हेन्री डेव्हिड थोरो : निसर्गोपासक तत्त्ववेता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

६  मे हा हेन्री डेव्हिड थोरो यांचा स्मृतिदिन. निसर्गाशी तादात्म्य पावणारे समाजजीवन खऱ्या अर्थाने सुख संपन्न असते आणि सुखी व संपन्न जीवनाची माणसाला, समाजाला नितांत गरज आहे अशी भूमिका घेऊन संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे एक थोर निसर्गवादी विचारवंत म्हणून अमेरिकन असणारे पण संपूर्ण जगाला आपले वाटणारे हेन्री डेव्हिड थोरो  हे एक महान व्यक्तिमत्व १९ व्या शतकाच्या पूर्वर्धात होऊन गेले. १२ जुलै १८१७ रोजी जन्मलेले हेन्री ६ मे १८६२ रोजी कालवश झाले. मराठी वाचकांना त्यांचा परिचय १९६५ साली त्यांच्या वॉल्डन या पुस्तकाचा दुर्गा भागवत यांनी केलेला ‘ वॉल्डनकाठी विचार विहार ‘या नावाच्या अनुदावादामुळे अधिक जवळून झाला. हे अठरा प्रकरणातून व्यक्त होणारे ३०० पानी पुस्तक म्हणजे हेन्री डेव्हिड थोरो ची विचारधारा शास्त्रशुद्धपणे मांडणारा अनमोल दस्तऐवज आहे.कार्ल मार्क्सचा समकालीन असलेला थोरो एक नवा दृष्टिकोन मांडत होता. 

त्याचा जन्मदिन जगभर ‘साधेपणाचा दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो. आज निसर्ग आणि मानव यांच्या निसर्गदत्त नात्यात अतिशय वेगाने अंतर पडत असताना, माणूस निसर्गापासून आपल्या स्वार्थामुळे फटकून वागत असताना, दूर जात असताना, निसर्गावर मात करण्याचे अनैसर्गिक प्रयत्न करत असताना तर हेन्री डेव्हिड थोरो यांचे महत्त्व फार मोठे आहे. 

हेन्री यांचा जन्म अमेरिकेतील मेसेच्युसेटस या जिल्ह्यातील कॉकार्ड या तालुक्यात झाला होता. त्यांचे कुटुंब गरीबच होते .पण त्यामध्ये कमालीचे प्रेम व चारित्र्य जपणुकीचे वातावरण होते .म्हणून तर त्याचे वडील आणि थोरल्या बहिणीने काबाडकष्ट करत हेन्रीला हॉवर्ड विद्यापीठात शिक्षणसाठी घातले.हेन्री स्वतः ही अतिशय बुद्धिमान व प्रगल्भ विद्यार्थी होते. लॅटिन, ग्रीक,फ्रेंच या भाषा आणि गणित या विषयातील पदवी त्यांनी मिळवली होती. इमर्सन या तत्वज्ञानी विचारवंताचा प्रभाव त्यांच्यावर होता. म्हणून तर शाळेत असलेली शिक्षकाची नोकरी सोडून त्यांनी इमर्सनच्या घरी कारभारी म्हणूनही नोकरी केली होती. पण हे सारेच सोडून देऊन निसर्गाशी तादात्म्य पावण्याच्या अंतरीक ओढीने ते निसर्गाशी तद्रुप झाले. 

मानवी संस्कारापेक्षा निसर्गाला जाणून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी एका घनदाट जंगलात असलेल्या वार्डन या सरोवराकाठी एक झोपडी बांधली. आणि कंदमुळे खाऊन तब्बल सव्वा दोन वर्षे तेथेच राहिले .निसर्गाचे, तेथील पशुपक्ष्यांचे ,झाडाझुडपांचे निरीक्षण आणि अभ्यास करीत ते राहिले. वॉल्डन  हे पुस्तक त्याचच फलित आहे. म्हणून तर त्यांचे हे पुस्तक आज दीडशे वर्षानंतर ही निसर्गवादी विचारांच्या ग्रंथाचे बायबल समजले जाते. निसर्ग जाणून घ्यायच्या आदम्य ओढीने हा माणूस जाणीवपूर्वक अविवाहित राहिला.’ यांनी घडवलं सहस्त्रक ‘या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे ,’ मनुष्य हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक असून ती जाणीव त्याच्यात तेवत राहिली तर तो आपल्या सुप्तगुणांचा, अव्यक्त क्षमतांचा आणि चारित्र्याचा विकास करू शकतो. हे सर्व करण्यासाठी माणसाला फुरसत आणि निवांतपणा ही तितकाच आवश्यक आहे. यात त्याच्या आत्म्याचं स्वातंत्र्य अबाधित रहात . जे काही चांगलं आहे ते संस्काररहित, वन्य आणि मुक्त असतं.” हा त्याचा सिद्धांत आहे. 

हेन्री डेव्हिड थोरो नेमका कोण होता आणि त्याची महती काय हे दुर्गा भागवत यांनी वॉल्डनकाठी विचार विहार या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सविस्तरपणे मांडल आहे.त्या म्हणतात ,” थोरो कमालीचा आत्मनिष्ठ चिंतक आहे. तो कोणत्याही रूढ तत्त्वज्ञानाच्या संप्रदायास स्थिरावला नाही.कांट, गटे, हेगेग, स्पेंसर , स्पिनोझा  वगैरे नामवंत तत्वज्ञांच्या  भूमिकेत आणि थोरोच्या भूमिकेत जराही सारखेपणा नाही.कारण थोरो हा मुळी तत्वशास्त्रज्ञ नव्हेच. तो आदिम सृष्टीशी तन्मय झालेला गद्यकवी आहे. आदिमातेशी त्याचे सनातन नाते आहे. आदिम अरण्य, आदिम मानव, आदिम प्रतिमा त्याला प्रिय आहेत.आणि या साऱ्याचे प्रतिबिंब तत्वज्ञानाच्या ग्रंथापेक्षा विविध देशांच्या पुराणकथात मिळते .म्हणून त्याला दैवतकथा अतिव प्रिय आहे. थोरोची देवावर श्रद्धा नाही ,चर्चवर नाही, समाध्यांवर नाही, देवालयांवर नाही, ज्ञानावरही नाही.पण मानव हा सृष्टी यांना मूलभूत सौंदर्यामुळे ,पार्थिव व रहस्यमय संबंध जोडणाऱ्या पुराणकथांचे किंवा दैवतकथांचे त्याला क्षणभरही विस्मरण होत नाही. त्याच्यावर त्याची नितांत श्रद्धा आहे. “

दुर्गा भागवत पुढे म्हणतात ,”थोरोने समाजाला फटकारे मारले असले तरी त्यांने निग्रोच्या गुलामगिरी विरुद्ध बंडाचा झेंडा पुकारला. सविनय कायदेभंगाचा पुरस्कार केलेला आहे. महात्मा गांधींना त्यांचे विचार प्रेरक व मार्गदर्शक वाटले.  त्यांनी दक्षिण आफ्रिकेत त्या सत्याग्रहाच्या वेळी सविनय कायदेभंगावरच्या त्याच्या लेखाचा अनुवाद करून लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले. कार्लाइल,इमर्सन व्हिटमन वगैरे विचारवंताशी थोरोचे सख्य होते. पण अनुयायीत्व असे त्याने कोणाचेच मानलेले नाही. त्याची प्रतिमा स्वातंत्र होती. त्याची  भाषा रानदांडगी, वृत्ती काव्यमय, आचरण शुद्ध होते .तो कुठल्यातरी बौद्धिक रहस्याचा आमरण वेध घेत होता. हे त्याच्या लेखनावरून स्पष्ट कळून येते.त्याचे जीवन हा रहस्य वेधाचा एक प्रयोग आहे. काळोखातून पलीकडे पाहण्याचा, लहान नौकेतून समुद्र तरुन जाण्याच्यामुक्त संचाराचा, धरा तळाशी संपूर्ण इमान राखण्याचा अभिनव प्रयोग या माणसाने आपल्या ४५  वर्षाच्या आयुर्मानात केला. इतक्या स्वेच्छाधारी ,स्वतःला यतकिंचितही  क्षमा न करणाऱ्या, पण पश्चातापाच्या आहारी न जाणाऱ्या माणसाच्या शिष्यत्वाचे ओझे पेलणे कुणाला शक्य आहे ? तरी पण विश्वाबद्दल अमर्याद प्रेम बाळवणारा, आशावादी असा थोरो स्वतंत्र विचार करणाऱ्यांना सदैव स्फूर्तीप्रद,आदरणीय असा वाटेल यात शंका नाही. त्यांचे लेखन अधून मधून वाचल्यास बुद्धीचे मांद्य जाऊन तिला नवी टवटवी आल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरे. कारण थोरो म्हणजे वारे ,सोसाट्याचे वारे ,सार साचलेपण धुवून काढून वातावरण निर्माण करणारे. “

दक्षिण अमेरिकेतील काही भागात त्या काळात गुलामगिरीची पद्धत होती .त्यावेळी थोरोनी या पद्धती विरुद्ध प्रबोधन केलं. लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला .’सिव्हिल डिसओबीडीयन्स ‘ हा थोरोचा लेख जगभर गाजलेला आहे. हा लेख म्हणजे त्यांन केलेलं एक प्रबोधनावादी भाषण आहे. गुलामगिरी सारख्या अनिष्ट प्रथा सुरू राहण्यास शासनाने केलेले कायदे व त्या कायद्यात असलेल्या पळवाटा कारणीभूत ठरतात असं थोरो यांचे मत होतं. शासन यंत्रणा लोकांच्यावर अवलंबित असली पाहिजे. पण जर ती लोकांना त्रासदायक ठरत असेल तर आपण त्याविरुद्ध बोललं पाहिजे. ते म्हणतात, ” अजिबात कसलंच शासन न करणारी शासन यंत्रणा सर्वोत्कृष्ट शासन यंत्रणा असते. वस्तूत: शासन व शासन यंत्रणा ही अपरिहार्य गोष्ट नसून ती परिस्थितीने निर्धारित केलेली घटना आहे .ती माणसानेच घडवलेली असते. मात्र बऱ्याच शासन यंत्रणा परिस्थितीने निर्धारित न होताच अस्तित्वात आलेल्या असतात.त्याविरोधी आवाज उठविणे हाच थोरोचा सविनय कायदेभंग होता. महात्मा गांधींनी हाच मार्ग पुढे चोखाळला. अहिंसक क्रांती, शांततामय लढा हा नव्या युगाचा महामंत्र बनवण्यात थोरो यांचे योगदान मोठा आहे. 

थोरो यांच्या मते ,जोपर्यंत राज्य व्यक्तिला श्रेष्ठ आणि राज्याच्या शक्तीचा आधार असलेली स्वतंत्र शक्ती मानत नाही आणि राज्याच्या शक्तीचा आधार असलेली स्वतंत्र शक्ती मानत नाही आणि त्याप्रमाणे व्यक्तीला वागणूक देत नाही तोपर्यंत राज्यही स्वतंत्र आणि सार्वभौम होऊ शकणार नाही. ज्या राज्यात सर्व व्यक्तींना न्याय आणि सन्मान मिळेल ते राज्य अधिक पूर्ण आणि संपन्न असेल. लोकांमध्ये अफाट सामर्थ्य आहे.पण लोक ते पूर्णपणे वापरत नाहीत,ते वापरावे ,हा थोरोचा आग्रह आहे .

वॉल्डन या ग्रंथाच्या आरंभीच थोरो म्हणतात,” माझ्या इतका मी इतर कुणालाही जर नीटपणे जाणत असतो तर मीही स्वतःबद्दल इतके बोललो नसतो.आज प्रगतीच्या नावाखाली माणूस आणि निसर्ग यांच्यातील संवाद तयार झाला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी थोरो आपल्याला उपयोगी ठरतील यात शंका नाही.त्यांनी म्हटले आहे,’ तत्ववेत्ता होणे म्हणजे केवळ तरल विचार असणे किंवा एखादे पीठ अगर एखादा संप्रदाय स्थापन करणे नव्हे .तर जीव भरून, प्राणपणाने

प्रज्ञेवर प्रेम करणे ,तिच्यावर निष्ठा ठेवणे आणि तिच्याच आदेशानुसार साधे ,मुक्त उदार, सश्रद्ध जीवन जगणे.आयुष्यातील बिकट प्रश्न यायोगे केवळ सिद्धांतदृष्ट्या नव्हे तर व्यावहारिक दृष्ट्याही सुटतील. वॉल्डन च्या अखेरीस त्यांना विधान केले ,’ जो प्रकाश आमचे डोळे दीपवतो तो आमच्या लेखी चक्क अंधारासारखाच आहे. ज्या दिवशी आपण जागृत असतो तोच आपल्या दिवसाचा खरा उदय. दिवस अजून खऱ्या अर्थाने उगवायचाच आहे .आताचा हा सूर्य म्हणजे केवळ पहाटेचा शुक्रतारच आहे.”अशा या थोर विचारवंताला विनम्र अभिवादन…!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया