प्रा. वांगारी मथाई : ग्रीन बेल्टची जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

१ एप्रिल हा प्रा. वांगारी मथाई यांचा जन्मदिन. आफ्रिकी संघाच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि पर्यावरण रक्षण, मानवाधिकार आणि महिलांना अधिकार मिळवून देण्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रा. वांगारी मथाई  या एक फार मोठ्या विदुषी होत्या. त्यांचा जन्म १ एप्रिल १९४० रोजी झाला तर २५ सप्टेंबर २०११ रोजी त्या गर्भाशयाच्या कर्करोगाने कालवश झाल्या. त्यांना २००४ साली शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले होते . २००६ सालचा इंदिरा गांधी पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता. तसेच जागतिक स्तरावरील अनेक मोठे पुरस्कार त्यांना मिळाले होते. अमेरिकेत शिकणाऱ्या मतांग मथाई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला होता. त्यांना अपत्ये झाली.नंतर या दांपत्याचा घटस्फोटही झाला.

केनियातील न्येरी शहरात जन्मलेल्या वांगांचे पदवीपर्यंत शिक्षण केनियातच झाले. पुढे पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत झाले.जीवशास्त्र आणि त्यातही पशुवैद्यकशास्त्र हा त्यांच्या खास आवडीचा विषय होता. केनियातील नैरोबी विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट केली. हे करीत असताना पर्यावरण संवर्धन ,स्त्री हक्क व लोकशाही हक्क चळवळीतही त्या कार्यरत होत्या. १९७७ मध्ये त्यांनी ग्रीन बेल्ट ही अभिनव चळवळ सुरू केली.कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात घरापासून करावी हा त्यांचा पिंड असल्याने त्यांनी आपल्याच घराच्या परड्यात काही रोपे लावली. ही रोपेच पुढे संपूर्ण आफ्रिकेत तयार झालेल्या हजारो रोपवाटिकांची प्रेरणास्थाने बनली.

प्रा.वांगारी यांनी झाडे लावण्यासाठी व ती जगवण्यासाठी स्त्रीशक्तीचा चांगला वापर करून घेतला. आफ्रिकेतील अतिशय गरीब कुटुंबातील स्त्रियांना खाजगी अथवा सरकारी जमिनीवर वृक्षारोपण करण्यासाठी रोपे देण्यात आली. ज्या स्त्रीने लावलेले रोप रुजेल तिला प्रोत्साहन पर काही रक्कम दिली जात असे. त्यामुळे वृक्षारोपणा बरोबरच त्याच्या देखभालीवरही लक्ष केंद्रित केले गेले.काही प्रमाणात अर्थार्जन होत असल्यामुळे स्त्रिया मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहाने त्यात सामील होऊ लागल्या. या ग्रीन बेल्ट मोहिमे अंतर्गत तब्बल तीस लाख झाडे लावण्यात आली.

वृक्षारोपण हे स्त्रियांच्या सबलीकरणाचे प्रतीक आहे असे प्रा. वांगारी मथाई ही मानत. पर्यावरण रक्षण व संवर्धन पर्यायाने मानव जातीच्या शांततामय जीवनासाठी अत्यावश्यक आहे ही त्याची भूमिका होती. त्यांना केनियातील तत्कालीन हुकूमशाही राजवटीविरुद्ध संघर्ष करावा लागला . केनियाचे तत्कालीन अध्यक्ष डॅनियल अराप मोइ यांच्या राजवटीत वांगारींना अनेक अत्याचाराना सामोरे जावे लागले. त्यांच्या चळवळीना देश विघातक ठरवले गेले. पण तरीही त्या लढत राहिल्या.

 आफ्रिकन देश परकीय कर्जामध्ये बुडून गेलेले असतात. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. गरीब शेतकऱ्यांच्या आणि सार्वजनिक मालकीच्या जमिनी गिळंकृत करणाऱ्या आफ्रिकेतील उच्च वर्गाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचेही काम त्यांनी हाती घेतले. १९९२ साली राजकीय कैद्यांची सुटका करण्यासाठीही वांगारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नैरोबीच्या एका बागेत उपोषण केले. त्यावेळी त्यांनी पोलिसी अत्याचार सहन करावे लागले होते. पण तरीही प्रा. वांगारी आघाडी मागे हटल्या नाहीत.त्यांनी विविध प्रकारच्या चळवळी केल्या. 

केनियात लोकशाही स्थापन झाली यावर त्या २००२ साली निवडून आल्या .त्यांनी वन व पर्यावरण मंत्री म्हणूनही काम केले. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला  नोबेल मिळाले तेंव्हा होते त्या म्हणाल्या होत्या,एवढी मोठी रक्कम मी आयुष्यात कधी पाहिली नाही. तेव्हा त्याचे काय करायचे हे मी आता सांगू शकत नाही .पण मला एवढे माहित आहे की आमच्या कामाच्या प्रगतीसाठी या रकमेच्या नक्कीच उपयोग होईल .पुढे त्यांनी त्याचा तसाच उपयोग केला .जेव्हा साधन संपत्ती मर्यादित होत जाते तेव्हाच आपण ती मिळवण्यासाठी संघर्ष करतो. म्हणूनच आपल्या साधनसंपत्तीचे नियोजन करण्यासाठी आणि पायाभूत  विकासासाठी आम्ही वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून शांततेची बीजेच रोवत आहोत ही त्यांची भूमिका फार महत्वाची होती.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया