हर्बर्ट स्पेंसर :  बहुविद्या समाजशास्त्रज्ञ 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

२७  एप्रिल हा समाजशास्त्राला ज्ञानशाखा बनवणाऱ्या थोर शास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्मदिन. ‘द स्टडी ऑफ सोसिओलॉजी ‘हा त्याचा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.१८७३  मध्ये त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाचे विद्वानानी मोठे स्वागत केले होते. स्पेन्सर यांनी  या ग्रंथाच्या सुरुवातीस म्हटले होते की, ‘ कदाचित आज विचारवंत समाजशास्त्राला एक विज्ञान म्हणून मान्यता देणार नाहीत.स्वीकारणार नाहीत.कारण निसर्ग नियम व सेवा यांचा प्रभाव समाजावर नसल्याने काही ठराविक समाज व्यवस्थेवरच त्याचा विश्वास आहे.पण कालांतराने समाजशास्त्र ही स्वतंत्र शाखा म्हणून उदयाला येईल याचा मला विश्वास आहे. अर्थातच त्याचा हा विश्वास सार्थ ठरला.अगदी अमेरिकेतही पहिले समाजशास्त्रीय पाठ्यपुस्तक म्हणून या ग्रंथाचा उल्लेख झाला. आणि जगभरच्या विद्यापीठांनी ते आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले. असा हर्बर्ट स्पेंसर २७ एप्रिल १८२० रोजी इंग्लंडमध्ये डर्बीशायर येथे जन्मला आणि ८ डिसेंबर १९०३ रोजी इंग्लंडमध्ये सेक्स परगण्यात ब्राइटन या गावी  कालवश झाला.

बहुविद्याशास्त्रज्ञ,तत्वज्ञानी , मानसशास्त्रज्ञ , जीवशास्त्रज्ञ , समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ अशी बहुविद्या शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातील सर्वात प्रसिद्ध युरोपियन बुद्धिजीवी” असे त्यांना ओळखले जात असे.

स्पेन्सरने भौतिक विश्व , जैव सृष्टी, मानवी मन आणि मानवी संस्कृती आणि समाजांचा प्रगतीशील विकास म्हणून उत्क्रांतीची सर्वसमावेशक संकल्पना विकसित केली.तसेच नीतिशास्त्र, धर्म, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, राजकीय सिद्धांत, तत्वज्ञान, साहित्य, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र अशा अनेक विषयांत सकस योगदान दिले.

१८४८ ते १८५३ या काळात द इकॉनॉमिस्ट या मुक्त-व्यापार नियम कालिकात उप-संपादक म्हणून काम करत असताना स्पेन्सरने १८५१ साली ‘सोशल स्टॅटिक्स  हे पहिले पुस्तक लिहिले. त्यात त्याने म्हटले की मानवता अखेरीस समाजात राहण्याच्या गरजांशी पूर्णपणे जुळवून घेईल आणि परिणामी राज्याचे अस्तित्व नष्ट होईल.१८५५ त्याचे प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी हे पुस्तक प्रकाशित झाले .मानवी मन नैसर्गिक नियमांच्या अधीन आहे आणि ते सामान्य जीवशास्त्राच्या चौकटीत शोधले जाऊ शकते या त्यांच्या मूलभूत गृहीतकावर हे पुस्तक आधारित होते. त्याने इतरही अनेक पुस्तके लिहिली.त्याच्या लेखनाचे जर्मन, इटालियन, स्पॅनिश, फ्रेंच, रशियन, जपानी आणि चिनी आणि इतर अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. त्यांना संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेत सन्मान आणि पुरस्कार देण्यात आले. तो लंडनमधील एक विशेष जेंटलमन्स क्लब, अथेनियमचा सदस्य बनला. ज्यात केवळ कला आणि विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीनाच प्रवेश होता.आणि टीएच हक्सलीने स्थापन केलेल्या नऊ जणांच्या डायनिंग क्लबचाही तो सदस्य बनला. हा क्लब दर महिन्याला भेटत असे आणि त्यात व्हिक्टोरियन काळातील काही प्रमुख विचारवंतांचा समावेश होता.

सेन्सरने आपल्या ग्रंथात उत्क्रांतीचे मध्यवर्ती सूत्र मानले. त्याद्वारे त्याने जीवशास्त्रीय सामाजिक कल्पनांचा सैद्धांतिक दृष्टिकोनातून विचार केला आहे. त्याला बैठक प्राप्त करून दिली आहे. राजकीय अर्थव्यवस्थेतही आढळणारी जीवशास्त्रीय सूत्रे तो विशद करतो. त्याच्या मते, मानवी जीवनात विविध संबंध प्रस्थापित करणाऱ्या आचार विचारांचा आढावा म्हणजे इतिहास.सामाजिक विज्ञानाचे स्वरूप अधिक स्पष्ट करताना स्पेन्सर म्हणतो ,मानवी प्राण्याची सेंद्रिय रचना आणि सामाजिक रचना व कार्यकारण यात समानता असतेच असे नाही कारण कित्येक वेळा त्यात भेद स्पष्ट दिसतात.तर काही प्रसंगी समानता जाणवते .साहजिकच सामाजिक रचनेची घडण अथवा मांडणी आणि कार्ये कायम समान नसतात. त्यात रुपांतरे होतात. परिस्थितीनुसार त्यात बदल होतात .प्रत्येक ठिकाणी त्यात विविधता दिसून येते. म्हणून विज्ञानाच्या कसोटीवर त्यांचे मूल्यमापन न करता जीवनोपयोगी व जीवनाधार ठरलेल्या घटना समाजशास्त्राच्या उभारणीला व विकासाला पोषक ठरतात, असेही त्याने स्पष्ट केले आहे. 

या ग्रंथात स्पेंसरने समाजशास्त्रीय अभ्यासातील अडचणी स्पष्ट केल्या आहेत.कोणत्याही घटनेचे प्राकृतिक स्वरूप त्या घटनेकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन, त्या घटनांचे निरीक्षण करताना प्रस्थापित होणारे संबंध या सर्वांचे निरीक्षण करून स्पेंसर म्हणतो इतर कोणत्याही शास्त्रापेक्षा समाजशास्त्रीय अभ्यासात अशावेळी अनेक अडचणी निर्माण होतात. कारण या घटना सर्वसामान्यपणे सर्वत्र आढळतात. परंतु त्या इंद्रियाना जाणवणाऱ्या नसतात. त्यांचे स्वरूप अनुभवानी आणि बुद्धीने जाणून घ्यावे लागते.घड्याळ, दुर्बिणीप्रमाणे त्यांचे निरीक्षण करता येत नाही. किंवा तापमापकाने मोजमाप करता येत नाही. रसायनशास्त्रातील परिणामाप्रमाणे त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही की जीवशास्त्रीय घटनांप्रमाणे ते विषदही करता येत नाही. म्हणून समाजशास्त्रीय घटनांची ओळख व ज्ञान करून देण्यासाठी आपल्याला काळ ,वेळ व स्थळ यांचे भान ठेवावे लागते. तसेच इतरही काही अडचणी त्याने मांडल्या आहेत.

 कोणत्याही शास्त्रापेक्षा समाजशास्त्र मानवी जीवनाची अनेक अंगांनी व अधिक स्पष्ट ओळख करून देते.समाजाचे सातत्य ,आकस्मितता, गुंतागुंतीच्या कल्पना सर्व समाजांना लागू होतात. हे जाणून घेणे म्हणजे समाजशास्त्राच्या अभ्यासाची गुरुकिल्ली होय. मानवी जीवनाच्या विज्ञानाचे हे परिणत रूप म्हणजे समाजशास्त्र असे मत स्पेन्सरने या ग्रंथात मांडले आहे.समाजशास्त्राला वैज्ञानिक दृष्टीची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात या ग्रंथांने मोठी मदत केली.समाज शास्त्राबद्दलच्या त्याच्या आदराबाबत एके ठिकाणी तो म्हणतो, भक्कम पायावर उभारलेल्या समाजशास्त्राबद्दल मला विलक्षण ओढ आहे. अत्यंत आवड आहे.विसाव्या शतकातील या थोर समाजशास्त्रज्ञाचे विचार महत्त्वाचे आहेत.त्याचे सर्वच विचार पटतीलच असे नाही. पण समाजशास्त्राचा व्यापक अभ्यास करायचा असेल तर स्पेंसरला टाळताच येत नाही हे स्पष्ट आहे.

स्पेन्सरच्या आयुष्यातील शेवटची दशके वाढती निराशा आणि एकाकीपणाने भरलेली होती. तो अविवाहित होता.१९०२ साली यांचे साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. मात्र त्यावेळी ते  जर्मन थियोडोर मॉमसेन यांना दिले गेले होते . त्यांनी अखेर पर्यंत अखंडपणे लेखन केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी लंडनच्या हायगेट स्मशानभूमीच्या पूर्वेकडील भागात कार्ल मार्क्सच्या थडग्यासमोर पुरण्यात आल्या . स्पेन्सरच्या अंत्यसंस्कारात, भारतीय  नेते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्पेन्सर आणि त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रतिवर्षी व्याख्यान  आयोजित करण्यासाठी मोठी देणगी दिली होती.

 (लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया