प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
दांडी यात्रा ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक मार्गदर्शक आणि स्फूर्तीदायक अशी घटना आहे. गुजरात मधील साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी गांधीजीनी दांडीयात्रेला प्रारंभ केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कायदेभंगाच्या चळवळीचा तो श्रीगणेशा होता.१९२८ साली सायमन परत जाअशा घोषणा देत सायमन कमिशनचा भारतीय जनतेने निषेध केला होता. त्यावेळी तेथील बैठकीत महात्मा गांधींनी सरकारचे अन्यायी कायदे मोडण्याचा भारतीय जनतेला हक्क आहे असे सांगितले. कायदेभंगाच्या चळवळीचा ठराव या बैठकीत मंजूर करून तिचे महात्मा गांधी यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले.
३० जानेवारी १९३० रोजी तत्कालीन व्हाईसरॉयल लॉर्ड आयर्विन यांना महात्मा गांधींनी अकरा मागण्यांचे एक पत्र पाठवले होते. त्यातील एक मागणी मीठावर विक्रीकर रद्द करावा याबाबतची होती. समुद्राचे पाणी नैसर्गिक, पण त्यापासून मीठ तयार करायला ब्रिटिश सरकारची परवानगी घ्यावी लागायची. शिवाय तयार झालेल्या मीठावर विक्रीकर ही लादला गेला होता. ही प्रत्येक माणसाला वेदना देणारी बाब होती.मीठ ही प्रत्येक माणसाला लागणारी दैनंदिन स्वरूपाची गोष्ट आहे. तिच्यावर कर बसविणे,ते महाग करणे न्यायाचे नाही ही गांधीजींची धारणा होती. गरिबाला खायला इतर काही मिळाले नाही तर तो मीठ भाकर तरी खातो .त्यामुळे मिठावरील कर रद्द करावा ही भूमिका गांधीजींनी घेतली. मिठाचा कायदेभंग केल्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळेल या हेतूने मिठाचा सत्याग्रह हा कायदेभंगाच्या आंदोलनाचा पहिला विषय ठरला व तसा सत्याग्रह यशस्वी केला गेला.
‘कायदेभंगाच्या चळवळीतला यश मिळाले नाही तर साबरमती आश्रमात परत येणार नाही ‘ अशी प्रतिज्ञा करून गांधीजी दांडी यात्रेला निघाले.दांडी हे साबरमती पासून दोनशे मैल दूरचे छोटे गाव. गांधीजींनी १२ मार्च १९३० रोजी साबरमती पासून आपल्या ७२ अनुयायांसह दांडीयात्रेला प्रारंभ केला. गांधीजींनी व्हाईसरॉय व इतर सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या नियोजित कायदेभंगाबाबतची पूर्वसूचनाही दिली. दांडी यात्रेच्या प्रवासात प्रचारसभा , प्रार्थनासभा होत होत्या .देशभक्तीचे फार मोठे वातावरण तयार होत होते. सर्वत्र गांधीजींचे प्रचंड स्वागत होत होते.दांडीला पोचल्यावर काय होणार याकडे भारतीयांचे नव्हे तर जगातील अनेक देशांचे लक्ष लागलेले होते.
६ एप्रिल १९३० या दिवशी मिठाचा कायदा सामूहिक रीतीने शांततापूर्ण वातावरणात सरकारला पूर्व सूचना देऊन मोडायचा ही गांधीजींची योजना होती. त्याप्रमाणे गांधीजींच्या भाषणांनंतर मोठ्या उत्साहाने पण शांततेने मीठ गोळा करण्यास सुरुवात झाली. पोलिसांच्या तुकड्या व पोलीस अधिकारी तेथे हजर होते.प्रथम गांधीजींनी आणि नंतर निशस्त्र स्वयंसेवकांनी समुद्र काठावरचे मीठ गोळा केले. त्याचे प्रसादासारखे वाटप केले. या सत्याग्रहात भाग घेण्यास शेकडो,हजारो लोक तयार होते. पण छत्तिस अनुयायांच्या पहिल्या तुकडीने त्या दिवशीच्या कायदेभंगात भाग घ्यावा असे ठरले होते .त्याप्रमाणे त्यांनी तसेच केले .पोलिसांनी लाठीहल्ला केला. तुरुंगात नेले तरी कसलाही प्रतिकार करायचा नाही असे ठरले होते. पहिल्या दिवशी पोलीस तटस्थ राहिले. परिणामी कायदेभंगाची सुरुवात शांततेने व अहिंसात्मक मार्गाने झाली.
दांडीप्रमाणे बारडोली, धारासना ,जुहू, विलेपार्ले वगैरे ठिकाणीही ममीठाचा कायदा मोडला गेला. ब्रिटिशांनी धारासना येथे लाठीमार केला .पण ‘ मार लागला तरी मीठ सोडू नका ‘ हे गांधीजींचे आवाहन सत्याग्रहीनी पाळले .कायदेभंगाचे प्रमाण वाढत गेले. गुजरात ,महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश ,बंगाल हा प्रंतात कायदेभंगाला चालना मिळाली. करबंदी व मुद्रण स्वातंत्र्यावरील निर्बंध मोडण्याचीही चळवळ सुरू झाली. तेव्हा सरकारने महात्मा गांधींना व इतर नेत्यांना अटक केली. आंदोलकांवर सशस्त्र हल्ले सुरू केले .पण अखेरीस महात्मा गांधींच्या विजय झाला. कायदेभंगाच्या या चळवळीने लोकजगृतीत फार मोठी कामगिरी केली. महात्मा गांधींच्या अजोड नेतृत्वाने आणि असामान्य प्रतिकार शक्तीमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सोनेरी पान लिहिले गेले. दांडी यात्रा हा त्या सुवर्ण पानावरील एक रत्नजडीत अध्याय आहे. ‘उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया ‘ हे पुढे लिहिले गेलेले शब्द सत्यार्थ ठरले.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा