बालकवी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

५  मे हा बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन. मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून बालकवींचे स्थान सर्वमान्य आहे. १३ ऑगस्ट १८९० रोजी जन्मलेले बालकवी ५  मे १९१८ रोजी रेल्वे अपघातात कालवश झाले. अवघ्या २८  वर्षाचे आयुष्य लाभलेल्या बालकवींनी निसर्ग कवितेच्या क्षेत्रात अनमोल व अजरामर कामगिरी केली आहे.बालकवींच्या निवडक कवितांचे ‘फुलराणी ‘नावाने संकलन कुसुमाग्रजानी १९६८ साली केले होते. त्यात कुसुमाग्रज प्रारंभीच म्हणतात,’……. झाडाझुडपात, दऱ्याखोऱ्यात , नीर्झर न नद्यात, आकाश अवकाशात ठायी ठायी भरलेले दिव्य सौंदर्य त्यांनी बेभान होऊन गोळा केलेले आहे. किंबहुना रांगड्या मराठी मनाला निसर्गाच्या अलौकिक रूपाचे सूक्ष्म चमत्कार बघायला त्यांनीच शिकवले आहे. त्यांची संगीतमय सुरेल कविता या किंवा त्या कालखंडाची, या किंवा त्या साहित्यिक वादाला साकार करणारी कविता नाही.ती निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणून जगू पाहणाऱ्या महामानवाचीच चिरंतनाची व्यथा आहे.’

बालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगावचा. त्यांचे वडील पोलीस खात्यात होते. परिणामी फिरतीची नोकरी असल्याने बालकवींचे प्राथमिक शिक्षण एरंडोल ,यावल, जामनेर इत्यादी गावी झाले. माध्यमिक शिक्षण धुळ्याला झाले. संस्कृतचे पाठ त्यांनी आपल्या थोरल्या बहिणीकडून गिरवले . तिच्यामुळेच त्यांना कवितेची ही गोडी लागली. वयाच्या बारावी वर्षापासून ते कविता लिहू लागले. १९०७ साली जळगावच्या कवीसंमेलनात त्यांचा’बालकवी ‘म्हणून गौरव झाला. पुढे याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. १९०९ साली ते अहमदनगरला रेव्हरंड टिळकांच्या मार्गदर्शनाखाली शिकू लागले. रेव्हरंड टिळक व लक्ष्मीबाई टिळक यांच्याशी बालकवींचे मातृ-पितृ तुल्य संबंध होते. बालकवी ना टायफॉईड झाला त्यावेळी चाळीस दिवस या दोघांनी त्यांची सेवा सुश्रुषा केली होती. लक्ष्मीबाईंच्या स्मृतीचित्रे मध्येही बालकवींच्या काही आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत.नगरला शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. परिणामी १९११ साली काही काळ ते पुण्याला आले. तेथे त्यांचा राम गणेश गडकरी यांच्याशी स्नेह जुळला. याच दरम्यान त्यांच्या कविता मासिक मनोरंजन मधून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या .त्या रसिकांना आवडूही लागल्या. 

१९१६  साली ते खानदेशच्या उत्तरेला असलेल्या नेवालीला राहायला आले. कवी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रभर पसरलेली होती. पण त्यांचे कवीमान औदासीन्यग्रस्त झाले होते. त्यामुळे ‘ आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे ‘ पासून’ सुंदरतेच्या सुमनांवरचे दव चुंबून घ्यावे ‘ म्हणणारा हा कवी ‘ खराखुरा आनंदी असे की सर्वच हा आभास ? कोठूनी येतो मला कळेना उदासीनता ही हृदयाला ‘ असे लिहू लागला. 

नेवालीहून पुन्हा नगरला बालकवी आले.’ येईल एक परी धन्य दिवस सौख्याचा जो करील तुझ्यासह अंत तुझ्या गीताचा ‘  असे लिहिणारे बालकवी ५ मे १९१८ रोजी भादवी रेल्वेस्टेशन जवळ रेल्वे ओलांडताना रेल्वेखाली सापडून कालवश झाले .त्यांच्या निधनानंतर १९२३साली  ‘ ‘बालकवींची कविता’ हा संग्रह ए.या. निफाडकर यांनी संपादित केला. नंतर गो.गो.अधिकारी ,भा.ल. पाटणकर, पार्वतीबाई ठोंबरे, कुसुमाग्रज आदी अनेकांनी त्यांच्या कवितांचे संपादन करून संग्रह काढले. निसर्गापासून तुटले पण आलेल्या आजच्या काळात बालकवीं सारख्या सर्वश्रेष्ठ निसर्ग कवीला नव्याने समजून घेण्याची नितांत गरज आहे. 

बालकवींच्या कवितांप्रमाणे त्यांनी गडकरी, देवदत्त टिळक, लक्ष्मीबाई टिळक, भास्करराव उजगरे, सोनाळकर आदिना लिहिलेल्या पत्रातूनही त्यांच्या उत्कट, मनस्वी , मिश्किल ,प्रेमळ, उदासीन स्वभाव दिसून येतो. त्यांनी काही ललित लेख लिहिले.बालकवींनी १६३ कविता लिहिल्या. त्या कवितांमधून विविध रंगाची उधळण त्यांनी केलेली आहे. डॉ. रा.शं.वाळिंबे यांनी म्हटले आहे की,’  प्रेम आणि सौंदर्य या गोष्टींचा अत्यंतिक प्रभाव सर्व आयुष्यभर बालकवींच्या मनावर होता. तो कधीही थोडासुद्धा कमी झाला नाही .किंबहुना वयाबरोबरच तो वाढतच गेला असे म्हटले तरी चालेल. प्रेम आणि सौंदर्य दोनच गोष्टीत त्यांच्या साऱ्या चित्तवृत्तींचा परिपूर्ण लय झालेला आहे.’ या निमित्ताने त्यांच्या काही कविता जाणून घेतल्या पाहिजे. 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन 

निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून 

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे 

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे ….

औदुंबर नावाच्या या केवळ आठ ओळीच्या कवितेतून बालकवी एक चित्र उभे करतात.अतिशय प्रभावी शब्दांची ठेवण येथे दिसते. पण त्याच वेळी कविता वाचताना शब्दांचे शब्दपण लय पावत जाते आणि तिथे नितांत मनोहरी चित्र उभे राहते. 

आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे

 वरती खाली मोद भरे वायु संगे मोद फिरे…

ही पाच कडव्यांची कविता अतिशय गाजलेली आहे. या कवितेबाबत कुसुमाग्रज म्हणतात,’ माणसाच्या परमोच्च आनंदाचे निदान मानवी व्यवहारात नसून निसर्ग सौंदर्याच्या निरामय आविष्कारात आहे अशी बालकवींची श्रद्धा होती. या कवितेतून प्रगट झालेली नैसर्गिक सौंदर्याची अनुभूती सूक्ष्म नसून स्थूल व सांकेतिक आहे. तरी देखील सहज सुंदर आणि नादरम्य लेखनामुळे बालगीताशी जवळीक असलेली एक मधुर आकर्षकता या कवितेला लाभलेली आहे. ‘

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

 क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

 श्रावण महिन्यातील वातावरणाचे नेमके वर्णन करणाऱ्या या कवितेत बालकवी आकाश, पक्षी, हरीण असे करत करत माणसाजवळ येऊन थांबतात. देवदर्शनाला निघालेल्या ललनांच्या मुखावर श्रावणाचे सारे मांगल्य गीतरूपाने उतरले आहे असे सांगताना या कवितेच्या शेवटी ते म्हणतात ,

देवदर्शना निगती ललना हर्ष माइना हृदयात

 वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत…

‘तू तर चाफेकळी’ ही बालकवींची एक अपूर्ण कविता आहे. पण अपूर्ण असूनही तिच्या आस्वादात कुठेही अडकाठी येत नाही.हे तिचे वैशिष्ट्य आहे. मराठीतील एक उत्तम दर्जाचे प्रेमगीत म्हणून गेले शतकभर त्याचा गौरव झाला आहे .

गर्भाशभोवती रान साजणी तू तर चाफेकळी

काय हरवले सांग शोधशी या यमुनेच्या जळी ? 

असे म्हणणारे बालकवी प्रीती हवी तर या कवितेत म्हणतात,

 प्रीती हवी तर जीव आधी कर आपुला कुर्बान

 प्रीती हवी तर तळहातावर घे कापूनी मान

 तलवारीची धार नागिणी लस लसती प्रीत 

याद ठेव अंगार जगाला लावील निमिषात..

बालकवींच्या कवितातून प्रेम, सौंदर्य आणि आनंद याची पाखरण आहे. निसर्गाशी त्यांची तादात्मताही सौंदर्य शोधाचा प्रवास ठरते. डॉ. वाळिंबे यांनी म्हटले आहे की,’….. सौंदर्य हेच एक मूलतत्त्व असून आनंद व प्रेम ही त्यांची वेगळी स्वरूपे आहेत. या सौंदर्यतत्त्वाचाच बालकवीना ध्यास लागलेला आहे. बालकवींनी प्रत्यक्षपणे सौंदर्य आणि सत्य या गोष्टी एकरूपच आहेत असे म्हटलेले नाही.तथापि सौंदर्य आणि प्रेम या गोष्टी ते अभिन्न मानीत आहेत.या दोन तत्त्वांच्या जोडीला आनंद हे तत्व मानले म्हणजे सौंदर्य, प्रेम ,आनंद ही बालकवींची त्रिपुटी तयार झाली.’ विश्वात्मक सौंदर्याचा ध्यास घेऊन जगणाऱ्या व लिहिणाऱ्या बालकवीना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया