प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
२ मे २०११ रोजी जागतिक दहशतवादाचे थैमान घालणारा कुप्रसिद्ध दहशतवादी आणि अमेरिकेचा एक नंबरचा शत्रू अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता ओसामा बिन लादेन याला अमेरिकन जवानांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर अबोटाबाद या शहरात गोळ्या घालून ठार केले. सतत पाच वर्षे लादेनच्या हालचालीवर पाळत ठेवून आणि वर्षभर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने योजना आखून अमेरिकेने लादेनचा खात्मा केला. पाकिस्तानलाही नागवे केले. अमेरिकेच्या गुप्तहेर आणि तंत्रज्ञान यंत्रणाचे हे वादातीत कौशल्य आहे.लादेनचा तिकडे खात्मा होत असताना ते ऑपरेशन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपल्या सहकाऱ्यांच्यासह व्हाईट हाऊस मध्ये पाहत होते. पाकमध्ये घुसून लादेनला ठार करेपर्यंत पाकिस्तानला याची काहीही कल्पना नव्हती. आणि लादेन मेल्यावर पाकिस्तानने अधिकृत प्रतिक्रिया द्यायला दहा बारा तास लावले हेही ध्यानात घेतले पाहिजे. बराक ओबामा यांची ढासळत चाललेली लोकप्रियता काही प्रमाणात वाढवण्यासाठी लादेनचा खात्मा त्यांना उपयोगी ठरेल यात शंका नाही. पण त्यामुळे दहशतवाद संपेल असे मानणे चुकीचे आहे.
लादेनला मारल्या नंतर अतिशय विचारपूर्वक व ठरवल्याप्रमाणे त्याचे दफन समुद्रतळाशी करण्यात आले .कारण तो पुन्हा हिरो ठरू नये. त्याचे स्मारक उभारले जाऊ नये म्हणूनच. यूएस स्पेशल फॉर्सेस नी अचानक मध्यरात्री हल्ला करून हे यश संपादन केले. लादेनला जिवंत पकडण्याचीच त्यांची योजना होती. पण त्याने प्रतिकार केल्याने त्याला ठार केले.लादेनसह त्याच्या घरात अमेरिकी अधिकाऱ्यांना आणखीही काही मिळाले आहे.ते म्हणजे अतिशय महत्त्वाची कागदपत्रे ,डीव्हीडी आणि संगणकाचे हार्ड ड्राइव्ह वगैरे बरेच.यात नेमके काय आहे हे सांगितले गेले नाही. पण त्या माहितीचे विश्लेषण सुरू आहे .अलकायदा आणि दहशतवादी संघटनांचे जाळे, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे स्त्रोत या साऱ्यांवर त्यामुळे प्रकाश पडणार आहे. लादेनचा खात्मा केल्यानंतर लगेचच अमेरिकेने इस्लामाबाद मधील दूतावास आणि पेशावर लाहोर व कराचीतील वकिलाती अनिश्चित काळासाठी बंद केल्या.
साधूंना मारल्यानंतर ती बातमी अमेरिकन जनतेला व जगालाही स्वतः राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितली. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले ,’लादेन ठार झाला म्हणजे दहशतवाला विरोधातील युद्ध संपले असे नाही. अलकायदा आमच्याविरुद्ध हल्ले करीतच राहील यात शंका नाही. त्यामुळे देशात आणि परदेशातही आम्हाला सदैव जागृत राहावे लागेल. आणि आम्ही तसे राहू .अमेरिकेने कधीही इस्लाम विरोधी युद्ध पुकारलेले नव्हते. आजही नाही. आणि भविष्यात ही तशी वेळ येणार नाही.बराक ओबामांनी या भाषणात बरेच काही मुद्दे मांडले व अखेर न्याय झाला आहे हे स्पष्ट केले.
हे सारे खरे असले तरी लादेनला मोठा कोणी केला ? दहशतवादाला खत पाणी कोणी घातले ?त्याला पैशापासून शस्त्रापर्यंतचा खुराक कोणी दिला ?दहशतवादाला चालना देणाऱ्या देशांना मुक्तहस्ते मदत कोण केली ? आपल्या स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर कोणी केला ? यासारखे प्रश्न उरतात. आणि त्या सर्व प्रश्नांचे उत्तर अमेरिका हेच येते यात शंका नाही. जागतिक राजकारणात व अर्थकारणात आपला एक कलमी हस्तक्षेप सुरू राहिला पाहिजे यासाठी अमेरिकेने नेहमीच जगभरच्या दहशतवाद्यांना व त्यांच्या कारवायांना मदत केली आहे. १९९० नंतर लादेन आणि इतर मंडळी अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनण्याऐवजी स्वतंत्रपणे काम करू लागली.अमेरिकेच्या विरोधात जाऊ लागली .हे बुमरंग उलटले आहे, असे दिसतात अमेरिका शांतताप्रेमी बनली. तसे बनल्याचे नाटक करू लागली. १० मार्च १९५७ रोजी जन्मलेला लादेन मारला गेला हे चांगलेच झाले .पण ही भुते वाढवते कोण ? हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. ओसामा हे अमेरिकेचे अनौरस आपत्य होते .त्याला अमेरिकेने मारले. या साऱ्या मुळे पाकची कोंडी झाली असली तरी अमेरिका चीन व पाकच्या विरोधात काही करण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे लादेनच्या खातम्याचे स्वागत करताना भारताने अधिक जबाबदारीने व सतर्कतेने याकडे पाहिले .
( वरील लेख ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकात मे २०११ च्या संपादकीय मध्ये लिहिला होता.)
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा