अभिजन वर्गाकडून अपेक्षा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षाच्या वाटचालीनंतर एकीकडे  देशातील अब्जाधीशांची संख्या वाढते आहे .तर दुसरीकडे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देऊन त्यांचे हात कापले  व आवाज दाबले जात आहेत. आणि वेगवान विकासाचे डांगोरेही पेटले जात आहेत. गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये प्रचंड श्रीमंत झालेल्यापैकी अनेक जण आता आपली संपत्ती घेऊन परदेशात स्थायिक होण्याच्या विचारात आहेत. किंबहुना शेकडो जण गेल्या पाच दहा वर्षात गेलेही आहेत. मात्र खऱ्या गरिबांना आणि धोरण लकव्याने गरिबीत ढकललेल्यांना देश सोडता येत नसतो तर फक्त श्वास सोडता येतो. गरिब आणि श्रीमंतीतील वाढती दरी स्पष्ट पणाने दिसते आहे. त्याच पद्धतीने गेल्या दोन दशकामध्ये मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग मोठ्या संख्येने वाढतो आहे. ४० ते ५० कोटी लोक त्या गटात मोडतात. अखंड अमेरिकेच्या दीडपट ,दुप्पट बाजारपेठ या वर्गासाठी काम करताना दिसते.

अभिजन वर्ग म्हणजे (Elite Class ) हा शब्द अनेकांच्या लेखना बोलण्यात येतो. त्याचेही कारण वरील मुद्दाच आहे.अभियान वर्ग हा बुद्धिमत्ता ,कार्य कौशल्य आणि नेतृत्व करण्याची क्षमता या गुणांनी युक्त असलेला  प्रभावी घटक असतो.वरील ४०  ते ५० कोटीतील अनेक मंडळी या अभिजन वर्गामध्ये मोडली जातात .सर्वसाधारण माणूस आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे कष्ट करतो. मिळणाऱ्या पैशातून बऱ्यापैकी जीवन जगतो. पालन पोषण करतो. श्रमपरिहार करतो. जिज्ञासा जागृत झाल्यास त्याची परिपूर्ती करून घेतो .थोडक्यात तो मिळेल त्यात समाधानी असतो .तो फार उंचीची स्वप्न पाहत नाही म्हणून अपेक्षाभंगाचे दुःखही त्याला कमी असतं .पण त्यातील काही व्यक्ती अशा असतात की त्या उठून दिसतात. उठावदार असे प्रभावशाली काम करतात .हा वर्ग जनामधला अभिजन असतो. अलीकडे अभिजन वर्ग संख्यात्मक मग गुणात्मक दृष्ट्याही वाढताना दिसतो.

अर्थात अभिजन कोणाला म्हणायचे याचे निकष कालमान, देशस्थिती प्रमाणे बदलत असतात. प्राचीन समाजात वयोवृद्ध व्यक्तीकडे समाजाचे नेतृत्व असायचे. मध्ययुगीन समाजात राजे, सरदार ,धर्मगुरू, पुरोहित यांना अभिजन म्हणून ओळखले जायचे. जनतेच्या ज्ञानाच्या व संस्कृतीच्या मोजपट्टीच्या आधारे अभिजन कोण याची व्याख्या केली जात असे .औद्योगिक प्रगती एकीकडे होत असताना समाजाचा आकारही वाढत गेला. कार्यक्षेत्रात विविधता येत गेली. सामाजिक क्षेत्रांची व्याप्ती वाढली. या व्याप्तीतून विशिष्ट क्षेत्रासाठी विशिष्ट नेतृत्व उदयाला येत गेले. या नेतृत्वाची ओळख अभिजन म्हणून होत गेली. त्यांच्या शब्दाला समाजात मान मिळू लागला. अभिजनाच्या व्यक्तिमत्त्वाचा, विशेष गुणांचा समाजावर प्रभाव पडत असतो .अशा अभिजन वर्गातील काही व्यक्तींना विशिष्ट जात, धर्म, संपत्ती यामुळेही समाजात प्रतिष्ठा लाभलेली असते. तर काहींच्या अंगी असलेल्या विलक्षण प्रतिभा शक्तीमुळे त्यांना मानाचे स्थान मिळते. काहीजवळ कलाकौशल्य असते तर काहीना कौटुंबिक पार्श्वभूमी उपयोगाची ठरत असते.

सर्वसाधारणपणे राजकीय नेतृत्व करणारे ,आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात नेतृत्व करणारे, लष्करी व प्रशासकीय क्षेत्रातील नेतृत्व ,धर्मगुरू, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ यासारख्या समाजावर नैतिक प्रभाव गाजवणाऱ्या व्यक्ती, भावनिक व मानसिक दृष्ट्या समाजाला आकर्षित करणारे नामवंत लेखक कलाकार खेळाडू विचारवंत  यांचे कार्य व गुणधर्म प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सारखेच असल्याचे दिसते .अभिजन वर्ग प्रामुख्याने समाजाच्या नैतिक एकतेचे प्रतीक म्हणून काम करणे ,विविध प्रकारच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधणे, गटबाजी फुटीरवादी यांच्याशी लढा देणे, अंतर्गत संघर्ष मिटवणे आणि धोक्यापासून समाजाचे संरक्षण करणे, समाजाला बौद्धिक आनंद देणे यासाठी कार्य करत असतो व असला पाहिजे.

समाजातील विविध क्षेत्रातून जो अभिजन वर्ग असे नेतृत्व करत असतो त्याबद्दलची कृतज्ञता समाज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यक्त करत असतो.आजची एकूण सामाजिक, आर्थिक, राजकीय ,सांस्कृतिक परिस्थिती पाहिली तर आजही समाजातील अभिजन वर्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.एकीकडे समाजाच्या दुरावस्थेला या अभिजन वर्गाची निष्क्रियता आणि बोटचेपेपण कारणीभूत आहे अशी भूमिका मांडली जात असते .तर दुसरीकडे या दुरावस्थेतून समाजाला अभिजन वर्ग सुअवस्थेत आणू शकतो असेही मत मांडले जाते. या दोन्हीही मतात थोडा थोडा तथ्यांश आहे. या पार्श्वभूमीवर अभिजन वर्गाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विचारांना आचाराची जोड मिळाली की प्रसार होत असतो हे ऐतिहासिक सत्य आहे. आज एकविसाव्या शतकाचे पाव शतक उलटून गेलेले असताना ए.आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या  युगात आपण वावरत असताना मध्ययुगीन संकल्पनाही जोर धरू लागल्या. म्हणूनच समाजात समता नांदण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशावेळी अभिजन वर्गाकडे दूषित नजरेने न पाहता त्यांचे कार्य त्यांनी व्यापक करावे अशी अपेक्षा व्यक्त करणेच योग्य ठरेल. सर्व जन समृद्ध व्हायचे असतील तर अभिजनात तशी प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे, ती वाढली पाहिजे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया