अरुण दाते : नभांगणातील शुक्रतारा 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

४  मे आणि ६ मे या दोन तारखा म्हणजे नभंगणातला शुक्रतारा असलेल्या अरुण दाते यांचा जन्मदिन व स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी भावगीतातील सुस्वर म्हणून ज्यांचे वर्णन करता येईल, ते रसिकप्रिय,लोकप्रिय आणि भावगीत रसिकांच्या मनातील शुक्रतारा असलेले, तलम मुलायम आवाजाचे जादूगार म्हणजे अरुण दाते. मराठी भावगीत गायनाच्या एका पर्वाचा अरुणोदय त्यांनी केला.’ असेन मी नसेन मी परी असेल गीत हे ‘असे त्यांनी गायलेले शब्द त्यांच्या बाबतीत खरे ठरणार आहेत एवढे संस्मरणीय गानधन त्यांनी मागे ठेवलेले आहे.त्या अर्थाने अरुण दाते अमर आहेत.

इंदूरमध्ये ४ मे १९३४ रोजी जन्मलेले अरुण जाते हे प्रसिद्ध गवई रामू भैय्या दाते यांचे चिरंजीव. इंदूर संस्थानात अधिकारी असलेल्या रामूभैय्या यांच्या घरी नामवंत गायकांच्या सातत्याने बैठक होत असत .इथूनच सुर संगीताचे बाळकडू अरुणजीना मिळाले होते.खरंतर वस्त्रउद्योगात करिअर करण्यासाठी त्यानी टेक्स्टाईल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. वस्त्र अभियंता म्हणून जवळजवळ तीन दशके नोकरीही केली.पण हे करत असतानाच ते वडील रामूभैय्या दाते, कुमार गंधर्व आणि पु ल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गायक म्हणून घडत होते.

वयाच्या बावीसाव्या वर्षापासूनच ते आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२ साली  शुक्रतारा मंदवारा ची ध्वनीमुद्रिका निघाली आणि तेव्हापासून त्यांची लोकप्रियता वाढत गेली.अरुण दाते यांच्या गायकीचे गारुड रसिकांवर फेर धरू लागले . इंदूरसारख्या हिंदी मुलखात राहत असल्याने आपल्या मराठी शब्दोचाराबद्दल  साशंक असणाऱ्या अरुण दाते यांनी मराठी शब्द अशा तरलपणे रसिकांच्या हृदयात पोहोचविले की ते हिंदी मुलखातून आले आहेत याची शंकाही कधी कोणाला आली नाही.मराठी भावगीतांच्या नभांगणात या शुक्रताऱ्याने आढळस्थान निर्माण केले. 

अरुण दाते हिंदी गाणी गाताना ए. आर . दाते असे नाव घ्यायचे. शुक्रताराचे आकाशवाणीवर रेकॉर्डिंग झाले व अरुणजी इंदूरला गेले. मराठी आकाशवाणीवर इंग्रजी आद्याक्षरांच नाव असू नये म्हणून आकाशवाणीच्या निवेदिका कमलीने विजयकर यांनी त्यांचे मूळ नाव आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमाचे निर्माते पंडित यशवंत देव यांना विचारले.यशवंत देव यांनाही त्यांचे खरे नाव माहीत नव्हते. पण वडील त्यांना अरु नावाने हाक मारतात हे त्यांनी ऐकले होते. त्यावरून त्यांनी अरुण असे  नाव असावे असे अंदाज बांधला व अरुण दाते हे नाव आकाशवाणीवरून प्रसारित झाले.आणि तेच नाव पुढे रूढ झाले. अरुणजींनीही ते कधी बदलले नाही.खरे तर त्यांचे मूळ नाव अरविंद होते.पहिल्याच मराठी भावगीतापासून अरविंदचे अरूण होणे आणि तेही देवांनी करणे आणि ते यशवंत होणे ही सारीच मजेदार अर्थ मीपूर्ण कथा आहे. 

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात ऐन भरात होते. लोकमान्य टिळकांचे नेतृत्व कालवश होऊन महात्मा गांधीजींकडे स्वातंत्र्याची सूत्र येत होती. मराठी कवितेतही याच काळात बदल होत गेले. या काळात आकाशवाणी उदयाला येत होती.मराठी नाट्य संगीताचा प्रभाव ओसरू लागला होता. रविकिरण मंडळ नावाचे कवी मंडळ उदयाला येत होते. मराठी कवितेला रसिकप्रिय बनवणाऱ्या या मंडळाची स्थापना १९२३ मध्ये झाली होती. या मंडळात श्रीधर बाळकृष्ण रानडे, मनोरमाबाई रानडे ,माधव जुलियन ,यशवंत, गिरीश, गं.त्र्यं.माडखोलकर, द. ल. गोखले आणि दिवाकर असे आठ सदस्य होते.दिवाकर बाहेर पडल्यावर वि. द.घाटे त्यात आले. या आठ जणांच्या मंडळात सात पुरुष आणि एक स्त्री असल्याने ‘अरुंधतीसह सप्तर्षी ‘हे या मंडळाचे प्रतिक बनले. मंडळाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांवरही ते छापले जाऊ लागले.रविकरण मंडळाने मराठी भावकवितेचा पाया रचला.मराठी कविता त्यांनी अधिक धीट केली. कालसुसंगत तर केलीच आणि काळाच्या पुढेही नेली. या कवीनी सामाजिक प्रश्न तडफेने मांडले. तसेच प्रेमभावनेसाठीचा राधा कृष्ण वगैरे प्रतिक्र न मांडता सरळ मी तू ही प्रतीके कवितेत आणली. हा बदल फार मोठा होता. रवीकरण मंडळ अल्पकाळ चालले असले तरी त्यांचे कार्य नजरेआड करता येत नाही. ही सारीच माणसे उत्तुंग होती. या आठपैकी माधव युनियन ,यशवंत, गं.त्र्यं.माडखोलकर आणि वि.द.घाटे हे चार जण पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. यावरून रवी किरण मंडळाचे कार्य लक्षात येईल. 

इंग्रजीतील लिरिक म्हणजे मराठीतील भावगीत हा एक काव्यप्रकारच आहे. डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी म्हटल्याप्रमाणे,’  काव्याशयाच्या  अंगाने कवीची आत्मनिष्ठा, भावोत्कटता आणि अभिव्यक्तीच्या अंगाने गेयता व लयबद्धता ही या काव्यप्रकाराची प्रमुख लक्षणे म्हणता येतील. या भावगीतांनी कविता चालीत म्हणण्याची परंपरा निर्माण केली. राग संगीताला आणि काव्यभावाला एकत्र आणणारा हा प्रकार गेली ८०/९०  वर्षे मराठीत लोकप्रिय आहे. त्यातील तब्बल ५५ वर्षे अरुण दाते यांच्या गायकीने आपली मोहर उमटवली आहे. व एक नवी परंपरा निर्माण केली. हे अरुण दाते यांचे वेगळेपण आहे. 

मराठी भावगीत गायनाला एक मोठी परंपरा आहे.जे . एस.रानडे, जी.एन. जोशी, लीला लिमये,गजानन वाटवे,बबनराव नावडीकर ,गोविंद कुरवाळीकर, अशोक जोगळेकर , राम पेठे,विश्वास काळे ,दत्ता वाळवेकर, माणिक वर्मा , ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, सुधीर फडके, केशवराव भोळे ,लता मंगेशकर ,आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर ,सुमन कल्याणपुर अशा अनेकांचे फार मोठे योगदान त्यात आहे.पण, अरुण दाते यांनी वयाच्या पन्नाशीनंतरचे सर्व आयुष्य केवळ आणि केवळ भावगीत गायनाला देऊन या क्षेत्राचा सर्वांगीण विकास केला.देश-विदेशात अडीच तीन हजार कार्यक्रम केले.पंधरा वीस ध्वनीमुद्रिका काढल्या.त्यामुळे ते शब्दशः जगभरातील करोडो मराठी रसिकांपर्यंत पोहोचले. आणि भावगीतांच्या क्षेत्रातील अढळ स्थान त्यांनी निर्माण केलं .अर्थात त्यांना पंडित यशवंत देव ,श्रीनिवास खळे ,मंगेश पाडगावकर अशा साहित्य आणि संगीतातील अनेक दिग्गजांचेही मोठे सहकार्य मिळाले यात शंका नाही. 

‘शतदा प्रेम करावे ‘ या आत्मचरित्रात त्यांनी आपला जीवन प्रवास चितारला आहे. नव्या जुन्या पिढीच्या सर्व सहकाऱ्यांशी, कलाकारांशी त्यांचे ममत्वाचे संबंध होते. प्रचंड लोकप्रियता मिळूनही कायम जमिनीवर राहण्याचे भान मनी जपणारा व ते कृतीत आणणारा हा अव्वल कलावंत होता. गझल गायकीसाठीही अरुणजींचा आवाज फारच उत्तम होता. पण तुलनेने त्यांनी फारशा मराठी गझला गायल्या नाहीत.सुरेश भटांच्या काही गझलांना अरुणजींचा स्वरसाज मिळाला असता तर मराठी गझल गायकीही अधिक उंचीवर गेली असती असे नम्रपणे म्हणावे वाटते. पण भावगीताच्या क्षेत्रात त्यांनी मिळवलेले आढळस्थान  मराठी साहित्य संस्कृतीच्या इतिहासात कायमपणे कोरले गेलेले आहे. 

शुक्रतारा मंद वारा, दिवस तुझे हे फुलायचे ,भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी ,स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील ,भेट तुझी माझी स्मरते ,जेव्हा तिची न माझी चोरून भेट झाली, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही ,असेन मी असेन मी तरी असेल गीत हे ,मान वेळाउनी धुंद बोलू नको ,जपून चाल पोरी जपून चाल ,आज हृदया मम विशाल झाले , संधीकाळी या अशा ,पहिलीच भेट झाली ,डोळे कशासाठी, अखेरचे येतील माझ्या तेच शब्द ओठी यासारखी असंख्य गीते आपला स्वर साज साथ देऊन रसिकांच्या पिढ्यान पिढ्यांना बहा ल करणाऱ्या या महान गायकाला विनम्र अभिवादन..!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया