स्वस्थतेच्या काल्पनिक दुकानात अस्वस्थतेचे वर्तमान विकले जाते

————————–

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com

आता अठराव्या लोकसभेची अधिसूचना कर कोणत्याही क्षणी जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सतराव्या लोकसभेचे कामकाज तपासले तर या पाच वर्षात एकूण पंधरा अधिवेशने झाली. २७४ बैठका झाल्या आणि दरवर्षी सरासरी ५५ दिवस कामकाज चालले. पूर्ण पाच वर्षे कामकाज करण्याची संधी मिळालेल्या लोकसभेतील कामकाजाचा हा नीचांक आहे. या लोकसभेमध्ये २२१ विधेयके संमत झाली. त्यातील ३५ टक्के विधेयके काही मिनिटांच्या चर्चेने संमत  केली. गेली. तर  ३० टक्के विधेयकावर तीन तासा पेक्षा अधिक काळ चर्चा झाली. एकूण विधेयकांपैकी केवळ १६ टक्के विधेयके स्थायी समित्यांकडे पाठवण्यात आली . वास्तविक स्थायी समिती सर्वपक्षीय खासदार असतात त्यामुळे त्या विधेयकांवर साधक-बाधक चर्चा होत असते. पण तशी संधी न देता सभागृहात बहुमताच्या आधारे किंवा प्रसंगी विरोधकांना निलंबित करून विधेयके मंजूर घ्यायचा सपाटा लावण्याचे प्रमाण या लोकसभेत मोठे होते. या लोकसभेत लोकसभेचे ११५ तर राज्यसभेचे १०२ सदस्य निलंबित  केले गेले होते. महत्त्वाच्या विषयावर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर देण्याचे प्रमाण या लोकसभेत अतिशय कमी होते केवळ  २८ वेळा असे घडले.या लोकसभेत चार हजाराहून अधिक सूचीबद्ध तारांकित प्रश्न विचारले गेले होते त्यापैकी फक्त  २४ टक्के प्रश्नांची उत्तरे दिली गेली. या पार्श्वभूमीवर आपण १८ व्या लोकसभेला सामोरे जात आहोत.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव सुरू आहे.गेल्या ७५ वर्षाची विभागणी ही पहिली ६५ वर्षे आणि नंतरची १० वर्षे अशी करून गेल्या दहा वर्षातच भारत नव स्वतंत्र झाला आहे अशी एक विकृत आणि खोटी मांडणी सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत स्वस्थ आहे की अस्वस्थ आहे याचा किमान विचार करण्याची नितांत गरज आहे. राजकारण हे केवळ आणि केवळ सत्ता स्थापनेसाठीच करायचं असतं अशी नवी मूल्ये रुजवण्यात येत आहेत. लोकशाहीत व्यक्तिवाद प्रचंड वाढवला जात आहे. जातीय द्वेष व धर्मांधता यांच्यात विकृत पद्धतीने वाढ होत आहे. हल्ले ,गोळीबार व असंवेदनशीलता वाढत आहे. स्वतःला साधू-बाबा म्हणवून घेणारे विषारी आणि विखारी वक्तव्य करत आहेत. त्यांचे राजकारणातील वर्चस्व लोकमान्य करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. धर्म आणि राजकारण यांची अनैसर्गिक सांगड घातली जात आहे. महिला,लेखक, कलावंत यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यांचे अपमान केले जात आहेत. आणि अपमान करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. इतिहासातील पळपुट्यायांना शूर आणि शुरांना भ्याड ठरवले जात आहे. भ्याड खुन्याला  शौर्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे .

सभागृहामध्ये अनाकलनीय पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत. सभापती मंडळी मनमानी पद्धतीने वागत आहेत. ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्यांची जाणीवपूर्वक मुस्कटदाबी केली जाते तेथील राज्यपालांचा हस्तक्षेप हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हस्तक्षेप लोकशाहीच्या विरोधी आहे.महापौर पदाच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारीच पक्षपात करून विरोधकांची मते बाद करत आहेत. निवडणूक रोख्यांसारखा लोकशाहीवर गदा आणणारा निर्णय बहुमताच्या आधारावर घेतला जात आहे. मात्र त्याच वेळी न्यायालये सजगपणाने निर्णय देऊन लोकशाही बजावाची भूमिका बजावत आहेत. ही या आश्वस्थपणात स्वस्थपणाची थोडी हमी आहे. नाहीतर स्वस्थतेच्या काल्पनिक दुकानात अस्वस्थतेचे वर्तमान विकले जात आहे हे वास्तव आहे.

अलीकडे शब्दबंबाळ भाषणबाजी आणि त्याच वेळी जाती धर्मावर आधारित व गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी रुंदावणारी विषारी आणि विखारी कृती  केली जात आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांवर हल्ले होत आहेत. शेतकरी आंदोलकांचे खिळे ठोकून मार्ग बंद केले जात आहेत.सरकारी शाळा बंद पडल्या जात आहेत ,रोजगार आक्रसत चालला आहे, महागाई गगनाला भिडते आहे, बळीराजाच्या गळ्याभोवती दोरी आवळली जात आहे. मात्र त्याचवेळी जगण्याच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष हटविण्यासाठी समाजाला धर्म आणि धर्मस्थळांच्या भुलीचा डोस दिला जात आहे. सत्य बोलणाऱ्यांवर हल्ले होत आहेत आणि खोटेपणाचा बडेजाव माजवला जात आहे हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे.या पार्श्वभूमीवर ज्यांच्या धडावर अजून स्वतःचे डोके शाबूत आहे आणि मेंदू , कान, डोळे कार्यरत आहेत अशा माणसांनी या परिस्थितीचा विवेकाने विचार केला पाहिजे.

संविधानिक मूल्यांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण केले जात आहे. राजकिय पक्षाच्या चौकटीत संविधानाला घालण्याचा कृतीकार्यक्रम आखला जात आहे. कोणत्याही ध्वजापेक्षा भारतीय राष्ट्रध्वज हा सर्वश्रेष्ठ आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे.भारतीय तिरंग्यातील केशरी रंग त्याग व धैर्य, पांढरा रंग शांती आणि सत्य आणि हिरवा रंग श्रद्धा आणि संपन्नता अधोरेखित करणार आहे.तसेच त्यातील अशोक चक्राच्या चोवीस आऱ्या बंधुत्व, आरोग्य ,संघटन आदी महत्वाची मानवी मूल्ये सांगतात. स्वातंत्र्य सैनिकाच्या रक्तातून आणि बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यानंतर समग्र भारतीय संस्कृतीचे भान ठेवून तयार केलेली भारतीय राज्यघटना जपायची असेल तर आपल्या तिरंग्याचे महत्त्व पुन्हा पुन्हा प्रस्थापित करणे हाच खरा अमृत काळाचा संदेश आहे. 

वर्तमान भारतीय राजकारण, समाजकारण ,अर्थकारण, संस्कृतीकारण, धर्मकारण या साऱ्याचा वापर करून भविष्य उज्वल करायचे असेल तर या सगळ्याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे. तसेच सत्य आणि असत्य,वाचाळता आणि विवेक, विज्ञान आणि छद्म विज्ञान, विकास मुठभरांचा की सर्वांगिण, हिंसा आणि अहिंसा, मानवधर्म की धर्मांधता, लोकशाही की हुकूमशाही, समाजवाद की माफिया भांडवलशाही, संघराज्य की एकचालुकानीवर्तित्व , मतदार केंद्रितता की व्यक्ती केंद्रितता अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह केला. आणि जगाच्या इतिहासात अनेकदा लोकशक्तीनेच अस्वस्थ वर्तमान बदलून इतिहास घडवलेला आहे. कारण अंतिम सत्ता लोकांची असते. काही लोकांना काही काळ फसवता येतं , काही काळ सर्व लोकांना फसवता येतं, पण सर्व काळ सर्व लोकांना फसवता येत नाही. कारण लोकांचा सामुदायिक शहाणपणावर जगाची आणि भारताची ही वाटचाल झालेली आहे आणि होत राहील यात शंका नाही.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया