पत्रकारांवरील वाढते हल्ले चिंताजनक


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com


न्यायपालिका ,कार्यपालिका, विधिमंडळ या तीन स्तंभाबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे पाहिले जाते .या चारही स्तंभाचे स्वतःचे असे अधिकार क्षेत्र आहे .त्यांनी एकमेकात ढवळाढवळ करू नये असा लोकशाहीचा संकेतही आहे. पण आज सर्व संकेतांप्रमाणे हा संकेतही झुगारून दिला जात आहे. मध्यप्रवाही माध्यमे सत्तेला प्रश्न विचारत नाहीत आणि सत्ताधारी माध्यमांना समोरे जात नाहीत.अशावेळी ही पोकळी पर्यायी समाज माध्यमे भरून काढत असतात .प्रसार माध्यमे ही जनतेचा आवाज म्हणून काम करत असतात. ते काम त्यांनी प्रामाणिकपणे करावे ही अपेक्षाही असते. सत्याचा अनुल्लेख आणि असत्याचा गाजावाजा फार काळ टिकत नसतो .कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचे सामूहिक शहाणपण नेहमीच महत्त्वाचे ठरत आलेले आहे .हा जगभरचा इतिहास आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ १७ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व पत्रकारांनी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली यांना मोठा अर्थ आहे.

पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केले जाणारे दुर्लक्ष याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सर्व संघटनांनी सर्वत्र निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी केली.संरक्षण कायद्याची होळी पत्रकारांना करावी लागावी हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांकडे आणि मध्यमकर्मी यांच्याकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन काय आहे ?हे स्पष्ट करते. पत्रकारांवर हल्ला झाला तरी या कायद्याचे कलम लावायला टाळाटाळ केली जाते. हा कायदा चार वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्यानंतरही दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले. त्यातील केवळ सदतीस प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली गेली. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा आहे. हा हल्ला सिद्ध झाला तर हल्ले खोराला तीन वर्षे शिक्षा, पन्नास हजार रुपये दंड आणि सर्व प्रकारची नुकसान भरपाई भरून द्यावी लागते. पण राजकीय दबावामुळे अनेक वेळा असे गुन्हे दाखल केले जात नाही असे दिसते. राजकारण आणि गुन्हेगारी यांच्या एकत्रीकरणातून पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण आणि धारिष्ट वाढत चाललेले आहे. याचा निषेध म्हणूनच पत्रकारांनी या कायद्याची होळी केली.

आमदारांनी पत्रकारांना धमकावणे आणि त्यांच्या गुंडानी मारहाण करणे हा प्रकार पाचोरा येथे घडला. काही महिन्यांपूर्वी राजापूर येथे शशिकांत वारीसे या पत्रकाराची अंगावर गाडी घालून दिवसाढवळ्या हत्या केली गेली होती. कणेरी मठामध्ये मृत्यू पावलेल्या गाईची बातमी करण्यासाठी गेलेल्या एका वहिनीच्या पत्रकारालाही मारझोड
करण्यात आलेली होती. असे प्रकार अलीकडे वाढत चाललेले आहेत हे चिंताजनक आहे.पत्रकारांवरील हल्ला हा मस्तवाल झुंडशाहीने संवैधानिक लोकशाही वर केलेला हल्ला असतो.तसेच तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य व माध्यम स्वातंत्र्यावरही हल्ला असतो. जागतिक माध्यम स्वतंत्रता सुचकांकात आपला भारत दरवर्षी खालावत चालला आहे.यावर्षी आपला त्यामध्ये जगातील १४२वा क्रमांक आहे. लोकसंख्येपासून अर्थव्यवस्थेच्या आकारापर्यंत सर्वत्र वाढीची चर्चा होत असताना माध्यम स्वातंत्र्या बाबतची ही घसरण अतिशय वाईट आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
आहे.

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य घटनादत्त आहे. आपले विचार संवेदना आणि भावना व्यक्त करणारे हे स्वातंत्र्य नैसर्गिक आहे. माणूस, प्राणी, याबरोबरच वनस्पतीही अभिव्यक्ती जोपासत असतात. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. राज्यघटनेच्या मूलतत्त्वात स्वीकारण्यात आलेल्या लोकशाही संकल्पनेचा आशय आणि पल्ला प्राथमिक लोकशाहीकडून सहभागी लोकशाही कडे जाणारा आहे. मात्र तसे असले तरी प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात लोकशाहीची परवड सुरू झाली आहे .माध्यमांवर अंकुश ठेवण्याची विकृती वाढत जाणे हे नेहमीच हुकूमशाहीचे द्योतक असते.

न्यूज आणि फेक न्यूज या दोघांचा समाज माध्यमांवर वावर असतो. एकीकडे फेक न्युज वणव्यासारख्या पसरवण्याचं काम प्रसार माध्यमे करत असतात आणि त्याचवेळी दुसरीकडे समाज माध्यमांमुळे एखादी सत्य बातमी दडपता ही येत नाही हे वास्तव आहे. आज वाचकांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना वास्तवापासून दूर होण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत आहे. आज वृत्तपत्रांबाबत काही वृत्तपत्रे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबावाखाली कार्यरत असली तरी वृत्तपत्र ही लोकविश्वासाला उतरलेली माध्यमे आहेत यात शंका नाही. लोकशिक्षणाचे प्रभावी काम करून समाज परिवर्तनाचे साधन बनवण्याची वृत्तपत्रांची मोठी क्षमता असते. समाजासमोरची सर्व प्रकारची आव्हाने वाढत आहेत .सामाजिक विषमता व दुरावस्था वाढते आहे .म्हणूनच प्रबोधनाच्या प्रवासात सर्वात समर्थ माध्यम म्हणून वृत्तपत्राचे महत्त्व आणि योगदान मोठे आहे .’ इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ‘हा आगरकरी बाणा पत्रकारितेत गृहीत धरलेला आहे .लोकांचा आजही छाप्यावर विश्वास आहे.म्हणूनच पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे या पत्रकारांच्या भूमिकेला प्रत्येक सजग नागरिकाने पाठिंबा दिला पाहिजे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेली अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.आणि कवी, गझलकार ,वक्ते आहे. )

यावर आपले मत नोंदवा

Design a site like this with WordPress.com
सुरु करूया