प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
२० मे हा आधुनिक उदारमतवादाचा प्रणेता मानला गेलेल्या जॉन स्टुअर्ट मिल यांचा जन्मदिन. एकोणिसाव्या शतकातील एक प्रमुख तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विचारवंत असलेल्या जॉन स्टुअर्ट मिल यांचा जन्म इंग्लंडमध्ये २० मे १८०६ रोजी झाला. आणि ७ मे १८७३ रोजी ते कालवश झाले. भांडवलशाही व्यवस्थेच्या संक्रमणकाळात नवे राजकीय तत्त्वज्ञान मांडण्यामध्ये मिल यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, सामाजिक सुधारणा अशा विविध विषयांवर मूलभूत स्वरूपाचे लेखन केले. त्यांचे वडील जेम्स मिल हे देखील एक तत्त्वज्ञ होते. ओन लिबर्टी हा त्यांचा ग्रंथ तर जगप्रसिद्ध ठरला. जगभरातील अनेकांना त्याने प्रेरणा दिली. त्याचबरोबर मिल यांनी युटीलीटेरिअनिझम, कन्सिडरेशन ओन रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्मेंट, द सब्जेक्शन ऑफ वुमन, प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनोमी हेही महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्रियांचे स्वातंत्र्य, अल्पसंख्यांकांचे हक्क याचा त्यांनी आग्रहाने पुरस्कार केला. व्यक्ती आणि शासन यांच्यातील परस्पर संबंधाबाबत मिली आणि जी मांडणी केली की भांडवलशाही बदलत्या समाजरचनेला पूरक ठरली .त्यामुळे त्यांना आधुनिक उदारमतवादाचे प्रणेते असे म्हटले जाते.
जॉन स्टुअर्ट मिल याच्या ‘ ऑन लिबर्टी ‘ म्हणजे ‘ स्वातंत्र्या विषयी ‘या ग्रंथाने गेली १५० वर्षे जगातील राजकीय नेत्यांना ,अभ्यासाकांना, चळवळीला फार मोठे वैचारिक खाद्य पुरवले आहे. छोटासा निबंध लिहावा या हेतूने मिल यांनी लिहायला सुरुवात केली. पण या महत्त्वाच्या विषयाच्या चिंतनात व लेखनात तो एवढा गुंतला की त्याचा मोठा प्रबंध तयार झाला.१८५९ मध्ये हा प्रबंध तयार झाला .मिल व त्याची विचारवंत पत्नी हेरिट टेलर यांनी १९५४ पासून या विषयाचा विचार आणि लेखन सुरू केले होते. त्यांच्या संयुक्त विचार मंथनातून हा ग्रंथ तयार झाला. पण ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हा हेरिटचा मृत्यू झाला होता. म्हणून तिच्या सहभागाची आठवण जपण्यासाठी मिलने हा ग्रंथ तिला अर्पण केला आहे. स्वातंत्र्य या विषयावर जगात जे वाङ्मय आहे त्यातील अग्रक्रमावर या ग्रंथाचे स्थान आहे.
मिल म्हणतो मानवी सुखाचा विचार हा केवळ संघात्मक निकषाने नव्हे तर गुणवत्तेच्या आधारे केला पाहिजे. सुखाला नैतिक निकष लावण्याची गरज त्यांनी प्रतिपादली. परमोच्च सुखाचा शोध आत्मशोधात परिवर्तित व्हायला हवा असे त्याचे मत होते. ऑन लिबर्टी या ग्रंथात मिलने व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधांची मांडणी केली आहे .या ग्रंथाच्या प्रस्तावनेत मिल म्हणतो, इतरांशी ज्या कृत्यांचा संबंध येतो त्या कृत्यांच्या बाबतीतच माणसाने समाजाचा विचार करायला हवा. केवळ स्वतः पाशीच ज्या कृत्यांचा संबंध येतो त्याच्या बाबतीत व्यक्तीचे स्वातंत्र्य एक हक्क म्हणून अबाधित राहिले पाहिजे. स्वतःपुरती, स्वतःचे शरीर व मन यापूर्ती व्यक्ती सार्वभौम आहे. माणसाच्या वैयक्तिक जीवनामध्ये समाजाने हस्तक्षेप करू नये. माणसाला विचारांचे, भावनांचे , मतांचे, काल्पनांचे आणि सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य असावे असे मिल म्हणतो.
विचार स्वातंत्र्याचा विचार करताना मिल एक महत्त्वाची बाब मांडतो .तो म्हणतो, एक माणूस सोडून बाकीच्या उरलेल्या सबंध मनुष्य जातीचे एक मत असेल आणि फक्त त्या एका माणसाचे वेगळे मत असले तरी देखील त्या एका माणसाने त्याचा अधिकार असला तरी सबंध जगाला गप बसवणे असमर्थनीय आहे .विचारांमधील किंवा मतांमधील सत्य हे खुल्या चर्चे शिवाय स्पष्ट होत नाही. हे त्याने सांगितले आहे. विचार व मत स्वातंत्र्याबरोबरच मिलने कृती स्वातंत्र्याचाही विचार मांडला आहे. त्याच्या मते कृती स्वातंत्र्याने दुसऱ्याला त्रास होता कामा नये .आणि आपल्या कृतीचे परिणाम भोगण्याची माणसाची तयारी हवी .या दोन मर्यादांच्या दरम्यानच माणसाला कृती स्वातंत्र्य हवे. व्यक्तित्वाच्या विकासामुळे जीवन सजीव संपन्न वैविध्यपूर्ण बनते. म्हणून माणसांनी एकमेकांची नक्कल करणारे परंपराबद्ध जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या प्रवृत्तीला खुला वाव देणारे स्वतंत्र जीवन जगावे असा आग्रह मिल धरतो.
मिल ने या ग्रंथात समाजाची व्यक्तीवरील सत्ता कुठवर चालावी याचीही चर्चा केलेली आहे. या चर्चेत मिलने केवळ स्वतःशिच संबंधित व्यवहार आणि दुसऱ्याशी संबंधित व्यवहार अशा दोन अंगाने विचार केला आहे. व्यक्तीच्या खाजगी जीवनातील काही व्यवहारांची उदाहरणे देऊन त्यात समाजाचा हस्तक्षेप योग्य नाही असे तो म्हणतो. तसेच धर्माच्या नावाने व्यक्तीवर व व्यक्ती समूहावर बंधने लादली जातात त्याचा तो निषेध करतो. याबाबत तो म्हणतो दुसरा माणूस धर्माचरण करतो की नाही हे पाहणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे ही कल्पनाच आजवर जो धार्मिक छळ झाला त्याच्या मुळाशी आहे. ती खरी आहे असे मानले की त्या सर्व छळाचे पूर्ण समर्थन होते.
आपल्या ग्रंथात मिलने जी तत्वे सांगितले आहेत त्याच्या अंमलबजावणी बाबतचेही विचार अखेरच्या प्रकरणात मांडले आहेत.स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय अन्याय ,शासनाचा अधिकार व कार्यक्षेत्र याबाबतही त्यांने विवेचन केलेले आहे. मिल मर्यादित शासनाचा पुरस्कार करत होता. जे नागरिकांना करता येते ते शासनाने करू नये असे त्याचे मत होते. तो विकेंद्रीकरणाचा पाठीराखा होता. लोकांना कामे करून दिल्यामुळेच त्यांच्यातील कर्तुत्वाचा व बुद्धीचा विकास होतो व व्यक्ती म्हणून त्याची महती वाढते असे तो म्हणतो. ‘राष्ट्राची महती कशावर अवलंबून असेल तर ती राष्ट्रातील व्यक्तींच्या महतीवर’ असे म्हणणारा मिल आणि त्याचा ऑन लिबर्टी हा ग्रंथ आजच्या काळातही अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे यात शंका नाही.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा