महामानवांचे पुतळे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही पुतळ्यांची विटंबना, पुतळे पडणे, विना परवाना अचानक पुतळे उभारणे असे अनेक प्रकार घडत आहेत.वारंवार घडत आहेत. पुतळ्यांची विटंबना ,त्यातून बंद, दंगल वातावरणातील असह्य होणारा तणाव असे प्रकार वाढत आहेत. महान व्यक्तींचे पुतळे जसे समाजाच्या आदराचे  प्रतिक असतात तसेच ते समाजविरोधी, समाजस्वास्थ्य विरोधी शक्तींच्या विकृत प्रकटीकरणाचेही साधन बनलेले आहेत.खरे तर पुतळ्यांचे पावित्र्य नष्ट केल्याने त्या व्यक्तीचे विचार नष्ट होतात असे नाही. अनेक महामानवांच्या जिवंतपणेही त्यांना अंगावर घाण झेलणे,दगड धोंडे स्वीकारणे, निंदानालस्ती करून घेणे,  इतकेच काय तर याची देही याची डोळा आपली प्रतिकात्मक अंत्ययात्राही पहावी लागली आहे. तरीही ही मंडळी आपले विचार पेरतच राहिली पर्यायाने ती अमर राहीली.

पुतळ्यांबाबत कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आहे. त्या कवितेत ते लिहितात,मध्यरात्र उलटल्यावर / शहरातील पाच पुतळे /एका चौथऱ्यावर बसले /आणि टिपं गाळू लागले / ज्योतिबा म्हणाले  /शेवटी मी झालो / फक्त माळ्यांचा / शिवाजीराजे म्हणाले /मी फ़क्त मराठ्यांचा/आंबेडकर म्हणाले /मी फ़क्त बौद्धांचा /टिळक उद्गारले /मी तर फ़क्तचित्पावन ब्राम्हणांचा /गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला /आणि ते म्हणाले /तरी तुम्ही भाग्यवान / एकेक जातजमात तरी / तुमच्या पाठीशी आहे /माझ्या पाठीशी मात्र /फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती ! अखंड मानव जातीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या महामानवांच्या या पुतळ्यांचे दुःखही अतिशय वास्तव आहे.

या निमित्ताने आणखी एक बाब आपण आता परिस्थितीची गरज म्हणून स्वीकारली पाहिजे ती म्हणजे आपण पुतळा  मॅनियातून बाहेर आले पाहिजे. पुतळे आता माणसांच्या दांभिकपणाला विटले आहेत. जयंत्या ,मयंत्या साजऱ्या करायच्या पण विचारांना हरताळ फासायचा व या वर्तनाचा उबग येत ‘ समाधान ‘या कवितेत कुसुमाग्रज लिहितात, ” जयंतीच्या उत्तररात्री / सर्वत्र सामसूम झाल्यावर / पुतळ्याने झटकून टाकले /अंगाखांद्यावर साचलेले असंख्य नमस्कार /आणि पुटपुटला / सुदैवाने /पुढील जयंती पर्यंत /मला फक्त /कावळेच सहन करावे लागतील.”

नव्याने पुतळे उभारणे बंद केले पाहिजे. पुतळ्या ऐवजी त्या व्यक्तीचे विचार जोपासणारे रुग्णालय, ग्रंथालय, क्रीडा केंद्र , कलादालन ,विद्यालय असे कोणतेही केंद्र सुरू केले पाहिजे. तिथे प्रवेशद्वारावर त्यांची उत्तम प्रतिमा ठेवता येईल.तेच त्यांचे योग्य व खरे स्मारक ठरू शकेल. आपण आदराप्रीत्यर्थ पुतळे उभा करतो पण विकृत मंडळी त्याची विटंबना करतात.पुतळ्यांची विटंबना करणारी मंडळी एक तर खुशालचेंडू चंगळवादी संस्कृतीची पिल्लं आहेत.किंवा वाढत्या सामाजिक ,आर्थिक ,सांस्कृतिक विषमतेने हैराण झालेली अगतिक माणसे आहेत. तसेच समाजात वारंवार अस्थिरता माजवून विकृत आनंद मिळवणारी एक मनोवृत्ती सर्वच समाजात सर्वकाळ वास करत असते. म्हणूनच पुतळे उभारण्यापासून ते विटंबनेपर्यंतच्या सामाजिक घटनांकडे आपण सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. कारण पुतळा हे भावनिक राजकारणाचे मतांच्या ध्रुवीकरणाचे साधन बनता कामा नये. तसे कोणी करत असेल तर जनतेनेही तो प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नये. पुतळा उभारणी हा केवळ दिखाऊ अस्मितेचा प्रश्न असू नये. कारण खरी अस्मिता त्या महापुरुषाच्या विचारांचा सच्चा अनुयायी बनणे व तसा वर्तन व्यवहार करणे ही आहे.

पुतळे प्रेरणादायी असतात आवश्यक असतात. ते ऐतिहासिक घटना व संस्कृतीची आठवण करून देत असतात. त्याचे प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. पुतळे सौंदर्य, सर्जनशीलता, कलात्मकता यांची पेरणी करत असतात. एका अर्थाने पुतळा म्हणजे राष्ट्रीय स्मारक असते. पण एकदा पुतळा उभारल्यानंतर या भावनेने त्याकडे पाहिले जाते का हा मोठा प्रश्न आहे. नाहीतर कुसुमाग्रजांनीच लिहिलेली पुतळे आभार मानतात या कवितेसारखे होते. ते लिहितात ” तुमचे हार पोहोचले /जयघोष ही पोहो चले /कल्पनेतही नसलेले लष्करी कुर्निसातही पोहोचले / फासावर चढताना / संसार जळताना / रक्त सांडताना / आमचे एक स्वप्न होते / रंकाच्या माथ्यावरील छपराचे / उघड्या अंगावरील वस्त्रांचे /उपाशी पोटातील अन्नाचे / स्वातंत्र्यातील सफलतेचे / घोष विरल्यावर / दिवे विझल्यावर / मध्यरात्रीच्या निवांतात/ गिधाडांचे थवे आले / त्या स्वप्नाचे तुकडे चोचीत घेऊन /तेही पोहोचले.”

खरे तर शहराच्या मध्यवर्ती भागात एका प्रशस्त जागेत शहरातील सर्व पुतळे एकत्र आणून तो सारा परिसर सुशोभित केला पाहिजे.तेथे त्या महापुरुषांच्या जीवन चरित्रातील महत्त्वाच्या घटना, प्रसंग ,त्यांचे विचार फलकाद्वारे प्रदर्शित केले पाहिजेत. सर्व पुतळे एकत्रित आसल्याने समाजामध्ये संदेशही अतिशय चांगल्या प्रकारचा जाऊ शकेल. एक प्रकारचा सामाजिक ऐक्यभाव त्यातून तयार होऊ शकतो.

 (लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया