व्होल्टेअर : क्रांतीचे विचार पेरणारा थोर प्रबोधक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

३० मे हा ख्यातनाम फ्रेंच साहित्यिक व विचारवंत व्होल्टेअर याचा स्मृतिदिन. त्याचे खरे नाव फ्रान्सोइस-मॅरी अरोएट असे होते.तो पॅरिसमध्ये २१ नोव्हेंबर १६९४ रोजी जन्मला आणि ३० मे १७७८ रोजी कालवश झाला. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रेरणास्त्रोत, थोर साहित्यिक,इतिहासतज्ञ म्हणून त्यांने फार मोठी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच त्याच्या निधनाला अडीचशे वर्ष होत आली तरीही त्याच्या विचारांचे महत्त्व मोठे आहे. आजच्या राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक ,धार्मिक उन्मादी परिस्थितीत व्होल्टेअरचे विचार महत्वाचे आहेत. प्रबोधन चळवळीतील एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्याचे मोठे काम आहे. 

व्हॉल्टेअर मानवी स्वातंत्र्याचा मुक्तीदाता होता. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांच्या अन्यायाविरुद्ध सामान्य माणसाला जागे करून मानवाचे स्वातंत्र्य, समता आणि सहिष्णुता या मूल्यांना त्याने सक्रिय समर्थन दिले.पारंपारिक धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानापेक्षा स्वतःचे विचार,कार्य आणि आत्मविश्वास यावर त्याची जास्त श्रद्धा होती. त्यासाठी तो अखंड कार्यरत होता.काही न करता रिकामे बसणे आणि मरणे या दोन्ही गोष्टी समान आहेत असे तो मानत असे.तो म्हणतो,’आळशी लोकांशिवाय सर्व लोक चांगले आहेत.या जगातील जीवन सुसह्य व्हायचे असेल तर आपले जीवन सतत कार्यरत ठेवले पाहिजे.मोठ्यातले मोठे सुख म्हणजे कार्यरत राहणे .कारण ते जीवनातील भ्रमांची जागा घेत असते.’ म्हणूनच त्याचे सहकारी म्हणत असावेत,’ व्होल्टेअर एकाच गोष्टीची काटकसर करायचा ती म्हणजे आपल्या वेळेची.’ व्होल्टेअर रागाचे विनोदात रूपांतर करू शकत असे आणि आगीला प्रकाश बनवण्याची ताकद त्याच्या शब्दात होती.

कोणत्याही लेखकाने आपल्या हयातीत इतका परिणाम घडवून आणला नसेल एवढा व्होल्टेअरने आपल्या कारकिर्दीत घडवून आणला. त्याच्या कविता, महाकाव्य, नाटके, कथासंग्रह ,कादंबऱ्या ,निबंध अशा समग्र लेखनातून मूलभूत स्वरूपाच्या विचारांची शेकडो अवतरणे काढता येतील. त्याच्या कवितेतील, कथेतील ,नाटकातील, कादंबरीतील पात्रांच्या संवादातून तो अत्यंत महत्त्वाचे विचार मांडत असतो. उदाहरणार्थ , लेखणी हाती घेणे म्हणजे युद्धात उतरणे./प्रत्येक माणूस त्याने न केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी दोषी आहे./माणूस ज्या क्षणी मुक्त होऊ इच्छितो त्या क्षणी तो मुक्त असतो./आपण जिवंत लोकांबद्दल विचारशील असले पाहिजे./मी नेहमीच देवाला एकच प्रार्थना करायचो तीही अगदी लहानशी की,हे प्रभू, आमच्या शत्रूंना खूपच हास्यास्पद बनव आणि देवाने ती ऐकली. /काही सत्ये सर्व लोकांसाठी नाहीत आणि सर्व काळासाठी नाहीत./आपल्या या छोट्याशा जगात प्लेग किंवा भूकंपांपेक्षाही मतांमुळे जास्त आजार निर्माण झाले आहेत./जर देव अस्तित्वात नसता तर त्याचा शोध लावणे आवश्यक होते./स्वतःच्या समर्थनामुळे सदगुणांचे अवमूल्यन होते./जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वजण एकाच धर्माचे असतात./जेव्हा बोलण्यासाठी काहीच नसते तेव्हा माणूस नेहमीच वाईट बोलतो./राष्ट्रात एकच धर्म असेल तर हुकूमशाहीचा धोकाअसतो ,जर दोन धर्म असतील तर ते एकमेकांचे गळे कापू पाहतील पण जर अनेक धर्म असतील तर आनंद व शांतता नांदेल ./कौमार्य हा एक सद्गुण असू शकतो अशी कल्पना करणे ही मानवी मनाच्या अंधश्रद्धांपैकी एक आहे./देवाला प्रार्थना करणे म्हणजे स्वतःची खुशामत करणे आहे की शब्दांनी निसर्ग बदलता येतो./जर देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले असेल, तर आपण त्याला त्याची कृपा परत दिली आहे. अशी अनेक विचार वाक्ये सांगता येतील.

पुस्तके जगावर सत्ता चालवतात किंवा ज्यांना लेखी भाषा आहे ती राष्ट्रे जगावर सत्ता चालवतात ही त्याची भूमिका होती.मला जे सांगायचे असते ते मी स्वच्छपणे सांगतो.मी एखाद्या लहान झऱ्याप्रमाणे आहे .ते नितळ व पारदर्शक असतात,कारण ते फार खोल नसतात .असे म्हणणाऱ्या व्होल्टेअरला आपण लोकांना आपल्या लेखणीने व वाणीने अधिक सुसंस्कृत करू याची खात्री होती.व्हॉल्टेअरचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्याने नागरी स्वातंत्र्याचे आणि धार्मिक सहनशीलतेचे समर्थन केले.त्याने फ्रेंच समाजात रूढ असलेल्या विषम व्यवस्थेवर टीका केली आणि सामाजिक आणि राजकीय सुधारणांची मागणी केली. त्याने इतिहासाशी मानवी विचार, समाजशास्त्र आणि तत्वज्ञान यांना जोडून घेतले. त्याच्या विचारांनी प्रबोधन युगाला चालना व चेतना दिली. लोकांमध्ये नवा विचार ,नव्या कल्पना ,नवे प्रश्न त्यांनी निर्माण केले.

व्होल्टेअरचे वडील नोटरी होते. त्याची आई एका प्रतिष्ठित घराण्यातील सुसंस्कृत होती.तो पॅरिस मध्ये शिकत असताना साहित्याकडे आणि रंगभूमीकडे वळला. लेखनही करू लागला. तरुणपणी म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी एका उपरोधात्मक लिहिलेल्या कवितेसाठी त्याला एक वर्ष तुरुंगवासही झाला होता. या तुरुंगवासातच त्याने एक नाटक लिहिले. इडिपस असे त्याचे नाव होते. हे नाटक अतिशय गाजले. त्यानंतर त्याने व्होल्टेअर हे नाव धारण केले व त्याच नावाने तो ओळखला जाऊ लागला. धर्मसत्तेने व राजसत्तेने त्याच्या लिखाणाला जो विरोध केला त्यातूनही त्याने हे नाव धारण केले असेही मानले जाते.पुढे आणखी एका प्रकरणात त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. फ्रान्स सोडून जाण्याचे अटीवर त्याची सुटका झाली आणि

व्होल्टेअर इंग्लंडला गेला. व्हॉल्टेअरच्या शिक्षकांनी त्याला संशयवाद व वादपद्धतीचे शिक्षण दिले होते. वाद पद्धती म्हणजे काहीही सिद्ध करण्याची कला आणि कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय. यात तो वाकबगार होता.व्होल्टेअर म्हणतो, जगात फक्त ढोंगी लोकांना सदैव खात्री वाटत असते. त्यांना शंका नसते ते नि:शंक असतात.

इंग्लंडमध्ये  त्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले शेक्सपियरच्या नाटकांचा अभ्यास केला. फ्रेंच भाषेत त्याच्या काही नाटकांचा अनुवादही केला. तेथील साहित्यिक व विचारवंतांच्या वर्तुळात तो रमला. तेथे त्याने इंग्लंडचा राजा चौथा हेन्री याला नायक केलेले अंरीयाद हे महाकाव्य लिहिले. न्यूटन, जॉन लॉक इत्यादी विचारवंताचा त्याच्यावर प्रभाव होता.लॉक हा इंग्लिश तत्त्वज्ञ आणि व्यवसायाने डॉक्टर होता.’राजा हा देवाचा प्रतिनिधी आहे या विचाराचा लॉकने प्रतिवाद केला. समाजातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा, स्वातंत्र्यांचा आणि संपत्तीचा हक्क आहे. हा हक्क जो राजा मान्य करणार नाही, त्याला गादीवरून दूर केलं पाहिजे असे लॉकचे मत होते.तर न्यूटन बद्दल व्हॉल्टेअरआदराने म्हणतो हिंसेच्या बळापेक्षा सत्याचे सामर्थ्य जो आपल्याला दाखवून देतो, तो आदरणीय ठरतो. न्यूटन  असा होता.”न्यूटनचा वैज्ञानिक दृष्टिकोन  फ्रान्समध्ये त्याने रुजवला.सफरचंदाचं फळ झाडावरून खाली पडताना पाहून न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सुचला हा किस्सा त्यानेच लोकप्रिय केला होता.

इंग्लंड मध्ये तीन वर्षे राहून तो पुन्हा फ्रान्समध्ये आला. त्याने कँडीड, लेटर्स ऑफ फिलॉसॉफी, द मेड ऑफ अर्लींस ,द फिलोसॉफिकल डिक्शनरी, टॉलरन्स अँड आदर ऐसेज, द बुक ऑफ फेथ, मायक्रोमेगास, द हिस्टरी ऑफ पीटर द ग्रेट लेटर्स कन्सर्निंग द इंग्लिश नेशन, मेरोप, माहोमेड,अशी असंख्य पुस्तके लिहिली. लेखन, भाषण आणि संभाषण यात त्याने आयुष्यभर स्वतःला गुंतवून घेतले.तो म्हणतो,’राजकारण हा माझा मार्ग नाही.ती माझी वृत्तीही नाही. माणसे कमीत कमी मूर्ख व्हावीत आणि अधिक स्वाभिमानी व नीट वागणारी व्हावीत यासाठी मला जे काही थोडे करता येईल ते मी करत असतो. या लहानशा कामात मी स्वतःहून पडलेलो आहे.आणि स्वतःला या मर्यादित क्षेत्रात गुंतून घेतलेले आहे.त्याने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा , व्यापार , आर्थिक व्यवस्था , शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला . त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. एका अर्थाने व्हॉल्टेअरने आधुनिक इतिहासलेखनाचा नवा सिद्धांत मांडला. प्रचंड स्वरूपाचे लेखन करूनही त्याचे लेखन पाल्हाळीक वाटत नाही तर ते रेखीव व संक्षेपी आहे.

व्होल्टेअर म्हणतो, फक्त तत्त्वज्ञानीच इतिहास लिहावा. सर्व राष्ट्रातून इतिहास काल्पनिक गोष्टींनी, दंतकथांनी विकृत केला जातो. शेवटी तत्वज्ञान येते व माणसाला प्रकाश देते. पंथ उजळायला ते येते. या अंधारात तत्वज्ञान जेव्हा आपला दीप घेऊन येते त्यावेळी त्याला काय दिसते ? शतकानुशतके मानवी मन आंधळे केलेले त्याला दिसते. तत्वज्ञानालाही या मनाची फसवणूक न करणे कठीण जाते. समारंभ, स्मारके, हकीकती ,घडामोडी यांचे असत्याला सिद्ध करण्यासाठी एकावर एक रचलेले ढीग तत्त्वज्ञानाला दिसतात…. इतिहास हा जणू आपण मृतांच्या विषयी खेळलेल्या हात चलाखीचा गठ्ठा असतो. इतिहास म्हणजे हातचलाखी आहे. हा हातचलाखीचा खेळ मृतांबाबत आपण खेळतो….. आपल्या ज्या भविष्यकालीन आशा आकांक्षा असतात त्याला अनुरूप असे स्वरूप भूतकाळाला आपण देतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की इतिहासाने काहीही सिद्ध करता येईल हे इतिहास सिद्ध करतो.”

इतिहासातील आधुनिक तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्याचे मोठे काम आपल्या ग्रंथातून व्होल्टेअरने केले . इतिहास म्हणजे राजे , राण्या,राजवाडे, युद्धे नव्हे तर इतिहास म्हणजे समाज, संस्कृती, माणूस, मानवी मन ही भूमिका घेऊन त्याने लेखन केले. इतिहास ही रानटी अवस्थेकडून संस्कृतीकडे झालेल्या वाटचालीची कारणे आहे असे त्याचे मत होते. तो म्हणतो,मानवी मनाचा इतिहास लिहिणे हे माझे ध्येय आहे .माणसे आपल्या घरात कुटुंबात कशी राहतात हे मला समजून घ्यायचे आहे .ते सर्व मिळून कोणत्या कलांचा आणि कसा विकास करत होते हेही मला जाणून घ्यायचे आहे. युद्ध म्हणजे सर्व गुन्ह्यातील भयंकर गुन्हा आहे. परंतु आक्रमण करणारा प्रत्येकजण या गुन्ह्याला न्यायाची रंगरंगोटी देत असतो.१७२९ साली व्होल्टेअरने सरकारी लॉटरीची तिकिटे मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यातून त्याला प्रचंड पैसे मिळाले होते. पण त्याच्या या कृतीचा सरकारला प्रचंड रागही आलेला होता. तो मनात असेल ते बोलत व करत असे. त्यामुळे अनेकांना त्याचा राग ही येत असे व अनेकांना त्याचा आदरही वाटत असे. एकदा एका उमरावाचा त्याने अपमान केला होता. त्या उमरावाने गुंडांना त्याला मारहाण करायला सांगितले. हे सांगताना उमराव म्हणाला, कृपा करून त्याच्या डोक्याला इजा करू नका. कारण त्याच्या डोक्यातून कधी कोणती कल्पना येईल हे सांगता येत नाही. त्याचे डोके फार महत्त्वाचे आहे. तर व्होल्टेअरने एका भांडणात एका व्यक्तीला थप्पड मारली होती. त्यामुळे ती व्यक्ती येऊन हमरी तुमरीवर येऊन भांडू लागली. त्यावेळी व्होल्टेअरचा सहकारी त्याला म्हणाला ,तू जगातील सर्वात मोठ्या व बुद्धिमान व्यक्तीकडून थप्पड खाल्ली आहेस. हे ऐकल्यावर ती व्यक्तीही शांत झाली.

व्होल्टेअर तत्त्वज्ञानाचा व्यासंगी होता. सर्व बौद्धिक शक्ती सामाजिक प्रगतीसाठी वापरली पाहिजे हा मुद्दा त्यांने आग्रहाने प्रतिपादित केला. प्रस्थापित व्यवस्था व विचारधारेवर टीका असल्यामुळे त्याच्या काही ग्रंथांवर फ्रान्समध्ये बंदी घालण्यात आली. त्याच्या अटकेसाठी वॉरंटही निघाले. तेव्हा १७३४ साली व्होल्टेअरला मादाम चॅटलेट या विद्वान स्त्रीने आपल्या घरी आश्रय दिला. ती गणितज्ञ,विचारवंत, लेखिका ,अनुवादक होती.ती १७६९ साली मृत्यू पावली. तोपर्यंत व्होल्टेअर तिच्यासह पंधरा वर्षे राहिला. ती व्होल्टेअरला फ्रान्सचा सर्वोत्तम अलंकार आहे असे म्हणत असे.हा पंधरा वर्षाचा कालखंड त्याच्या जीवनातील वैचारिक आदान प्रदान आणि व्यासंग समृद्धीचा होता. या काळात त्याचे तत्त्वज्ञानावरील, इतिहासावरील ग्रंथ प्रकाशित झाले. 

आपल्या लेखनातून तो नेहमीच धार्मिक सहिष्णुता ,भौतिक प्रगती, मानवी हक्क, मानवतावाद यासाठी भूमिका मांडत राहिला.बुद्धिनिष्ठ विज्ञानवादी असलेल्या व्होल्टेअरने  युरोपीय संस्कृतीला एक वेगळा विचार देण्याचे महत्त्वाचे काम त्याने केले. धर्मश्रद्धा डोळस असली पाहिजे या भूमिकेतून त्याने ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या कारभारातील भ्रष्टतेवर कोरडे ओढले. धर्माच्या नावावर चाललेल्या पिळवणुकी विरोधात  आवाज उठवला. धर्मात घुसडलेल्या अंधश्रद्धा आणि धर्मगुरु म्हणवून घेणाऱ्यांचे पापाचरण यावर त्यांने कठोर टीका केली.देव  कधीही लोकांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करणारा, दुष्टपणाला शिक्षा करणारा, भक्तांचे रक्षण करणारा, सर्वज्ञ, सर्वनियंत्रक व दयाळू असत नाही. देव एकच आहे आणि तो त्याने एकदा निर्माण केलेल्या सुष्टीत ढवळा ढवळ करत नाही असे त्याचे मत होते.व्होल्टेअरने आर्थिक विचारांचीही मांडणी केली. चलन व्यवस्था ,मुक्त व्यापार अशा अनेक  बाबींना त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाची जोड मिळाली. 

व्होल्टेअरबद्दल नामवंत विचारवंत मोर्ले  यांनी म्हटले आहे ‘ स्वतःच्या जीवनाने सारे युग व्यापले. याचे कारण काय तर तो स्वतः पूर्णपणे जिवंत होता’.तर व्हिक्टर ह्युगो म्हणतो ‘त्याचे दुसरे नाव म्हणजे संपूर्ण अठरावे शतक. इटलीत नवयुग आले ,जर्मनीत धार्मिक क्रांती झाली परंतु फ्रान्सला व्होल्टेअर मिळाला. तो फ्रान्समध्ये नवयुग होता ,धर्म सुधारक होता आणि आर्थिक क्रांतीही होता.’आणि लँमटाईन म्हणतो,’ माणसाने काय केले यावरून जर त्याची परीक्षा करायची असेल तर व्होल्टेअर हा अर्वाचीन काळातील सर्वात मोठा लेखक आहे. आपल्या काळाशी झगडायला त्याला भरपूर काळ मिळाला. आणि जेव्हा तो पडला तेव्हा तो विजयी जेता होता’. निच्छे म्हणाला, व्होल्टेअरने सत्याचा मार्ग जोमदारपणे अखला होता. त्यामुळे सारे राजे, महाराजे धर्मगुरू, त्याच्यासमोर रुंजी घालू लागले. सिंहासने त्याच्या पुढे डळमळू लागली. त्याचा प्रत्येक शब्द ऐकायला मिळावा म्हणून निम्मी दुनिया कान टवकारून बसे. ते युग असे होते की कोणीतरी प्रचंड पाडापाडी करणारा पाहिजे होता. हसणारे सिंह यायला हवे होते तसा एक आला.

व्होल्टेअरने हसत हसत नाश केला.’ अर्थात तो विचारवंत होताच पण मिश्किल स्वभावाचाही होता.  कारण एके ठिकाणी तो म्हणतो,’निसर्गाने आपल्याला जर थोडेसे छचोर बनवले नसते, थोडे फुलपाखरी बनवले नसते तर आपण फारच दुःखी आणि दळभद्री झालो असतो. आपण निदान काही वेळ छचोर बनू शकतो ,गंमत जंमत करण्यात रमू शकतो. म्हणून तर बहुसंख्य लोक जगू शकतात.सततच्या.गांभीर्याला मी एक प्रकारचा रोग समजतो.’

जगप्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ विल ड्युरंट यांनी १९२६ साली’ द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी ‘ हा हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला होता. या सहाशे पानी मूळ इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद साने गुरुजींनी १९४१ मध्ये तुरुंगात असताना अवघ्या दीड महिन्यात ‘पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी’या नावाने केला होता. ते हस्तलिखिताचे बाड अनेक वर्षे पडून होते. त्याचे संपादन डॉ. ग.ना.जोशी यांनी करून साने गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजे १९९९ साली हा महत्त्वाचा ग्रंथ साकार केला. तो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या सहकार्याने अमळनेरच्या चेतश्री प्रकाशनने प्रकाशित केला आहे. या ग्रंथात व्होल्टेअरच्या व्यक्तिमत्वाबाबत विल ड्युरंट म्हणतात,” व्होल्टेअरला पाहताच अनुकूल ग्रह होत नसे. तो कुरूप होता, गर्विष्ठ, चेष्टेखोर ,अश्लील होता.त्याला कशाचाही विधीनिषेध वाटत नसे. तो काही वेळा अप्रामाणिकही असे. त्याच्या काळातील व त्याच्या देशातील सारे दोष त्याच्याजवळ होते. एखादाही दुर्गुण कमी नसे.परंतु हाच 

व्होल्टेअर परोपकार करायला कंटाळत नाही. दया दाखवताना दमत नाही. तो विचारी आहे.त्याला उत्साह शक्ती उदंड आहे. व ती तो का कू न करता ,काटकसर न करता खर्च करीत असे. त्याची पैशाची पिशवी सदैव खुली असे.मित्रांना मदत करण्यात जितका तत्पर तितकाच प्रतिस्पर्ध्याला चिरडण्यातही  निर्दयी असे .लेखणीच्या एका फटकार्‍याने तो मारू शके. परंतु मिळते जुळते घेण्यास, कोणी पुढे येताच तो एकदम सारे मतभेद विसरे. असा हा परस्पर विरोधी गुणांचा मनुष्य होता .गुणदोषांचा मूर्तीमंत पुतळा होता. परंतु हे सारे वाईट वा चांगले गुण म्हणजे काही व्होल्टेअरचे अंतरंग नव्हे. हे गुण दुय्यम महत्त्वाचे. त्याच्या जीवनातील प्रधान शक्ती, प्राणमय तत्व म्हणजे हे गुण दोष नव्हे. त्याच्यातील आश्चर्यकारक व मूलभूत वस्तू म्हणजे त्याचा अत्यंत सुपीक मेंदू .त्याच्या सुपीकपणाला सीमा नव्हती. त्याचा मेंदू तल्लख होता .तेजस्वी होता. त्याची विचारप्रसवशक्ती अत्यंत प्रगल्भ व अनंत होती. त्याच्या लिखाणाने ९९ ग्रंथ साकारले.त्याच्या प्रत्येक पानात चमक आहे. प्रत्येक पान फलदायी आहे. आणि जगातील सारे विषय त्यात आहेत.अमुक एका विषयावर येथे विचार नाहीत असे होणार नाही.हा ९९ भागी ज्ञानकोश आहे असे म्हणावे लागेल. येथे या विषयावर लिहील तर क्षणात दुसऱ्या.लहर लागेल त्याप्रमाणे तो शूरवीर सर्व दुनियेतला विषयांचा समाचार घेत हिंडत असे. ज्याचा मी विचार करतो ते सांगणे हा माझा धंदा आहे असे तो म्हणे.आणि तो ज्याचा विचार करी ते सांगण्यासारखे असे.आणि तो जे सांगेल ते अनुपम रीतीने सांगत असे .”

अखेरची वीस वर्षे तो स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ फेर्ने या गावी स्थायिक झाला.लिखाणातून आणि इतर मार्गाने मिळालेल्या प्रचंड संपत्तीतून त्याने फेर्ने येथे मोठे घर आणि मोठी जमीन विकत घेतली. तो अतिशय वैभवात राहिला. निसर्गसान्निध्यात त्याच्या लेखणीला बहर आला.

तेथे त्याच्याकडे जगभरातून सर्व क्षेत्रातील लोक येत असत.

एका अर्थाने हे गाव जगाची बौद्धिक राजधानी बनली होती. अनेक लोक राहायला जेवायला असत.व्होल्टेअर एकदा म्हणाला होता, आता मी संपूर्ण युरोपचा हॉटेलवाला झालो आहे…. माझ्या शत्रूंपासूनच मी स्वतःची काळजी घेईन पण माझ्या मित्रांपासून ईश्वर आणि माझी काळजी घ्यावी.

विल ड्युरेंट ने म्हटले होते, सधन मध्यमवर्गाने व्होल्टेअरचा बुद्धिवाद आणि रुसोचा निसर्गवाद यांना पाठिंबा दिला होता. ती महान क्रांती येण्याआधी जुनाट रुढी खिळखिळ्या करणे जरूर होते.जुन्या चालीरीतींचे महत्त्व कमी करणे आवश्यक होते. भावना व विचार यांच्यात चैतन्य ओतण्याची ,तीव्रता ओतण्याची जरूर होती. प्रयोग व बदल यासाठी मन उघडणे आवश्यक होते. रुसो ,व्होल्टेअर ही क्रांतीची कारणे होते असे नव्हे. कदाचित ज्या शक्तीतून क्रांती जन्मली त्या शक्ती तूनच तेही निर्माण झाले. फ्रेंच जीवनाच्या पृष्ठभागाखाली जे राजकीय व सामाजिक शक्तीप्रवाह उकळत होते ,खळबळत होते त्यातून हे दोघे उदयास आले.ज्वालामुखीतील जी प्रचंड आग बाहेर पडली, तो जो प्रचंड वणवा पेटला त्याबरोबरच असणारे प्रकाश व दिव्यता म्हणजे हे दोघे पुरुष .बुद्धीचे इच्छेशी जे नाते ते तत्त्वज्ञानाचे इतिहासाशी असते. दोहोतही खालची आंधळी, जाणीवहीन प्रक्रिया वरच्या वैचारिक जाणीवेला आकार देते. वरचे विचार जाणीवपूर्वक खालच्या जाणीव खळबळीतून जन्मतात. त्यातून त्या विचारास आकार , रंगरूप, दिशा मिळतात.

१७७० मध्ये व्होल्टेअरच्या काही मित्रांनी व समर्थकांनी त्याचा अर्ध पुतळा उभारण्याचे ठरवले. त्यासाठी हजारो लोक देणग्या द्यायला तयार झाले. पण व्हॉल्टेअरने आता आपण वृद्ध झालो आहे, आपली सर्व रया गेली आहे असे सांगून त्याला विरोध केला. तेव्हा त्याचा एक स्नेही म्हणाला, अलौकिक पुरुषाजवळ सदैव एक अशी मुद्रा असते जी अलौकिक पुरुष सहज ओळखील. अखेरच्या काळात त्याला पुन्हा पॅरिसला जायची इच्छा झाली. आणि तो वयाच्या ८३ व्या वर्षी तो पुन्हा पॅरिसला आला. आल्यावर तो आपल्या मित्राला म्हणाला, तुला येऊन भेटण्यासाठी मी माझे मरण जरा दूर केले आहे..व्होल्टेअरने आयुष्यभर बुद्धीप्रामाण्यवादाची कास , स्वातंत्र्याची आस बाळगलेली होती. तो ३० मे १७७८ रोजी कालवश झाला तेव्हा ख्रिश्चन धर्मा प्रमाणे त्याच्या अंत्यविधीला विरोध करण्यात आला. तेव्हा त्याच्या मित्रांनी  तो जिवंतच आहे असे सांगून त्याचे शव गाडीत घातले. सेलिरिस येथे त्यांना एक पाद्री भेटला. हा  व्होल्टेअरचे महत्व जाणून होता. ‘ सारे विधीनियम सामान्यांसाठी असतात असामान्यांसाठी नसतात ‘असे म्हणून त्याने तेथील स्मशानभूमीत त्याच्या देहाचे दफन करायला संमती दिली. मृत्यूपूर्वी तीन महिने म्हणजे २८ फेब्रुवारी १७७८ रोजी त्याने चिठ्ठी आपल्या सहकार्याकडे लिहून दिली होती.त्यात लिहिले होते,”ईश्वराची पूजा व प्रार्थना करीत,माझ्या स्नेहीजनांवर प्रेम करीत, माझ्या शत्रूंचा द्वेष न करता मी चुकीच्या रूढी परंपरांचा तीव्र अधिकार करत मृत्यूकडे जात आहे.”

पुढे तेरा वर्षांनी म्हणजे १७९१ साली क्रांतीच्या नॅशनल असेंबलीने व्होल्टेअरच्या अस्थी पॅरिस मध्ये आणायला सोळाव्या लुईला भाग पाडले. तेव्हा त्याच्या अस्थीकलश यात्रेत पॅरिसमध्ये एक लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते आणि रस्त्याच्या दुतर्फा सहा लाख लोक होते. त्याच्या अस्थीरथावर लिहिले होते “मानवी मनाला त्याने जोराने चालना दिली. स्वातंत्र्यासाठी त्याने आम्हाला तयार केले.” व्होल्टेअरने एके ठिकाणी लिहिले होते ,” मी जे जे पाहतो तेथे क्रांतीची बीजे सर्वत्र पेरीत आहे असे मला दिसत आहे. ही क्रांती आज ना उद्या आल्याशिवाय राहणार नाही. परंतु ती क्रांती पाहण्याचे माझ्या नशिबात नाही. ते सुख मला मिळणार नाही. फ्रेंच लोक उशिरा जागे होतात, परंतु शेवटी एकदाचे जागे होतात. अशा रीतीने शेजाऱ्यापासून शेजाऱ्याला प्रकाश मिळत जाईल. पहिल्या प्रसंगी नेत्रदीपक स्फोट होईल आणि मग क्वचितच अस्थिरता माजेल. तरुण पिढीला नव्या नव्या गोष्टी पाहायला मिळतील आणि ते भाग्यवान ठरतील…..एकदा राष्ट्र विचार करू लागले की त्याला थांबवणे कठीण असते.”त्याच्या लेखनातून  राजेशाही अंताकडे जाऊन लोकशाहीचे प्रस्थापनेचा विचार रुजू लागला. बहुसंख्यांकांच्या मदतीने राज्याचे धोरण ठरवणे आणि सार्वमताने राज्यसंस्थेला मार्गदर्शन करणे त्याला महत्त्वाचे वाटत होते. आणि त्याच्या मृत्यूनंतर अकरा वर्षांनी फ्रेंच राज्यक्रांती झाली.रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. पण त्याचबरोबर जॉन लॉक, मॉन्टेस्क्यू ,व्होल्टेअर यांच्या विचारांचा  फ्रेंच राज्यक्रांतीवर मोठा प्रभाव होता. मानवी स्वातंत्र्याला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या व्होल्टेअरला त्याच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन… !

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया