इहवादाचे महत्व 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान किंवा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा यासारखी गाणी, ओव्या आपल्याला त्यातील लय ,ताल ,संगीत, स्वर यामुळे आकर्षून घेतात. गुणगुणायला लावतात हे खरे .पण त्यातील अर्थ बारकाईने ऐकत , वाचत नाही.वाचला की आपल्याला पराधीनता, कर्मविपाक सिद्धांत वगैरेचा प्रत्यय येतो.आज आपण सर्वजण स्वतःला वैज्ञानिक युगाचे रहिवासी म्हणून घेतो. पण सामाजिक व्यवहार मात्र कमालीचा अवैज्ञानिक दिसतो आहे .चुकीच्या धर्म रूढी ,परंपरा ,कर्मकांडे ,आत्मा परमात्मा ,मोक्ष यामध्ये आपण गुरफटले जात आहोत. जगण्याची साक्ष काढत आपण मोक्षाच्या चर्चा करत आहोत .वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्समधून, प्रसार माध्यमातून आपल्यावर पारलौकिक विचारांचा एकसारखा मारा होत आहे. त्यामुळे आपणही या जगण्यापेक्षा गतजन्माच्या आणि पुनर्जन्माच्या चर्चेतच व्यस्त राहत आहोत .आपण याचा अर्थ सरसकट सगळे नव्हे .पण समाजातील मोठ्या संख्येने असणारा घटक हा दैववादी विचारात भरकटत चालला आहे. या दैववादातून समाजाला  बाहेर काढायचे असेल तर इहवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. 

इहवाद म्हणजे या जगाच्या संदर्भात आणि जगासंबंधी केलेला विचार. या वादामध्ये रूढअर्थाने ज्याला धर्मविचार म्हणतात तो येत नाही. कारण धर्मवादात धर्म, मोक्ष, आत्मा, परमात्मा, परलोक, पुनर्जन्म, आध्यात्मिक इत्यादींची चर्चा असते .तर इहवादात मानवी जीवन, त्या जीवनातील समस्या, प्रश्न, अर्थ ,काम अनुभवजन्य ज्ञान, प्रवृत्ती पर जीवन यांचा विचार असतो.धर्मग्रंथ हे शतका सहस्त्रका पूर्वी लिहिलेले असतात. ते मानायचे म्हणजे त्यांचे शब्द प्रामाण्य मानावे लागते. सृष्टीचक्रात होत गेलेले बदल धर्मग्रंथात येऊ शकत नाहीत. अशी अपरिवर्तनशील विचार पद्धती इहवादी विचाराला मान्यता देत नाही. कारण ती इहवादी प्रगतीला मदतकारी असू शकत नाही .

पारलौकिक जीवनाची संकल्पना इहवादाला मान्य नाही. परलोक आणि त्यासंबंधीच्या कल्पना यांचा इहवादी जीवनाशी संबंध सिद्ध होत नाही.म्हणून अशा सिद्ध होऊ न शकणाऱ्या काल्पनिक विचारांभोवती आपण जगण्याचा विचार करणे योग्य ठरत नाही. आत्मा, परमात्मा यांचे अस्तित्वही आजवर सिद्ध होऊ शकलेले नाही.त्यामुळे अशा कल्पना केवळ धर्मग्रंथात लिहिल्या आहेत म्हणून केवळ शब्दप्रामाण्याने मानणे बरोबर नाही. तसे करणे म्हणजे मानवाच्या विचारशक्तीची, बौद्धिक सामर्थ्याची अवहेलना करण्यासारखेच आहे. अशावेळी आपली बुद्धी हीच प्रमाणभूत मानणे हे संयुक्तिक व नैतिक आहे.ही अहवादी विचारातील मध्यवर्ती संकल्पना आहे. इहवादाचे विचार स्वातंत्र्य हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून आणि अनुभवाच्या आधारे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतंत्रपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य मानवाला असले पाहिजे. त्यातूनच नव्या ज्ञानाची प्राप्ती आणि वृद्धी होऊ शकते .असे ज्ञान मुक्तपणे व्यक्त करता यावे ही विचार स्वातंत्र्याची कल्पना आहे. पण असे विचार स्वातंत्र मांडणाऱ्यांचा छळ केला गेला. ठार मारले गेले हा इतिहास आहे. तर कर्मकांडांचा अतिरेक करणाऱ्या शास्त्रांच्या आणि रुढीच्या आधाराने समाजामध्ये जात व्यवस्था निर्माण झाली .सर्व मानवी जीवन व्यवहार जाती बंधनात जखडला गेला. जाती आधारे अनेक अमानुष रुढी, परंपरा तयार झाल्या. या साऱ्यांमध्ये माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा कमी झाली आणि त्यातून समाजाचे सामर्थ्य खचत गेले.

स्वतंत्र चिंतन, अवलोकोन, अनुभव, कार्यकारणभाव शोधण्याची तयारी आणि शेवटी सर्वांवरून निष्कर्ष काढण्याची विचार पद्धती यालाच बुद्धीप्रामाण्य म्हणतात.हे बुद्धीप्रामाण्य नीतीचे एक मुख्य लक्षण आहे. बाबा वाक्य प्रमाण इहवाद मानत नाही. इहवाद व्यक्तिस्वातंत्र्य मानतो. व्यक्तीची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा मुक्तपणे विकास झाल्यास समाजाच्या विकासाचे प्रगतीचे चित्र निर्माण होते. व्यक्तीचा विचार खुंटला तर अर्थात समाजवृक्षही वठतो.या वृक्षाला नवनवीन पालवी फुटण्यासाठी व्यक्तीच्या विचार स्वातंत्र्याचा विचार इहवाला महत्त्वाचा वाटतो.

विज्ञानवाद हे इहवादाचे लक्षण आहे . तिथे देव आणि दैव याला स्थान नसते. देव आणि दैव या कल्पना केवळ श्रद्धेवर आणि ग्रंथ धर्मग्रंथांच्या शब्दप्रामाण्यवर आधारलेल्या आहेत. ज्या समाजात धर्मपिठे वाढत जातात त्या समाजात ज्ञानपिठे कमी होत जाता. विद्यापीठे वाढत गेली तरी ती इहवालाची विद्यापीठे बनली आहे असे मानण्यासारखी परिस्थिती नाही. मानव हाच सर्व मूल्यांचा मानदंड असला पाहिजे हे वैज्ञानिक मानवतावादाचे मध्यवर्ती सूत्र आहे. श्रद्धा ही बाब केवळ अव्यक्त अदृश्य बाबींसाठी नसते. आणि केवळ धर्मानेच सांगितली असेही नाही. डोळसपणे श्रद्धेचा स्वीकार केला तर ती मानवाच्या ऐहिक सुखदुःखाशी निगडित असते हे लक्षात येते. ती श्रद्धा इहवादी बनते .अशा डोळस इहवादी श्रद्धेतूनच सामाजिक न्याय, समता, बंधुता, सहिष्णुता आदींना खरेखुरे नैतिक अधिष्ठान प्राप्त होत असते. 

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया