कवी बी : सौंदर्यपूजक कवी 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

१ जून हा कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्मदिन. १ जून १८७२ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांचा जन्म झाला. आणि छिंदवाडा येथे ते त्यांचे जावई प्रधान यांच्याकडे रहात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच ते ३०ऑगस्ट १९४७ रोजी कालवश झाले.  त्यांच्या आई-वडिलांचे नाव राजू बाई उर्फ लक्ष्मीबाई आणि मुरलीधरपंत होते. या दाम्पत्याला पाच मुले व तीन मुली अशी आठ अपत्ये होती. यापैकी गजाननराव हे अध्यात्माकडे वळले आणि ‘ नाथपंथी संत गजानन महाराज ‘ या नावाने ते विख्यात झाले. (१५ ऑगस्ट १८९२ ते २४ सप्टेंबर १९४६ )ते नाशिक येथे वास्तव्याला होते. यशवंतराव महाराज मैदानावर त्यांची समाधी आहे.कवी बी यांचे वह्राडातच संपूर्ण आयुष्य व्यतीत झाले. मात्र त्यांचे घराणे मूळचे कुलाबा जिल्ह्यातील वाशी या गावचे होते. वाशी,पेण इत्यादी पाच सात गावांचे कुलकर्णी ते होते.त्यांचे शिक्षण यवतमाळ अमरावती येथे झाले. मात्र वडिलांच्या निधनामुळे व घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली. न्याय खात्यामध्ये ते कारकून म्हणून नोकरीला लागले. वाशिम ,मुर्तीजापुर ,अकोला इत्यादी गावात त्यांच्या बदल्या झाल्या. अर्थात अकोल्यातच ते दीर्घकाळ वास्तव्यास होते. ते स्वतःला अकोलेकरच मानत असत.नंतर त्यांनी वकिली सुरू केली. 

कवी बी हे स्वातंत्र्य आंदोलनाच्या कालखंडात लिहीत होते. मात्र स्वातंत्र्याची त्यांची कल्पना केवळ आपल्या देशाचे स्वातंत्र्य नाही. तर वैश्विक स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित आहे. जगाच्या पाठीवर एकही देश गुलामीत राहू नये ,पारतंत्र्यात खीतपत पडू नये ही त्यांची भूमिका होती .ते म्हणतात,

ते स्वातंत्र्य खरे न, फक्त अपुली जे तोडती बंधने 

अन्यांच्या पदश्रृंखलास बघते निष्कंप ऐशा मने,

या, त्या आपण वागवू  निजपदी त्यांच्यासवे प्रत्यही 

तोडू त्यास समग्र एक करुनी आकाश पाताळही….

कवी बी यांचा विवाह लहानपणीच वणीच्या मार्तंडराव प्रधान यांच्या मुलीशी झाला होता. मात्र ती लवकर निधन पावली. त्यामुळे त्यांचा दुसरा विवाह यवतमाळच्या गोविंदराव सुळे यांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी झाला. या दंपत्याला एक मुलगा व तीन कन्या होत्या. कवी बी यांच्या पत्नी लक्ष्मीबाई ११ एप्रिल १९३४ रोजी अकोला येथे अर्धांग वायूने कालवश झाल्या.कवी बी वयाच्या अठराव्या वर्षापासूनच कविता करू लागले. त्यांची ‘प्रणय पत्रिका’ ही कविता १८९१ साली ‘करमणूक ‘नियतकालिकात प्रकाशित झाली होती. नंतर काही काळ त्यांनी गद्य लेखनही केले. १९११  साली मनोरंजन मासिका मध्ये त्यांची ‘ वेडगाणे ‘ही कविता प्रकाशित झाली. ‘ बी ‘या टोपण नावाने प्रकाशित झालेल्या या कवितेपासून त्यांच्या कवितेकडे रसिकांचे लक्ष वेधले गेले. हे टोपण नाव त्यांना त्यांचे मित्र शंकर विठ्ठल दीक्षित यांनी सुचवले होते. आचार्य अत्रे म्हणाले होते ,’ते नावाने जरी बी असले तरी त्यांचे कर्तृत्व ए वन दर्जाचे आहे.’

चाफा बोलेना, चाफा चालेना 

चाफा खंत करी काही केल्या फुलेना !!

तसेच 

गाई पाण्यावर काय म्हणून आल्या 

का ग गंगायमुनाही या मिळाल्या ?

 उभयपितरांच्या चित्तचोरटीला 

कोण माझ्या बोलले गोरटीला ?

तसेच 

तेजाचे तारे तुटले मग मळेची सारी पिकले 

लागती दुहिच्या आगी राष्ट्राच्या संसाराला !

अति महामुर पूर येतो, ढोंग्यांच्या पवित्राला 

खडबडात उडवी जेव्हा कोरड्या विधींचा मेळा 

चरखात मान्यवर पीळती सामान्य मुकी जनता ती

 लटक्याला मोले येती कौटिल्य स्वैर बोकाळे

 तेजाचे तारे तुटले…!

यासारख्या त्यांच्या काही कविता प्रचंड लोकप्रिय ठरल्या.कविता आणि अध्यात्म हे त्यांच्या आवडीचे विषय होते. मराठी संस्कृती आणि इंग्रजी प्राचीन वांग्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता.एकांतात रमणारे कवी बी चिंतनशील मनोवृत्तीचे होते. ते निस्पृह आणि प्रसिद्धीपरांगमुख होते. ज्ञानेश्वर, मुक्तेश्वर, तुकाराम, कोलरिज,टेनिसन हे त्यांचे आवडते कवी होते. १९३४ साली ‘फुलांची ओंजळ ‘हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहात ३८ कविता आहेत. अर्थात त्यांच्या एकूण कवितांची संख्या केवळ एकोण पन्नास आहे. एवढ्या कमी कविता लिहूनही काव्य क्षेत्रात आपले नाव त्यांनी कोरून ठेवले आहे. त्यांच्या समग्र कवितेतच ‘ पिकले पान ‘ या सदरामध्ये अकरा कविता आहेत. त्याला वामन नारायण देशपांडे यांनी ‘ चार शब्द ‘लिहिलेले आहेत. ते म्हणतात, ‘बी हे केवढेही तत्त्वजिज्ञासू ,संस्कृतीप्रेमी असले तरी त्यांचा पिंड मुळात कवीचा होता.हे विसरता कामा नये. ते जन्मजात कवी होते. याचाच अर्थ ते अभिजात रसिक होते.त्यांची ही रसिकता आठवण, प्रीती ,रूप मुग्धा  या कवितातून निदर्शनास येते. अखेरच्या कवितेत त्यांनी एका मुग्धेच्या नारीतत्त्वाचा पूर्णोदय वर्णिला आहे. पंच्याहत्तरीतील कवीला अशा विषयाची गोडी वाटावी यावरून त्यांची बावन्नकशी रसिकताच व्यक्त होत नाही काय.?’

समग्र कवितेच्या  पहिल्या पृष्ठावर म्हटले आहे,’केशवसुतांच्या पिढीतील मोजक्या कवीश्रेष्ठांपैकी एक म्हणून मराठी कवितेत ‘बी ‘यांचे नाव कायमचे कोरले गेले आहे. त्यांचा चाफा, डंका आणि त्यांची क्रांतिकारी तीव्र जाणीव आज मराठी संस्कृतीच्या संचिताचा मौल्यवान भाग झाले आहेत. आंग्ल रोमँटिक कवितेतील भाववृत्तीचा सहर्ष स्वीकार करणारी परंतु भारदस्त व परिपक्व संस्कृत साहित्यातील हवे ते न सोडणारी त्यांची कविता वाचकांना प्रतिभेची कलमी वेलीच वाटत आलेली आहे. ‘ भावी भारत भाग्यसूचक महाचिन्हांची ‘ स्वप्ने पाहणारी त्यांची कविता सोन्याच्या साखळ्या पायात घालून संगमरवरी जिन्यावरून उतरणाऱ्या एखाद्या मराठा राजघराण्यातील तेजस्वी राजकन्येप्रमाणे आकर्षक वाटल्यास आजही नवल वाटण्याचे कारण नाही.’

बी कवींची समग्र कविता : फुलांची ओंजळ या संग्रहाला आचार्य अत्रे यांची ‘ सत्कार ‘ या शीर्षकाची ३९ पृष्ठांची प्रस्तावना आहे. त्यामध्ये आचार्य अत्रे यांनी कवी बी, त्यांच्या कविता,त्यांचे योगदान, त्यांच्याकडे झालेली डोळेझाक, त्याकाळचे वांग्मयीन वातावरण याची विस्ताराने चर्चा केली आहे. अत्रे लिहितात, ‘ लोकप्रिय रहदारीचा मार्ग बी यांनी अनुसरला नाही. म्हणून टीकाकारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.त्यांना फारसेच काय पण कोणीही अनुयायी अगर शिष्य न मिळाल्यामुळे आणि त्यांच्या स्वतंत्र पंथ अगर परंपरा निघणे शक्य नसल्यामुळे चव्हाट्यावरच्या गाजावाजाचा लाभ त्यांना झाला नाही.’

आचार्य अत्रे यांनी सत्कारात पुढे म्हटले आहे, आयुष्याचे रहस्य ज्यामुळे कळेल व प्रगतीचा मार्ग दिसेल असे जीवनात अत्यंत उपयुक्त असलेले तत्वज्ञान बी कवींच्या काव्यात भरलेले आहे. जीवनाची मिमांसा ज्यात केलेली आहे ते खरे काव्य अशी जर काव्याची व्याख्या केली तर त्या व्याख्येच्या कसोटीला बी यांचे काव्य उत्कृष्ट रीतीने उतरल्याखेरीज राहणार नाही…… हस्तीदंताच्या एका लहानशा तुकड्यावर बारीक हत्यारांच्या टोकाने दिवसचे दिवस सूक्ष्म नक्षीकाम कोरीत बसणाऱ्या एखाद्या नादी कलावंताप्रमाणे आपल्या कवितेची रचना सर्वांग सुंदर कशी करावी या निदिध्यासात बी कवींचे महिनेचे महिने जात असावेत असे वाटते. त्यामुळे त्यांच्या हातून विपुल कविता निर्मिती होऊ शकली नाही.कारखानदारापेक्षा कारागिराची कीर्ती अधिक चिरस्थायी असते. किंवा गावोगावी धर्मशाळा आणि डाकबंगले बांधणाऱ्या पीडब्ल्यूडी पेक्षा एकच ताजमहल बांधणाऱ्या शहाजानचा लौकिक अधिक काळ टिकेल हे सांगण्यास ज्योतिषाची जरुरी नाही….. बी यांच्या काव्यात विषय ,विचार व भाषा यांचे ऐश्वर्य व वैभव पाहायला मिळत असल्याने त्यांच्या सौंदर्यात साधेपणा पेक्षा भव्यता व उदात्तता हेच गुण मनाला विशेष पटतात…. अखेर बी कवींच्या मनोहरिणी कवितेचे त्यांच्याच शब्दात असे वर्णन करता येईल,

पदन्यास लावण्यप्रांती ही करिते रमणी 

तारा मंडित निरभ्रांबरी जशी रम्य रजनी!

शुभ्र कृष्ण वर्णातील सारी मोहकता आली 

नेत्री गात्री एके पात्री हृदयांगम मेळी !!

कवी बी या सौंदर्य पूजकाला विनम्र अभिवादन….!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया