प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
लोकशाहीची चौकट ढीली होत गेली की फॅसीझम बळकट होत असतो असे इतिहास सांगतो. फॅसीझम युद्धाची अंगभूत खुमखुमी घेऊन वावरत असतो. अमेरिका फॅसिझमशी मुकाबला करण्याचे नाटक करून स्वतः फॅसिस्ट पद्धतीने वागत असते.पण गेल्या काही दशकात जगभरची शस्त्रास्त स्पर्धा वाढवण्याचे काम अमेरिका नेटाने करत आली आहे. त्यातून लहान मोठी युद्धे जन्म घेत असतात. युद्ध हे केवळ शस्त्रामुळे होते असे नाही हे खरे .कारण त्याचा उगम माणसाच्या मनस्थितीत व परिस्थितीत असतो .दारिद्र्य ,विषमता ,ज्ञान ,रोगराई आणि मागासलेपणा यातूनच युद्ध होतात असाही इतिहास आहे.आशिया व आफ्रिका खंडाबाबत तर ते अधिक खरे आहे .तेव्हा युद्धज्वर थांबवण्याची गरज आहे. युद्ध म्हणजे विनाश आणि शांतता म्हणजे विकास हे खरे आहे. पण फॅसिष्ठ शक्ती युद्धज्वर पसरवण्याचे काम नेटाने करीत असतात. भारतातील फॅसिस्ट शक्तीही काहीही बेताल बोलत असतात.
पहिल्या महायुद्धानंतर १९२३ मध्ये इटलीमध्ये आणि १९३३ ला जर्मनीत हुकूमशाही आली.तसेच आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी बळावत गेल्या. सामूहिक निर्णयाऐवजी कोणीतरी एखादी व्यक्तीच ही परिस्थिती सावरू शकेल असा बनेल आशावाद निर्माण करण्यात फॅसिष्ठ शक्ती यशस्वी झाल्या.त्यातून या वैफल्याला विभूती पूजेची जोड मिळाली .परिणामी फॅसीझमचा विस्तार होऊ लागला. हिटलरने लोकांना गॅस चेंबर मध्ये कोंडून मारले होते. भारतात ही बावीस वर्षांपूर्वी जे हत्याकांड झाले होते त्यामध्ये घर पाण्याने भरून त्यामध्ये वीज प्रवाह सोडून लोकांना मारण्यासारखे करून प्रकार झाले होते.
राज्यावर संपूर्ण श्रद्धा आणि त्याच्या सामर्थ्यावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणे हे फॅसीझमचे मुख्य तत्व असते. येथे लोकांना स्वतःचे मत मांडण्याचे काडीचेही स्वातंत्र्य नसते .इच्छा असो वा नसो या व्यवस्थेवर श्रद्धा आहे असे म्हणावे लागते. अन्यथा प्राणास मुकावे लागते
लोकांचे असे आवाज दडपण्याचे प्रयत्न हिटलरने केले. तसेच विरोध विचार व्यक्त करणाऱ्यांची वैचारिक व सैद्धांतिक पातळीवर मुकाबला करण्याऐवजी त्यांना मारहाण करण्याचे आदेश दिले जाणे हे फॅसिष्ठ प्रवृत्तीचेच लक्षण असते.एक राष्ट्र, एक नेता आणि एक वंश ही नाझीवादाची घोषणा आजच्या फॅसीझमलाही मान्य आहे. भारतासारख्या विविधतेतून एकता साधणाऱ्या सुसंस्कृत राष्ट्राचीही धर्माच्या आधारावर निर्मिती करावी असे वाटणारी मंडळी फॅसीझमच्या जवळ जात असतात.
फॅसीझमला वंश श्रेष्ठत्वाचा सिद्धांत पूर्णपणे मान्य असतो. जगातील सर्व मानव वंशामध्ये आर्यवंशी श्रेष्ठ हे नाझीचे ठाम मत होते .जगाचा इतिहास म्हणजे निरनिराळ्या वंशांच्या युद्धांचाच इतिहास आहे. त्यामुळे युद्धात श्रेष्ठ ठरलेल्या वंशालाच जगावर सत्ता गाजवायचा अधिकार आहे. ही भ्रामक कल्पना नाझीनी आणि तमाम फॅसिस्ट मंडळींनी सातत्याने गोबेल्स पद्धतीने मांडलेली आहे .त्यातून जीत व जेते, स्वामी व दास, श्रेष्ठ व कनिष्ठ, उच्च व नीच, सवर्ण व दलित ,आहे रे आणि नाही रे हा भेद निसर्गनिमानुसार असणारच हा विचार ही मंडळी मांडतात. मात्र वंशवादाची भ्रमकता विज्ञानाने जनुक आराखडा तयार करून उघडा पाडलेला आहे.
मानवी जीवनाचे गुपित दडवून ठेवलेल्या पुस्तकातील लिपी वाचण्याची शक्ती यामुळे मानवाला संशोधनाच्या आधारे प्राप्त झाली आहे. मानवी शरीरातील ९९ टक्के डीएनए सारख्याच प्रकारचे असतात. त्यामुळे सारी मानव जात एकाच धाग्यात सूत्रबद्ध असल्याचा शोध यातून लागलेला आहे.नाझीवादाचा भस्मासुर वंश श्रेष्ठत्वाच्या कल्पनेने फोफावत गेला. जगातील सर्वच माणसे समान दर्जाची नसतात, वंशात व व्यक्तीत असमानता असणे हे नैसर्गिकच आहे असे मानणारा व ते समाजमनात रुजू पाहणारा हिटलर चुकीच्या गृहीतकांवर बोलत होता. हे स्पष्ट झालेले आहे. असे असूनही हिटलरचा उदो उदो करणारी आणि त्याला प्रेरणास्थान मानणारी विचारसरणी वाढत जाणे म्हणजे फॅसीझमचे भूत वाढत जाणे आहे.
फॅसिझम ही अति उजवीकडे झुकणारी ,हुकूमशाही विकृतीचे समर्थन करणारी ,अति राष्ट्रवादी बनणारी विचारधारा आहे. या विचारसरणीमध्ये नेत्याची मनमानी हुकूमशाही ,सर्व सत्ता त्याच्या ताब्यात, विरोधी विचारांचे दमन होत असते. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असतो. माध्यमांचे स्वातंत्र्य संकुचित केले जाते.सरकारवर टीका करणे म्हणजे देशाविरोध मानला जातो. म्हणजेच यांचा आवाज बंद करून लोकशाहीच्या गळा दाबला जातो .फॅसिझम इतर राष्ट्रांशी युद्ध करणे आणि त्यांच्यावर वर्चस्व स्थापित करणे हे ध्येय ठेवून असतो. सैन्याची शक्ती आणि सामर्थ्य वाढविण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जात असते. मुसोलिनीने इटलीमध्ये १९२२ ते १९४३ या काळात फॅसीझमच्या आधारे सत्ता राबवली. जर्मनीत हिटलरने नाझी पार्टी स्थापन केली आणि फॅसीझमचा एक नवा प्रकार सुरू केला. यहुदी विरोध आणि वंशवाद हे त्याचे घटक होते. फॅसीझम लोकांचा मानवाधिकारच नाकारत असतो. संपूर्ण लोकसंख्येच्या जगण्याचा अर्थ लावण्याचे काम फॅसिझम स्वतःच्या हाती घेत असतो. म्हणूनच फॅसीझम वाढत जाणे हे देश विघातक आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.
बे

यावर आपले मत नोंदवा