फुले
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
महाराष्ट्र ‘ पुरोगामी आहे ‘असे जे म्हटले जाते त्याचे गेल्या दीडशे वर्षातील श्रेय महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्याला द्यावे लागेल. कारण आता पुरोगामी शब्दाची ‘फुरोगामी ‘अशी हटाळणी सुरू असण्याच्या आणि महाराष्ट्र ‘पुरोगामी होता ‘ या वास्तवाच्या काळात आपण वावरत आहोत. या पार्श्वभूमीवर केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला फुले दांपत्याचे विचारधन व योगदान वास्तव स्वरूपात समजून सांगण्यात ‘ फुले ‘ हा चित्रपट निश्चित एक महत्त्वाची भूमिका बजावतो असे म्हणावे लागेल. त्यामुळे ज्यांना फुले समजून घ्यायचे आहेत त्यांनी आणि स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे.
कारण असे अस्सल विवेकवादी, समतावादी , समाजाला योग्य विचार देणाऱ्या विचारधारेचे चित्रपट बॉक्सऑफिसच्या तथाकथित गणितातही यशस्वी होऊ शकतात हे दाखवून देण्याचीसुद्धा आज गरज आहे. चांगल्याला चालना देण्याच्या विचाराची चळवळ नव्याने उभारण्याची गरज आहे. कारण एकीकडे समाजातली जात्यांधता व धर्मांधता पद्धतशीरपणे वाढवत नेली जात आहे. त्यामुळे जीवन मरणाच्या प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते आहे. गरिबांना मोफत अन्नधान्याचे वाटप करून आणि मध्यमवर्गीयांना तुलनेने कमी पैशात इंटरनेट उपलब्ध करून देऊन आणि त्यांना रील्स पासून मालिकांपर्यंतच्या मनोरंजनात मश्गूल ठेवून त्यांना स्वकेंद्री , माणूसघाणे समाजद्वेष्टे बनवले जात आहे. माणसे मारण्यापेक्षा मेंदू विचारहीन बनवणे हा सोपा मार्ग सध्या प्रस्थापित भांडवली अर्थकारणाने व राजकारणाने रूढ केला आहे. आणि त्याची शिकार करोडो माणसे होत आहेत हे अस्वस्थ वर्तमान आहे.
‘फुले’ हा’हिंदी चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची नव्या पिढीला चांगल्या पद्धतीने ओळख करून देणारा एक चरित्रपट आहे. फुले दांपत्याच्या कार्यकर्तुत्वावर यापूर्वी काही चित्रपट ,नाटके घेऊन गेलेली आहेत. मात्र त्यावर फारसा कोणी आक्षेप घेतलेला नव्हता. सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे १९५४ साली आचार्य अत्रे यांनी महात्मा ज्योतिराव फुले हा चित्रपट बनवीलेला होता. त्याचे दिग्दर्शन करत पटकथाही आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिलेली होती. या चित्रपटाच्या प्रारंभाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माईसाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते. या चित्रपटात बाबुराव पेंढारकर ,बापूराव माने, दामूअण्णा जोशी, सरस्वती बोडस ,प्रबोधनकार ठाकरे अशा अनेकांनी भूमिका केलेल्या होत्या. या चित्रपटात काही क्षण संत गाडगे महाराजांचेही दर्शन झालेले होते.या चित्रपटाला १९५५ साली राष्ट्रीय पुरस्कार अर्थात राष्ट्रपतींचे रौप्य पदक मिळालेले होते. हा चित्रपटही आशयासंपन्न होता. त्याचप्रमाणे श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ भारत एक खोज ‘ या मालिकेत महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर एक वीस पंचवीस मिनिटांचा आढावा पट प्रकाशित झालेला होता.आणि अलीकडेच आलेला निलेश जळमकर यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला ‘ सत्यशोधक ‘हा चित्रपटही महत्त्वाचा होता. फुले दांपत्याच्या विचारांचे बारकावे या चित्रपटाने चांगल्या पद्धतीने मांडले होते हेही इथे नमूद करावे लागले. तसेच काही नाटके वगळता महात्मा फुले यांच्यासारख्या एका अग्रणी व्यक्तित्वावर चित्रपट माध्यमातून बरेच काही यायला हवे होते पण फारसे आले नाही हेही खरे आहे.
‘फुले ‘ चित्रपटाचे ट्रेलर प्रकाशित झाल्यावरच काहीं आक्षेप घेण्यात आले .त्यामुळे ११ एप्रिल २०२५ रोजी प्रकाशित होणारा हा चित्रपट स्थगित होऊन २५ एप्रिल रोजी रोजी चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला. खरे तर असा आक्षेप घेण्याचे काहीही कारण नव्हते. पण जे आक्षेप घेतले त्याची दखल घेण्यात आली. काही बदलही करण्यात आले. मात्र मुद्दा हा आहे की हा चित्रपट संदेश देतो तो फार महत्त्वाचा आहे. ‘ इतिहास आपण बदलू शकत नसलो तरी त्यापासून बोध घेऊन पुढील वाटचाल केली पाहिजे ‘ असा समारोप हा चित्रपट करतो त्याचे महत्त्व आजच्या काळात मोठे आहे. सत्यशोधन काय असतं आणि कसं असतं, सामाजिक परिवर्तन म्हणजे काय, सत्यासाठी कोणती किंमत द्यावी लागते हे हा चित्रपट सांगतो. दीडशे वर्षांपूर्वी फुले यांनी मांडलेले विचार आपण आजही पचवू शकलो नाही ही बोच हा चित्रपट देतो. आणि म्हणूनच तो विचार प्रवृत्तही करतो. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे ही भूमिका मांडणारे ज्योतिबा आधुनिक भारतातील पहिले सामाजिक विचारवंत होते. त्यांनी उक्तीला कृतीची जोड दिली. विचाराला शब्दबद्ध केले. महात्मा फुले यांच्या विचाराला ,कार्याला सावित्रीबाईंनी समर्थपणाने साथ दिली .विचाराने एकरूप झालेलं आणि त्यावर निष्ठा ठेवून कृतिशील आदर्श निर्माण करणारे हे जोडप खरोखरच अद्वितीय होत.
ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रतीक गांधी व पत्रलेखा यांनी ज्योतिबा व सावित्रीबाईं यांच्या भूमिका अतिशय सक्षमपणे केल्या आहेत. त्यांच्या अभिनयातून त्यांनी संयतपणा, ठामपणा, करारीपणा नेमका साकारला आहे.
तर इतर भूमिकांमध्ये विनय पाठक,सुरेश विश्वकर्मा,सुशील पांडे ,विशाल तिवारी,जॉय सेनगुप्ता,अमित बहल,अक्षया गुरव,जयेश मोरे,धनंजय माद्रेकर, दर्शिल सफारी,असित रेडिज,अभिनव पाटेकर,आकांक्षा गाडे,अभिनव सिंग राघव,अॅलेक्स ओनेल, एली आदी अनेक कलाकारांनी इतर महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत.
चित्रपटाला संगीत रोहन-रोहन यांनी दिले आहे. तर गीते कौसर मुनीर आणि सरोश आसिफ यांनी लिहिली आहेत. तसेच सुनिता राडिया यांनी केलेले छायाचित्रणी नितांत सुंदर चित्रपटासाठी उभारलेले सेटही तो काळ उभा करतात.
हा चित्रपट चित्रपट माध्यम म्हणून अजून सकस करता आला असता की नाही याचा विचार केला तर तो नक्कीच अजूनही प्रभावी होऊ करता आला असता असे वाटते. हा चित्रपट तांत्रिक अंगाने चांगला आहेच.पण वैचारिक अंगाने त्याचे महत्त्व जास्त आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे बघितले पाहिजे. हा मनोरंजन पट नाही तर बोधपट आहे ,विचारपट आहे. आणि मुख्य म्हणजे अवघ्या दीडशे वर्षांपूर्वी घडून गेलेला सत्य इतिहास आहे. एकीकडे ब्रिटिश सत्ता आर्थिक शोषण करत होती. दुसरीकडे इथली जातीय उतरंडीची व्यवस्था बहुजन समाजाचे भावनिक व मानसिक शोषण करत होती. त्या शोषणाविरुद्धचा हे विवेकी मार्गाने दिलेला लढा आहे. हा लढा अहिंसक आणि बौद्धिक आहे. माणसाकडे माणूस म्हणून पाहणार आहे. आणि म्हणूनच त्याचे महत्त्व फार मोठे आहे.
आज ज्या पद्धतीने वैचारिक प्रदूषण वाढते आहे, सत्य शोधणाऱ्या वर हल्ले केले जात आहेत, इतिहास हवा तसा सांगितला जात आहे, महामानवांचे नाव केवळ भाषणात उच्चारण्याची व त्यांचे विचार वर्तन व्यवहार व धोरणात पद्धतशीरपणे बाजूला करण्याच्या काळात महात्मा फुले नव्या पिढीला समजणे गरजेचे होते. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न नाटक, छत्रपती शिवाजीराव राजे भोसले यांचा पोवाडा ,विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजीचा पोवाडा, ब्राह्मणाचे कसब,गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तके,हंटर कमिशन समोर केलेले निवेदन,मराठी ग्रंथकार सभेस लिहिलेले पत्र , ग्रामजोश्यासंबंधी जाहीर खबर ,मामा परमानंद यांना लिहिलेले पत्र , सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधि , त्यांनी लिहिलेल्या अनेक अखंडरूपी काव्यरचना असे विविध स्वरूपाचे लेखन केले. त्या लेखनातून त्यांची एक विवेकवादी समतावादी भूमिका स्पष्ट दिसते. मात्र हे सारे न वाचताच त्यांच्यावर टीका करणारे संख्येने कमी नाहीत. अगदी ‘ हे कुठले फुले ,ही तर फुले नावाची दुर्गंधी ‘या नावाचा बेहरे यांचा लेखही आपल्याला ज्ञात आहे. तसेच फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाला ‘मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा ‘ आणि ‘ विश्व कुटुंबवादाची गाथा ‘अशी सार्थ विशेषण देणारे चरित्रकार धनंजय कीर ही भेटतात.
या सर्व पार्श्वभूमीवर फुले यांची विचारधारा वस्तुनिष्ठ स्वरूपातून हा चित्रपट मांडतो हे त्याचे समकालीन महत्व मोठे आहे. मूळचे गोऱ्हे असे आडनाव असलेले फुले कसे झाले, पेशव्यांनी त्यांच्या कौशल्याला दाद देत इनाम म्हणून दिलेली जमीन, ज्योतिबांची लहानपणापासून दिसून येणारी बुद्धिमत्ता, त्यांनी घेतलेले इंग्रजी शिक्षण, वर्ण व्यवस्थेचे बसलेले चटके, अंगावर सावलीही पडून न देणारे उच्चवर्णीय, त्याचबरोबर ज्योतिबांचे विचार पटल्यामुळे त्यांना सहकार्य करणारे उच्चवर्णीय, सावित्रीबाईंचे शिक्षण ,त्यांचे शिक्षिका होणे, त्यासाठी पडेल तो अपमान झेलणे, ब्रिटिश जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांचे सहकार्य , तसेच त्यातील डावही, लहुजी उस्ताद यांचे मिळालेले सहकार्य, उस्मान व फातिमा शेख यांची अखंड साथ,ज्योतिबांचा मोठा बांधकाम व्यवसाय, इंग्रजी शिक्षणामुळे त्यांना थॉमस पेन पासून मार्टिन ल्युथर पर्यंतचा झालेला परिचय, समाज सुधारण्याचा पक्का विचार व त्यासाठीचा खटाटोप, समाज परिवर्तनाची एक निश्चित भूमिका ठेवून केलेले वास्तवदर्शी लेखन, सत्यशोधक समाजाची स्थापना, बालविवाह बंदीला विरोध, विधवा पुनर्विवाहला पाठिंबा, बालकाश्रमाची निर्मिती, अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून पाण्याचा हौद खुला करण्यापासून केलेले अनेक उपक्रम, महात्मा ही पदवी, उजवी बाजू लकव्याने कमजोर झाली असताना पण अजून मेंदू पूर्ण शाबूत आहे असे म्हणत बोलणारे व डाव्या हाताने लिहिणारे फुले, मारेकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्याचे प्रसंग, यशवंतला दत्तक घेऊन डॉक्टर करणे आणि या साऱ्यामध्ये सावित्रीबाईंची असामान्य साथ अशा अनेक बाबी या चित्रपटातून परिणामकारक मांडल्या आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या नात्यातील तरुणपणापासून वार्धक्यापर्यंतचे अनेक तरल प्रसंग अतिशय तलमपणे इथे मांडले आहेत. फुले पक्के विवेकवादी होते यात शंका नाही. तसेच ते सच्चे कवीही होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांचे हळवे पण आणि काठीण्य दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने मांडले आहे. ही ही एक या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
या चित्रपटात महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाचा विचार नेमकेपणाने पुढे ठेवण्याचा दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. हा चित्रपट प्रदर्शित होत असताना दिग्दर्शक अनंत महादेवन यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.त्यात ते म्हणतात,’ फुले चित्रपट केवळ एक बायोपिक नाही. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी जाती आणि लिंगभेद दूर करण्यासाठी आणि विधवांना सन्मान देण्यासाठी सुरू शांततामय मार्गाने केलेल्या सामाजिक क्रांतीचे हे चित्रण आहे. १७५ वर्षांपूर्वी सुरू झालेले प्रगतीशील ध्येय अजूनही पूर्ण झालेले नाही. आपण त्यांच्या कामगिरीची महानता आणि समाजावरील त्यांच्या योगदानाचा प्रभाव विसरलो आहोत. यामुळे मला हिंदीमध्ये सत्तर मिमी चित्रपट तयार करण्यास भाग पाडले.ते त्यात यशस्वी झाले आहेत असे म्हणावे लागेल.तसेच या चित्रपटात सावित्रीबाईंना केवळ महात्मा फुले यांची पत्नी, सहकारी ,अनुयायी एवढेच न दाखवता काही प्रसंगी सावित्रीबाई नेतृत्व करताना दिसतात,महत्त्वाची भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. लग्नानंतर मूल होत नसल्यामुळे घरच्यांचे व बाहेरच्यांचे टोमणे खाव्या लागणाऱ्या तरुण सावित्रीबाई पासून प्रत्येक वंचितच आमचे आपत्य आहे अशी व्यापक भूमिका मांडणाऱ्या सावित्रीबाई इथे दिसतात. एकूण काय तर हा चित्रपट परिवर्तनाशी व प्रबोधनाशी बांधिलकी असलेल्या प्रत्येकाने पाहिला पाहिजे असे वाटते.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)
,

यावर आपले मत नोंदवा