लोक जागृती याचे महत्त्व पटविले आणि समाजाला नेटकेपणाची शिकवण दिली .

स्वराज्यावर परकीयांनी केलेल आक्रमण शिवरायांनी दूर केलं .या नव्या स्वराज्याची उभारणी कशी करावी याबाबत रामदासांची नेटकी भूमिका होती. ते म्हणतात ,स्वराज्याच्या उभारणीत माणसांना कामे द्यायला हवीत. सगळे हात कष्टकरी झाले पाहिजेत.परिसर नीट स्वच्छ आणि देखणा असावा. कोणीही रिकामे आणि उपाशी राहू नये. निरनिराळ्या इमारती, उद्याने ,देवळे ,गोपुरे, विहिरी, कारंजी, कोठ्या , महाल, जामदारखाने ,धर्मशाळा, पाठशाळा नवे नवे कारखाने तसेच घुमटाकार मशिदीही उभाराव्यात.

थांबे देवळे शिखरे ! उंच गोपुरे मनोहरे!
वापी पोखरणी सरोवरे ! हमामस्थाने कारंजी !
गड कोट महाल मठ्या ! गुप्तद्वारे अंतर शिड्या!
छत्र्या लादण्याचे तबकड्यां ! नाना भुयारी विवरे !
धनधन्य रसखाने ! दारूखाने जामदारखाने!
नाना अठरा कारखाने! घुमट मशिदी मनोहर!
चित्र शाळा नाटक शाळा !भोजन शाळा होम शाळा !
पाठशाळा धर्मशाळा !नाना इमारती !!

रामदासांच्या एकूण कार्याकडे पाहिले की असे म्हणावे लागते की त्यांनी लोकांची मने तयार करण्याचे काम केले. देश संपन्न कशामुळे होईल याची जाणीव करून दिली. राजकारण समाजकारण ,व्यवहार व वेदांत याविषयी त्यांनी आपली मते रोखठोकपणे मांडली.

रामदासांचा वेगळेपणा दाखवणारे हे सारे पैलू थोडक्यात पाहिले. प्राचीन मराठी वांग्यमयाचे स्वरूप या ग्रंथात प्रा. ह.श्री.शेणोलीकर समर्थ रामदासासंदर्भात असा विचार मांडतात की , सनातनी परंपरेचा अभिमानी आणि ब्राह्मण वर्णाचा पक्षपात यामुळे तुकारामांची तुलना करता रामदास प्रतिगामी ठरतात. त्यांच्या ग्रंथरचनेवर विवेक सिंधू, गुरुचरित्र ,ग्रंथराज बोलबोध या सांप्रदायिक ग्रंथांची जबरदस्त छाप पडली आहे .या सर्व गोष्टी लक्षात घेता रामदासांच्या शिकवणुकीतील सामाजिक संकुचितपणा स्पष्ट होतो. यामुळे एकनाथ तुकारामाप्रमाणे रामदासांचे साहित्य हे बहुजन समाजाला प्रेरणादायी होऊ शकले नाही. हे खरे आहे. परंतु म्हणून समर्थांचा जीवन विषयक दृष्टिकोन कमी महत्त्वाच्या ठरत नाही. समर्थांचे सामाजिक आणि राजकीय विचार अतिशय महत्त्वाचे ठरतात .समर्थांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, मी जे बोलतो ते सगळं अनुभवातून आलेलं आहे. मी स्वतः प्रथम आचरण केलं आणि मग जगाला सांगितलं. मानवल तर घ्या नाही मानवल तर सोडून टाका .माझा आग्रह नाही .

हे प्रचितीचे बोलिले!आधी केले मग सांगितले!
मानेल तरी पाहिजे घेतले !कोणी एके!!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया