कन्फ्यूशियस : एक द्रष्टा चिनी तत्वज्ञ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

prasad.kulkarni65@gmail.co

कन्फ्यूशियसहा इसवी सन पूर्व ५५१ ते ४७९  प्राचीन चीन मधील धर्मोपदेशक, समाज शिक्षक सामाजिक व राजकीय तत्वज्ञ अशा अनेक अंगांनी जगभर ख्यातीप्राप्त माणूस होता.चीनचे वैचारिक जीवन समृद्ध करण्यात त्याचा वाटा फार मोठा असल्याचे मानले जाते .प्राचीन जगाच्या संस्कृतीच्या आणि तत्त्वज्ञानाच्या सर्वश्रेष्ठ संस्थापकांमध्ये कन्फ्यूशियसची गणना  केली जाते. त्याच्या विचारांचा प्रभाव चीन प्रमाणे पूर्व आशियाई संस्कृतीमध्ये असल्याचे दिसते.गेली अडीच हजार वर्षे त्याच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव समाजाच्या अनेक अंगावर असल्याचे दिसते.कन्फ्यूशियसवाद  म्हणजे ज्ञान असे समीकरण होऊन गेले होते.

अत्यंत गरिबीत वाढलेला, तरुणपणी आई-वडिलांचे छत्र हरपलेला कन्फ्यूशियस प्रतिकुलतेशी संघर्ष करत शिकला. तत्त्वज्ञ बनला.समाजाला सदर्तनाचे धडे देणारा समाज सुधारक म्हणून त्याने मोठे काम केले. त्याच्या विचारात रूढ धार्मिक कल्पनाना स्थान नव्हते . रूढ अर्थाने तो धार्मिक पुढारी अथवा धर्म संस्थापक नव्हता. पण पुढील काळात सामाजिक नीतिमत्तेच्या त्याच्या विचारांना धर्मनितीचे स्थान दिले गेले. गेल्या अडीच हजार वर्षात तयार झालेल्या अनेक चीनी धर्मग्रंथांच्या अभ्यासक्रमाचा आधार त्याच्या विचारात सापडतो.

कन्फ्यूशियसने अनेक विचार मांडले. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत.(१) जिंकण्याची इच्छाशक्ती, सफलतेसाठीची एकाग्रता आणि कोणतेही काम आपल्या पूर्ण क्षमतेने करण्याची जिद्द या चाव्या तुम्हाला जगातील सर्वात उच्च स्थानी नेण्यासाठी दरवाजा उघडतील. 

(२) जी गोष्ट आपण ऐकतो ती लवकर विसरून जातो जे पाहतो तिला लक्षात ठेवतो पण जी गोष्ट आपण स्वतः करतो ती कायमची स्मरणात राहते.(३) एक चूक झाल्यानंतर जी व्यक्ती सुधारणा करत नाही ती व्यक्ती खरे तर दुसऱ्यांदा चूक करत असते.(४) यशस्विता ही त्या कामासाठी आपण किती तयारी करतो यावर अवलंबून असते. जर ते काम करण्यापूर्वी आपण पुरेशी तयारी केली नसेल तर त्या कामात अपयश येणे हे निश्चित आहे.(५) कधीही न पडणे यात कसलेही मोठेपण नाही उलट सातत्याने पडूनही पुन्हा पुन्हा उठणे हे मोठेपणाचे लक्षण आहे.(६) इतरांचा द्वेष करणे फार सोपे असते पण त्यांच्याशी प्रेमाने वागणे अवघड असते. चांगल्या गोष्टी मिळवणं नेहमीच अवघड असतं मात्र वाईट गोष्टी सहजपणे मिळत असतात.(७) आपण ज्ञान तीन प्रकारे मिळवू शकतो. एक  : चिंतन हा योग्य ज्ञान मिळवण्याचा उत्तम प्रकार आहे. दोन: दुसऱ्याचे अनुकरण करून ज्ञान मिळवता येतं.हा तसा सोपा मार्ग आहे. तीन : आपण आपल्या अनुभवातून ज्ञान मिळवू शकतो ज्ञानप्राप्तीचा हा सर्वात अवघड मार्ग आहे.(८) जर आपली गती कमी असेल तरीही तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. फक्त आपण थांबू नये ही दक्षता घ्या.(९) यशस्वी आणि उत्तम माणूस तोच असतो जो बोलतो कमी आणि काम जास्त करतो.(१०) ज्या कामाची आपल्याला  आवड आहे तेच काम आपल्या चरितार्थासाठी निवडा. त्यानंतर मग आपल्याला कोणतेही काम नाईलाजाने करावे लागणार नाही.(११) वाईट पाहणे आणि ऐकणे हीच वाईटपणाची सुरुवात असते. (१२) जे काम आपण स्वतः करायला राजू नसतो ती दुसऱ्यांना करायला सांगू नये.

चीनमध्ये समाजवादी विचार रुजत असतानाही चीनच्या ग्रामीण जनतेचे त्याच्या विचाराबाबतचे आकर्षण कमी झाले नाही असे दिसून आले. कारण त्याच्या शिकवणुकीत मानवी जीवनाची आदर्श मूल्ये दिसतात. त्याच्या शिकवणुकीतून सद्वर्तनाची स्फूर्ती मिळते. एकमेकांशी कसे वागावे याचे शिक्षण मिळते. जाती-जमातीतील, व्यक्ती व्यक्तीतील, राष्ट्रा राष्ट्रातील संबंधाविषयी त्याचे मार्गदर्शन मोलाचे आहे यावर चिनी माणसांचे एकमत आहे.त्याचा प्रभाव केवळ चीनवर पडला असं नव्हे तर कोरिया, जपान व्हिएतनाम या देशांवरही त्याचा प्रभाव पडला. त्याचे विचार या देशांच्या संस्कृतीचे अंग बनले. जपानमध्ये मध्ययुगीन काळात त्याच्या विचाराला राजश्रय आणि लोकाश्रय  मिळाला. तेथे त्याची मंदिरेही आहेत. कोरियाच्या राष्ट्रध्वजावरील चिन्ह हे कन्फ्यूशियस व कोरिया यांच्यातील सांस्कृतिक संवादाचे प्रतीक मानले जाते. सेऊल येथील त्याचे मंदिर प्रसिद्ध आहे. 

चीनमध्ये ताओवाद, बौद्ध धर्म यांचा प्रसार झाला. पण हा प्रसार होतानाही चिनी लोक स्वतःला कन्फ्यूशियसवादी  म्हणवून  घेत असत.कारण त्याचे विचार हा चिनी जीवनाचा अविभाज्य घटक होता. त्याने मानवा मानवातील संबंधांचे सुंदर विवेचन केलेले आहे.  प्रेमाचे रूपांतर कालांतराने राष्ट्रीय भावनेत होते असे त्याचे मत होते.त्याने कुटुंब संस्था आणि राज्य संस्था याबाबत भूमिका मांडली. ज्याला कुटुंब चालवता येते त्याला राज्य चालवता येते असे तो म्हणतो. मनुष्य व्यवहारी असला पाहिजे. त्याचबरोबर उदात्त , ज्ञानमय, सद्गुणी,जीवन जगण्याची अभिलाशाही त्यांने धरली पाहिजे. असे त्याचे मत होते.

सामाजिक जबाबदारी पूर्ण करताना माणसाला स्वतःची ध्येयपूर्ती साधता आली पाहिजे. आदर्श व्यक्ती व चांगला समाज हे हातात हात घालून वावरतात.त्यामुळे व्यक्तीचे ध्येय साध्य होण्यास मदत होते व समाजात शांतता निर्माण होते असे त्याचे मत होते. राज्यकारभार करणारी माणसे सभ्य, शहाणी आणि सदहेतूने  प्रेरित असावीत असा अतिशय मौलिक विचार त्याने अडीच हजार वर्षांपूर्वी मांडला होता. यावरून त्याच्या प्रचंड दूरदृष्टीची व विचारधारेची कल्पना येते. राजा ईश्वराचा अंश आहे हे त्याला मान्य नव्हते. म्हणून तर तो म्हणाला होता की शासन सत्ता म्हणजे दैवी अधिकाराने सम्राटाला मिळालेली सत्ता नसून मानवी बुद्धी आणि सद्गुण यावर ती अधिष्ठित असते. असे विचार मांडणाऱ्या कन्फ्यूशियसची कीर्ती जगभरात पसरणे उचितच होते.

 (लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया