प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
६ जून हा आधुनिक रशियन साहित्याचा जनक म्हणून ज्याला ओळखले जाते त्या जगप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे अलेक्झांडर पुष्कीन याचा जन्मदिन. कविता, कथा ,नाटक अशा विविध प्रकारात त्याने भरभरून लिहिले. त्याच्या लेखनात उत्कट देशभक्ती होती .रशियातील सर्वसामान्य समाज जीवनातील पोकळपणाची त्याने बुरखाफाड केली. पुष्किनला अवघे ३८ वर्षाच आयुष्य मिळालं. पण त्याच साहित्य जागतिक साहित्याचा एक अनमोल ठेवा बनलेला आहे .
मॉस्को मधील एका उमराव कुटुंबात पुष्किन ६ जून १७९९रोजी जन्मला. सेंट पीटर्सबर्ग येथे शिक्षण घेत असतानाच तो कविता करू लागला.शिक्षण झाल्यावर तो विदेश मंत्रालयात नोकरीला लागला. पण क्रांतीवादी लेखन केल्यानं त्याला नोकरीवरून डच्चू दिला गेला. नंतर त्याने दुसरी नोकरी धरली. पण निरीश्वर वादावर लेखन केल्याने त्याला तीही नोकरी गमवावी लागली. त्या काळात रशियात सुरू असलेल्या क्रांतिकारकांबद्दल त्याला सहानुभूती होती. पण त्याने प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. एका फ्रेंच सरदाराने पुष्कींनच्या पत्नीला आत्कृष्ट केलं अशी अफवा उठली होती.पुष्कीनला ते सहन झालं नाही. त्याने त्या सरदाराला द्वंदयुद्धाच आव्हान दिलं.या युद्धात पुष्किनला जखमी झाल्या. आणि त्यातून १० फेब्रुवारी १८३७ रोजी सेंट पीटसबर्ग येथे तो कालवश झाला.
पुश्किनने साहित्याच्या सर्व क्षेत्रात विपुल लिखाण केलं. रशियन भूतकाळ ,इतिहास, लोकसाहित्य ,लोकजीवन आदी विविध बाबींचा आपल्या साहित्यात वापर केला. परिणामी नवीन वाङ्मयीन परिभाषा तयार केली. रशियन साहित्यात त्याच्यामुळे नवीन नांदी सुरू झाली. नवे पर्व निर्माण करणारा पुष्कीन रशियाचा राष्ट्रीय कवी म्हणून ओळखला जातो. त्याच्या कवितेत तत्कालीन सामाजिक, राजकीय व्यवस्थेबद्दल चा असंतोष,उद्रेक होता. तर त्याच्या गद्य लेखनात त्या काळातील शेतकऱ्यांची अवस्था केंद्रस्थानी होती. द कॅप्टन्स डॉटर या त्याच्या लघुकादंबरीत १७७३ ते १७७५ या काळातील शेतकऱ्यांच्या उठावाचे चित्रण असून या पार्श्वभूमीवरच प्रेमाचेही चित्रण आहे. तर त्याच्या एका नाटकात रशियाच राष्ट्रप्रेम आणि लोकसमूह म्हणून भविष्यात भवितव्य काय असेल याची तो मांडणी करतो. त्याने पुरोगामी विचारांचा एक नियतकालिखी काढलेलं होतं. ते लोकप्रिय होते.
पुष्किनची रसलान अँड लुडमिला, द जिप्सिज, युजिन ओनेजिन, बोरीस गोंद्यनेव्ह, द टेल्स ऑफ बेलकिन, द क्वीन ऑफ स्पीड्स,
द प्रिझनर ऑफ द कॉकेशस,गॅब्रिएलियाड,रॉबर ब्रदर्स,द फाउंटन ऑफ बख्चिसराय,पोल्टावा,द लिटल हाऊस इन कोलोम्न,एंजेलो
1833 – मेदनी व्साडनिक (Медный всадник) ; इंग्रजी भाषांतर: ब्रॉन्झ हॉर्समन,ए फीस्ट इन टाइम ऑफ प्लेग अशी त्याची अनेक पुस्तके गाजली. द ब्रांझ हॉर्समन या त्याच्या दीर्घ कवितेत रशियाच्या ऐतिहासिक भवितव्य विषयी सखोल चिंतन केलेला आहे. त्यातील काही भाग आक्षेपार्ह ठरवून झारने त्याला वगळायला लावला. तर युजिन ओनेजिन या त्याच्या कादंबरीला रशियन साहित्यातील पहिली वास्तववादी कादंबरी मानले जाते. या कादंबरीतून पुष्कींनच्या सामाजिक ऐतिहासिक जाणिवेचा तात्विक आविष्कार झालेला दिसतो. त्याच्या साहित्यातून समकालीन वास्तवाला भिडण्याची तीव्र जाणीव दिसते. समाजाचे बहुअंगी, बहुरंगी चित्रण त्याच्या साहित्यात पानापानावर आढळत.
तसेच मी झारांचे मनोरंजन करण्यासाठी जन्माला आलेलो नाही./तुला समजून घेण्यासाठी मी तुझी अस्पष्ट भाषा शिकतो आहे./मी माझ्या सर्व इच्छा संपवलेले आहेत. माझ्या स्वप्नांपासून मी बाजूला झालो आहे. माझे दुःख एकटेच आहे. आणि माझे रिकामे हृदय तेजाने भरलेले आहे./ व्यवस्थेच्या निर्दयी वादळांनी माझ्या फुलांचे हार उध्वस्त केले आहेत. मला एकाकी उजाडपणाने घेरलेल आहे. मी अंताची वाट पाहतो आहे./ उघड्या झाडाच्या फांदीवर ऋतू ओसरलेलं पान अजूनही थरथरत असेल./ आपल्याला उंचावणारी फसवणूक ही अनेक नीच सत्यापेक्षा जास्त प्रिय असते./ माझ्या मनात पेटलेल्या ज्वाला मी विवेकाने विझवण्याचा प्रयत्न करतो हे तुला माहीत असते तर?/ मी इच्छांना गाडण्यासाठी आणि स्वप्नांना गंजलेले पाहण्यासाठीचजगलो आहे. आताही निष्फळ आग हृदयात उगीचच धुराचे लोट साठवते
/ आपल्या विश्वासाशी वचनबद्ध असलेला, बौद्धिक अलिप्ततेला दाबून टाकणारा, आणि भावनांच्या विलासात आराम करणारा माणूस खूप भाग्यवान असतो./ पुस्तकांच्या टोळीने भरलेले कपाट तो वाचत राहिला. त्यात काहीही अर्थपूर्ण नव्हते. भूतकाळातील पुस्तके जुनी झाली होती आणि वर्तुळातील पुस्तके भूतकाळात रमलेली होती./
नैराश्य अजूनही त्याच्यावर लक्ष ठेवून होते, आणि सावलीसारखे – किंवा विश्वासू पत्नीसारखे त्याचा पाठलाग करत होते./ज्याप्रमाणे भौतिक जगात दोन शरीरे एकच स्थान व्यापू शकतात त्याप्रमाणे नैतिक जगात दोन स्थिर कल्पना एकत्र राहू शकत नाहीत./ ज्याने आयुष्याची कादंबरी शेवटपर्यंत वाचली नाही तो भाग्यवान माणूस आहे. अशी अनेक विचार प्रवृत्त करणारी वाक्ये त्याच्या लेखनात सापडतात.
पुष्किन च्या साहित्यात प्रेम आणि सौंदर्य, सामाजिक न्याय ,स्वातंत्र्य, भाषा याबाबतची सखोल मांडणी आहे.घडलेला इतिहास आणि संभाव्य इतिहास याची गुंफण तो साहित्यात साध्या सोप्या शैलीत करत होता. माणसाच समाजातील स्थान काहीही असले तरी त्याच व्यक्तिमत्व व प्रतिष्ठा यांचा आदर राखायला हवा. हा मानवतावाद त्याने मांडला. पुष्किनच्या साहित्याची मोहिनी गोगोल, टॉलस्टॉय , चेखोव यासारख्या भल्याभल्यांना पडली. त्याला आणखी आयुष्य मिळाले असते तर त्याने आणखी सकस साहित्य निर्मिती केली असती यात शंका नाही.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा