प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
२५ मे हा दिवस अमेरिकेत वैचारिक क्रांती घडवून आणणारा ख्यातनाम कवी राल्फ वाल्डो इमर्सन याचा जन्मदिन. २५ मे १८०३ रोजी तो बोस्टन येथे जन्मला आणिआजरामर कामगिरी करून २७ एप्रिल १८८२ रोजी कॉन्कोड येथे कालवश झाला. तो एक तत्त्वचिंतक बुद्धीवादी कवी होता. पुढील शतकामध्ये मानवी समाजासमोर जे प्रश्न उभे ठाकतील त्या प्रश्नांची सोडवणूक करणारे विचार मांडण्याचे द्रष्टेपण त्याच्याकडे होते. त्याचा जन्म चर्चमध्ये अधिकारी असलेल्या कुटुंबामध्ये झाला. शिक्षण झाल्यावर तो स्वतःही चर्च मिनिस्टर झाला. पण वयाच्या तिशीतच त्याने राजीनामा दिला. याचे कारण चर्चेचे पारंपारिक नियम व्यक्तीचे स्वातंत्र्य बाधित करतात असे त्याचे मत बनले. वास्तविक ख्रिश्चन तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे ईश्वराचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे .पण त्या ऐवजी सर्व समाजाला कर्मकांडात व धर्मकांडात अडकवले जात आहे असे वाटल्याने त्याने हा राजीनामा दिला होता. इमर्सनने एके ठिकाणी म्हटले आहे ,दुःख मागे वळून पाहते काळजी आजूबाजूला पाहते तर विश्वास वर पाहतो. हा राजीनामा देताना त्याला असाच विश्वास वाटला असला पाहिजे. अमेरिकन नव जागरणाला त्यांने याच विश्वासातून चालना दिली.
तुमच्या मागे आणि समोर जे आहे ते तुमच्या आत जे आहे त्याच्या तुलनेत फिके पडत असते असे म्हणणारा इमर्सन व्यक्तीस्वातंत्र्य ,नैतिक आदर्शवाद आणि सद्सदविवेक बुद्धी याचा आग्रह निग्रहपूर्वक धरतो .साहित्य निर्मिती सुद्धा लोककेंद्री आणि अकृत्रिम असली पाहिजे यावर त्याने भर दिला. अमेरिकेच्या दर्शन परंपरेवर इमर्सनचा मोठा प्रभाव आहे. त्याच पद्धतीने साहित्य,समाजकारण ,राजकारण ,संस्कृती अशा सर्व क्षेत्रात त्याच्या विचारांशी दखल घेतली गेलेली दिसते. इमर्सनने भरपूर प्रवास केला.” द डायल” हे मासिक त्याने काढलं. नेचर, एसेज, एसेज सेकंड सेरीज, पोएम्स ,रिप्रेझेंटेटिव्ह मॅन, जर्नल, लेटर्स, दि कंडक्ट ऑफ लाईफ, सोसायटी अँड सोल्युट्यूड अशी अनेक पुस्तके त्याने लिहिली. त्याच पद्धतीने निबंध स्वरूपात ही भरपूर लेखन केले. इमर्सने भगवद्गीतेचाही सखोल अभ्यास केलेला होता. ब्रम्हा या त्याच्या कवितेतून भगवद्गीता आणि भारतीय तत्त्वपरंपरेचे दर्शन घडते. तो म्हणतो, केवळ आनंदी राहणे हा जीवनाचा उद्देश नाही तर ते उपयुक्त असणे महत्त्वाचे आहे. जगणे आणि चांगले जगणे यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. कारण आयुष्यात लांबीपेक्षा खोलीला महत्त्व जास्त आहे. म्हणूनच आपण जगताना जिथे मार्ग नेतो तिथे न जाता जिथे मार्ग नाही तिथे जाऊन आपली एक खूण ठेवली पाहिजे. सामान्य ज्ञान आणि साधेपणा माणसाला जेवढे आश्चर्यचकित करतो तेवढे दुसरे कोणीही करीत नाही. इमर्सन स्वतःही साधा होता. कारण तो म्हणतो मी ज्या व्यक्तीला भेटतो ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्यापेक्षा सरस असते.
‘ट्रान्सेनडेंटल क्लब ‘ ची सुरुवात त्याने सुरू केली. ही विचारधारा अमेरिकेतील प्युरीटन आणि युरोपातील रोमँटिसीझम यांचा एकमेकांवर परिणाम होऊन तयार झालेली ही विचारधारा आहे. त्याची विस्तृत मांडणी इमर्सनेने नेचर या ग्रंथात केलेली आहे. माणूस निसर्गाच्या जवळ राहिला तर अतिशय आनंदी ,समाधानी आणि शांततेचे जीवन जगू शकेल अशी हे विचारधारा आहे.” मी स्वतः जे नाही ते म्हणजे निसर्ग ” असे इमर्सन म्हणतो. माणूस आणि निसर्ग यांचा परस्पर अवलंबित्व तो मानतो. माणूस आणि निसर्ग यांचा मूलस्त्रोत एकच आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. त्यासाठी माणसाने स्वभावातील सरळपणा, लहान मुलांमधील निरागसता आणि नवलाईची जाणीव बाळगली पाहिजे. पातळ बर्फावरून स्केटिंग करताना आपली सुरक्षितता वेगात असते.अशी भूमिका तो मांडतो. त्याच्या मते,सर्वात आनंदी माणूस तो आहे जो निसर्गाकडून उपासनेचा धडा शिकतो. तसेच खरा निसर्गप्रेमी त्याच्या आतील व बाह्य इंद्रियांनी खरोखर जुळवून घेत असतो. त्याच्या ठायी बालकाची निरागसता असते. ज्याला खऱ्या अर्थाने भाग बनायचे आहे त्याने संधी बाबतची तक्रार करू नये.निसर्गाशी अतिशय एकरूप झालेला इमर्सन एका ठिकाणी म्हणतो, ‘तण म्हणजे काय आहे ? तर ज्याचे गुण कधीच शोधले गेले नाहीत अशी वनस्पती.
कवी किंवा लेखक कसा असावा हे सांगताना इमर्सन आपल्या ‘द अमेरिकन स्कॉलर ‘ या व्याख्यानरूपी निबंधात म्हणतो,” कवी हा विचारवंत असावा ,तो पोपटपंची करणारा पढीकपंडित नसावा, निसर्गाचे सानिध्य आणि पूर्वसुरिंचे ग्रंथ या दोन्हीचाही त्याच्यावर प्रभाव असावा, त्याने बहुजनांशी नातं तोडून काल्पनिक विश्वात वावरू नये, दैनंदिन जीवनाचा व प्रत्यक्ष कामाचा त्याने अनुभव घ्यावा, सर्वसामान्य माणसाचा विचार त्याने गांभीर्याने करावा, त्याचं लेखन लोक भाषेत असावं, त्याने लोकशाही संकल्पनेतील व्यक्तीचे महत्त्व ओळखावं.”एकूण काय तर इमर्सनने साहित्य आणि समाज यांचे परस्पर नाते कसे असले पाहिजे याचा एक आधुनिक दृष्टिकोन मांडलेला दिसतो. कवी हा केवळ रचनेतील लालित्य निर्माण करणारा कलाकार नाही तर तो संत वृत्तीचा द्रष्टा असला पाहिजे असेही तो म्हणतो.
एक महान माणूस नेहमीच लहान राहण्यासाठी तयार असतो. आणि लोकांना हे कळत नाही की जगाबद्दलचे त्यांचे मत हे त्यांच्या चारित्र्याची कबुली असते असे म्हणणारा इमर्सन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वावलंबन महत्त्वाचे मानतो. त्याच्यामते आपल्या प्रत्येक जाणिवेमागे स्व अभ्यास आणि स्व अनुभूती असली पाहिजे.कारण ती कोणत्याही पांडित्यापेक्षा महत्त्वाची असते. ”सेल्फ रिलायन्स “या निबंध त्याने स्वावलंबनाची विस्तृत चर्चा केली आहे. तसेच नैतिक आदर्शवादाची संकल्पना तो द ओव्हरसोल या आपल्या निबंधात मांडतो. प्रत्येकाकडे सर्वकालिक असणाऱ्या शक्तीला इमर्सन ओव्हरसोल या शब्दाने उल्लेखतो. त्याच्यामते ही शक्ती सर्व मानव, प्राणीमात्र यांच्या जीवनाचा मूलस्त्रोत आहे.
माणूस आणि ईश्वर यांच्या एकतेच प्रतीक माणसाच्या सर्व कृतीमध्ये दिसले पाहिजे. आपल्या कृती मधून ,परमेश्वराच्या योग्य भक्तीमधून मानवच परमेश्वर बनतो. असे सांगणाऱ्या इमर्सनने ईश्वराची संकल्पना आणि भौतिक शास्त्र यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्याच्या तत्त्वज्ञानात आंतरिक जाणीव आणि खरोखरीची भावना यांचे महत्त्व मोठे आहे. तो म्हणतो, ईश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये एका खाजगी दाराने प्रवेश करत असतो. पण अनेकदा ते आपल्याला कळत नाही. कारण आपण एक शूद्र आणि चंचल व्यक्ती असतो.लोभ,संकोच आणि अनुसरण या आजाराने सतत ग्रस्त असतो.एकूण कय तर इमर्सनने आपल्या लेखनातून मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंधांचा शोध घेतला आहे. सर्वांनी व्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखावे आणि आपल्या आतील आवाजावर विश्वास ठेवावा असे तो सांगतो. सर्व प्राणीमात्रांमध्ये तो अध्यात्मिक स्वरूपाची एकता पाहतो. आपला वैयक्तिक अनुभवाचे स्वरूप आणि आकलन क्षमता याचे महत्त्व अधोरेखित करतो.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा