प्रसाद माधव कुलकर्णी
समाजवादी प्रबोधिनी,५३६/१८
इंडस्ट्रिअल इस्टेट,इचलकरंजी(४१६११५)
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
“माझ्या लेखनात सामाजिक संदर्भ कधी सुटत नाही.कालिदास असो नाहीतर हेगेल असो ,ललित कृती असो नाहीतर तात्विक प्रमेय असो, रसव्यवस्थेचे विवेचन असो नाहीतर औदुंबर सारख्या कवितेची समीक्षा असो, मी या सर्वातून कालच्या व आजच्या माणसांची मने समजावून घेण्याचा प्रयत्न करीन. या शोधासाठी माझे लेखन असते. त्यामुळे केवळ स्वतःचे एकाकी मत मी मांडत नाही. माणूस व्यक्ती म्हणून एकाकी असतो हे सत्य आहे. आणि माणसांच्या साध्या किंवा मोलाच्या कृती सामाजिक असतात हेही सत्यच आहे .माझ्या लेखनात ही दोन सत्ये विलग न राहता संवादी राहावी असा माझा प्रयत्न असतो.या संवादासाठीच माझे लेखन असते. “असे लिहिणारे कालवश दि.के. बेडेकर हे विचारवंत, तत्वचिंतक आणि साहित्य समीक्षक म्हणून ख्यातनाम होते.८ जून हा त्यांचा जन्मदिन. दि.के.बेडेकर ८ जून १९१० रोजी जन्मले आणि ३ मे १९७३ रोजी कालवश झाले.
त्यांचे मूळ घराणे टेंभू येथील.त्यांचे वडील अभियंता होते आणि सरकारी नोकरीत कराचीला होते.बेडेकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्याला आणि माध्यमिक शिक्षण इंदूरला झाले.पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे शिकल्यावर त्यांनी कराचीला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.पण त्यात गोडी न वाटल्याने शांतिनिकेतन मध्ये चित्रकलेच्या शिक्षणासाठी गेले .तेही काही कारणाने त्यांना सोडावे लागले. अखेर बनारस हिंदू विश्वविद्यालयातून त्यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयात १९३२ साली बीएची पदवी घेतली. १९३० साली नगर येथील जंगल सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. या दरम्यान त्यांचा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी परिचय झाला .आणि ते कम्युनिस्ट बनले.कामगार चळवळीत ते कार्यरत होते. पुढे राजकीय धोरणांच्या मतभेदामुळे त्यांनी १९५० साली पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षापासून दूर राहण्याचा निश्चय केला.
१९५४ साली पुणे विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची एम. ए. पदवी त्यांनी घेतली. नंतर त्यांनी नाशिकच्या हंसराज ठाकरसी महाविद्यालयात, पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत, वाईच्या मराठी विश्वकोशत काम केले .गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ‘ अर्थविज्ञान ‘ त्रीमासिकाचे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संपादक म्हणून त्यांनी काम केले .या सर्व वाटचालीत१९३५ च्या दरम्यान त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांचे विविध विषयावरचे लेख प्रतिभा, नवभारत, स्त्री,किलोस्कर ,भवितव्य, सह्याद्री चित्रमयजगत ,सत्यकथा अशा विविध नियतकालिकातून येत असत. स्वतंत्र विचाराचे बेडेकर एकांगी नव्हते .मार्क्सच्या द्वंदात्मक जडवादाचा आणि हेगेलच्या तत्वज्ञानाचाही त्यांच्यावर प्रभाव होता.
स्वातंत्र्योत्तर काळात १९५० नंतर मराठीत नवकथा व नवकव्याचा उदय झाला.त्यातून पुढे आलेल्या विचारप्रणालीवर बेडेकरांनी साक्षेपी लेखन केले.त्यांनी सोवियत राष्ट्रे व लोक ,साहित्य निर्मिती व समीक्षा, साहित्य विचार ,हेगेल:जीवन व तत्वज्ञान , संयुक्त महाराष्ट्र, सुमित्रानंदन पंत, जपान,केशवसुतांची काव्यसृष्टी ,आधुनिक मराठी काव्य:उदय-विकास व भवितव्य, समाज चिंतन , अणूयुगातील मानवधर्म, अस्तित्ववादाची ओळख आदि अनेक पुस्तके लिहिली. बेडेकरांचे सर्वच लेखन मानवी सर्जनशीलतेवर विश्वास ठेवणारे आहे. त्यांच्या लिखाणात तात्विकता, गंभीरता आणि चिंतनात्मकता आढळते. सौंदर्यमूल्ये ही इतिहासनिष्ठ नसून सामाजिक परंपरेतूनच निष्पन्न होत असल्याने ती संस्कृतीसापेक्षच असतात.सौंदर्य या कल्पनेवर ज्याची निष्ठा आहे तोच साहित्य आणि कलेचा समीक्षक होऊ शकतो असे ते म्हणत असत. समीक्षा व्यवहार हा सामाजिक ,राजकीय ,आर्थिक व्यवहारांशी जुळलेला असतो ही त्यांची भूमिका होती.त्यांची समीक्षा साहित्य समाज संस्कृती याचा व्यापक पट मांडणारी आहे.
संक्षिप्त मराठी वांग्मय कोशात त्यांच्याविषयी म्हटले आहे, “बेडेकरांच्या लेखनाचा विचार मार्क्सवादी आहे.मानव जातीच्या प्रयत्नशीलतेवर त्यांचा विश्वास आहे. मानवाचा स्वतःवरील विश्वास हे त्याचे बळ आहे अशी त्यांची धारणा आहे. मराठी साहित्याचा व त्यातील प्रवृत्तींचा विचार करताना मराठी साहित्याची निर्मिती बहुतांशी मध्यमवर्गीयांकडून, मध्यमवर्गीय संज्ञेतून झाली असल्यामुळे त्यात नैराश्य, विफलता व दुर्बोधता आहे असे त्यांचे मत होते. मराठी साहित्यात समाजसापेक्ष स्वातंत्र्यकल्पना आली पाहिजे. इतिहासापासून बोध घेऊन साहित्यिकानी विफलता सोडली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. बेडेकर सौंदर्यवादी, जीवनवादी व मार्क्सवादी होते .पण साहित्यिकाने मार्क्सवादाचा पुरस्कार करावा असे त्यांचे म्हणणे नाही. तसेच सौंदर्यवादी असूनही कलावंतांच्या सौंदर्य भावनेचा आणि त्याच्या जीवन विषयक जाणीवांचा संबंध नसतो असेही ते मानत नाहीत .सौंदर्यसाधना ही मानवी जीवनाला सुसंस्कृत व अर्थपूर्ण करणारा व्यवहार आहे अशी त्यांची भूमिका आहे….. मनुष्यावर आणि त्याच्या सर्जकतेवर श्रद्धा असल्यामुळे बेडेकरांचे लेखन हृद्य झालेले आहे .ते विचाराने भारवलेले , प्रमेयदर्शी,चिंतनशील असूनही तत्त्वजड व रुक्ष किंवा क्लिष्ट न राहता प्रसन्न आणि सहज सुंदर वाटते.वाचकांना वैचारिक आणि आंतरिक प्रगल्भता देण्याची विलक्षण ताकद व परिणामकारकता त्यांच्या सर्वच लेखनात आहे.”
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा