दिशांतर : दिशाचे अंतरंग उलगडणारा गझल संग्रह 

दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेला आपला दिशांतर संग्रह वाचला. या संग्रहाचे मंचावर प्रकाशन करणाऱ्यांपैकी मीही एक होतो याचा आनंद आहेच.आज संपूर्ण संग्रह वाचला. छान वाचनीय झाला आहे. दिशाचे अंतरंग गझलेतून मांडणारा हा दिशांतर आहे. तसेच तो दिशा आणि गझल यांच्यात अंतर नाही हेही अधोरेखित करणारा आहे. मी समीक्षण, रसग्रहण वगैरेच्या फंदात शक्यतो पडत नाही. तसल्या छंदात रमतही नाही.कारण जे चांगले आहे त्याचे स्वागत व कौतुक करत पुढे गेले पाहिजे ही भूमिका घेऊन मी पुढे जात असतो.न्यूनत्व सार्वत्रिक असते तर पूर्णत्व दुर्मीळ असते हे वास्तव आहे. त्यामुळे गझल विधेत पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करणारे सगळेच मला महत्वाचे वाटतात. हे गझल पंढरीचे वारकरी सुरेश भट नावाच्या विठूच्या दर्शनाला जात असतात. तो मार्ग तंत्र, मंत्र दाखवतो.अर्थात त्याचे यंत्रात रूपांतर होऊ नये याची दक्षता ज्याची त्याने घ्यायची असते.या मार्गावर वृत, लय, यती यांच्यासह अनेकजण भेटत असतात. त्यांचा सन्मान करत पुढे जाणे आवश्यक असते असे मला वाटते.आपण तो प्रयत्न करत यशस्वीपणे पुढे जात आहात याचा आनंद आहे.

मी एकमेव भारी मुलगी जगात होते 

येथे वडील माझे जोवर हयात होते…

अशा अर्पणपत्रिकेने सुरू होणाऱ्या या संग्रहात आई-वडील ,पती-पत्नी, मुलगा मुलगी यासह सर्व मानवी नातेसंबंध, निर्गुण निराकार ते सगुण साकार, सहजता ते गुढता अशा प्रकारची विविधता या गझलांतील शेरांमधून आलेली आहे. एकूणच संग्रह छान जमला आहे. प्रस्तावना, मनोगतही चांगले मुद्देसूद आहे. या दुसऱ्या गझल संग्रहाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. जेव्हा आपल्या नावे दोन गझलसंग्रह येतात तेव्हा गझलकाराची जबाबदारी ही अधिक वाढलेली असते असे मी मानतो. कारण आपण त्याद्वारे किमान दोनशे गझला रसिकांपुढे सादर केलेल्या असतात. संख्यात्मक दृष्ट्या ही फार मोठी कामगीरी असते. कारण खुद्द सुरेश भटांनी तेवढ्या किंवा किंचित जास्त गझला आपल्या समग्र कारकीर्दीत लिहिलेल्या असतात. दुष्यंतकुमार सारखा तर केवळ चाळीस पन्नास गझल लिहून अढळ स्थान प्रस्थापित करत असतो. अशावेळी दोन गझल संग्रह असलेल्यांची जबाबदारी मोठी असते असे मला वाटते.ही गझल विषयक वाढती जबाबदारी पेलण्याची आणि पुढे नेण्याची शक्ती आपल्या लेखनात आहेच ती अधिक वृद्धिंगत होत जावी ही सदिच्छा.

 यातील काही भावलेले शेर…

मनाला स्पर्श झाला तर युती होईलही अपुली

जसा नाहीस तू काटा तशी मी रेशमी नाही….

पडणे, पडून उठणे आयुष्य हेच तर

जातोय तोल त्याला सावर कसे म्हणू….

वाटते भेटून त्याने..रिक्त व्हावे 

मात्र तो क्षण हातचे राहून येतो….

गंधवार्ता जीवनाची आजही कळलीच नाही 

शांततेवाचून दुसरी मागणी उरलीच नाही..

गंधाळू कायम दोघे म्हणू नकोस वेड्यावाणी 

तू ऋतू औटघटकेचा मी हंगामी फुलराणी…..

सुखाची बाह्यरंगाची अशी सांगड नका घालू 

बिचाऱ्या सावकाराची गढी तारण असू शकते…

थांबते घरट्यात वा फिरते गरुड दिसतो तिथे 

घार दर्शन देत नाही कावळा उडतो तिथे…

पाठीमागे त्याच्या जेंव्हा रांगत गेले 

कौतुक माझे समोरच्याला वाटत गेले..

केली नाही कुणी मीमांसा वक्तव्याची

मग मी थोडे अजून खोटे बोलत गेले…

साजरे होईलही म्हातारपण

बाहुली डोळ्यातली अल्लड हवी…

एवढ्यासाठी मला जपतोस का

मी तुझी पुरवायला आवड हवी…

सौदा होईल कसा नेमका माहीत नाही पुढचा 

 फुले घ्यायला भुश्याचा व्यापारी आला आहे…

देहासोबत आत्मा वापर..तुला पाहिजे तेव्हा 

 शृंगराचा उंचावू स्तर … तुला पाहिजे तेंव्हा…

भेद जाणवला मला दोघात केवळ एवढा 

 वेदनेचा अंश म्हणजे पूर्तता सौख्यातली….

गव्हावरचा थवा उडवेल गोफण लाडकी तुमची 

कसा काढाल मुंगीच्या मुखामधला रवा तुम्ही….

खरंतर रोज शृंगारून मी कंटाळले आहे 

दिवाळी वाटण्याकरता सजावे लागते आहे…

ऋतू रंगीत वाट्याला पुन्हा यावेत यासाठी 

दिशा पाहून वाऱ्याला फिरावे लागते आहे…

खोल जखमाही ऋतुनी वेदना विरहित केल्या 

काळजावरचा तडाखा जन्मभर दुखणार आहे…

दुःखात सर्व जिवलग लाजूने दूर केले 

 मनसोक्त हासताना देऊ कुणास टाळी….

वयोवृद्ध तरणा पुराणात होता 

तसे का ययाती सभोवार झाले ….

चुलीवर सौर ऊर्जेच्या मिळाली नोंद सरकारी 

उन्हे अभिजात असल्याचा पुरावा सापडत नाही…

अशीही छान तू दिसतेस आई.. तो जरी म्हणतो 

दिशा मॉडर्न झालेली मुलाला आवडत नाही…

रोज मी उजळेन वाती रात्रभर त्याच्यापुढे 

चांदण्या नाकारणारा पाहिजे कोणीतरी…

खरे स्वप्नातले सारे… अभावाने घडत आहे 

मला तो चुंबतो आहे.. हवा बर्फाळ होऊ दे….

भाग घ्यावा लागतो त्याला सतत स्पर्धेत आता 

जिंकण्याआधी कुणाचा जाच नव्हता कासवाला….

शेवटी इतकीच माझी प्रार्थना आली फळाला 

वादळावर भरदुपारी गारवा मोफत मिळाला….

विनोदाची लहर माझी खटकली नेमकी त्याला

(असो…प्रत्येक गोष्टीची मजा ठरवून येते का…)

चकव्यामध्ये स्वतःचे मन गुंतवून आले 

मी भूल पडणाऱ्या वाटेवरून आले…

दावू नकोस भीती श्र्वासातल्या धगीची 

वेड्या तुझ्या उबेला वणव्यामधून आले..

नाही गरज तुझी.. हे त्याला सुनावताना 

ओठात नाव त्याचे कितीदा चुकून आले….

मी रात्रीची भिस्त कधीही चंद्रावर ठेवत नाही 

आल्याखेरीज जाग उषेला दिवा मालवत नाही…

जन्माने वड असतो म्हणूनी अक्षय वृध्दी होते

दत्तक घेऊन पारंब्या तो घेर वाढवत नाही….

कमजोर दृष्टीची पिढी जन्मायला नको

गर्भात सूर्याची तिरीप रुजवायला हवी….

हा रात्रीचा की दिवसाचा प्रहर कोणता समजू 

झोपडपट्ट्या जाग्या असूनी शहर झोपले आहे…

कसे लगडले काटे त्याला नका विचारू कोणी

निवडुंगाने बिनपाण्याचे मूळ पोसले आहे…

वेगळे जर तुला अत्तर हवे

बाग कुस्कर अजून एखादी…

थांब.. होशील तू जगज्जेता 

हार पत्कर अजून एखादी…

चिंब भिजलो दवामध्ये आपण 

वाफ झाली उन्हात दोघांची…

मोड आले भिजून मातीला 

फार झाले दवा तुझे स्वागत….

आभाळ आत घेते भिंतीमधून खिडकी 

पण ठेवते घराच्या बाहेर ऊन खिडकी…

एकदा कळले तुला हा गंध आवडतो किती 

सोनचाफ्याने स्वतःची दृष्ट काढत राहिले…

टोच्या मारून कोसळला तो तहानलेला पक्षी 

दगडावर पाणवठ्याचे मी चित्र काढले आहे…

चुकतील घाव काही आली दयाबिया तर

तू शिल्प कोरताना काळीज निर्दयी कर…

गझलेचे तंत्र आणि मंत्र छान जमले आहे. आपण स्वतः नव्या पिढीला कार्यशाळेद्वारे गझल शिकवणाऱ्या गझलगुरु आहात. त्याद्वारे गझलविधा पुढे नेत आहात हे महत्वपूर्ण काम आहे. दिशांतरचे मुखपृष्ठ ही सुरेख झाले आहे.छपाई छान आहे.फक्त अनवधानाने ‘मी त्यांच्यासाठी पाऊस घेऊन चालले होते’ही ५५ क्रमांकाची गझल ‘ जाणून घेतले आहे’ या शीर्षकाने पुन्हा क्रमांक ९० वर घेतली गेली आहे. तसेच पाठराखणसुद्धा मलपृष्ठावर आणि  पुस्तकाच्या प्रारंभीही घेतली गेली आहे. शक्यतो ब्लर्बचे लेखन हे केवळ तिथेच दिले जाते. किंवा प्रस्तावनेतील अथवा त्यातील काही अंश मलपृष्ठावर दिला जातो.अर्थात हा संकेत आहे नियम नाही हेही तितकेच खरे. बाकी एक संग्रह म्हणून दिशांतर चांगला आहे. आपल्या पुढील गझल लेखन प्रवासाला माझ्या भरभरून शुभेच्छा.आपली लेखणी अधिकाधिक सशक्त होत राहो ही सदिच्छा….!

ता. क. (हा अभिप्राय मी १० डिसेंबर रोजी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांना व्हाट्सअप वर पाठवला होता. त्यावर त्यांचा “त्यावर काय बोलू सर…आपल्या सारख्या गझलेच्या जेष्ठ श्रेष्ठ जाणकाराकडून शाबासकी मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे, हीच माझ्या पुढील लिखाणाची ऊर्जा आहे.जबाबदारीची जाणीव करून दिल्याबद्दल  मनापासून आभारी आहे सर. ती निभावण्याचा मनापासून प्रयत्न करेन 🙏🏼😊🌹

….सांगितलेल्या त्रुटी लक्षात घेते सर. एकच गझल दोनदा आलीय हे लक्षात आलं होतं. ब्लर्ब बद्दल लक्षात ठेवेन. 🙏🏼” असा अभिप्रायही आला.डॉ.स्नेहल कुलकर्णी यांनीमाझी प्रतिक्रिया आज ता.१२ डिसेंबर रोजी सकाळी समाज माध्यमांवर सार्वत्रिक केली आहे. म्हणून तिचा ब्लॉगवर ही समावेश ,इतकेच.)

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी 

(९८५०८ ३०२९०)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया