प्रताप होगाडे : आदरणीय अभ्यासू नेतृत्व 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

प्रताप गणपतराव होगाडे हे राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व होते.१४ जून १९५०  रोजी जन्मलेल्या प्रतापरावांचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होते. सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष या नात्याने प्रचारात सक्रिय होते. गेले दोन-तीन दिवस व्हायरल तापाचे निमित्त झाले. त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करायचे होते.पण त्यापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ते सोमवार ता.१८ नोव्हेंबर २०२४ रोजी कालवश झाले. त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेले की त्या प्रश्नाची तड लागेल असा सर्वसामान्य माणसांना मोठा विश्वास वाटणारा हा नेता होता. अलीकडेच त्यांना कॉ.दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंचचा अतिशय मानाचा असा गौरव पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानिमित्ताने त्यांना दिले जाणारे मानपत्र मी लिहावे अशी इच्छा काही सुहृदानी माझ्याकडे व्यक्त केली होती. प्रतापरावांशी गेली चाळीस वर्षे माझा जिव्हाळ्याचा स्नेह असल्याने मीही त्याला आनंदाने होकार दिला होता. त्याबाबत चार दिवसांपूर्वी माझे प्रतापरावांशी बोलणेही झाले होते.मात्र त्या कार्यक्रमापूर्वीच त्यांचे निधन झाले. मानपत्र लिहायचे असताना मृत्युलेख लिहावा लागणे ही अतिशय वेदनादायी बाब आहे. पण सतत कार्यरत रहात असताना अनेकवेळा भावनिकतेला बाजूला ठेवावे लागते ही शिकवणही सतत कार्यमग्न असणाऱ्या प्रतापरावांकडूनही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळाली आहे.

ते एक प्रभावी आणि अभ्यासू नेते व वक्ते होते. कोणतेही काम हाती घेतले की ते सूत्रबद्ध रीतीने कसे पार पाडावे आणि त्याचा सतत पाठपुरावा कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे आदराने आम्ही पहायचो. त्यांच्याकडून शिकण्यासारखे व घेण्यासारखे बरेच गुण होते. त्यांना फोन केला की ‘ होठों से छू लो तुम ‘ ही गझल डायल टोनवर ऐकायला मिळायची. कडक इस्त्रीची खादीची पॅन्ट आणि शर्ट, सतत फायलींच्या व कागदपत्रांच्या ढीगाऱ्यात, बहुतांश वेळ हातात जळती सिगारेट असणारे एक कमालीचे कार्यमग्न , चौफेर दृष्टी व समकालीन घडामोडींची अद्यावत माहिती असणारे अतिशय रसिक आणि उमद्या स्वभावाचे त्यांचे व्यक्तिमत्व होते. बैठकीत,चर्चेत त्यांचा अनेकदा शीघ्रकोपीपणाही दिसायचा.पण तितक्याच शीघ्रपणाने ते स्वतः पुढाकार घेऊन वातावरण शांतही करत असायचे. आपला अभ्यासूपणाने मुद्दा मांडताना ते समोर शासन ,प्रशासनापैकी कोणीही असले तरी त्याला खडसावायला कमी करत नसत. आणि तितक्याच तळमळीने तो प्रश्न शांतपणानेही मांडत असत.प्रत्येकाला आपला वाटावा आणि आदर वाटावा असा हा भला माणूस होता.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील बीई पदवी आणि हिंदी राष्ट्रभाषा रत्न पदवी प्राप्त असलेले प्रताप होगाडे गेली पन्नास वर्षे राजकारणामध्ये सक्रिय होते. अभियंता असल्याने त्यांच्या एकूण मांडणीतही एक सूत्रबद्ध शास्त्रीयता , वैज्ञानिकता असायची.  पन्नास वर्षापूर्वी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या लोकसंघर्ष समितीतील सक्रिय सहभागापासून त्यांच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा सुरू झाला. त्यानंतर आणीबाणीत त्यांनी दीड वर्षे कारावास भोगला. जनता पक्ष, जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी पक्ष अशा राजकीय वाटचालीत त्यांनी शहराध्यक्षपदापासून जिल्हा सेक्रेटरी,प्रधान महासचिव , राज्य कार्याध्यक्ष पदापर्यंत वाटचाल करत कामगार ,कष्टकरी ,गरीब, दलित मागास ,अल्पसंख्यांक जनतेचे राजकारण त्यांनी केले. इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक आणि गटनेता म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले.

शासन मान्यताप्राप्त मूल्यांकन कर्ता आणि औद्योगिक व  गृहनिर्माण सल्लागार म्हणून काम करत असतानाच सत्याग्रह, मोर्चे, आंदोलने यांचे एक प्रमुख संघटक म्हणून त्यांनी मोठी कामगिरी केली. इचलकरंजी व परिसरातील डाव्या व पुरोगामी चळवळीचे एकमुखी ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले. यंत्रमाग धारक आणि कामगार या दोघांच्याही प्रश्नांमध्ये संतुलित दृष्टिकोन ठेवून काम करणारे ते समर्थ नेतृत्व होते. लोकहिताच्या प्रत्येक प्रश्नावर अतिशय सखोल अभ्यास करून त्यावर अधिकारवाणीने भाष्य करणारा आणि त्यासाठी महाराष्ट्रभर जनजागरण करणारा ,सतत फिरणारा हा नेता होता. प्रताप होगाडे हे एक माध्यम स्नेही व्यक्तिमत्व ही होते. आपली भूमिका मांडण्यासाठी समाज माध्यमांचा अतिशय सक्रियपणे ते सतत वापर करत असत.

एक प्रभावी राजकारणी व समाजकारणी नेता म्हणून काम करत असतानाच गेली २५ वर्षे वीजतज्ञ म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अतिशय प्रभावी आहे. रस्त्यावरील लढ्यापासून वीज आयोगासमोर हजारोच्या संख्येने हरकती दाखल करून न्यायालयीन लढा देण्यामध्ये ते सतत कार्यरत होते.एन्रॉन ,रिलायन्स,वीज नियामक आयोग, वीजदर, कृषीपंप विज वापर व वीज गळती, वीज वहन व वितरण गळती आकार, सिंगल फेजिंग योजना, लघुउद्योगांवरील स्थिर आकार, मीटर चार्जेस अतिरिक्त पुरवठा आकार, कृषीपंप टेम्पररी कनेक्शन, रिलायन्स एमएलसी परतावा, सर्विस लाईन चार्जेस परतावा, छोट्या घरगुती व्यावसायिकांना घरगुती दराने वीज आकारणी, वीज दरवाढी विरोधातील आंदोलन व राज्य सरकारचे अनुदान ,औद्योगिक वीज दर वाढीवर नियंत्रण, कृषी पंप वीज वापर व वीज गळती इत्यादी विजेबाबतच्या प्रश्नांवर त्यांनी राज्यभर सतत लढे दिले. लोक संघटन केले. शेतकरी व यंत्रमानधारकांना वीज दरात सवलत मिळावी ,पोकळ थकबाकी रद्द करावी यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते कालवश प्रा. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोर अकरा दिवस निदर्शने केली होती व या प्रश्नाची सोडवणूक केली होती.

महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून लाखो वीज ग्राहकांना त्यांनी दिलासा दिला. त्यांनी वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनातून महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना परतावा अथवा बचत रूपामध्ये साडेतीन ते चार हजार कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत. वाढत्या वीज दराच्या माध्यमातून होणाऱ्या पिळवणुकीतून ग्राहकांना एवढी बचत मिळवून देणारे हे भारतीय पातळीवरचे एकमेव उदाहरण असावे. त्यांची वीजतज्ञ ही ओळख या अर्थानेही अतिशय अर्थपूर्ण आहे. वीज प्रश्नांवरचे त्यांचे लेखन हे नेहमीच अतिशय मूलभूत स्वरूपाचे असायचे. वीस वर्षांपूर्वी समाजवादी प्रबोधिनीच्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ या मासिकाच्या फेब्रुवारी २००४  च्या अंकामध्ये त्यांनी ‘ वीज प्रश्नाचे कोसळणारे संकट ‘ हा तीस पानांचा विस्तृत देखील लिहिला होता. नंतर त्याची स्वतंत्र पुस्तिकाही काढण्यात आली त्याला मी प्रस्तावना लिहिलेली होती.ऊर्जा क्षेत्रातील विविध समित्यांचे ते संघटनाचे सक्रिय मार्गदर्शक सदस्य होते. वीज क्षेत्रातील एक आणि एकमेव जाणकार म्हणून त्यांना सर्व थरातून मोठी मान्यता मिळालेली होती. त्यांच्याबरोबर वीज विषयक व्याख्यानांना, चर्चासत्रांना काही वेळा जाण्याची संधीही मला मिळाली. पदवीधर मतदार संघाच्या एक दोन निवडणुकीत त्यांच्याबरोबर मी प्रचारातही हिंडलो होतो. एका निवडणुकीत त्यांच्या अर्जावर मी अनुमोदक म्हणूनही सही केलेली होती.

इचलकरंजी इंजीनियरिंग असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. तेथे त्यांनी चेअरमन म्हणूनही काम केले. उद्योग आणि उद्योजकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते सतत करत. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग धारक संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच इंडियन पॉवरलूम फेडरेशनचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे पारिजात को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, आनंद सहकारी ग्राहक संस्था, उद्योजक सहकारी पतसंस्था, कोल्हापूर जिल्हा सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, इचलकरंजी को-ऑपरेटिव्ह टेक्सटाईल लिमिटेड, आदर्श शिक्षण मंडळ ,क्रांती शिक्षण मंडळ या संस्थांचे ते संस्थापक चेअरमन होते. तसेच इचलकरंजी शहरातील मधुबन निशिगंध व सावली या सहकारी गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. इचलकरंजी को ऑप सिमेंट कंपनी, साधना सहकारी बँक, इचलकरंजी टेक्सटाईल, प्राइड इंडिया टेक्स्टाईल पार्क आदिंच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते.अनेक यंत्रमाग व औद्योगिक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांच्या सक्रिय सहभाग होता. समाजवादी प्रबोधिनीशी त्यांचा स्थापनेपासून जवळचा संबंध होता.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात ख्यातनाम असलेल्या मनोरंजन मंडळाचे ते संस्थापक होते.आपटे वाचन मंदिराचे ते बारा वर्षे कार्यवाह होते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, लोकविज्ञान चळवळ ,सामाजिक कृतज्ञता निधी, साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट ,राज्यस्तरीय नाट्य संमेलन, राज्यस्तरीय शाहीर परिषद, स्त्री मुक्ती यात्रा , राज्य स्तरीय बालकुमार साहित्य संमेलन अशा सर्व उपक्रमात त्यांचे योगदान मोठे होते. इचलकरंजी परिसरातील सर्व सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, सहकारी संस्थांना त्यांचा मोठा आधार वाटत असे. अगदी अलीकडे सुळकुड पाणी योजना कृती समितीचे निमंत्रक म्हणून  त्यांनी या प्रश्नावर मोठे योगदान दिलेले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक ज्येष्ठ अभ्यासू आंदोलन नेता गमावला आहे आणि अर्थातच इचलकरंजी आणि परिसराचा राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक आधारवड कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्नी ,दोन कन्या, जावई ,नातवंडे ,बंधू-भगिनी असा मोठा कौटुंबिक परिवार आहे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन…!

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार, वक्ता म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया