दुष्काळ दृश्यतेकडे…



प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com


ऑगस्ट महिना संपल्यानंतर महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे अस्वस्थ चित्र आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपूर्ण भारतात १९०१ पासूनचा सर्वात कमी पाऊस झालाआहे असे म्हटले जाते.प्रशांत महासागरातील एल निनो या उबदार पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता वाढल्याने ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जोरदार पावसासाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात तयार होत असून त्याच्या प्रभावामुळे सप्टेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस पडू शकेल असेही हवामान खात्याने सुचित केले आहे. महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात सरासरीपेक्षा मध्य महाराष्ट्रात एकवीस टक्के कमी, मराठवाड्यात अठरा टक्के कमी, विदर्भात नऊ टक्के कमी पाऊस झाला आहे.कोकणातही पाच टक्के कमी पाऊस झाला आहे.एकूण महाराष्ट्रात प्रतिवर्षी पेक्षा या काळात आठ ते दहा टक्के पाऊस कमी पडल्याने हे संकट तयार झाले आहे. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा अशी जाहीर मागणी आता होऊ लागली आहे. दुष्काळ जाहीर करण्याचे जे निकष असतात ते पाहता सध्या महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे हे नाकारता येत नाही.

या सर्व वातावरणात आज महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट अधिक गहिरे व गडद झालेले आहे. पुरेशा पावसाअभावी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे तर शिवारातील पिकांना पाण्याअभावी तग धरणे अवघड झाले आहे. अनेक शहरांमध्ये पाणी कपात सुरू झाली आहे.ऐन श्रावण महिन्यात टँकरने पाणीपुरवठा काही ठिकाणी सुरू आहे. कोकणात पावसाअभावी भातपीक लोंबू लागलेआहे.मराठवाड्यात सोयाबीन,कापूस अडचणीत आहे. विदर्भात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात फळबागा व इतर पिके सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे.

वास्तविक पाण्याचे दुर्भिक्ष ,दुष्काळाची होरपळ आणि विकसनशीलतेतील विषमता हे परस्परांशी संबंधित प्रश्न आहेत.हे प्रश्न म्हणजे मोठी संकटेच आहेत. ही संकटे केवळ नैसर्गिक, आस्मानी नाहीत तर ती सुलतानी सुद्धा आहेत. दूरदृष्टीच्या अभावाचे नियोजन ,मूळ रोग घालवण्यापेक्षा तात्पुरत्या मलमपट्टीवर भर, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या साऱ्यातून दुष्काळाचे क्षेत्र आणि त्याची तीव्रता वाढत आहे. विकासाचा समतोल कोलमडून आहे रे आणि नाही रे वर्गातील दरी रुंदावत चाललेली आहे.परिणामी सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट वाढलेली आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळ,पाणी नियोजन,पीक पद्धती , सिंचन धोरण, पाणी साठवण क्षमता आदीबाबत विचार करण्याची नितांत गरज आहे.

वर्षभरातील ८७६० तासांसाठी आपल्याला केवळ शंभर तास पडणारा पाऊस पूरवावा लागतो पण आपल्याकडे ड्रेनेजद्वारे ८५ते ९०टक्के पाणी वाया जात असते .जमिनीवर आणि जमिनीखालीही सांडपाण्याचे शुद्धीकरण करणारी सक्षम यंत्रणा आम्ही सार्वत्रिक स्वरूपात उभी करू शकलो नाही. जगातील इतर देश आणि भारत यांच्या साठवणूक क्षमतेतही मोठी तफावत आहे. अमेरिकेत दरडोई ५१६१ घनमीटर , ऑस्ट्रेलियात ४७१७, ब्राझीलमध्ये ३३८६, चीनमध्ये २४८६, दक्षिण आफ्रिकेत ६७८ घनमीटर दरडोई साठवण क्षमता आहे .तर भारतात ती केवळ २०० घनमीटर आहे.

महाराष्ट्रात एकूण पाण्यापैकी ऐंशी टक्के पाणी शेतीला, बारा टक्के उद्योगाला, पाच टक्के घरगुती वापराला आणि तीन टक्के इतर वापरासाठी खर्च होत असते. कालव्यांमधील ६० टक्के पाणी केवळ चार टक्के क्षेत्र असणाऱ्या उसाच्या क्षेत्राला जाते. एकूण पाण्यापैकी ७५ टक्के पाणी ऊस क्षेत्राला जाते .पाणीवाटप विषम आहे. तसेच जलसिंचनाचे केंद्रीकरण होऊन त्याचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात अशास्त्रीय स्वरूपाने होतो आहे. पाणी प्रश्न आणि दुष्काळ यातून सोडवणूक करायची असेल तर सिंचनाचे धोरण बदलावे लागेल.प्रत्येक शेतकऱ्याला किमान एका पिकाला सिंचनाचा लाभ व्हावा, पाण्याचा सुयोग्य आणि नियंत्रित वापर व्हावा ,कमी पाण्यात व कमी दिवसात येणाऱ्या पिकाला प्राधान्य दिले जावे, भूपृष्ठावरील व खालीलही जलसाठ्याचा संतुलीत वापर व्हावा, पिकांचे नियोजन व पीकवार क्षेत्ररचना याचा विचार करण्याची गरज आहे. सिंचन धोरण व्यवस्थित झाले तर प्राप्त पाण्याचा नेमका वापर होऊ शकेल. आणि त्यातून आपली समृद्धताही वाढत जाईल. स्वयंपूर्ण समृद्धतेची कास पकडणे सोपे होईल

अर्थात दुष्काळी परिस्थिती समोर उभी ठाकली आहे म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही .त्याचेही नियोजन करता येऊ शकते व संकटावर मात करता येऊ शकते. महाराष्ट्राला व दुष्काळ भारताला दुष्काळ नवे नाहीत. १९७२च्या दुष्काळासह अनेक दुष्काळ आपण पाहिलेले आहेत.लोकराजे शाहू महाराज यांनी नुकताच कारभार हाती घेतला होता. त्यावेळी म्हणजे १८९६ मध्ये कोल्हापूर संस्थानावर आवर्षण आणि दुष्काळ यांचे संकट उद्भवले होते. त्यावेळी अवघ्या बावीस वर्षाच्या शाहू महाराजांनी एक प्रजाहितदक्ष राजा या नात्याने दुष्काळाचा पद्धतशीर मुकाबला केला होता. दुष्काळात संकटाला भिडण्यासाठी लोकांचे मनोधैर्य वाढावे, या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांना वचक बसावा, दुष्काळी परिस्थितीत लोकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तातडीच्या,कमी मुदतीच्या,दीर्घ मुदतीच्या उपाययोजना त्यांनी आखल्या व अमलात आणल्या होत्या. हे लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर अलीकडे ‘ दुष्काळ आवडे सर्वांना ‘ही स्थिती रूढ होऊ लागली आहे.

या निमित्ताने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,दुष्काळ आणि टंचाई यांच्या व्याख्येमध्ये फरक असतो. दुष्काळी परिस्थितीमध्ये अन्नधान्याची तीव्र टंचाई, खाद्यपदार्थांची तीव्र चण चण आणि उपासमारीची परिस्थिती दीर्घ कालावधीसाठी जाणवत असते. तर टंचाईमध्ये प्रतिकूल हवामान व पावसाचे सरासरी प्रमाण खूप कमी होणे आणि त्यातून अन्नधान्याचे उत्पादन घटणे. तसेच दुष्काळ मोठ्या परिसरात व दीर्घ काळ असतो तर टंचाई मर्यादित क्षेत्रात व काही काळ असते. अर्थात टंचाईची वारंवार परिस्थिती उद्भवत राहिली तर त्यातून दुष्काळ निर्माण होत असतो.

नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न प्रा.डॉ. अमर्त्य सेन यांनी चाळीस वर्षापूर्वी दारिद्र्य ,दुष्काळ आणि उपासमार यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचा अभ्यास पूर्ण सिद्धांत मांडला होता.१९८१ साली प्रकाशित झालेला त्यांचा ‘दारिद्र्य आणि दुष्काळ : सुविधा आणि वंचना ‘हा ग्रंथ जगभर गाजला.कारण त्यांनी त्यात एक नवी सैद्धांतिक मांडणी केली. दक्षनशील देशांमध्ये नैसर्गिक कारणांमुळे दुष्काळ पडतो ही बाब अमर्त्य सेन यांनी नाकारली. बहुतेक विकसनशील देशात दुष्काळ असतो तेव्हा अन्नधान्याची कमतरता नसते.तर लोकांचा त्या अन्नधान्यावर अधिकार नसतो. म्हणजेच त्यांची क्रयशक्ती नसते. म्हणून ते दुष्काळाला बळी पडतात. या पुस्तकात अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे, माझ्या संशोधनानुसार दुष्काळ केवळ अन्नधान्याच्या तूटवड्यामुळे पडत नाही. मुबलक अन्नधान्य असतानाही दुष्काळ पडतो.काहीवेळा तर दुष्काळ म्हणून जाहीर झालेल्या भागातून अन्नधान्याची निर्यातही झालेली आहे. धोरण ठरवण्यात झालेल्या चुकीमुळे ,सामाजिक व आर्थिक विषमतेमुळे वंचित जनतेची क्रयशक्ती हिरावून घेतली जाते. प्रशासकीय व सामाजिक अकार्यक्षमता यामुळे दुष्काळ जास्त पडत असतात. राजा किंवा राजासत्ता सरकार यांच्या राजकीय धोरणांच्या परिणामामुळे दुष्काळ पडत असतो. सार्वजनिक कृतीचा अभाव किंवा चुकीची सार्वजनिक कृती यामुळे ही दुष्काळ पडत असतो. माणसाची अकार्यक्षमता, बेफिकिरी,संपत्तीची भयानक हाव आणि संस्थात्मक अपयश यांचे फलित म्हणजे दुष्काळ असतो. दुष्काळाच्या परिणामांकडे नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपात न बघता सामाजिक अपयशाच्या स्वरूपात पाहिले पाहिजे. महाराष्ट्रावर येऊ घातलेले दुष्काळाचे संकट दूर होवो ही अपेक्षा आहेच.पण दुष्काळ आलाच तर त्याला योग्य विचारांनी व कृतिशीलतेने भिडले पाहिजे.तशी राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती आपण दाखवली पाहिजे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया