प्लेटोचा आजचा संदर्भ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

सामाजिक व राजकीय ग्रीक तत्वज्ञ म्हणून प्लेटोची गेली अडीच हजार वर्षे ओळख आहे.त्याचा काळ इसवी सन पूर्व ४२७ ते ३४७ हा होता.

अथेन्समधील प्लॅटॉनिक अकॅडमी या त्याकाळच्या लोक विद्यापीठाचा तो संस्थापक होता.जगभर पदव्युत्तर अभ्यासक्रमातही प्लेटोचा समावेशआहे .त्याच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ आजही विविध प्रकारे लावण्याचा प्रयत्न होतो आहे. अर्थात त्याच्यावर टीकाही भरपूर झाली. त्याचा शिष्य अरिस्टॉटलने त्याच्या विचारातील उणिवा स्पष्ट केल्या होत्या. पण प्लेटोचा युरोपीय तत्त्वज्ञानावरील प्रभाव कमी होऊ शकला नाही. प्रसिद्ध विचारवंत कार्ल पॉपर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की’ पाश्चात्य विचारावर प्लेटोचा जो बरा वाईट प्रभाव आहे तो अपरिमित आहे. प्लेटोशी सहमत असा की नसा प्लेटोच्या राजकीय विचारांशी तुमचा संबंध नाही हे अशक्य.’ यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे. 

प्लेटोने सॉक्रेटिसचे विचार आत्मसात करून त्यात स्वतःच्या राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानाची भर घातलेली दिसते. युरोपमध्ये तत्वज्ञानाचे पद्धतशीरपणे विवेचन करण्याची सुरुवात करण्याचा मान प्लेटोला जातो .वयाच्या विसाव्या वर्षी तो सॉक्रेटिसचा शिष्य झाला .अतिशय बुद्धिमान असलेल्या प्लेटोने विविध ज्ञानशाखांचा चिकित्सक अभ्यास केला होता. राजकारण ,समाजशास्त्र, नीती तत्वे, धर्मकल्पना,अर्थशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा त्याने परामर्श घेतला.’सदगुण हेच ज्ञान होय ‘ हा आदर्श तो मानत असे . व्यक्तीच्या ,समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण हाच एक प्रभावी मार्ग आहे हे त्याने सांगितले. 

आपल्याला अभिप्रेत असलेल्या आदर्श समाज व राज्यव्यवस्थेचे कल्पनाचित्र त्याने ‘ रिपब्लिक ‘ या ग्रंथात मांडले आहे . सॉक्रेटिसला झालेल्या मृत्यूदंडाचा त्याला धक्का बसला. त्यातून त्याने आदर्श राज्याची कल्पना मांडली. सॅक्रेटीसच्या मृत्यूनंतर जीवाला धोका वाटल्याने त्याने बारा वर्षे अज्ञातवासात घालवली.त्या काळात अनेक देशांना त्याने भेटी दिल्या व राजकारणाचा, विचार प्रणालींचा सूक्ष्म अभ्यास केला. त्याने प्रचंड लेखन केले. त्याचे अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत .त्याची विचार मांडण्याची पद्धत संवादात्मक होती. त्यामुळे त्याच्या ग्रंथांना प्लेटोचे संवाद असेही म्हटले जाते.

प्लेटो च्या मते राज्य म्हणजे व्यक्तीचे विशाल रूप. ज्या पद्धतीने व्यक्ती निर्माण होतात आणि त्याचे कार्य चालते त्या पद्धतीने समाज बनतो.समाजाच्या गरजा भागवण्यासाठी समाजात तीन वर्ग असतात. राज्यकर्त्यांचा वर्ग, संरक्षकांचा वर्ग आणि उत्पादकांचा वर्ग .या तीन वर्गामार्फत राज्याचे संरक्षण व संवर्धन होत असते.मनुष्याच्या शरीरात पोट ,छाती व मेंदू हे तीन भाग ज्याप्रमाणे अनुक्रमे वासनापूर्ती, संरक्षण आणि नियंत्रण ही कामे करीत असतात त्याचप्रमाणे समाजातील वर्ग ही राज्याची कार्ये पार पाडत असतात. आदर्श नागरिक निर्माण करणे हे राज्याचे प्रमुख कार्य आहे .राज्यातील सर्व व्यक्ती आदर्श बनतील तरच खऱ्या अर्थाने न्याय प्रस्थापित होईल. 

प्लेटोचे तत्त्वज्ञान आणि रूपकाद्वारे केलेल्या मांडणीबाबत विकिपीडिया म्हटले आहे,”प्लेटोच्या तत्त्वज्ञानाची भाषा मुख्यत: साहित्यिक राहिलेली आहे. त्याच्या शास्त्रीय व तात्त्विक सिद्धान्ताचे आविष्करण करताना तो रुपके वापरतो. ‘रिपब्लिक’ मध्ये बौद्धिक विकासाची प्रक्रिया मांडताना प्लेटोने एक गुहेचे रुपक वापरलेले आहे. त्या अंधाऱ्या गुहेत दोरखंडाने बांधलेले काही कैदी तुरुंगाच्या भिंतीकडे बघू शकतात अशी कल्पना केली आहे. ते एकमेकांकडे वळूनही बघू शकत नाहीत. त्यांच्या पाठीमागे उंचावर एकमेव झरोका आहे. त्यातून भिंतीवर उजेड पडतो. उजेडाकडे पाठमोर्या असलेल्या कैद्यांना बाहेरील व्यक्तींची हालचाल भिंतीवरील पडछायांच्या स्वरूपात फक्त दिसते. बाहेरील व्यक्ती डोक्यावर पुतळे घेऊन इकडेतिकडे हालचाल करीत आहेत. गुहेबाहेरील त्या व्यक्ती वस्तू इकडून तिकडे हलवतात त्याची ‘छायाचित्रे’ कैद्यांना बघता येतात. कैद्यांच्या जगाच्या वास्तवाच्या कल्पनेत असते ते छायाकृतींचे जग. त्यापलीकडे अन्य काही नाही. गुहेतील एखाद्या कैद्याला मुक्त होण्याची संधी मिळून जेव्हा तो गुहेबाहेरील स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेले जग बघू शकतो तेव्हा आधीच्या अनुभवात उतरलेले जगाचे स्वरूप वास्तविक नव्हते हे त्याच्या लक्षात येते. शृंखलांमधून, मर्यादांमधून बाहेर पडल्यावर छायांचे जग संपते. सूर्यप्रकाशाने माखलेल्या या जगापलीकडे अधिक आणि अंतिम अर्थी सत्य तो आणखी प्रयत्नांनी पाहू शकतो. हे जमते तेव्हा प्रकाशातील जगापेक्षा प्रत्यक्ष प्रकाशाचा स्रोत असलेल्या देदीप्यमान अशा सूर्याच्या वास्तवाची त्याला जाण येते. ही ज्ञानाची सर्वात वरची पायरी आहे. हा सूर्य जगातील सर्वात शिवाचे (द गुड) प्रातिनिधिक रूप आहे.

या गुहेच्या रुपकातून प्लेटोने विवेकी मनाचा विकास अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या पायरीपासून विवेकापर्यंत, अंधकारापासून प्रकाशाच्या वाटेकडे कसा होतो हे दाखवले. जाणिवेला विशेष प्रयत्नांनी प्रकाशाकडून प्रकाशाच्या उगमापर्यंत जाता येते. सूर्याच्या दर्शनानंतर अंधकारात बंदी असलेल्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणारी काही माणसे असतात पण गुहावासियांना प्रकाश पाहिलेल्यांचा भरवसा वाटतो असे नाही. एका अर्थाने गुहेचे रुपक हे सॉक्रेटिसच्या आयुष्याला चपखलपणे लागू होते हा योगायोग नक्कीच नसावा.”

आदर्श राज्याची कल्पना प्रत्यक्षात साकारणे अवघड आहे. याची खात्री पटल्याने प्लेटो ने उत्तर आयुष्यात ‘ द लॉज ‘म्हणजेच विधीनियम हा ग्रंथ लिहून मिश्र शासन पद्धतीचा पुरस्कार केला. राजेशाही व लोकशाही यातील चांगल्या गुणांचा समन्वय साधून नवीन राज्यपद्धती निर्माण करावी. राजेशाहीतील तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांची बुद्धी आणि प्रजातंत्रात्मक पद्धतीवरील स्वतंत्रता या दोघांचा समन्वय साधून राज्य चालवावे. हा विचार त्याने मांडला. धर्म, अर्थ, न्याय, शिक्षण अशा अनेक विषयांवर त्याने सूत्रबद्ध लेखन केले आहे. त्यामुळे प्लेटोचा संदर्भ आजही अनेक अर्थाने ताजा आहे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया